तक्रारदार : स्वतः हजर.
सामनेवाले : गैरहजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.एस.डी. मडके ,अध्यक्ष. ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. तक्रारदार श्री. सुबोध कर्वे यांनी सा.वाले कन्ट्री व्हेकेशन यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदार यांनी दिनांक 4 जुलै,2010 रोजी कन्ट्री व्हेकेशनच्या सभासदासाठी रु.75,000/- दिले. सा.वाले यांनी दिनांक 10.7.2010 रेाजी त्यांना तात्पुरती सभासद म्हणून मान्यता दिली. तक्रारदार यांनी दिनांक 5.9.2010, 10.9.2010, 20.9.2010 व 21.9.2010 रोजी ई-मेलव्दारे कायम सभासद मिळणेसाठी विनंती केली, पण त्याचा उपयोग झाला नाही.
3. सा.वाले यांनी दिनांक 22.3.2011 रोजी तक्रारदार यांना सभासदत्व मुलगी व जावई यांच्या नांवे करण्याची विनंती केली. तक्रारदार यांनी सदरहू विनंती मान्य व सभासदत्व मुलीच्या नांवे करण्याचे ठरविले व तसा करार केला.
4. तक्रारदार यांनी सा.वाले यांना दिनांक 22.3.2011 ते 25.11.2011 पर्यत सतत पाठपुरवा केला. पण त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. दिनांक 25.11.2011 रेाजी सा.वाले यांनी त्यांना ई-मेल पाठवून तक्रारदार यांना 30 वर्षाच्या यादीमध्ये सामील केले.
5. तक्रारदार यांनी दिनांक 19.12.2011 रोजी सा.वाले यांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने पैसे व्याजासहीत परत मिळावेत व नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती केली.
6. सा.वाले क्र. 1 व 2 यांनी आपली लेखी कैफीयत दाखल करुन तक्रार अर्ज खोटा असून नामंजूर करण्याची विनंती केली. तक्रारदार यांनी रु.75,000/- भरले हे मान्य असून सदर कालावधी 30 वर्षाचा असल्याचे नाकारले. तक्रारदारांच्या स्वतःच्या मागणी वरुन सभासदत्व त्यांच्या मुलीच्या व जावयाचे नांवे केले. तक्रारदार यांनी 5 वर्षाचे पैसे भरले तरीही त्यांना 30 वर्षाचा कालावधी मिळाला.
7. सा.वाले यांनी पुढे असे नमुद केले केले की, तात्पुरर्ते व कायम सभासदत्व असा उल्लेख नाही. तक्रारदार यांनी सभासदत्व ट्रान्सफर केल्याने तक्रारदार हे सभासद राहीले नाहीत. तक्रारदार यांनी सा.वाले यांचेकडे व्हेकेशनचे बुकींग केले नाही. त्यामुळे सेवेतील कसुर असल्याचे म्हणता येणार नाही.
8. तक्रारदार व सा.वाले यांनी आपले म्हणण्याचे संदर्भात कागदपत्रे दाखल केली आहेत. मंचाने सर्व कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले.
9. त्यानुसार निकालाचेकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदार यांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2 | तक्रारदार तक्रारीत मागीतलेल्या मागण्या मिळण्यास पात्र आहेत काय | होय. |
3 | अंतीम आदेश ? | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
10. तक्रारदार यांनी सा.वाले यांना रु.75,000/- दिनांक 4.7.2010 रोजी दिले हे मान्य आहे. सा.वाले यांनी दिनांक 10.7.2010 रोजी तात्पुरते सभासद करुन घेतले हे मान्य आहे.
11. तक्रारदार यांनी असे कथन केले की, करारा प्रमाणे सा.वाले हे सवलती 30 वर्षासाठी देणार होते. सा.वाले यांनी असा बचाव केला की, तक्रारदार यांना देण्यात येणा-या सूविधा 5 वर्षासाठीच फक्त होत्या व 30 वर्षासाठी नव्हत्या.
12. प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या कागदपत्रांचे सूक्ष्म अवलोकन करता असे दिसून येते की, कराराच्या अटी प्रमाणे मुदत 30 वर्षासाठी होती.
13. तक्रारदार यांनी आपली दाखल कागदपत्रे जोडपत्र अ.क्र. 8 हे सा.वाले यांनी तक्रारदार यांना दिनांक 22.3.2011 रोजी पाठविलेले पत्र आहे. सदर पत्राचा खालील भाग नमुद केला आहे.
“ This is being done as your original agreement was for the
Period of thirty years”
14. सदर पत्र सा.वाले यांनी तक्रारदार यांना पाठविले असून सदर पत्रानुसार कराराची कालमर्यादा 30 वर्षाची आहे. सा.वाले यांनी सदर कालावधी फक्त पाच वर्षाचा असल्याचे कथन करुन करारातील अटीचा भंग केला आहे.
