निकाल
पारीत दिनांकः- 30/10/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] जाबदेणार कंपनी ही पॅकेज टुर आयोजित करण्यासाठी प्रसिद्ध कंपनी आहे. तक्रारदारांना एप्रिल 2010 मध्ये युरोप येथील “बौमा” (BAUMA) येथे जावयाचे असल्यामुळे त्यांनी जाबदेणारांद्वारे त्यांच्याकरीता आणि त्यांच्या पत्नीकरीता तिकिट बुक केले व त्यासाठी दि. 6/4/2010 रोजी रक्कम रुम 1,00,000/- चेकद्वारे जाबदेणारांना दिले. ज्वालामुखीच्या वादळामुळे (Volcanic Ash Storm) जाबदेणारांच्या प्रतिनिधींनी तात्काळ बौमाचे डीपार्चर होऊ शकणार नाही, असे कळविले, त्यावेळी तक्रारदारांनी भरलेली रक्कम त्यांना परत केली जाईल असे जाबदेणारांनी आश्वासन दिले होते. दि. 15/4/2010 रोजी जाबदेणारांच्या प्रतिनिधींनी तक्रारदारास फोन करुन टूरची पूर्ण रक्कम परत करण्यासाठी उर्वरीत रक्कम रु. 6,000/- व प्रत्येक व्यक्तीचे कॅन्सलेशन चार्जेस रक्कम रु. 21,000/- भरावयास सांगितले. तक्रारदारांनी यासंदर्भात जाबदेणारांकडे विचारणा केली असता, त्यांनी कंपनीच्या नियमानुसार प्रत्येक ग्राहकास फोन करुन रक्कम भरावयास सांगितली, परंतु हा नियम तक्रारदारांना लागू नाही असे सांगितले. म्हणून तक्रारदारांनी दि. 16/4/2010 रोजी रक्कम रु. 6,000/- जमा केले. ही रक्कम भरताना तक्रारदारांनी जाबदेणारांना स्पष्टपणे सांगितले होते की ते कॅन्सलेशन चार्जेस भरणार नाहीत कारण कंपनीने त्यांना यासंबंधी सविस्तर माहिती दिलेली नव्हती. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणार कंपनीने दि. 12/5/2010 रोजी ई-मेलद्वारे कळविले की, “This is with regards to the unfortunate Volcano Ash Storm
over Europe during the last two weeks of April 2010 due to
which BAUMA departure could not take place.”
त्याच ई-मेलमध्ये जाबदेणारांनी पुढे असे नमुद केले की, त्यांना तक्रारदारांकडून मिळालेली एकुण रक्कम रु. 28,990/- + 890 युरो, म्हणजे एकुण रक्कम रु. 85,000/- व ते तक्रारदारांना परत करणार रक्कम रु. 16,000/- + 500 युरो, म्हणजे एकुण रक्कम रु. 46,050/-. त्यामध्ये जाबदेणार कंपनीने तक्रारदारांना दोन पर्याय दिले होते, ते म्हणजे नोव्हे. महिन्यातील “बौमा-चायना” पॅकेज टूरसाठी रक्कम रु. 16,000/- ते ठेवून घेतील आणि त्याटूरमध्ये अॅडजस्ट करतील आणि 500 युरोची रक्कम प्रती युरो 60/- च्या दराने रक्कम रु. 30,050/- परत करतील. दुसरा पर्याय म्हणजे, ते पूर्ण रक्कम म्हणजे रक्कम रु. 46,050/- परत करतील व ही रक्कम वेळेत परत घेतली नाही तर ती लॅप्स होईल. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी स्वत: टूर रद्द केला नव्हता तर जाबदेणारांनी तो तांत्रिक कारणामुळे रद्द केला होता. तक्रारदारांचा कॅन्सलेशन चार्जेसला आक्षेप आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार, कॅन्सलेशन चार्जेसमध्ये नॉन रिफंडेबल व्हिसा चार्जेस, एअर टिकिट कॅन्सलेशन चार्जेस, हॉटेल बुकिंग, ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी कॅन्सलेशन चार्जेस इ. समविष्ट आहेत. तक्रारदारांची टूर ही तांत्रिक अडचणीमुळे/नैसर्गिक आपत्तीमुळे रद्द झालेली आहे, त्यामुळे त्यासंदर्भातील नुकसानासाठी तक्रारदार जबाबदार नाहीत आणि म्हणून कॅन्सलेशन चार्जेस वजा करण्यास त्यांचा तीव्र आक्षेप आहे. त्यानंतर तक्रारदारांनी जाबदेणारांकडे वारंवार रकमेची मागणी केली, परंतु जाबदेणारांनी प्रत्येक वेळी टाळाटाळ केली, त्याचप्रमाणे जाबदेणारांनी तक्रारदारांसाठी केलेल्या खर्चाचा तपशिलही दिला नाही. जाबदेणार कंपनीने आजतागायत तक्रारदारांना रकमेची परतफेड केलेली नाही, ही रक्कम जाबदेणारांकडेच व्याजरहीत पडून आहे व जाबदेणार त्या रकमेचा वापर करीत आहेत, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. तक्रारदारांनी वेळोवेळी जाबदेणारांना कायदेशिर नोटीस पाठवून रकमेची मागणी केली, परंतु जाबदेणारांनी त्यांना रक्कमही परत केली नाही किंवा रकमेचा सविस्तर तपशिलही दिला नाही. जाबदेणारांनी तक्रारदारांना नोटीशीचे उत्तर पाठविले व त्यामध्ये नमुद केले की, “Force Majeure or Vice Majeure, the company shall not be responsible to give any refund.” तरीही त्यांनी तक्रारदारास रक्कम रु. 1,06,000/- च्या ऐवजी रु. 46,050/- परत करण्याची तयारी दर्शविली व उर्वरीत रक्कम वजा केल्याचे नमुद केले, परंतु कॅन्सलेशन चार्जेसबद्दल स्पष्टीकरण दिले नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून रक्कम रु. 1,06,000/- व्याजासह, रक्कम रु. 20,000/- मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई, तक्रारीचा खर्च आणि इतर दिलासा मागतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, ते मंचामध्ये उपस्थित झाले व त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यामध्ये आणि तक्रारदारांमध्ये झालेल्या करारातील अटी व शर्तींनुसार मुंबई येथील कोर्टांना सदरचे प्रकरण चालविण्याच अधिकार आहेत, या मंचास हे प्रकरण चालविण्याचे अधिकार नाही. तक्रारदारांनी करारनाम्यावर सह्या केल्यामुळे त्यातील अटी व शर्ती त्यांच्यावर बंधनकारक आहेत. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी खोटी तक्रार दाखल केली आहे, त्यांनी महत्वाची माहिती मंचापासून दडवून ठेवलेली आहे. तक्रारदार क्र. 2 यांनी ‘बौमा’ येथे जाण्याकरीता तिकिट बुक केले होते, त्यांना दि. 18/4/2010 रोजी बौमा येथे जावयाचे होते. बुकिंग करताना तक्रारदार क्र. 2 यांनी फॉर्मवरील अटी व शर्ती मान्य करुन त्यावर स्वत:च्या व तक्रारदार क्र. 1 यांच्या वतीने डिक्लरेशनवर स्वाक्षरी केली, त्यामुळे अटी व शर्ती त्यांच्यावर बंधनकारक आहेत. दि. 