द्वारा- श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य
निकालपत्र
दिनांक 24 फेब्रुवारी 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार क्र.1 कु. करिष्मा वासुदेव कनुगा हया तक्रारदार क्र.2 यांच्या दत्तक कन्या आहेत. तक्रारदार क्र.1 यांचे जन्मदाते वडिल कै. दिपक वसंत भोंडवलकर यांचे दिनांक 16/10/2009 रोजी निधन झाले. श्री. भोंडवलकर यांनी त्यांच्या जाबदेणार क्र.2 यांच्याकडे असलेल्या बचत खात्या संदर्भात तक्रारदार क्र.1 यांचे नॉमिनेशन केले होते, सदर खात्यात रुपये 7,77,698/- शिल्लक होते. तक्रारदार क्र.1 यांनी जाबदेणार यांना श्री. भोंडवलकर यांच्या खात्यातील रक्कम त्यांच्या नावे करण्याची विनंती केली. जाबदेणार क्र.2 यांनी मागणीनुसार फॉर्म, पॅनकार्ड, रहिवासी दाखला, श्री. भोंडवलकर यांच्या मृत्यूचा दाखला, दोन फोटो तक्रारदार क्र.1 यांनी दिले. नंतर दत्तकविधानाची कागदपत्रे मागितल्या प्रमाणे तक्रारदार क्र.1 यांनी जाबदेणार यांना दिली. त्यानंतर जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून इन्डेमनिटी बॉन्ड व शपथपत्र मागितले. जाबदेणार ही कागदपत्रे पहिल्यांदा देखील मागू शकत होते. तसेच बँकेने दोन जामिनदार, त्यांचे वेतनप्रमाणपत्र, आयडेंडिटी प्रुफ यांची मागणी केली, तसेच मयत यांची पत्नी व मुलगा यांचा रहिवासी दाखला मागितला. तक्रारदारांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता केली. तक्रारदारांना जी रक्कम प्राप्त होणार होती ती जाबदेणार यांच्याकडे मुदतठेव स्वरुपात ठेवावी लागेल असे सांगितले. म्हणून तक्रारदार क्र.1 यांनी दिनांक 7/11/2009 च्या पत्रान्वये कोरेगांव पार्क, पुणे शाखेत मुदतठेव ठेवण्यास सहमती दर्शविल्यानंतर रक्कम दिली. तक्रारदार क्र.2 यांना पत्नीसोबत जाबदेणार यांच्या कडे एकूण 9 वेळा जावे यावे लागले, रहावे लागले एकूण खर्च रुपये 24500/- आला. दिनांक 6/2/2010 च्या नोटीसद्वारे मुदतठेव पावत्या रद्द करुन तक्रारदार क्र.1 यांना रक्कम मिळण्याची मागणी केली. मुदतठेव पावती दिनांक 8/1/2010, रुपये 7,82,127/-, तीन वर्षे, व्याजदर 7.25 टक्के होता. दिनांक 5/5/2010 रोजी जाबदेणार बँकेने तक्रारदारांना रुपये 7,92,392.42 न देता रुपये 7,89,272/-ची पेऑर्डर दिली. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रुपये 3,120.42 कमी दिले. मुदतठेव जाबदेणार यांच्या बँकेतच ठेवावयास सांगणे ही अनुचित व्यापारी पध्दत आहे. 2 टक्के व्याजदर कमी देतांना त्यास रिझर्व्ह बँकेचे रेग्युलेशनचा आधार नाही. जाबदेणार यांनी रुपये 7,82,127/- + व्याज रुपये 14,180/- मिळून रुपये 7,96,307/- मधून तक्रारदारांना दिलेली रक्कम रुपये 7,89,272/- वजा जाता रुपये 7,035/- मिळावयास हवेत. जाबदेणार यांनी सर्व कागदपत्रांची मागणी एकदम केली नाही, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 7,035/- 7.25 टक्के व्याजासह, खर्चापोटी रुपये 24,500/-, नुकसान भरपाई पोटी रुपये 10,000/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार क्र.1 व 2 यांनी एकत्रित लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदार क्र.1 या तक्रारदार क्र.2 यांच्या दत्तक कन्या आहेत, त्यांचे जन्मदाते वडिल श्री. दिपक वसंत भोंडवलकरांचा मृत्यू झाला याची माहिती जाबदेणार यांना नाही. श्री. भोंडवलकरांनी यांच्या बचत खात्यास तक्रारदार क्र.1 नॉमिनी होते. तक्रारदार क्र.1 यांनी रक्कम मिळण्यासाठी दिनांक 7/11/2009 रोजी अर्ज घेतला, परंतू दिनांक 19/12/2009 