जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक 272/2014 तक्रार दाखल करणेत आलेची तारीखः- 29/06/2014.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-03/11/2015.
तानाजी केशवराव भोईटे,
उ.व.सज्ञान, धंदाः समाजकार्य,
रा.प्लॉट नं.1, पिंप्राळा रोड,भोईटे नगर,
जळगांव,ता.जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
युनीट हेड,
क्रॉम्प्टन ग्रिव्हज लिमिटेड,
दिक्षीतवाडी,जिल्हापेठ,जळगांव. ......... सामनेवाला.
कोरम-
श्री.विनायक रावजी लोंढे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदारातर्फे श्री.विनोद सु इंगळे वकील.
सामनेवाला तर्फे श्री.जयंत बी.मोरे वकील.
निकालपत्र
व्दारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्षः
1. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी चुकीची विद्युत देयके देऊन द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवली आहे व अनधिकृतपणे विद्युत प्रवाह खंडीत केला आहे म्हणुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी व विद्युत प्रवाह करण्यासाठी दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणेः-
2. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडुन त्यांचे नावावर विज जोडणी घेतली आहे. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार हे 30 वर्षापासुन सदर जागेत राहत आहेत. गेल्या 7 वर्षापासुन तक्रारदार हे सदरील जागेत अल्प कालावधीकरिता राहतात. तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे मे,2012 पर्यंत विद्युत देयके दिली आहेत. तक्रारदार हे विजेचा वापर अतिशय काटकसरीने करतात. तक्रारदार हे वकील व समाजसेवक असल्याने त्यांना बचतीचे महत्व माहीती आहे. तक्रारदार हे सद्यस्थितीत विद्युत मिटर घेतलेल्या जागेत राहत नाहीत. तक्रारदाराचे कुटूंबीय अत्यल्प काळाकरिता सदरील जागेत राहतात. माहे जुलै,2013 पासुन सामनेवाला यांनी तक्रारदार यांना मोठी तफावत असलेली विज बिले पाठविली. विज जोडणीचे मिटर बंद आहे व ते आकडे दाखवत नाही अशी स्थिती असतांनाही सामनेवाला यांनी तक्रारदार यांना अवाजवी बिले दिली आहेत. तक्रारदार यांनी दि.3/10/2013 रोजी अर्ज पाठविला आहे. तक्रारदाराचा वापर हा 100 युनीट इतका आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे तक्रार केल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली व पाहणी अहवाल तयार करण्यात आला. सदरील रिपोर्ट मध्ये विजेचा वापर हा घरात असलेली उपकरणे लक्षात घेऊन दाखविण्यात आला आहे. प्रत्यक्ष विजेची उपकरणे घरात असली तरी तक्रारदार हे अत्यल्प कालावधीसाठी घरात राहतात त्यामुळे वापर हा चुकीचा दाखविण्यात आलेला आहे. माहे जुलै,2013 मध्ये अवास्तव बिल सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दिले आहे. अवास्तव बिल असल्यामुळे तक्रारदार यांना मनस्ताप सहन करावा लागला. सामनेवाला हे विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे तयारीत आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना वेळोवेळी संपर्क केला परंतु सामनेवाला यांनी दखल घेतली नाही. सबब तक्रारदाराने अशी विनंती केली आहे की, सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दुरुस्त विजेचे देयक देववावे व सामनेवाला यांनी विद्युत प्रवाह खंडीत करु नये असे निर्देश देण्यात यावेत, तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी व खर्चापोटी रु.40,000/- देण्याचे आदेश व्हावेत.
3. सदरील तक्रारीसोबत तक्रारदाराने अंतरीम आदेश मिळण्यासाठी अर्ज दिला होता त्यावर तत्कालीन मंचाने तक्रारदाराने वादातील बिलापोटी रु.21,230/- तात्काळ भरण्याचे निर्देश दिले व सदरील बिल भरल्यानंतर तक्रारीचा निकाल लागेपावेतो विज पुरवठा खंडीत करु नये असे निर्देश दिले.