7/4/2010 रोजी जाबदेणारांना टूर बुकिंगसाठी आनंद मशिनरी इंडिया प्रा. लि. कडून रक्कम रु. 1,00,000/- चा चेक मिळाला व दि. 16/4/2010 रोजी रक्कम रु. 6,000/- रोखीने मिळाले. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी टूरची रक्कम दिलेली नाही तर आनंद मशिनरी इंडिया प्रा. लि. ने सदरची रक्कम भरलेली आहे, त्यामुळे तक्रारदार ही रक्कम परत मागू शकत नाही. त्याचप्रमाणे तक्रारदारांनी व्हिसा ऑफिसरला लिहिलेल्या पत्रामध्ये टूरचा खर्च आनंद एंटरप्राईजेस करणार आहे, असे नमुद केले आहे. जाबदेणारांना प्राप्त झालेल्या रक्कम रु. 1,06,000/- पैकी रक्कम रु. 23,000/- (रु. 3,000/- रिझर्व्हेशन रक्कम म्हणून आणि रु. 20,000/- व्याजरहित नापरतावा बुकिंगची रक्कम) तक्रारदार क्र. 2 करीता आणि उर्वरीत रक्कम ही तक्रारदार क्र. 1 करीता प्राप्त झालेली आहे. त्यामुळे तक्रारदार क्र. 2 यांची पूर्ण टूर कॉस्ट त्यांना मिळालेली नाही, असे जाबदेणारांचे म्हणणे आहे. जाबदेणारांनी खालीलप्रमाणे पेमेंट शेड्युल दिलेले आहे,
PAYMENT AND SCHEDULE FOR TRADE FAIR
Sr. No. | Payment Item | Amount in NRI per person | Date of Payment |
1. | Unsecured Reservation Fee | Rs. 3,000/- | Immediately upon booking |
2. | Interest free Non-refundable booking amount | Rs. 20,000/- | Immediately or within 10 days of booking date |
3. | Documentation Amount | As per the selected tour | Immediately or within 10 days of booking date along with Visa documents |
4. | Balance Payments | As per the selected tour | Before 45 days from the departure of tour |
वरील तक्त्यानुसार रिझर्व्हेशन चार्जेस हे नॉनरिफंडेबल आहेत, ते बुकिंगच्या रकमेप्रमाणे सुरक्षित नाहीत. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार क्र. 2 यांनी रिवाईज्ड रुल्सप्रमाणे कागदपत्रे सादर केलेले नव्हते. जाबदेणारांनी तक्रारदारांना दि. 15/4/2010 रोजी ई-मेलवरुन तक्रारदार क्र. 2 यांचा टूर रद्द होण्याचे कारण व्हिसा असल्याचे कळविले होते व हे तक्रारदार क्र. 2 यांनी मान्य केले होते व कॅन्सलेशन चार्जेससाठी मान्यताही दिली होती. जाबदेणारांनी तक्रारदार क्र. 2 यांना त्यांच्या पॉलिसीनुसार कॅन्सलेशन चार्जेस आकारण्याऐवजी कमी प्रमाणात म्हणजे रु. 21,000/- लावले. त्यानंतर जाबदेणारांनी तक्रारदार क्र. 1 यांच्या व्हिसासाठी कॉन्स्युलेटकडे अर्ज केला. जाबदेणार फक्त व्हिसाच्या बाबतीत मार्गदर्शन करतात, मात्र व्हिसा देणे किंवा नाकारणे याचा सर्वस्वी निर्णय कॉन्स्युलेटचा असतो. जाबदेणारांनी व्हिसाच्या कागदपत्रासंबंधीच्या अटी व शर्ती नमुद केल्या आहेत, त्यानुसार वैध कागदपत्रे सादर करणे, म्हणजे पासपोर्ट, व्हिसा, कन्फर्म एअर तिकिट्स, इन्शुरन्स, मेडीकल इन्शुरन्स सर्टिफिकिट्स, इतर सर्टिफिकिट्स, इमीग्रेशन क्लिअरन्स इ. कागदपत्रे