(द्वारा मा. सदस्या – श्रीमती. माधुरी एस. विश्वरुपे)
1. तक्रारदारांनी सामनेवाले नं. 1 यांचेकडुन H.T.C. Desire 616, मोबाईल हँडसेंट ता. 15/08/2014 रोजी रक्कम रु. 17,180/- एवढया किमतीचा विकत घेतला.
2. तक्रारदारांचा मोबाईल खरेदी केल्यानंतर मे महिन्यात म्हणजेच वारंटी कालावधीत नादुरूस्त झाला. तक्रारदारांच्या मोबाईल वरील “Display” मध्ये दोष निर्माण झाला होता, त्यामुळे सामनेवाले 2 सर्विस सेंटर यांचेकडे मे महिन्यात दुरूस्तीसाठी दिला त्यानंतर जुन मध्ये पुन्हा त्याच कारणासाठी सामनेवाले नं. 2 यांचेकडे दुरूस्तीसाठी दिला तथापी सामनेवाले नं. 2 यांनी अद्याप पर्यंत मोबाईल हॅंडसेट दूरुस्ती करून परत दिला नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
3. सामनेवाले 1 ते 3 यांना मंचाची नोटिस प्राप्त होवुनही गैरहजर असल्यामुळे त्यांचे विरुध्द ता. 07/05/2016 रोजी एकतर्फा आदेश पारित करण्यात आला.
4. तक्रारदारांने पुरावाशपथपत्र दाखल केले, तसेच पुरावा शपथपत्र हाच लेखी युक्तिवादा व तोंडी युक्तिवाद समजविण्यात यावा अशी पुरसिस दाखल केली. तक्रारीतील दाखल कागपत्रावरुन मंच खालील प्रमाणे निष्कर्ष काढत आहे.
5. कारण मिमांसा
अ) तक्रारदारांनी सामनेवाले नं. 1 यांचेकडुन ता. 15/08/2014 रोजी रक्कम रु. 17,180.00 एवढया किमतीचा Free H.T.C. 616 Flip Cover Black व Sandisk Micra SD Card 16 GB सहीत विकत घेतला. याबाबत सामनेवाले नं. 1 यांनी तक्रारदारांना दिलेली बिलाची प्रत मंचात दाखल आहे.
ब) सामनेवाले नं. 2 यांचेकडे ता. 21/07/2015 रोजी मोबाईल दुरूस्तीसाठी दिल्या बाबतचे “Delivery Challan” ची प्रत मंचात दाखल आहे. सदर challan प्रमाणे तक्रारदारांच्या मोबाईलमधील Display मध्ये दोष निर्माण झाल्याची बाब नमुद आहे.
क) वरील परिस्थितीचे अवलोकन केले असता तक्रारदारांचा मोबाईल वारंटी कालावधीत नादुरूस्त झाल्याचे दिसून येते. सामनेवाले 1 ते 3 यांचेतर्फे कोणताही आक्षेप दाखल नाही. सबब तक्रारदाराचा पुरावा अबाधित आहे.
उ) तक्रारदारांनी ता. 21/07/2016 रोजी अर्ज दाखल करुन अर्जाद्वारे तक्रारीमध्ये तक्रारदारांचा मोबाईल मे 14 ऐवजी मे 15 मध्ये नादुरूस्त झाल्याचे व जुन 14 ऐवजी मे 15 तारखेला सामनेवाले नं. 2 यांचेकडे दुरूस्तीला दिल्याबाबत नमुद केले आहे.
इ) तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार सामनेवाले नं. 2 यांनी अद्याप पर्यंत मोबाईल दुरूस्ती करुन परत दिला नाही. तक्रारदारांचा नादुरूस्त मोबाईल सामेनवाले नं. 2 यांचेकडे अद्यापर्यंत ठेवला आहे. तक्रारदारांना सदर मोबाईलचा वापर करणे शक्य झाले नाही.
ई) सामनेवाले नं. 3 ही उत्पादक कंपनी असुन सामनेवाले 2 हे त्यांचे अधिकृत सर्विस सेंटर आहे. तक्रारदारांचा मोबाईल वॉरंटी कालावधीत नादुरूस्त झालेला आहे. वरील परिस्थितीचे अवलोकन केले असता तक्रारदारांच्या मोबाईलची दुरूस्ती होणे शक्य नसल्याचे दिसुन येते. तक्रारदारांच्या मोबाईलची दुरूस्ती होवु शकत नसल्यामुळे सामनेवाले नं. 3 यांनी तक्रारदारांना मोबाईलची रक्कम रु. 17,180/- परत देणे उचित होईल असे मंचाचे मत आहे.
5. सबब, खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1) तक्रार क्र. 881/2015 अंशतः मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाले नं. 3 यांनी तक्रारदारांना सदोष सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
3) सामनेवाले नं. 1 व 2 यांचे विरुध्दची तक्रार फेटाळण्यात येते.
4) सामनेवाले नं. 3 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मोबाईलची किंमत रु. 17,180/- तक्रार दाखल तारखेपासून म्हणजेच ता. 10/08/2015 पासुन संपुर्ण किंमत अदा होईपर्यंत द.सा.द.शे 9% व्याजदरासह द्यावी.
5) सामनेवाले नं. 3 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना तक्रारीचा खर्चाची रक्कम रु. 2,500/- (रु. दोन हजार पाचशे फक्त) ता.30/09/2016 पर्यंत द्यावी. विहित मुदतीत सदर रक्कम अदा न केल्यास ता. 01/10/2016 पासुन आदेशाच्या पुर्ततेपर्यंत संपुर्ण रक्कम द.सा.द.शे 9% व्याजदारासहीत द्यावी.
6) आदेशाच्या प्रती उभय पक्षकाराना विनाविलंब, विनाशुल्क पाठविण्यात याव्यात.
7) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम अंतर्गत विनियम 2005 मधील विनियम 20(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांना परत करण्यात यावेत.
ठिकाण – ठाणे.
दिनांक – 12/08/2016