तक्रारदारातर्फे अॅड. घोणे हजर.
जाबदेणारांतर्फे अॅड. दुबे हजर
द्वारा मा. श्रीमती. गीता. एस. घाटगे, सदस्य
** निकालपत्र **
(23/10/2013)
तक्रारदारांनी जाबदेणार क्लबमध्ये पैसे भरुन सभासदत्व स्विकारले होते. परंतु सभासदत्व स्विकारताना केलेल्या कराराप्रमाणे तक्रारदारांना श्रीलंकेला गेल्यावर सेवा सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नाराज होवून तक्रारदारांनी त्यांचे सभासदत्व रद्द होवून मिळणेसाठी व सभासदत्वासाठी भरलेली रक्कम परत मिळण्यासाठी व श्रीलंकेत झालेल्या खर्चाच्या वसुलीसाठी सदरहू तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. त्याबाबत थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे.
1] जाबदेणार “कंट्री व्हेकेशन” या कंपनीचा, सहलीला जाताना व सहलीच्या ठीकाणावर सोयी-सुविधा पुरविण्याचा व्यवसाय आहे. तक्रारदारांना प्रवासाची आवड असल्याने, जाबदेणार कंपनीची जाहीरात वाचून त्यांचेकडे त्यांच्या पत्नीसह सभासदत्व स्विकारले (सभासद क्र. DT 5300999). त्यावेळी तक्रारदारांना सेवासुविधा पसंत न पडल्यास त्यांनी भरलेली रक्कम त्यांना परत मिळेल असे आश्वासन जाबदेणारांमार्फत देण्यात आले. सभासदत्व मिळण्याकरीता तक्रारदारांनी दि. 1/9/2011 रोजी जाबदेणारांना एकुण रक्कम रु. 50,000/- अदा केले, असे तक्रारदारांनी त्यांचे तक्रार अर्जात कथन केलेले आहे. तक्रारदार पुढे असेही नमुद करतात की, या करारानुसार त्यांना सहा रात्री आणि सात दिवस असे पाच वर्षे कोणत्याही रिसॉर्टमध्ये राहता येणार होते व त्यावेळी त्यांना जाबदेणारांमार्फत उत्तम प्रकारच्या सेवा-सुविधा पुरविण्यात येणार होत्या.
2] प्रवासानिमित्त तक्रारदार उंद्री येथे गेले असताना तेथील क्लबमर्फत नियोजित रेस्टॉरंट मध्ये काम चालू असल्याने, तक्रारदारांना अन्य रेस्टॉरंट मध्ये जावे लागले. त्यानंतर श्रीलंकेला जाताना त्यांना केवळ इंधन व एन्ट्रन्स फी द्यावी लागेल, असे सांगण्यात आले असतानाही, तक्रारदारांना कार व ड्रायव्हरसाठी खर्च करावा लागला. तसेच तक्रारदारांना जे हॉटेल देण्यात आले होते, ते माहितीपुस्तका मध्ये नमुद केल्याप्रमाणे उत्तम दर्जाचे नव्हते. तसेच तेथे मसाज पार्लर, स्विमिंग पूल, इन-डोअर व आऊट-डोअर गेम्स या सुविधाही नव्हत्या. पण या सगळ्याच पैसा भरुनही उलट तक्रारदारांना अनेक असुविधांना व अस्वच्छतेला सामोरे जावे लागले. त्यामुळे निराश होवून तक्रारदार यांची सहल अर्धवट टाकून परतले. त्यानंतर तक्रारदारांना जाबदेणार क्लबच्या निकृष्ट दर्जाच्या सेवेबाबत अन्य ठीकाणाहून माहिती मिळाल्याने, त्यांनी क्लबचे सभासदत्व रद्द होवून मिळण्याची व सहलीत खर्च केलेल्या रकमेची मागणी क्लबकडे केली. तथापि, वारंवार लेखी व तोंडी मागणी करुनही जाबदेणार क्लबने तक्रारदारांना दाद दिली नाही. आणि अशा रितीने जाबदेणार कंट्री क्लबने तक्रारदारांची फसवणुक करुन त्यांना दुषित सेवा दिल्याची तक्रार तक्रारदारांनी त्यांच्या अर्जात करुन क्लबचे सभासदत्व रद्द होवून मिळणेची, तसेच त्यांचेकडे भरलेल्या रकमेची व्याजसह अधिक श्रीलंकेच्या सहलीच्या खर्चाची, त्यांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासाची व तक्रार अर्जाच्या खर्चाची म्हणून एकुण रक्कम रु. 1,54,000/- ची मागणी तक्रार अर्जात केली आहे. तक्रार अर्जाच्या पुष्ठ्यर्थ तक्रारदारांनी प्रतिज्ञापत्र व आवश्यक ती कागदपत्रे प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेली आहेत.
