श्रीमती अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार निकालपत्र-
:- नि का ल प त्र :-
[दिनांक 13/मे/2011]
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1] जाबदेणार यांनी एक योजना सुरु केली. त्या योजनेनुसार तक्रारदारानी रक्कम रुपये नव्वद हजार भरुन जाबदेणार कंट्री व्हॅकेशन इंटरनॅशन हॉलिडे क्लब लि., चे सभासदत्व स्विकारले. जाबदेणार व तक्रारदार यांच्यात दिनांक 14/2/2009 रोजी करार क्र 66/डीटी/257 झाला. जाबदेणार तीस दिवसांच्या आत वेलकम किट, सभासदत्वाचे प्रमाणपत्र व सभासदत्वाचे कार्ड तक्रारदारास देणार होते, तसेच पुढील अतिरिक्त सोई-सुविधा ज्या सामनेवालेनी तक्रारदारास देण्याचे मान्य केल्या होत्या, त्यादेखील तक्रारदारास दिल्या नाहीत.
[1] कंट्री क्लबचे आजीवन सभासदत्व
[2] भारत व परदेशात संलग्न क्लब येथे अॅसेस
[3] कंट्री क्लब येथे दोन वर्षांसाठी हेल्थ क्लब ची मोफत सेवा
[4] अमृता कॅसेल, हैद्राबाद येथील जेवणावर 20 टक्के सुट
[5] भारत व पदरेशातीत विविध हॉटेल्स च्या रुम टेरिफवर सुट
[6] परदेशातील विविध ठिकाणच्या खरेदीवर सुट
[7] रुपये 5 लाखापर्यंत अपघात विमा
वार्षिक देखभालीच्या खर्चापोटी तक्रारदारानी रक्कम रुपये 4,000/- जाबदेणार यांच्याकडे भरली. ही रक्कम भरल्यानंतर तक्रारदारास सभासदत्वाचे प्रमाणपत्र व कार्ड देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. परंतू प्रत्यक्षात तक्रारदारास ते देण्यात आले नाही त्यामुळे तक्रारदार व्हॅकेशन्स व सुविधांचा लाभ घेऊ शकले नाही. वारंवार मागणी करुनही तक्रारदारास सभासदत्वाचे प्रमाणपत्र व कार्ड देण्यात आले नाही. यासर्वांमुळे तक्रारदारास मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. म्हणून प्रस्तूत तक्रार दाखल करुन सभासदत्वापोटी भरलेली रक्कम रुपये 90,000/- 24 टक्के व्याजासह, व रुपये 4,000/- वार्षिक देखभाल खर्चापोटी भरलेली रक्कम, रक्कम रुपये 20,000/- मानसिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च मागतात. तक्रारीसोबत प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे दाखल केली.
2] जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार यांनी तक्रारदारानी योजनेच्या सभासदत्वापोटी रक्कम रुपये 90,000/- भरल्याचे मान्य केले. तसेच तक्रारदारास लवकरात लवकर सभासदत्वाचे कार्ड देण्यात येईल असे कळविण्यात आले होते हे देखील जाबदेणारयांनी मान्य केले. परंतू सभासदत्वाचे कार्ड 30 दिवसांच्या आत देण्याची अट जाबदेणार यांना मान्य नाही. सभासदत्वाचे कार्ड न दिल्यामुळे तक्रारदाराच्या अधिकारांवर व सवलतींचा लाभ घेण्यावर बंधन येणार नव्हते. जाबदेणार अतिरिक्त सोई सवलती देणार होते हे अमान्य करतात. सभासदत्वाचे प्रमाणपत्र देण्याची जाबदेणार यांची प्रथा नाही. उलट तक्रारदारानीच सभासदत्वाचे कार्ड न मिळाल्यामुळे योजनेचा लाभ घेतला नाही, असे जाबदेणार यांचे म्हणणे आहे. तक्रारदारानी उर्वरित वार्षिक देखभालीच्या खर्चाची रक्कम भरली नाही. तक्रारदारास 14/2/2009 च्या कराराद्वारे सभासदत्व क्र.डीटी/66/257 देण्यात आला होता. सभासदत्व स्विकारल्यापासून ते तक्रार दाखल करेपर्यन्त कधीही तक्रारदारानी हॉलिडेज चे प्रिफरन्सेस व निवड कधीच जाबदेणार यांना कळविली नाही. व्हॅकेशनची मागणी केल्यावरच फुड व रुम टेरिफ वगैंरेंवर सवलत मागता येते. तक्रारदारानी व्हॅकेशनची, सोई सवलतींची कधीही मागणीच केलेली नव्हती त्यामुळे सेवेत कमतरतेचा प्रश्नच उदभवत नाही, असे जाबदेणार यांचे म्हणणे आहे. शेवटी तक्रार नामंजूर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. सोबत शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3] दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. दिनांक 14/2/2009 रोजी करार क्र 66/डीटी/257 झाला. कराराच्या अट क्र.4 “POINTS CERTIFICATE : … it shall admit the purchaser(s) to the membership of Country Vacations international Holiday Club and shall ensure that a membership certificate be issued in respect of their membership at Country Vacations. Such certificate shall be issued within approximately 30 days (time not of the essence) and shall be conclusive evidence of legal ownership..” असे नमूद करण्यात आलेले आहे. तक्रारदारास लवकरात लवकर सभासदत्वाचे कार्ड देण्यात येईल असे कळविण्यात आले होते हे देखील जाबदेणार यांनी लेखी जबाबात मान्य केलेले आहे. सभासदत्वाचे प्रमाणपत्र व कार्ड न मिळाल्यामुळे तक्रारदारानी योजनेचा लाभ घेतला नाही हे देखील जाबदेणार यांना मान्य आहे. तक्रारदारानी सभासदत्वाचे प्रमाणपत्र व कार्ड मिळणेबाबत जाबदेणार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला परंतू तक्रारदारास योग्य वागणूक देखील देण्यात आली नाही, योजनेचा लाभ पुर्ण सभासदत्वाची रक्कम भरुनही तक्रारदारस घेता आला नाही, ही जाबदेणार यांच्या सेवेतील कमतरता आहे. जाबदेणार यांच्या सेवेतील कमतरतेमुळे तक्रारदारास मानसिक, शारिरीक, आर्थिक त्रास सहन करावा लागला असेलच. त्यामुळे तक्रारदार त्यांनी भरलेली रक्कम रुपये 90,000/- व देखभालीचा खर्च रक्कम रुपये 4,000/- जाबदेणार यांच्याकडून मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे-
:- आ दे श :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारास रक्कम रुपये 94,000/-9 टक्के व्याजासह दिनांक 14/2/2009 पासून संपूर्ण रक्कम तक्रारदारास अदाहोईपर्यन्त तसेच तक्रारीचा खर्च
रक्कम रुपये 1,000/- तक्रारदारास आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयात दयावी.
3. आदेशाची प्रत दोन्ही पक्षास विनामूल्य देण्यात यावी.