4. सामनेवाला हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी लेखी खुलासा दाखल केला. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत ही बाब मान्य आहे. तक्रारदारास दि.8/10/1989 रोजी घरगुती वापराकरिता विद्युत प्रवाह दिलेला आहे. सामनेवाला यांनी 1 नोव्हेंबर,2011 पासुन कराराव्दारे विज वितरण करण्याचे काम हाती घेतले आहे. ग्राहकांनी वापरलेल्या युनीटप्रमाणे बिले तयार करणे व ते वसुल करणे हे काम सामनेवाला करतात. तक्रारदाराचे वास्तव्य वादातील मिळकतीत नाही किंवा अल्प प्रमाणांत आहे ही बाब सामनेवाला यांनी नाकारलेली आहे. तक्रारदाराने वापरलेल्या विजेची गणना करण्याकरिता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निर्देशीत केल्यानुसार तक्रारदाराचे घरात विज मिटर बसविलेले आहे. सदरचे मिटर प्रमाणीत असते व विज वापर युनीटची अचुक नोंद घेतात. सदरील विज वापराप्रमाणे युनीट दर्शविले जातात व तशी नोंद होते. तक्रारदाराने वापरलेले युनीट लक्षात घेतले असता ते सदरील मिळकतीत अत्यल्प कालावधीकरिता राहतात ही बाब मान्य करण्यासारखी नाही. तक्रारदाराचे मिटर मध्ये दोष असल्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराला ऑक्टोंबर,2011 ते ऑगष्ट,2012 या कालावधीकरिता तक्रारदाराच्या मागील एका वर्षाच्या विज वापराप्रमाणे दरमहा 44 युनीट चे बिज दिले. त्यानंतर सप्टेंबर,2012 मध्ये तक्रारदाराचे विज मिटर बदलविण्यात आले. तक्रारदाराने सरासरी विज बिल येत असल्यामुळे त्यांनी ऑक्टोंबर,2011 ते ऑगष्ट,2012 या कालावधीत सामनेवाला यांचेकडे कोणतीही तक्रार नोंदविली नव्हती अगर विज मिटर बदलण्याबाबत कळविले नव्हते. सामनेवाला यांचे निर्दशनास सदरची बाब आल्यानंतर विज मिटर बदलले आहे. विज मिटर बदलल्यानंतर ऑक्टोंबर,2012 मध्ये तक्रारदाराला तंतोतंत मिटर वाचन घेऊन विज बिल देण्यात आले. सदरचे विज मिटर तक्रारदाराच्या घराच्या दर्शनी भागात लावलेले नसल्यामुळे विज मिटरचे वाचन उपलब्ध झाले नाही त्यामुळे नोव्हेंबर,2012 ते जानेवारी,2013 या 3 महीन्याचे कालावधीत तक्रारदाराला दरमहा 78 युनीट सरासरी विज वापराचे बिल देण्यात आले तथापी पुढील महीन्यात म्हणजेच फेब्रुवारी,2013 मध्ये तक्रारदाराचे मिटर वाचन आले त्यामध्ये तक्रारदाराचा एकुण विज वापर 2019 युनीट होता त्यामुळे सामनेवाला यांचे संगणक प्रणालीव्दारे ऑक्टोंबर,2012 चे चालु रिडींग 165 युनीट, फेब्रुवारी,2013 चे मागील रिडींग धरुन व मिटर वाचनाप्रमाणे फेब्रुवारी,2013 चे चालु रिडींग 2184 घेऊन तक्रारदारास नोव्हेंबर,2012 ते फेब्रुवारी,2013 या 4 महीन्याचे 2019 युनीटचे विज बिल देण्यात आले. तक्रारदारास नोव्हेंबर,2012 ते जानेवारी,2013 या 3 महीन्याच्या कालावधीत सरासरी विज बिल दिल्यामुळे फेब्रुवारी,2013 चे विज बिलात रु.1,010/- ची वजावट करुन देण्यात आलेली आहे. मिटर वाचनाप्रमाणे तक्रारदारास नियमित बिले देण्यात येत आहेत. तक्रारदाराने दि.21/3/2013 रोजी विज मिटर तपासणीकरिता जो अर्ज दिला त्याची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या वेळेस तक्रारदाराचे घरात दिवे 2, सी.