जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक 641/2014 तक्रार दाखल करणेत आलेची तारीखः-10/12/2014.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-22/09/2015.
श्रीमती शहेनाज नसीम अन्सारी,
उ.व.सज्ञान, धंदाः नौकरी,
रा.सि.स.नं.302, प्लॉट नं.6, भारतनगर, जळगांव,
ता.जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
क्रॉम्प्टन ग्रिव्हज लि,जळगांव तर्फे युनीट हेड,
कोंबडी बाजार, मटन मार्केट जवळ,जळगांव,
ता.जि.जळगांव. ......... सामनेवाला.
कोरम-
श्री.विनायक रावजी लोंढे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदारातर्फे श्री.फरीद ए.एम.शेख वकील.
सामनेवाला तर्फे श्री.जयंत बी.मोरे वकील.
निकालपत्र
व्दारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्षः
1. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी चुकीचे विद्युत देयक देऊन द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवली आहे म्हणुन विद्युत देयक रद्य करण्यासाठी व नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणेः-
2. तक्रारदार हे भारत नगर,जळगांव येथे कुटूंबीयासमवेत राहतात. सामनेवाला ही विज वितरण कंपनी आहे. तक्रारदार यांनी घरगुती वापरासाठी सामनेवाला यांचेकडुन विज पुरवठा घेतला आहे. तक्रारदार यांचा ग्राहक क्र.110016665410 असा आहे. तक्रारदार हे त्यांचे घरात दोन टयुब लाईट, एक पंखा, टी.व्ही.इत्यादी उपकरणांचा वापर करतात. तक्रारदाराचा विज वापर दरमहा 35 युनीट पेक्षा कमी आहे. तक्रारदार हे नौकरी करीत असल्यामुळे व घरात एकटयाच राहत असल्यामुळे त्यांचा विद्युत वापर कमी होता. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना पुर्व सुचना न देता घराला कुलूप असल्याचे दाखवुन अवास्तव सरासरी विद्युत देयक दिलेले आहेत. सामनेवाला यांनी विद्युत मिटरचे वाचन न करता बिले दिलेली आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे अवास्तव देयकाबाबत व मिटरची जागा बदलुन देण्याबाबत विनंती केली. सामनेवाला यांनी त्यांचेकडे दुर्लक्ष केले. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना नोव्हेंबर,2012 पासुन सरासरी 85 युनीट वापराचे देयक दिले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विद्युत वापर लक्षात घेतला नाही. तक्रारदार यांनी देयकाबाबत हरकती कायम ठेवुन दि.28/6/2014 पावेतो विज देयक भरलेले आहे. तक्रारदार यांनी असे कथन केलेले आहे की, सामनेवाला यांचेकडे तक्रार देऊन त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही म्हणुन तक्रारदार यांनी सामनेवाला यांना दि.24/9/2014 रोजी नोटीस दिली त्याप्रमाणे सामनेवाला वागले नाहीत. दि.27/11/2014 रोजी कोणतीही पुर्व सुचना न देता तक्रारदाराचा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन ग्राहकांना द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवलेली आहे. सबब तक्रारदार यांना सामनेवाला यांनी नोव्हेंबर,2012 पासुन जी विद्युत देयके दिलेली आहेत ती रद्य करण्यात यावीत. तक्रारदाराचा वापर लक्षात घेऊन विद्युत देयक देण्याबाबत आदेश व्हावेत तसेच तक्रारीचा निकाल होईपावेतो विद्युत पुरवठा खंडीत करु नये तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