सादर करणे ही सर्व जबाबदारी तक्रारदारांची असते. जर कागदपत्रांची कमतरता असेल, तर त्याकरीता जाबदेणार कंपनी जबाबदार नसेल. व्हिसा फीच्या अंतर्गत प्रत्यक्ष व्हिसा फी, प्रोसेसिंग फी आणि ओव्हरहेड्स येईल. नॉन रिफंडेबल डिपॉजिटची रक्कम फोरफिट केली जाईल, त्यासाठी कोणताही क्लेम करता येणार नाही. व्हिसा देणे किंवा नाकारणे याचा पूर्ण निर्णय हा एम्बसी/ कॉन्स्युलेटचा असेल, त्यासाठी जाबदेणार जबाबदार राहणार नाहीत. तक्रारदार क्र. 2 यांनी टूर रद्द केला व तक्रारदारांनी मान्य केल्यानुसार तक्रारदार क्र. 2 यांना कॅन्सलेशन चार्जेस आकारण्यात आले. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, कॅन्सलेशन पॉलिसीनुसार तक्रारदार क्र. 2 यांचे रक्कम रु. 23,000/- कॅन्सलेशन चार्जेस म्हणून फोरफिट करावयास हवे होते, परंतु स्पेशल केस म्हणून तक्रारदार क्र. 2 यांना फक्त रु. 21,000/- आकारण्यात आले. सदरचे चार्जेस तक्रारदारांनी विनाहरकत (without any protest) मान्य केले आहे. तक्रारदार क्र. 1 यांनी तक्रारदार क्र. 2 यांच्या कॅन्सलेशन चार्जेसविषयी कोणतीही हरकत न घेता ठरलेल्या वेळी एकट्याने प्रवास करण्याचे ठरविले, कारण त्यांचा व्हिसा कॉन्स्युलेटने मंजूर केला होता. जाबदेणारांनी तक्रारदार क्र. 1 यांच्या दि. 18/4/2010 रोजीच्या टूरच्या आधी म्हणजे दि. 16/4/2010 रोजी सर्व कागदपत्रे त्यांच्या सुपुर्त केली होती. त्यानंतर ज्वालामुखीच्या वादळामुळे (Volcanic Ash Storm) टूर रद्द झाला आणि तक्रारदार क्र. 1 प्रवास करु शकले नाहीत, त्याचे कारण जाबदेणारांच्या अवाक्यापलीकडले होते. यामध्ये त्यांची सेवेतील त्रुटी नाही. जाबदेणारांनी त्यांच्या Liability बाबत अटी व शर्ती नमुद केली आहे, ती खालीलप्रमाणे आहे,
LIABILITY
“The Company shall not be responsible and/or liable for
any damages caused to you due to reasons beyond the
control of the Company (Force Majeure/Vis Majeure)
तक्रारदार क्र. 1 यांचा टूर प्रवासाच्या दोन दिवस आधी रद्द केल्यामुळे 100% कॅन्सलेशन चार्जेस आकारण्यात आले. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, प्रवासाला निघण्याच्या 30 दिवसांच्या आधी जर टूर रद्द केला तर 100% कॅन्सलेशन चार्जेस आकारण्यात येतात व रिफंड मिळत नाही. तक्रारदारांनी भरलेल्या रक्कम रु. 1,06,000/- पैकी रक्कम रु. 21,000/- तक्रारदार क्र. 2 यांच्या कॅन्सलेशन चार्जेससाठी वजा करण्यात आले आणि उर्वरीत रक्कम तक्रारदार क्र. 1 यांच्या टूरसाठी ठेवण्याचे ठरले, परंतु तक्रारदार क्र. 1 यांचाही टूर दोन दिवस आधी रद्द झाला त्यामुळे त्यांचेही कॅन्सलेशन चार्जेस नियमानुसार आकारुन उर्वरीत रक्कम त्यांना परत करण्याची तयारी जाबदेणारांनी दर्शविली. वरील सर्व कारणांवरुन तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार करतात.
4] जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबाच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
5] दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी त्यांच्या स्वत:करीता व त्यांच्या पत्नीकरीता ‘बौमा’ येथे जाण्यासाठी जाबदेणारान्मार्फत बुकिंग केले होते. त्यासाठी दि. 6/4/2010 रोजी रक्कम रुम 1,00,000/- चेकद्वारे व दि. 16/4/2010 रोजी रक्कम रु. 6,000/- रोखीने, असे एकुण रक्कम रु. 1,06,000/- जाबदेणारांना दिले. तक्रारदारांच्या पत्नीचे, म्हणजे तक्रारदार क्र. 2 यांचे कागदपत्रे योग्य नसल्यामुळे त्यांना व्हिसा प्राप्त झाला नाही, त्यामुळे त्यांचा टूर रद्द झाला, ही वस्तुस्थिती तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये नमुद केली नाही. जाबदेणारांनी तक्रारदार क्र. 2 यांची स्पेशल केस म्हणून कॅन्सलेशन चार्जेस रक्कम रु. 23,000/- च्या ऐवजी रु. 21,000/- आकारले. हा निर्णय तक्रारदार क्र. 1 यांनी कोणतीही हरकत न घेता मान्य करुन एकट्यानेच ‘बौमा’ येथे दि. 18/4/2010 रोजी जाण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याच दरम्यान ज्वालामुखीच्या वादळामुळे (Volcanic Ash Storm) तक्रारदार क्र. 1 यांचाही दौरा रद्द करावा लागला. सदरचा दौरा हा नैसर्गिक आपत्तीमुळे रद्द झाला व नैसर्गिक आपत्ती ही जाबदेणारांच्या आवाक्याबाहेरील (Beyond control) होती. तक्रारदार क्र. 1 यांचा दौरा हा फक्त दोन दिवस आधीच रद्द झाला. जाबदेणार कंपनीच्या कॅन्सलेशनच्या अटी व शर्तींमध्ये खालीलप्रमाणे नमुद केले आहे,
WHEN A CANCELLATON S MADE | CANCELLATON CHARGS |
Less than 30 days prior to the date of Departure/NO SHOW | 100% of the tour cost (including the Supplements) NO RFUND |
वरील अटीनुसार 30 दिवसांच्या आधी जर टूर रद्द केला तर 100% कॅन्सलेशन चार्जेस आकारण्यात येतात व रिफंड मिळत नाही. तक्रारदारांचा दौरा दोनच दिवस आधी रद्द झाला होता तो दौरा जाबदेणारांमुळे रद्द झालेला नव्हता. तसेच तक्रारदार क्र. 2 यांनी तक्रारदार क्र. 1 यांच्यावतीनेही डिक्लरेशन मान्य केले होते त्यामुळे त्या डिक्लरेशननुसार सर्व अटी व शर्ती तक्रारदारांवर बंधनकारक आहेत. तक्रारदारांनी मान्य केलेल्या अटी व शर्तींच्या अधिन राहूनच जाबदेणारांनी कॅन्सलेशन चार्जेस आकारलेले आहेत, ते परत मिळण्यास तक्रारदार पात्र नाहीत, असे मंचाचे मत आहे.
त्याचप्रमाणे, जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबामध्ये मंचाच्या अधिकार क्षेत्राचा मुद्दाही उपस्थित केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यामध्ये व तक्रारदारांमध्ये झालेल्या करारनाम्यामध्ये फक्त ‘मुंबई’ येथील कोर्टाला प्रस्तुतचे प्रकरण चालविण्याचा अधिकार आहे, असे नमुद केले आहे. सदरच्या करारावर तक्रारदारांनीही सह्या केलेल्या आहेत, त्यामुळे तो करार तक्रारदारांवर बंधनकारक आहे. त्यामुळे या मुद्द्यानुसारही मंचास प्रस्तुतच्या तक्रारीचे स्थळसिमा कार्यक्षेत्र नाही, असे मंचाचे मत आहे.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात
येते.
2. तक्रारीच्या खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.