एफ.एल.5, पंखे 4, टयूब लाईट 2, टी वी 1, संगणक 1, वातानुकूलीत संच 2, डबल डोअर फ्रीज 1, पाण्याचा पंप 1, इनर्व्हर्टर 1 इत्यादी उपकरणे असल्याचे आढळुन आले. विज मिटर वाचनाप्रमाणे सामनेवाला यांनी दिलेली बिले अत्यंत वाजवी व योग्य आहेत. तक्रारदाराने दिड वर्षापासुन कोणतीहीरक्कम विज वापरापोटी भरलेली नाही व चालु बिलात थकीत दिसत आहे. सामनेवाला हे तक्रारदार यांना चांगली सेवा देण्यात तत्पर असतात. तक्रारदाराने वापरलेल्या युनीट प्रमाणे बिल देण्याची जबाबदारी तक्रारदारावर आहे ती त्यांनी पार पाडलेली नाही. तसेच मार्च,2013 ते जुलै,2013 या कालावधीत तक्रारदाराचा विज वापर मोठया प्रमाणांवर झाल्याचे दिसुन येते. तक्रारदाराकडे विद्युत बिलांपोटी थकीत रक्कम आहे ती तक्रारदाराने भरलेली नाही. सामनेवाला यांनी बसविलेल्या विद्युत मिटरचे वाचन तंतोतंत दर्शवीत आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्य व वाजवी बिले दिलेली आहेत. तक्रारदारास द्यावयाचे सेवेत कोणतीही त्रृटी ठेवलेली नाही. तक्रारदार यांना दिलेल्या विद्यूत मिटर मध्ये दोष नाही. सबब तक्रारदाराची तक्रार रद्य करण्यात यावी.
5. तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे तसेच सामनेवाला यांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. तक्रारदाराने लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे. सामनेवाला यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदाराने तक्रारीसोबत विद्युत देयके दाखल केलेली आहेत त्यांचे अवलोकन केले. न्याय-निर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदारास चुकीची विद्युत देयके देऊन
द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवली आहे ही बाब तक्रारदाराने शाबीत
केली आहे काय ? नाही.
2) तक्रारदार हे तक्रारीत केलेली मागणी मिळण्यास
पात्र आहेत काय ? नाही.
3) कोणता आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसाः
मुद्या क्र. 1 ते 3 ः
6. तक्रारदार यांनी त्यांचे लेखी युक्तीवादामध्ये असे नमुद केलेले आहे की, विद्युत जोडणी त्यांचे नावावर घेतली आहे. सदरील घरामध्ये तक्रारदार हे अत्यंत कमी कालावधीसाठी राहतात. त्यांचा विजेचा वापर कमी आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना चुकीची विद्युत देयके दिलेली आहेत. तसेच सामनेवाला यांनी बसविलेले मिटर फॉल्टी आहे. तक्रारदाराचे घरात कोणीही राहत नाहीत ते विजेवर चालणा-या वस्तुंचा वापर करीत नाहीत. सामनेवाला यांचे कृतीमुळे तक्रारदारास मनस्ताप सहन करावा लागला. सामनेवाला यांनी दिलेले बिल हे चुकीचे आहे व अवास्तव बिल कमी करुन देण्याचे निर्देश देण्यात यावेत.