3. सामनेवाला हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी लेखी खुलासा दाखल केला. सामनेवाला यांचे कथन की, त्यांनी महावितरणकडुन फ्रँचाईसी दि.1 नोव्हेंबर,2011 पासुन हाती घेतली आहे. सामनेवाला हे ग्राहकांना विज वितरण करुन ग्राहकांनी वापरलेल्या विज युनीट प्रमाणे विद्युत देयके देतात. तक्रारदाराच्या घरात विद्युत मिटर बसविलेले आहे. विद्युत वापराची गणना करण्याकरिता सामनेवाला यांचेकडुन नोंदी घेतल्या जातात. तक्रारदार यांच्या घरात विद्युत मिटर आत बसविलेले आहे. तक्रारदार हया नौकरी करतात. त्यांचे घर बंद असते. सामनेवाला यांचे अधिकारी मिटर नोंद घेण्याकरिता सुर्योदयानंतर व सुर्यास्तापुर्वी जाण्याचे निर्देशीत केलेले आहे. तक्रारदाराचे घर बंद असल्यामुळे मिटर वाचन करणे आवश्यक झाले नाही. तक्रारदार यांनी त्यांचे घरात मिटर दर्शनी भागात बसवण्याकरिता कधीही अर्ज दिला नाही. तक्रारदाराचे घर नेहमी बंद असल्यामुळे सामनेवाला यांच्याकडुन तक्रारदार यांना नोव्हेंबर,2012 पासुन दरमहा विज वापराची बिले देण्यात आली आहेत. विज मिटरचे वाचन जुन,2014 मध्ये उपलब्ध झाले त्यावेळेस विज वाचन 5235 युनीट होते. तक्रारदार यांचे मागील व चालु मिटर वाचन लक्षात घेऊन तक्रारदार यांना जुन,2014 करिता 4154 युनीटचे बिल देण्यात आले. सदरचे बिल हे एकुण 20 महीन्याचे आहे. नोव्हेंबर,2012 पासुन जुन,2014 पर्यंत दरमहा सरासरी विज वापराचे बिल दिलेले आहे. तक्रारदाराला जुन,2014 च्या विज बिलातुन रक्कम रु.6,515/- तसेच ऑगष्ट,2014 च्या विज बिलातुन रक्कम रु.2,253/- ची वजावट करुन देण्यात आली आहे. नोव्हेंबर,2012 नंतर तक्रारदाराला एकुण रक्कम रु.8,768/- इतकी रक्कम समायोजीत करुन देण्यात आलेली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे कधीही अर्ज दिलेला नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना दि.24/9/2014 रोजी नोटीस दिली परंतु त्यापुर्वीच सामनेवाला यांनी तक्रारदाराचे तक्रारीचे निवारण केले आहे. तसेच तक्रारदार यांनी मिटरची जागा बदलुन हवी असल्यास आवश्यक ते शुल्क भरणे क्रमप्राप्त आहे. तक्रारदार यांनी शुल्क भरलेले नाही किंवा तसा अर्जही दिलेला नाही. तक्रारदार यांना देयकात समायोजीत केलेली रक्कम अवगत करुन दिली आहे असे असतांनाही तक्रारदार हे खोटया मजकुराच्या आधारावर सदरची तक्रार दाखल करीत आहेत. आजरोजी तक्रारदाराकडे रक्कम रु.19,760/- ची बाकी आहे. तक्रारदार यांनी केवळ मंचापुढे अधसत्य घेऊन तक्रार दाखल केली आहे. तसेच विज अधिनियम,2003 चे कलम 42 (5) नुसार तक्रारदाराच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी अंर्तगत ग-हाणे निवारण मंच स्थापन केलेले आहे त्यामुळे सदरची तक्रार या ग्राहक मंचात चालु शकत नाही. सबब तक्रारदाराने केलेली तक्रार रद्य करण्यात यावी.
4. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत अंतरीम आदेश मिळण्यासाठी अर्ज केला आहे. तत्कालीन मंचाने तक्रारदाराचा अर्ज अंशतः मंजुर करुन सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विद्युत पुरवठा मंचाचे पुढील आदेश होईपावेतो खंडीत करु नये असे आदेश दिले.
5. तक्रारदार श्रीमती शेहनाझ नसीम अन्सारी यांनी पुराव्याकामी स्वतःचे शपथपत्र दाखल केलेले आहे. तसेच तक्रारीसोबत विद्युत देयक, सामनेवाला यांचेकडे केलेली तक्रार, सामनेवाला यांना दिलेली नोटीस हजर केलेली आहे. सामनेवाला यांनी लेखी कैफीयती सोबत तक्रारदार यांचे सी पी एल चा उतारा दाखल केला आहे. तक्रारदाराच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाला यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. न्याय-निर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रृटी
ठेवली आहे ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केलेली
आहे काय ? होय.
2) तक्रारदार हे तक्रारीत केलेली मागणी व नुकसान भरपाई
मिळण्यास पात्र आहेत काय ? होय.