रोजी मृत्यूच्या दाखल्यासोबत सादर केला. श्रीमती राजश्री वासुदेव कनुगा हया तक्रारदार क्र.1 यांच्या नावे रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा केला परंतू त्यांनी ट्रान्सफर व्हाऊचर व इतर कायदेशिर बाबींची पुर्तता केलेली नव्हती. रिझर्व्ह बँकेच्या नॉर्मस प्रमाणे पुर्तता केली नाही. नॉमिनीचे आयडेंटिफिकेशन होण्यासाठी कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती. तक्रारदार क्र.2 हे जाबदेणार यांचे ग्राहक नाहीत, रक्कम तक्रारदार क्र.1 यांना मिळणार असतांनाही तक्रारदार क्र.2 व त्यांच्या पत्नी जाबदेणार यांच्याकडे येत असत, त्यापोटी झालेल्या खर्च देण्यास जाबदेणार बांधिल नाहीत. तक्रारदार क्र.1 यांनी मुदतठेव पावती सादर केल्यानंतर दिनांक 5/5/2010 रोजी रुपये 7,89,272/- ची पे ऑर्डर त्यांना देण्यात आली होती. मुदतठेवीचे नियम ठेव पावतीच्या मागील बाजूस नमूद करण्यात आलेले आहेत, त्यानुसार देय असलेली मुदतीपुर्वी मुदतठेव पावतीची रक्कम रुपये 7,89,272/- तक्रारदारांना देण्यात आलेली आहे. मुदतठेव ठेवण्याचा निर्णय तक्रारदारांचा होता. त्याबाबतच्या अटी व शर्ती तक्रारदारांना सांगण्यात आलेल्या होत्या. जाबेदणार यांच्या सेवेत त्रुटी नाही म्हणून तक्रार खर्चासह नामंजुर करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार करतात.
3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने काळजीपुर्वक पाहणी केली. कै. दिपक वसंत भोंडवलकर यांच्या नॉमिनी तक्रारदार क्र.1 यांनी बचत खात्यातील रकमेच्या मागणी संदर्भात सर्व कागदपत्रांसह केलेला अर्ज जाबदेणार यांना दिनांक 19/12/2009 रोजी प्राप्त झाला होता हे जाबदेणार यांच्या दिनांक 15/4/2010 च्या पत्रावरुन स्पष्ट होते. जाबदेणार यांनी दिनांक 13/4/2010 रोजी तक्रारदारांच्या वकीलांना पाठविलेल्या नोटीसीचे अवलोकन केले असता जाबदेणार यांनी तक्रारदारांना जी रक्कम मिळणार होती ती मुदतठेवीत ठेवण्याचा सल्ला दिलेला होता ही बाब मान्य केल्याचे स्पष्ट होते. जाबदेणार यांनीच सल्ला दिलेला असल्यामुळे मुदत ठेव ठेवण्यास तक्रारदारांनी मान्यता दिली व मुदत ठेवीत रक्कम गुंतविल्याचे स्पष्ट होते. तसेच बचत खात्यातील रक्कम प्राप्त होण्यासाठी जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून एकाच वेळी सर्व कागदपत्रे मागितली होती यासंदर्भातील पुरावा मंचासमोर जाबदेणार यांनी दाखल केलेला नाही. जाबदेणार हे प्रत्येक वेळी तक्रारदारांकडून वेगवेगळी कागदपत्रे मागत असल्यामुळे, तक्रारदारास सदरची रक्कम मिळण्यास विलंब झाला हे स्पष्ट होते. कै. दिपक वसंत भोंडवलकर यांचा मृत्यू दिनांक 16/10/2009 रोजी झाल्यानंतर जाबदेणार यांनी तक्रारदारांना प्रथम पुर्ण भरलेला फॉर्म, पॅनकार्ड, रहिवासी दाखला, श्री. भोंडवलकर यांच्या मृत्यूचा दाखला, तक्रारदार क्र.1 यांचे फोटो यांची प्रथम मागणी केली. ही कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून श्रीमती राजश्री यांचे आडनाव मयत वडिलांच्या आडनावाशी मिळते जुळते नाही असा आक्षेप घेतला. वास्तविक जाबदेणार बँकेला श्री. भोंडवलकर यांनी नॉमिनी केलेल्या व्यक्तीचे आडनाव माहित होते. जाबदेणार बँक दत्तकविधानाच्या आदेशाची सत्यप्रत्य प्रथम मागू शकत असतांना देखील त्यांनी ती नंतर मागितली. दत्तकविधानाची कागदपत्रे तक्रारदारांनी दिल्यानंतर जाबदेणार यांनी इन्डमनिटी बॉन्ड व शपथपत्राची मागणी केली. त्यानंतर परत दोन गॅरेंटर्स, त्यांच्या पगाराचा दाखला, ओळखपत्र मागितले. त्यानंतर