7. सामनेवाला यांचे वकीलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार हे स्वतः व्यवसायाने वकील आहेत व ते ज्या मिळकतीमध्ये राहतात तेथे विद्युत प्रवाह घेतलेला आहे. तक्रारदाराने त्यांचे घरात नमुद केलेल्या कालावधीमध्ये अल्प काळाकरिता राहतात ही बाब सिध्द केलेली नाही तसेच तक्रारदार हे उर्वरीत कालावधीत कोणत्या ठिकाणी राहतात हे नमुद केलेले नाही. तक्रारदार हे सदरील मिळकतीत त्यांचे कुटूंबासमवेत राहतात. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना पुरविलेले मिटर हे अत्यंत चांगल्या प्रतीचे आहे त्यामध्ये तपासणी केली असता कोणताही दोष आढळुन आलेला नाही. तसेच सामनेवाला यांचे वकीलांनी असाही युक्तीवाद केला की, तक्रारदार यांना नोव्हेंबर,2012 ते जानेवारी,2013 या तीन महीन्याच्या कालावधीत मिटर दर्शनी भागात न लावल्यामुळे वाचन उपलब्ध झाले नाही त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दरमहा 78 युनीट वापराप्रमाणे सरासरी बिल दिले परंतु फेब्रुवारी,2013 मध्ये मिटर वाचन घेतल्यानंतर तक्रारदाराने एकुण विज वापर 2019 युनीट चा केला होता आणि संगणक प्रणालीव्दारे ऑक्टोंबर,2012 चे चालु रिडींग 165 युनीट, फेब्रुवारी,2013 चे मागील रिडींग धरुन व मिटर वाचनाप्रमाणे फेब्रुवारी,2013 चे चालु रिडींग 2184 घेऊन तक्रारदाराला नोव्हेंबर,2012 ते फेब्रुवारी,2013 या 4 महीन्याच्या कालावधीचे 2019 युनीटचे बिल देण्यात आले होते. नोव्हेंबर,2012 ते जानेवारी,2013 या 3 महीन्याच्या कालावधीत सरासरी विज बिल देण्यात आले होते. तक्रारदाराने भरलेली रक्कम वजावट करुन तक्रारदार यांना योग्य व वाजवी बिल दिले आहे व तशी सी.पी.एल.मध्ये नोंद केली आहे. तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर त्याच्या घरात विज वापर किती होतो ? याची पाहणी केली असता व विज वापरावर चालणारी किती उपकरणे आहेत ? याची पाहणी केली असता, तक्रारदाराकडे दिवे 2, सी.एफ.एल.5, पंखे 4, टयूब लाईट 2, टी वी 1, संगणक 1, वातानुकूलीत संच 2, डबल डोअर फ्रीज 1, पाण्याचा पंप 1, इनर्व्हर्टर 1 इत्यादी मोठया प्रमाणांवर विद्युत वापरावर बसविलेल्या वस्तु दिसुन आल्या. सदरील वापर लक्षात घेता सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे वापराप्रमाणे व मिटर रिडींग प्रमाणे बिले दिलेली आहेत. तक्रारदार यांना या मंचापुढे असा कोणताही पुरावा दाखल केला नाही की, ज्याअन्वये तक्रारदार हे सदरील उपकरणाचा वापर करीत नाहीत असे सिध्द होते. मिटर तपासणी केली असता मिटर हे योग्य वापर करीत असल्याचे निर्दशनास आले आहे. तक्रारदाराची तक्रार रद्य होण्यास पात्र आहे.
8. तक्रारदार व सामनेवाला यांचा युक्तीवाद लक्षात घेतला. तसेच पुराव्याचे शपथपत्र व दस्तऐवजांचे अवलोकन केले. तक्रारदाराने त्याचे तक्रारीमध्ये असे नमुद केलेले आहे की, ते ज्या घरजागेत मिटर बसविलेले आहे तेथे कमी वास्तव्य करतात., ही बाब तक्रारदाराने प्रथमदर्शनी शाबीत करणे गरजेचे होते. तक्रारदार हे इतर कोणत्या ठिकाणी राहतात याबाबत तक्रारदाराने त्यांचे तक्रारीत कुठेही स्पष्ट उल्लेख केलेला नाही. तसेच तक्रारदार हे त्यांचे कुटूंबीयासमवेत इतर कोणत्या ठिकाणी राहतात त्या जागेचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही त्यामुळे तक्रारदार हे ज्या घर जागेत मिटर बसविलेले आहे तेथे फारच अल्प कालावधीकरिता राहतात असे गृहीत धरता येणार नाही.