3) कोणता आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसाः
मुद्या क्र. 1 ते 3 ः
6. तक्रारदाराचे वकील श्री.शेख यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदाराचे विद्युत मिटर घरामध्ये बसविलेले आहे. तक्रारदार हया नौकरी करीत असल्यामुळे त्या घरात एकटयाच राहतात. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना विद्युत मिटर वाचन करण्याकामी कधीही सुचना दिल्या नाहीत. तक्रारदाराचे घराला कुलूप आहे असे भासवुन तक्रारदाराला सरासरी विद्युत देयके दिलेली आहेत. सदरील विद्युत देयके नोव्हेंबर,2012 पासुन देण्यात आलेली आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदाराचा त्यापुर्वीचा विद्युत वापर लक्षात घेतला नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे दि.28/6/2014 पावेतो विज देयकांची रक्कम भरलेली आहे. तक्रारदार यांना सामनेवाला यांनी विद्युत वापर लक्षात न घेता अवास्तव विद्युत देयक आकरणी बिले दिली तसेच तक्रारदार यांनी त्यांचे मिटर दर्शनी भागात लावणेकामी विनंती केली असता, त्यासही सामनेवाला यांनी नकार दिला. तक्रारदार यांना कोणतीही पुर्व सुचना न देता त्याचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. तक्रारदाराचे वकीलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार हे त्यांनी वापरत असलेल्या युनीट प्रमाणे विद्युत देयके देण्यास तयार आहेत परंतु सामनेवाला यांनी त्याकडे दुर्लक्ष करुन द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवलेली आहे.
7. सामनेवाला यांचे वकीलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार हया नौकरी करतात त्यामुळे दिवसा त्यांचे घर बंद असते. रात्रीच्या वेळेस मिटर तपासणीकामी जाता येत नाही. तक्रारदार यांनी मिटर घराबाहेर लावण्यासाठी कधीही अर्ज दिला नाही. सामनेवाला यांनी पुढे असे कथन केलेले आहे की, तक्रारदाराचे मिटरचे वाचन जुन,2014 मध्ये उपलब्ध झाले त्यावेळेस विज मिटर चे वाचन 5235 युनीट असे होते. तक्रारदार यांना जुन,2014 करिता 4154 युनीटचे विज बिल देण्यात आले सदरील बिल हे एकुण 20 महीन्यांचे होते. नोव्हेंबर,2012 पासुन जुन,2014 पर्यंत दरमहा सरासरी विज वापराची बिले दिल्याबाबत संगणकामध्ये नोंद आहे. जुन,2014 च्या विद्युत बिलात रक्कम रु.6,515/- व ऑगष्ट,2014 च्या बिलात रक्कम रु.2,253/- एवढी वजावट करुन देण्यात आलेली आहे. तक्रारदार यांना एकुण रक्कम रु.8,768/- समायोजीत करुन देण्यात आले आहेत. तसेच तक्रारदार यांना मिटर दर्शनी भागात बसवुन हवे असल्यास त्याकामी शुल्क भरणा करणे क्रमप्राप्त आहे. तक्रारदार यांनी दि.28/6/2014 नंतर विद्युत देयके भरलेली नाहीत. तक्रारदाराकडे एकुण रक्कम रु.19,760/- एवढी थकबाकी आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवलेली नाही.
