ग्राहक तक्रार निवारण मंच, मुंबई उपनगर जिल्हा यांचेसमोर
प्रशासकिय इमारत, तिसरा मजला, चेतना कॉलेजजवळ, बांद्रा-पूर्व,
मुंबई -400051.
तक्रार क्रं.ग्रातनिमं/मुंउजि 411/2014
तक्रार दाखल दिनांक 20/11/2014
आदेश दिनांकः- 21/07/2018
श्रीमती भारथी मूरजानी,
रा. अॅटलांटा 701, एव्हरशाईन,
मालाड (वेस्ट), मुंबई – 400064. ....... तक्रारदार
विरुध्द
1. कंट्री व्हेकेशन (डिव्हीजन ऑफ कंट्री क्लब),
तर्फे मॅनेजर,
बेगमपॅक्ट, रेल्वे स्टेशनच्या बाजूला,
हैदराबाद 500017.
2. कंट्री व्हेकेशन,
एकता भूमी क्लासिक, ए विंग,
ऑफीस नं. 1/11, पहिला मजला,
एच.डी.एफ.सी. बँकेच्या मागे,
महावीर नगरच्या मागे,
कांदिवली (वेस्ट), मुंबई – 400053. ..... सामनेवाले
मंचः- मा. एम. वाय. मानकर, अध्यक्ष,
मा. एस. व्ही. कलाल, सदस्य,
तक्रारदार तर्फे वकील श्रीमती पद्मा सिंग
सामनेवाले तर्फे वकील श्रीमती श्रध्दा वरळीकर
(युक्तीवादाचे वेळेस )
आदेश - मा. श्री. एम. वाय.मानकर, अध्यक्ष, ठिकाणः बांद्रा (पू.)
- न्यायनिर्णय -
(दि. 21/07/2018 रोजी घोषीत)
1. तक्रारदारांनी सामनेवाले यांचे विरुध्द त्यांना सांगितल्याप्रमाणे सुविधा न दिल्यामुळे ही तक्रार दाखल केली. सामनेवाले यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर ते मंचात उपस्थित झाले व त्यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले.
2. तक्रारदारांनुसार त्या निवृत्त वरीष्ठ नागरीक आहेत. सामनेवाले यांचे संपूर्ण देशामध्ये क्लब आहेत व त्याबाबत ते सेवा देतात. सामनेवाले यांची नोंदणी मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये झालेली आहे व देशामध्ये अग्रगण्य कंपनी आहे. माहे ऑगस्ट 2013 मध्ये सामनेवाले यांचे प्रतिनिधी श्री इरफान यांनी तक्रारदारांशी फोनवर संपर्क साधला व त्यांचा क्लब देशात व विदेशात देत असलेल्या सुविधांबाबत माहिती दिली. ते ऐकून तक्रारदारांनी सामनेवाले क्र. 2 यांच्याकडे जाण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्या दिनांक 03/08/13 रोजी श्री. इरफान यांना भेटले व त्यांनी माहीती बाबत एका कागदावर टिपण केले. सामनेवाले यांच्या रु 70,000/- च्या योजनेमध्ये सदस्य होण्याचे तक्रारदारांनी ठरविले. सामनेवाले यांनी तक्रारदारांना सुविधांबाबत आश्वस्त केले व त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी त्यांच्या क्रेडीट कार्डद्वारे रु. 7,500/- ची रक्कम अदा केली. दुस-या दिवशी सामनेवाले क्र 2 यांनी फोन केला व सांगीतले की, जर तक्रारदारांनी संपूर्ण रक्कम एकरकमी अदा केल्यास त्यांना दहा वर्षांकरीता असलेल्या तिस-या योजनेचे व रु 10,000/- चे वायू तिकीट प्राप्त होईल व वार्षीक देखभाल खर्च रु 6,000/- राहील व हे एकरकमी रक्कम दि. 15/08/2013 पूर्वी भरावी लागेल. तक्रारदारांनी ते मान्य करुन रु. 62,500/- क्रेडीट कार्डद्वारे दि. 14/08/13 रोजी अदा केले. सामनेवाले क्र 2 यांनी तक्रारदारांना कळविले की, रक्कम प्राप्त झाल्यानंतर त्यांना एका आठवडयामध्ये सभासद कार्ड प्राप्त होईल. परंतु 15 दिवस झाल्यानंतर सुध्दा त्यांना कार्ड प्राप्त न झाल्याने त्यांनी श्री. इरफान यांना फोन लावला परंतु त्यांनी तो उचलला नाही. सतत पाठपुरावा केल्यानंतर त्यांना ते कार्ड 14/01/14 रोजी प्राप्त झाले.
3. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे लेखी कैफीयत सादर केली आहे. त्यांच्यानुसार तक्रारदारांनी ही केस गैरसमजूतीमुळे दाखल केली आहे सबब ती खर्चासह खारीज करण्यात यावी. तक्रारदारांनी मुद्दाम काही महत्वाच्या बाबी दडवून ठेवल्या आहेत. सदस्य हा पूर्ण देशामध्ये सामनेवाले यांच्या क्लबमध्ये असलेल्या सुविधा अटी व शर्तीप्रमाणे उपभोगू शकतो. सदस्यत्वाबाबत तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये करार झाला आहे व त्या कराराप्रमाणे तक्रारदारांनी हा वाद लवादाकडे नेणे आवश्यक होते. तक्रारदारांनी सदस्यत्वाकरीता भरलेली फी / रक्कम ही कोणत्याही कारणास्तव कराराप्रमाणे परत करता येत नाही. कराराप्रमाणे तक्रारदार हे सामनेवाले यांच्या क्लबचे सदस्य झाले व त्यांना पाच वर्षे सात दिवस व सहा रात्रींकरीता ब्ल्यू बिलेनिअर सदस्यत्व देण्यात आले होते व त्याकरीता तक्रारदारांनी रु. 70,000/- अदा केले होते. त्यापैकी रु. 25,000/- ही क्लबच्या सदस्यत्वाकरीता होती. तक्रारदारांना सभासदत्व देण्यात आले होते. कराराप्रमाणे वार्षिक देखभाल खर्च रु. 8,000/- आहे व ही बाब करारामध्ये स्पष्टपणे नमूद आहे. तक्रारदारांनी सर्व समजून करारापत्रावर सही केलेली आहे व त्यामध्ये तक्रारदारांना प्राप्त होणारे फायदे अधिकार व जबाबदारी नमूद आहे. विशेष बाब म्हणून तक्रारदार यांना पाच वर्षांसाठी सुटीकालीन व्हाउचर्स देण्यात आले होते. सामनेवाले हे त्यांच्या नियमाप्रमाणे वागत आहेत व तक्रारदार यांचा दावा मोघम आहे व सामनेवाले यांनी सेवा देण्यात कोणताही कसूर केलेला नाही किंवा तक्रारदारांना त्रास दिलेला नाही. सबब, ही तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
4. उभयपक्षांनी कागदपत्रे पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तीवाद सादर केला. तक्रारदार यांचे वतीने वकील श्रीमती पद्मा सिंग व सामनेवाले तर्फे वकील श्रीमती श्रध्दा वरळीकर यांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
5. उपरोक्त बाबींप्रमाणे खालील बाबी मान्य आहेत. तक्रारदारांनी दि. 14/08/2013 रोजी रु. 70,000/- सामनेवाले यांचेकडे अदा केले. सामनेवाले यांनी तक्रारदारांची सदस्य म्हणून नोंदणी केली. उभयपक्षांमध्ये सभासदत्वाबाबत करार झाला होता.
6. तक्रारदारांनुसार सामनेवाले यांचे प्रतिनिधी श्री. इरफान यांनी त्यांना वेगवेगळया योजनांबाबत माहिती दिली व त्याचे टिपण एका कागदावर करण्यात आले व तो कागद तक्रारदारांनी नि. अ म्हणून तक्रारीसोबत दाखल केलेला आहे. या प्रमाणे तक्रारदारांना रु. 70,000/- भरल्यानंतर क्लबचे सदस्यत्व व पाच वर्षांसाठी सुटीकालीन सवलत मिळणार होती व वार्षिक देखभाल खर्च रु. 6,000/- दर्शविण्यात आला आहे. सामनेवाले यानी उभयपक्षांमध्ये झालेला करारनामा दाखल केलेला आहे. या करारपत्राच्या क्लॉज 25 प्रमाणे सामनेवाले यांनी करारपत्रामध्ये नमूद नसलेल्या बाबींव्यतिरिक्त कोणतेही तोंडी आश्वासन दिलेले नाही. सामनेवाले यांच्यानुसार उभयपक्षांच्या जबाबदा-या व सवलती करारप्रत्राप्रमाणे निर्धारीत केलेल्या आहे. करारपत्रामध्ये सवलत नसल्यास ती उपभोगण्याकरीता सदस्य मागणी करु शकत नाही. सामनेवाले यांनी त्यांच्या लेखी कैफीयतीच्या परिच्छेद क्र. 13 सी मध्ये नमूद केले आहे की, तक्रारदारांना विशेष बाब म्हणून सामनेवाले यांनी त्यांना उपलब्ध असलेल्या पाच वर्षाच्या सुटीकालीन सदस्यत्वा खेरीज पाच वर्षांकरीता सुटीकालीन व्हाउचर्स घेऊन जाण्यास कळविले होते. ही बाब विचारात घेता जरी सामनेवाले यांनी तक्रारदार यांना ही सवलत देण्याची तयारी दाखविली. परंतु ही बाब करारनाम्यामध्ये नमूद नाही किंवा विशेष बाब म्हणून अंतभूर्त नाही. यावरुन असे दिसून येते की, सामनेवाले यांनी ज्या अटी व शर्ती व सवलती करारामध्ये नाहीत त्या व्यतिरीक्त तक्रारदारांना तोंडी माहीती दिली होती. त्यामुळे सामनेवाले यांनी करारानाम्या व्यतिरिक्त तक्राररांना काही भासविले नाही हे म्हणणे सकृतदर्शनी चुकीचे दिसून येते. यावरुन हे दिसून येते की, सामनेवाले यांनी तक्रारदारांना सभासदत्वाबाबत माहिती देताना काही सवलती किंवा बाबी सांगीतल्या होत्या.
7. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कच्च्या टिपणावरुन हे स्पष्ट होते की, वार्षीक देखभाल खर्च रु 6,000/- होता परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना सभादत्वाबाबत कार्ड पाठविताना त्यामध्ये तो खर्च रु. 8,000/- दाखविला आहे. हे पृष्ठ तक्रारीमध्ये क्र. 18 वर आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारांना रक्कम प्राप्त झाल्यानंतर अंदाजे चार महिन्यांनी सभासदत्वाबाबत कार्ड पाठविले. सात दिवसांत पाठविण्याची हमी दिल्यानंतर कार्ड फार विलंबाने पाठविल्याचे दिसून येते.
8. उपरोक्त चर्चेवरुन हे दिसून येते की, सामनेवाले यांनी तक्रारदारांना सभासदत्वाबाबत माहिती देताना चुकीची माहिती दिली. त्यामुळे झालेला करार झुगारण्याचा तक्रारदारांना अधिकार प्राप्त होतो. असा करार तक्रारदार यांचेवर बंधनकारक राहू शकत नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सभासदत्व देताना अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असल्याचे दिसून येते. सामनेवाले हे आपल्या कराराचा प्राप्त केलेली रक्कम परत न करण्याकरीता आधार घेऊ शकत नाहीत. आमच्या मते, तक्रारदारांनी केलेली मागणी रास्त आहे व ते त्याकरीता पात्र ठरतात.
9. उपरोक्त चर्चेनुसार खालील आदेश पारीत करीत आहोत.
10. या मंचाचा कार्यभार व प्रशासकीय कारण विचारात घेता ही तक्रार याआधी निकाली काढता आली नाही. सबब, खालील आदेश
- आदेश -
1) तक्रार क्र. 411/2014 अंशतः मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात कसूर केला, तसेच अनुचित व्यापार पध्दत अवलंबीली असे जाहीर करण्यात येते.
3) सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक किंवा संयुक्तीकरित्या तक्रारदार यांना रक्कम रु. 70,000/- (रु. सत्तर हजार मात्र) दि. 15/08/2013 पासून द.सा.द.शे. 10 % व्याजाने दि. 31/08/2018 पर्यंत अदा करावेत. तसे न केल्यास त्या रकमेवर दि. 01/09/2018 पासून रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 15 % व्याज लागू राहील.
4) सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक किंवा संयुक्तीकरित्या तक्रारदार यांना मानसिक त्रासाकरीता रु. 25,000/- (रु. पंचवीस हजार मात्र) व तक्रारीचा खर्च म्हणून रु. 10,000/- (रु. दहा हजार मात्र) दि. 31/08/18 पर्यंत अदा करावेत. तसे न केल्यास त्या रकमांवर दि. 01/09/2018 पासून रकमा अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 10% व्याज लागू राहील.
5) तक्रारदार यांच्या मंजूर न झालेल्या मागण्या फेटाळण्यात येतात.
6) तक्रारीचे अतिरिक्त संच तक्रारदारांना परत करण्यात यावेत.
7) न्यायनिर्णयाच्या प्रती उभयपक्षांना विनामूल्य पाठविण्यात याव्यात.
(एस. व्ही. कलाल) ( एम. वाय. मानकर )
सदस्य अध्यक्ष
ठिकाणः बांद्रा (पू.) मुंबई.
दिनांकः 21/07/2018.
जीएमपी/-