श्री. भोंडवलकर यांच्या पत्नी व मुलाचा रहिवासी दाखला व ओळखपत्र मागितले. अशा प्रकारे जाबदेणार यांनी प्रत्येक वेळी वेगवेगळया कागदपत्रांची तक्रारदारांकडून मागणी करुन तक्रारदारांना निष्कारण वारंवार कागदपत्रे देण्यासाठी हेलपाटे घालण्यास भाग पाडल्याचे हे स्पष्ट होते. श्री. भोंडवलकर यांचा मृत्यू दिनांक 16/10/2009 रोजी झाला. जाबदेणार यांनी प्रत्येक वेळी मागितल्याप्रमाणे तक्रारदारांनी कागदपत्रांची पुर्तता केली. त्यानंतर जाबदेणार यांच्याच सल्ल्यानुसार तक्रारदारांनी बचतखात्यातून मिळणारी रक्क्म मुदतठेवीत ठेवण्यासाठी सहमती दर्शविली. मुदतठेव पावती दिनांक 8/1/2010 आहे. त्यानंतर सदरहू मुदतठेवीची मुदतपुर्व मागणी तक्रारदारांनी त्यांच्या वकीलांच्या दिनांक 6/2/2010 च्या नोटीसीद्वारे जाबदेणार यांच्याकडे केली. प्रत्यक्षात जाबदेणार यांनी दिनांक 5/5/2010 रोजी तक्रारदारांना रक्कम दिल्याचे स्पष्ट होते. यासर्वावरुन जाबदेणार यांनी श्री. भोंडवलकर यांच्या मृत्यू दिनांक 16/10/2009 नंतर, तक्रारदारांनी मुदतठेवीची मुदतपुर्व मागणी दिनांक 6/2/2010 रोजी केल्यानंतर तक्रारदारांना प्रत्यक्षात मुदतठेवीची रक्कम दिनांक 5/5/2010 रोजी जवळजवळ 3 महिन्यांच्या विलंबाने दिल्याचे स्पष्ट होते.
जाबदेणार यांनी दाखल केलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दिनांक 1/7/2009 च्या Master Circular- Interest Rates on Rupee Deposits- UCBs मध्ये “8. Premature Withdrawal of Term Deposit – Banks are free to determine their own penal interest rates for premature withdrawal of term deposits” असे नमूद करण्यात आलेले आहे. तर तक्रारदारांनी दाखल केलेल्या मुदतठेव पावतीच्या मागील बाजूस नमूद केलेल्या नियमांमध्ये “Interest payable on encashment of Term Deposit before maturity – Above 15 days—2% less than the applicable rate of interest for the actual period for which deposits kept with the Bank” असे नमूद केलेले आहे. तक्रारदारांनी मुदतपुर्व मुदतठेव रकमेची मागणी केल्यामुळे जाबदेणार यांनी नियमाप्रमाणे कार्यवाही केल्याचे स्पष्ट होते. मात्र मुदतठेवीत रक्कम गुंतविण्यासाठी दिलेला सल्ला व आवश्यक कागदपत्रांची एकदम मागणी न करणे, त्यामुळे मुदत ठेव रक्कम मिळण्यास झालेला विलंब या जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी ठरतात असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे निश्चितच तक्रारदारांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे. म्हणून तक्रारदार नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 10,000/- जाबदेणार यांच्याकडून मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. तक्रारदार क्र.2 यांनी त्यांना मुंबई येथे जाण्या येण्यासाठीचा खर्च, रहाण्याचा खर्च जाबदेणार यांच्याकडून मागितलेला आहे. परंतू जाबदेणार यांच्याकडून प्रत्यक्षात तक्रारदार क्र.1 यांनाच रक्कम मिळणार होती, तक्रारदार क्र.1 सज्ञान होत्या त्यामुळे तक्रारदार क्र.2 खर्चाची रक्कम मिळण्यास पात्र नाहीत असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
वर नमूद विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार क्र.1 व 2 यांनी एकत्रितरित्या व संयुक्तिकरित्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- तक्रारदार क्र.1 यांना आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.
[एस. के. कापसे] [अंजली देशमुख]
सदस्य अध्यक्ष