3] मंचच्या नोटीशीची बजावणी जाबदेणार यांचेवर झाल्यावर, जाबदेणार यांनी विधीज्ञामार्फत हजर होवून त्यांचे म्हणणे प्रस्तुत प्रकरणी दाखल केले. त्यांचे
म्हणण्यात त्यांनी तक्रारदार हे त्यांच्या क्लबचे सभासद असल्याचे मान्य केलेले आहे.
मात्र तक्रारदारांनी व त्यांच्या पत्नीने क्लबच्या सर्व नियमांची तसेच योजनांची सविस्तर माहिती घेतली, त्यानंतर त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करुन घेतल्यानंतरच तक्रारदारांनी त्यांचे पत्नीसह क्लबचे सभासदत्व स्वेच्छेने स्विकारायचे ठरवून क्लबचे “मेंबरशिप सबस्क्रीप्शन चार्जेस” जमा केले. त्यानंतर त्यांना DT5300999 हा सभासद क्रमांक देण्यात आला, असे म्हणणे मांडले आहे. जाबदेणार यांनी तक्रारदार हे श्रीलंकेतील नेमक्या कोणत्या ठिकाणी सहलीसाठी गेले होते व त्यांनी कोणत्या हॉटेलमध्ये वास्तव्य करुन जाबदेणारांच्या सेवेचा लाभ घेतला, याचा उल्लेख तक्रार अर्जात नसल्याने त्याबाबत शंका उपस्थित केलेली आहे आणि. म्हणून तक्रारदारांचे हे कथन पश्चात बुद्धीचे असल्याचे नमुद करुन नाकारलेले आहे. जाबदेणार पुढे असेही म्हणणे मांडतात की, तक्रारदारांबरोबर त्यांचा जो करार झालेला आहे, त्यानुसार सभासदत्वाची फी कोणत्याही परिस्थितीत परत देता येत नाही. तक्रारदारांनी क्लबकडे जमा केलेली रक्कम ही डिपॉजिट रक्कम नसून ते मेंबरशिप सबस्क्रीप्शन चार्जेस आहेत. त्यामुळे ते परत करता येणार नाहीत.
4] या जाबदेणारांनी पुढे असेही म्हणणे मांडले आहे की, जाबदेणार क्लबचे नोंदणीकृत ऑफिस हे हैद्राबाद मध्ये असल्याने, सदरहू तक्रार अर्ज या मंचाच्या भौगोलिक कार्यक्षेत्रात येत नाही. त्याचप्रमाणे तो या मंचाच्या आर्थिक कार्यक्षेत्राच्याही बाहेर आहे.
5] जाबदेणार यांचे असेही म्हणणे आहे की, तक्रारदारांनी त्यांचेवर जे आरोप केलेले आहेत, त्याबाबतचा कोणताही पत्रव्यवहार यापूर्वी तक्रारदारांकडून त्यांचेबरोबर
करणेत आलेला नाही. त्यामुळे जाबदेणारांनी, तक्रारदारांनी केलेल्या सर्व आरोपांना जोरदार आक्षेप घेतले आहेत व या आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ सन्मा. न्यायालयांच्या न्यायंवाड्यांचे उल्लेख त्यांचे म्हणण्यात केलेले आहे. म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ जाबदेणारांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.
6] तक्रार अर्ज, म्हणणे, त्यासोबतची दाखल कागदपत्रे, रिजॉईंडर, उभय पक्षकारांचा लेखी व तोंडी युक्तीवाद याचा साकल्याने विचार करता, खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ उपस्थित होतात.
