तक्रारदार : त्यांचे प्रतिनिधी वकील श्री.जयेश जैन यांचे मार्फत हजर.
सामनेवाले : त्यांचे प्रतिनिधी श्री.आशिष उपाध्याय यांचेमार्फत हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले हे तक्रारदारांना पर्यटनाचे ठिकाणी निवासस्थानाची व्यवस्था पुरविणारी कंपनी आहे. तक्रारदार यांनी सा.वाले यांचे सभासदत्व दिनांक 16.4.2004 रोजी स्विकारले व एकूण सभासदाचे शुल्क रु.30,000/- पैकी रु.18,000/- तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे दिनांक 16.4.2006 रोजी अदा केले.
2. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, दिनांक 16.4.2006 नंतर तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे वेग वेगळया पर्यटन ठिकाणामध्ये तक्रारदारांच्या निवासाची सुविधा करणेकामी विनंती केली होती. परंतु त्या प्रत्येक ठिकणी निवास उपलब्ध नाही असे कारण देऊन सा.वाले यांनी तक्रारदारांची विनंती नाकारली. या वरुन तक्रारदारांनी असा निष्कर्ष काढला की, सा.वाले हे कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यात असमर्थ आहेत. येवढेच नव्हेतर सा.वाले यांनी तक्रारदारांकडे ऑक्टोबर, 2008 मध्ये आस्थापना खर्चाबद्दल रक्कम मागीतली. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांना नोटीस देऊन सुरवातीला जमा केलेले रु.18,000/- परत मागीतले व सभासदत्व रद्द करीत आहे असे कळविले. सा.वाले यांनी तक्रारदारांनी सुरवातीला जमा केलेले रु.18,000/- परत करण्यास नकार दिला. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 30.6.2009 रोजी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व त्यामध्ये सा.वाले यांचेकडून तक्रारदारांनी जमा केलेले रु.18,000/- तसेच नुकसान भरपाई रु.50,000/- वसुल होऊन मिळावेत अशी दाद मागीतली.
3. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांनी दिनांक 16.4.2006 रोजी सभासदत्व स्विकारले व सभासदत्वाचा कालावधी 5 वर्षाचा होता. तक्रारदारांनी सभासद शुल्क रु.30,000/- पैकी सुरवातीला रुपये 18,000/- जमा केले व त्यानंतर कुठलीही रक्कम जमा केली नाही. कराराप्रमाणे तक्रारदारांनी बाकी रक्कम जमा न केल्याने तक्रारदार हे सेवा सुविधा मागू शकत नाही. तसेच अनामत रक्कम देखील परत मागू शकत नाही असे सा.वाले यांनी कथन केले. सा.वाले यांनी पुढे असे कथन केले की, पर्यटन स्थळावर निवासाची सुविधा उपलब्धते प्रमाणे केली जाते. विशिष्ट पर्यटन स्थळावर अग्र हक्काने ती मिळू शकत नाही. या प्रमाणे तक्रारदारांना कराराचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या आरोपस सा.वाले यांनी नकार दिला.
4. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तर सा.वाले यांनी त्यांचे प्रतिनिधी श्री.आशिष उपाध्याय यांचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी लेखी युक्तीवाद दाखल केला.
5. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली हा आरोप तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून अनामत रक्कम रु.18,000/- व नुकसान भरपाई वसुल करण्यास पात्र आहेत काय ? | नाही. |
3. | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
6. तक्रारदारांनी तक्रारीसोबत सा.वाले यांनी तक्रारदारांना दिलेल्या माहिती पत्रकाची प्रत हजर केलेली आहे. तसेच करारनाम्याची प्रत हजर केलेली आहे. त्यातील नोंदी वरुन असे दिसते की, तक्रारदारांनी एकुण शुल्क रु.30,000/- पैकी रु.18,000/- सा.वाले यांचेकडे जमा केले. व बाकी रक्क्म रु.12,000/- 18 मासिक हप्त्यामध्ये जमा करावयाची होती. तक्रारदारांचे असे कथन नाही की, त्यांनी बाकी रक्कम रु.12,000/- सा.वाले यांचेकडे जमा केले. या प्रमाणे तक्रारदारांनी सभासदत्वाची एकूण रक्कम रु.30,000/- सा.वाले यांचेकडे जमा केल्याबद्दल तक्रारदारांचे कथन नाही. व तसा पुरावाही नाही. कराराचे कलम 8 प्रमाणे तक्रारदारांनी जर विशिष्ट हप्ता भरण्यास नकार दिला किंवा तो हप्ता चुकविला तर सा.वाले सभासदत्व रद्द करु शकतील. त्याच प्रमाणे करारनामा कलम 5 प्रमाणे आस्थापना खर्चाची रक्कम अदा केली नाही तर सभासदत्व रद्द होऊ शकते. त्याप्रमाणे वार्षिक आस्थापना खर्च तक्रारदारांनी अदा करावयाचे होते. करारनाम्यातील शर्ती व अटी वरुन असे दिसून येते की, सभासदाला विशिष्ट पर्यटन स्थळाचे ठिकाणी विशिष्ट कालावधीमध्ये अथवा अग्रहक्काने निवासस्थानाची सोय उपलब्ध करुन देण्याचा हक्क होता असे असू शकत नाही. कारण पर्यटन स्थळावर निवासाची उपलब्धता तेथे निवासस्थान उपलब्ध असण्यावर अवलंबून असते. त्यातही जर निवासस्थान उपलब्ध नसेल तर तक्रारदारांना दुस-या पर्यटन स्थाळावरील निवासस्थानाची मागणी करावी लागेल. सा.वाले यांनी विशिष्ट ठिकाणचे निवासस्थान विशिष्ट कालावधीमध्ये उपलब्ध करुन दिले नाही, यावरुन सभासदत्वाचा करार रद्द करु शकत नाही. सभासद कराराचे कलम 11 प्रमाणे करारनामा अंतीम असून तो रद्द होऊ शकत नाही. त्यातही सा.वाले यांनी तक्रारदारांना केवळ विशिष्ट पर्यटन स्थळावर विशिष्ट कालावधीमध्ये निवासस्थानाची सुविधा उपलब्ध करुन दिली नाही या वरुन सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढता येत नाही.
7. एकूणच तक्रारदार सभासद शुल्काची अनामत रक्कम रुपये 18,000/- व नुकसान भरपाई सा.वाले यांचे कडून मागू शकत नाहीत.
8. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 510/2009 रद्द करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.