15. तक्रारदार यांनी दिनांक 4.7.2010 रोजी पैसे भरुन आजपर्यत कोणत्याही सुविधेचा लाभ घेतला नाही. सा.वाले यांनी तक्रारदार यांना सुविधा देऊन कायम सभासदत्व देण्याचे टाळल्याचे स्पष्ट दिसून येते.
16. तक्रारदार यांनी आपले पुराव्याचे समर्थनार्थ दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन करता असे दिसून येते की, तक्रारदार यांनी सभासदत्व मिळण्यासाठी नियमाप्रमाणे रु.75,000/- भरुन त्यांना सभासदत्व मिळणेसाठी दिनांक 4.7.2010 ते 22.3.2011 पर्यत सतत ई-मेल व समक्ष भेटून सा.वाले यांचेकडे पाठपुरावा केला. तथापी सा.वाले यांनी सभासदत्व दिले नाही व साधे उत्तरही पठविले नाही. सा.वाले यांनी तक्रारदारांकडून रक्कम स्विकारुन साधे उत्तरही न देणे ही सेवेतील त्रुटी आहे.
17. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन हसेही स्पष्ट होते की, सा.वाले यांनीच तक्रारदार यांना पत्र पाठवून सभासदत्व मुलीच्या नांवे ट्रान्सफर करावे असे कळविले आहे. सा.वाले यांनी दिनांक 22.3.2011 च्या पत्रात मान्य केले की, नांवामध्ये बदल करण्यास आठ महिन्याचा उशिर झाला आहे. सा.वाले यांच्या विनंती नुसार सभासदत्व मुलीच्या नांवे ट्रान्सफर करण्यास तक्रारदार तंयार झाले असे दिसून येते. तक्रारदार यांनी सा.वाले यांना दिनांक 22.3.2011 च्या पत्रा प्रमाणे विनंती केली की, सभासदत्व त्वरीत मुलीच्या नांवे करावे.
18. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुराव्या वरुन हे दिसून येते की, सा.वाले यांनी दिनांक 25.11.2011 रोजी तक्रारदार यांचे नांवे स्पेशल तिस वर्षाचे अॅप्रृव्हल घेतले. तक्रारदार यांचे नांव अ.क्र.45 वर नमुद केले आहे.
19. सा.वाले यांनी त्रारदार यांना मुलीच्या नांवे सभासदत्व ट्रान्सफर करावयास लावले. पण तक्रारदार यांचे नावेच रेकॉर्डला सभासद म्हणून नेांद घेतली. तक्रारदार व त्यांच्या मुलीला कोणत्याही प्रकारच्या सेवेचा लाभ मिळाला नाही. तक्रारदार यांना 30 वर्षापर्यतच्या सवलती देण्याचे मान्य करुनही तसे न करणे ही अनुचित व्यापारी प्रथेचा प्रकार आहे.
20. दाखल पुराव्या वरुन हे दिसून येते की, सा.वाले यांनी जुन, 2010 रोजी तक्रारदार यांचे कडून रु.75,000/- स्विकारुन कराराच्या अटीचे पालन केले नाही. तक्रारदार यांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागले. सा.वाले यांनी कराराच्या अटीचा भंग केल्याने तक्रारदार यांना करार रद्द करण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. तक्रारदार व त्यांच्या मुलीला पण कोणत्याही सुविधेचा लाभ घेता आला नाही. सा.वाले यांनी दिनांक 25.11.2011 च्या पत्रात त्यांच्या अडचणीचा उहापोह केला. तथापी त्यास तक्रारदार कोणत्याही प्रकारे जबाबदार नाहीत.
21. तक्रारदार हे सा.वाले यांचे कडून भरलेली रक्कम द.सा.द.शे. व्याजाने परत मिळणेस पात्र आहेत. सा.वाले यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदार व त्यांच्या मुलीला जो मानीसक त्रास झाला. त्याबद्दल त्यांना योग्य नुकसान भरपाई मिळणे न्यायाचे आहे. मंचाचे मते रु.15,000/- मानसिक त्रासापोटी योग्य ठरेल. सा.वाले यांनी तक्रारीचा खर्च रु.5,000/- तक्रारदार यांना द्यावा.
22. वरील विवेचना वरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. आरबीटी तक्रार क्रमांक 271/2012 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सा.वाले यांनी तक्रारदार यांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली
असे जाहीर करण्यात येते.
3. सा.वाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तपणे तक्रारदार
यांना रु.75,000/- द.सा.द.शे. 9 टक्के दराने दिनांक 30.06.2010
पासून पूर्ण रक्कम फिटेपर्यत द्यावेत.
4. सा.वाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तपणे तक्रारदार
यांना रु.15,000/- मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून
द्यावेत. सदर रक्कमेवर आदेशाच्या तारखेपासून 9 टक्के व्याज
द्यावे.
5. सा.वाले क्र.1 1 व 2 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तपणे तक्रारदार
यांना तक्रारीच्या खर्चापोटी रु. 5,000/- अदा करावेत.
6. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 16/06/2016