8. तक्रारदार व सामनेवाला यांचा संपुर्ण पुरावा व दस्तऐवज यांचे अवलोकन केले असता असे निर्दशनास येते की, तक्रारदार हया नौकरी करीत असल्यामुळे सामनेवाला यांना मिटरचे रिडींग घेता आले नाही असे असले तरी सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्य वेळेत नोटीस देऊन मिटर रिडींग कामी हजर रहावे असे कधीही कळविल्याचे निर्दशनास येत नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सरासरी विद्युत वापर लक्षात घेऊन विद्युत बिले दिली आहेत. सामनेवाला यांनी असे कथन केलेले आहे की, विज मिटर वाचन जुन,2014 मध्ये उपलब्ध झाले, विज मिटर वाचन 5235 युनीट होते. तक्रारदार यांना जुन,2014 करिता 4154 युनीट चे बिल देण्यात आले तसेच तक्रारदार यांनी जी विद्युत देयके भरलेली होती त्यांची वजावट तक्रारदार यांना करुन देण्यात आलेली आहे. एकुण रक्कम रु.8,768/- समायोजीत करुन देण्यात आले आहेत. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या विद्युत देयकांचे अवलोकन करता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना विद्युत वाचन न घेता सरासरी विद्युत देयके दिल्याचे निर्दशनास येते. सामनेवाला यांनी दरमहा विद्युत वाचन करुन ग्राहकाला बिल देणे आवश्यक असते. यदाकदाचित काही कारणामुळे मिटर पर्यंत पोहोचणे शक्य नसेल व नोंदी घेतल्या जात नसतील तर सर्वसाधारणपणे अंदाजाने बिले देता येतात परंतु नंतरच्या देयकामध्ये मिटर नोंद घेऊन त्याप्रमाणे बिल देणे अभिप्रेत आहे. सामनेवाला यांनी 20 महीन्यापर्यंत मिटर वाचन केलेले नाही व तक्रारदार यांना सरासरी बिले दिलेली आहेत त्यामध्ये तक्रारदाराचा वापर जास्त दाखविलेला आहे. सबब या मंचाचे मत की, सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवली आहे तसेच दस्तऐवजाचे अवलोकन केले असता, असे निर्दशनास येते की, तक्रारदार यांचे मिटर घरामध्ये बसविलेले आहे. जर सामनेवाला यांना तक्रारदाराचे घरास कुलूप आढळुन आल्यास त्याबाबत सामनेवाला यांनी तक्रारदार यांना नोटीस देऊन सामनेवाला यांचे अधिका-यांनी मिटर तपासणी करीता हजर राहणे क्रमप्राप्त आहे तसेही सामनेवाला यांनी केलेले दिसत नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना विद्युत मिटर दर्शनी भागात बसवावे म्हणजे विद्युत मिटरचे वाचन सोपे जाईल असे कळविले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना विद्युत मिटर दुस-या जागी दर्शनी भागात बसविण्याकामी काही रक्कम भरावी असे निर्देशीत केले आहे. तक्रारदार राहत असलेल्या घराच्या दर्शनी भागात मिटर स्थलांतरीत करावयाचे असल्यास कोणतीही रक्कम भरावयाची आवश्यकता नाही कारण तक्रारदार सदरचे मिटर दुस-या प्रॉपर्टी मध्ये शिफट करीत नाहीत म्हणुन सामनेवाला यांनी तक्रारदाराचे मिटर दर्शनी भागात न बसवुन द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवलेली आहे. सबब या मंचाचे मत की, तक्रारदार यांनी सामनेवाला यांना जी वाढीव देयके दिली आहेत ती रद्य करण्यात येतात. तक्रारदाराचे मिटर रिडींग प्रमाणे तक्रारदारास विद्युत देयके द्यावीत व तक्रारदाराची खात्री करुन त्याप्रमाणे रक्कम वसुल करावी तसेच कोणतेही शुल्क न आकारता तक्रारदाराचे मिटर दर्शनी भागात बसवुन देण्यात यावे. तसेच तक्रारदार हे त्यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी सामनेवाला यांचेकडुन रक्कम रु.2,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/- मिळण्यास पात्र आहेत. यास्तव मुद्या क्र. 1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देऊन मुद्या क्र. 3 चे निष्कर्षास्तव खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाला यांना असे आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना जी वाढीव देयके दिलेली आहेत ती रद्य करण्यात येतात. तसेच तक्रारदाराचे मिटर रिडींग प्रमाणे तक्रारदारास विद्युत देयके द्यावीत व तक्रारदाराची खात्री करुन त्याप्रमाणे रक्कम वसुल करावी तसेच कोणतेही शुल्क न आकारता तक्रारदाराचे मिटर दर्शनी भागात बसवुन देण्यात यावे. सदर आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत मिळाल्यापासुन सामनेवाला यांनी 30 दिवसांचे आंत करावी.
3) सामनेवाला यांना असे आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/-(अक्षरी रु.दोन हजार मात्र ) व तक्रारीचा खर्च रु.1,000/- (अक्षरी रु.एक हजार मात्र ) आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसांचे आंत अदा करावेत.
4) निकाल पत्राची प्रत उभयपक्षांना विनामुल्य देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 22/09/2015. ( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विनायक रा.लोंढे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.