मंचाचे मुद्दे व त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे -
अ.क्र. | मुद्ये | निष्कर्ष |
1. | तक्रार अर्ज या मंचाच्या भौगोलिक कार्यक्षेत्रात येतो का? | होय |
2. | या मंचास प्रस्तुतची तक्रार चालविण्याचे आर्थिक कार्यक्षेत्र आहे का? | होय |
3. | जाबदेणार यांनी तक्रारदारांना दुषित सेवा पुरविली, ही बाब शाबीत होते का? | नाही |
4. | कोणता आदेश ? | तक्रार नामंजूर करण्यात येते. |
विवेचन मुद्दा क्र. 1
जाबदेणारांनी क्लबचे नोंदणीकृत कार्यालय हे हैद्राबाद येथे असल्याने तक्रार अर्ज या मंचाच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याबाबत आक्षेपाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. परंतु, तक्रार अर्जाच्या टायटलचे अवलोकन करता जाबदेणार क्लबची शाखा ही पुणे
येथे असल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील कलम 11(2) नुसार तक्रारदारांचा हा तक्रार अर्ज या मंचाच्या भौगोलीक कार्यक्षेत्रात येतो, असा मंचाचा निष्कर्ष निघतो व त्यानुसार मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
विवेचन मुद्दा क्र. 2
जाबदेणार यांनी तक्रार अर्ज हा या मंचाचे आर्थिक कार्यक्षेत्रातही येत नसल्याचे म्हणणे मांडले आहे. तक्रार अर्जातील तक्रारदारांच्या विनंतीचे अवलोकन करता, तक्रारदारांनी एकुण रक्कम रु. 1,54,000/- ची मागणी केल्याचे दिसून येते. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 11(1) मधील तरतुदींनुसार तक्रार अर्ज या मंचाच्या आर्थिक कार्यक्षेत्रात येतो हे स्पष्ट होते. याचा विचार करता, जाबदेणार यांचा हा आक्षेपाचा मुद्दाही फेटाळून लावणेत येतो व त्यास अनुसरुन मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
विवेचन मुद्दा क्र. 3
तक्रार अर्जाचे व जाबदेणारांच्या म्हणण्याचे अवलोकन करता, तक्रारदारांनी जाबदेणार क्लबमध्ये सभासदत्व स्विकारले होते व त्यांनी जाबदेणार क्लबकडे रक्कम रु. 50,000/- जमा केले होते. याबाबत उभयपक्षात वाद दिसून येत नाही.
तक्रारदारांची जाबदेणारांविरुद्ध अशी तक्रार आहे की, श्रीलंकेच्या सहलीला गेल्यावर त्यांना क्लबच्या माहितीपुस्तिकामध्ये नमुद केल्याप्रमाणे उत्तम दर्जाच्या सेवा-सुविधा मिळाल्या नाहीत. उलट त्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाच्या सेवा पुरविण्यात
आल्या. या तक्रारीच्या अनुषंगे जाबदेणारांच्या म्हणण्याचे अवलोकन करता मंचास असे दिसून येते की, मुळातच जाबदेणारांनी तक्रारदार श्रीलंकेलाच गेले होते, याबाबत आक्षेप घेतलेला आहे. या आक्षेपाच्या अनुषंगे तक्रारदारांनी दाखल केलेल्या दि. 22/2/2011 रोजीच्या पत्राचे अवलोकन करता त्यात तक्रारदारांनी दि. 5/2/2012 रोजी श्रीलंकेला जाण्याचे ठरविल्याबाबत त्यांचे जाबदेणार क्लबमार्फत आभार मानल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे दि. 14/01/2011 च्या CV MEMBER ROOM RESERVATION REQUEST SLIP चे व दि. 18/12/2010 च्या VACATION CONFIRMATION VOUCHER चे अवलोकन करता, ही दोनही कागदपत्रे कंट्री व्हेकेशन क्लबची असल्याचे व त्यातील नमुद माहितीवरुन तक्रारदार हे श्रीलंका येथे सहलीला गेले होते, हे मंचापुढे शाबीत होते. त्यामुळे जाबदेणारांनी तक्रारदारांच्या श्रीलंकेच्या सहलीबाबत उपस्थित केलेली शंका पूर्णपणे तथ्यहीन ठरते, असे मंचाचे मत पडते.