9. तक्रारदाराचे कथन की, सामनेवाला यांनी बसविलेले मिटर फॉल्टी आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराने तक्रारी केल्यानंतर मिटरची तपासणी केली आहे व मिटरमध्ये कोणताही दोष नाही तसेच तक्रारदार यांना नवीन मिटर बसवुन दिलेले आहे व त्याचे वाचन योग्य येत आहे ही बाब निर्दशनास आणुन दिलेली आहे. तक्रारदार यांना सप्टेंबर,2012 मध्ये विज मिटर बदलुन देण्यात आलेले आहे तसेच असेही लक्षात येते की, तक्रारदारास सदरचे मिटर बसवुन दिल्यानंतर सरासरी विद्युत रिडींग प्रमाणे बिले देण्यात आलेली आहेत. त्याबाबत तक्रारदाराने कोणतीही तक्रार सामनेवाला यांचेकडे केली नाही. सदरील बाब लक्षात आल्यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदार यांना मिटर बदलुन दिले आहे. तसेच सप्टेंबर,2012 मध्ये नवीन मिटर बसवुन दिल्यानंतर तक्रारदाराला विज वापराप्रमाणे विद्युत देयके दिलेली आहेत. तसेच असेही लक्षात येते की, नोव्हेंबर,2012 ते जानेवारी,2013 या तीन महीन्याच्या कालावधीकरिता मिटर दर्शनी भागात बसविलेले नसल्यामुळे वाचन उपलब्ध होऊ शकले नाही त्यामुळे सदरच्या तीन महीन्याच्या कालावधीकरिता दरमहा 78 युनीट प्रमाणे विद्युत देयके दिलेली आहेत. तक्रारदाराचे घरात बसविलेल्या मिटरचे वाचन फेब्रुवारी,2013 मध्ये घेण्यात आले त्यावेळेस विज वापर 2019 युनीट इतका आढळुन आला. अगोदर तीन महीन्याचे दरमहा सरासरी युनीट प्रमाणे दिलेली विद्युत देयके व त्यापोटी तक्रारदाराने भरलेली रक्कमेची वजावट करुन तक्रारदारास मिटर वाचनाप्रमाणे विद्युत देयक दिलेले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराचे घरात जे विद्युत मिटर बसविलेले आहे त्यात कोणताही दोष आढळुन येत नाही व मिटर हे योग्य प्रमाणांत विद्युत वापराप्रमाणे नोंद घेत आहे असे निर्दशनास येते. तक्रारदार यांनी त्यांचे युक्तीवादात मिटर फॉल्टी असल्यामुळे सामनेवाला यांचेकडे वेळोवेळी तक्रारी केल्या, अर्ज केले त्याची दक्षता घेतली नाही असे नमुद केलेले आहे तसेच विज मिटर बदलुन देण्याचे आदेश देण्यात यावेत अशी विनंती केली आहे. तक्रारदाराला सदरील विद्युत मिटर बदलुन हवे असल्यास तसा रितसर अर्ज त्यांनी सामनेवाला यांचेकडे देऊन मिटर तपासुन घेऊन मिटर बदलाची कार्यवाही करता येते. तक्रारदाराचे कथन की, ते अत्यल्प कालावधीकरिता राहतात. या अगोदरच ही बाब सिध्द केलेली आहे की, ग्राहक जागेत अत्यल्प कालावधीकरिता राहतो हे सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारदारावर आहे. तक्रारदाराला दिलेले विद्युत मिटर मध्ये कोणताही दोष नाही., असे असल्यास ज्या प्रमाणांत विद्युत वापर होतो त्याचे प्रमाणात मिटर मध्ये वाचन दर्शविले जाते. तक्रारदार यांना नंतर देण्यात आलेल्या बिलांचे अवलोकन केले असता, व त्यांनी वापरलेले रिडींग पाहता तक्रारदाराचा वापर अत्यल्प आहे असे म्हणता येणार नाही. तक्रारदाराच्या घरात असलेली विद्युत उपकरणे लक्षात घेतली असता, व त्याचा वापर लक्षात घेतला असता, सामनेवाला यांनी तक्रारदार यांना चुकीची विद्युत देयके देऊन द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवलेली आहे असे निष्कर्ष काढणे उचित होणार नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारास पुरविलेल्या मिटरमध्ये कोणताही दोष नाही. तसा दोष असल्यास तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे रितसर अर्ज देऊन मिटर तपासणी करुन घेणे उचित होईल. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या घरात नवीन विद्युत मिटर बसविलेले आहे व सदरील मिटर हे सुस्थितीत असुन योग्य रिडींग दर्शवित आहे असे निर्दशनास येते. तसेच तक्रारदाराने दाखल केलेली बिले व सामनेवाला यांचा युक्तीवाद लक्षात घेतला असता, तक्रारदाराने नियमित विद्युत देयके भरलेली नाहीत त्यामुळे विद्युत देयकामध्ये थकबाकी दर्शविलेली आहे. या मंचाने अंतरीम आदेश दिल्यानंतर तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे रु.21,230/- दि.22/7/2014 रोजी भरल्याचे निर्दशनास येते. तक्रारदाराने एप्रिल,2014 चे बिल दाखल केलेले आहे. तक्रारदाराचा वापर लक्षात घेतला असता तक्रारदाराने 392 युनीट विद्युत वापर केल्याचे लक्षात येते. तसेच तक्रारदाराकडे थकबाकी दर्शवण्यात आलेली आहे. विद्युत वापरत असलेल्या ग्राहकाने दरमहा त्यांनी वापरलेल्या विद्युत युनीट प्रमाणे व बिलात नमुद केल्याप्रमाणे रक्कम भरणे अभिप्रेत आहे. जर बिलासंबंधी काही तक्रार असेल तर, तो वाद ते सामनेवाला यांचेकडे उपस्थित करु शकतात. तक्रारदाराने त्यास पुरवण्यात आलेले मिटर फॉल्टी आहे याबाबत कळविल्याचे निर्दशनास येत नाही. सामनेवाला यांनी तक्रारदाराला नवीन मिटर बसवुन दिले व विद्युत वाचनाप्रमाणे तक्रारदाराला बिल दिले आहे. तक्रारदाराचे घरात असलेली विद्युत उपकरणे लक्षात घेतली असता, तसेच तक्रारदारास नोव्हेंबर,2012 ते जानेवारी,2013 या 3 महीन्यात दरमहा सरासरी विज वापराचे बिले दिल्यामुळे व प्रत्यक्ष मिटर वाचन फेब्रुवारी,2013 मध्ये घेतल्यामुळे सदरील कालावधीत तक्रारदाराने प्रत्यक्ष वापरलेल्या विज रिडींग प्रमाणे विद्युत देयक दिलेले आहे. सदरील विद्युत देयक हे नियमाप्रमाणे व तक्रारदाराने वापरलेल्या युनीटप्रमाणे दिलेले आहे त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदार यांना चुकीची विद्युत देयके देऊन सेवेत त्रृटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही. सबब या मंचाचे मत की, तक्रारदाराची तक्रार रद्य होण्यास पात्र आहे. यास्तव मुद्या क्र. 1 व 2 चे उत्तर मुद्या क्र. 3 चे निष्कर्षास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदार यांची तक्रार रद्य करण्यात येते., तसेच तत्कालीन मंचाने यापुर्वी या तक्रारीकामी दिलेला अंतरीम आदेश रद्य करण्यात येतो.
2) खर्चाबाबत आदेश नाहीत.
3) निकाल पत्राची प्रत उभयपक्षांना विनामुल्य देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 03/11/2015. ( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विनायक रा.लोंढे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.