यानंतर जो मुद्दा मंचापुढे उपस्थित होतो, तो म्हणजे तक्रारदारांच्या मुळ तक्रारीचा म्हणजेच तक्रारदारांना जाबदेणार क्लबने निकृष्ट दर्जाची सेवा पुरविली अथवा कसे याबाबतचा. तक्रारदारांच्या या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी काही फोटो दाखल केलेले आहेत. तथापि हे फोटो तक्रारदार ज्या हॉटेलमध्ये वास्तक्यास होते, त्या हॉटेलमधीलच आहेत हे केवळ तक्रारदार कथन करतात म्हणून मान्य करणे मंचास शक्य नाही. त्यामुळे ते फोटो ग्राह्य धरुन त्यानुसार जाबदेणारांविरुद्ध आदेश करणे अत्यंत चुकीचे व अयोग्य ठरेल असे मंचास वाटते. प्रस्तुत प्रकरणी त्यांना दिलेले हॉटेल हे निकृष्ट दर्जाचे होते याबाबतचा कोणताही ठोस वस्तुजन्य पुरावा दाखल करणेत आलेला नाही. त्याचप्रमाणे, तक्रारदारांच्या विधीज्ञांनी त्यांच्या तोंडी युक्तीवादात, तक्रारदारांना क्लबच्या रेस्टॉरंट ऐवजी अन्य ठिकाणी रहावे
लागल्याने जास्तीचा खर्च करावा लागला, याबाबीकडे वारंवार मंचाचे लक्ष वेधले व त्याचीही भरपाई मिळावी, अशी विनंती केली. तक्रारदारांच्या या तक्रार अर्जातील व तोंडी युक्तीवादातील मागणीच्या अनुषंगे तक्रारदारांनी दाखल केलेल्या बीलांचे अवलोकन करता ती बीले, श्रीलंकेतील कंट्री क्लब बेबीलॉन (COUNTRY CLUB BABYLON RESORT HOTELS PVT.LTD.) या रेस्टॉरंटची आहेत, हे दिसून येते. परंतु या बीलावरुन तक्रारदार तक्रार अर्जात नमुद करतात त्याप्रमाणे, त्यांना माहिती देण्यात आली होती त्यापेक्षा त्यांना जास्तीचा खर्च करावा लागला, हे शाबीत होत नाही. तक्रारदार, जेव्हा त्यांना जास्तीचा खर्च करावा लागला अशी तक्रार करतात, तेव्हा तो खर्च किती जास्त होता हे स्पष्ट होण्याकरीता तक्रारदारांनी त्याबाबतचा तुलनात्मक पुरावा सादर करणे अत्यंत गरजेचे होते. परंतु अशा प्रकारचा कोणतीही पुरावा तक्रारदारांनी दाखल केलेला नाही आणि म्हणून वर नमुद विवेचन व निष्कर्षवरुन जाबदेणार क्लबने तक्रारदारांना दुषित सेवा दिली हे ठोस पुराव्याआभावी तक्रारदार शाबीत करुन शकलेले नाहीत, असा मंचाचा निष्कर्ष निघतो व त्यानुसार मुद्दा क्र. 3 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
प्रस्तुत प्रकरणी जाबदेणारांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ सन्मा. न्यायालयांच्या अनेक न्यायनिवाड्यांचा उल्लेख त्यांच्या म्हणण्यात केला आहे. तथापि, हे न्यायनिवाडे त्यांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेले नाहीत. त्याचप्रमाणे तक्रार अर्ज नामंजूर करण्यात आल्याने या न्यायनिवाड्यांचा उहापोह या निकालपत्रात करणेत आलेला नाही.
मुद्दा क्र. 3 मधील विवेचन व निष्कर्षवरुन तक्रारदार त्यांची तक्रार पुराव्याआभावी शाबीत करू शकले नाहीत य निष्कर्षावर मंच आल्याने तक्रारदारांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो व खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
** आदेश **
1. तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. तक्रारीच्या खर्चाबाबत कोणताही हुकुम नाही.
3. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात
यावी.
4. पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात की त्यांनी आदेशाची
प्रत मिळाल्यापासून एक महिन्याच्या आंत सदस्यांकरीता
दिलेले तक्रारीचे संच घेऊन जावेत, अन्यथा सदरचे संच
नष्ट करण्यात येतील.
स्थळ : पुणे
दिनांक : 23/ऑक्टो./2013