न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 11 प्रमाणे दाखल केला आहे. प्रस्तुतची तक्रार स्वीकृत होवून जाबदार यांना नोटीस आदेश झाले व जाबदार यांनी हजर होवून आपले म्हणणे दाखल केले. तक्रारदार यांनी आपले सांगरुळ, ता. करवीर जि. कोल्हापूर येथील गट नं. 425 येथे सन 2011 मध्ये घर बांधणेस सुरुवात केली. तक्रारदारांनी दि.16/7/2011 रोजी रक्कम रु.1,11,000/- आय.डी.बी.आय. क्र.522440 अन्वये भरले व कॉन्क्रीट खरेदी केले. पहिला स्लॅब व्यवस्थित झाला. तथापि दुस-या स्लॅबला जो माल पाठविला, तो थोडा काळपट रंगाचा होता व तसे जाबदार यांचे इंजिनिअर यांचे निदर्शनास आणलेनंतर तक्रारदारांनी काम थांबविले. परंतु सदरचे इंजिनिअर यांनी, काहीही अडचण येणार नाही व काही अडचण आलेस कंपनी स्वतः जबाबदार राहिल असे तक्रारदारांना सांगितलेने तक्रारदारांनी स्लॅबचे काम पूर्ण केले. मात्र सदरचा स्लॅब गळतच राहिला. अखेरीस वेळोवेळी स्लॅब दुरुस्तीसाठी तक्रार करुनही तसेच जाबदार यांनी पाहणी करुन स्लॅबची दुरुस्ती करुन देतो असे आश्वासन दिले, मात्र तदनंतर कंपनीची काही चूक नसून मजुरांची चूक आहे असे जाबदार यांनी कळविले व कोणतीही दुरुस्ती करुन दिली नाही. सबब, जाबदार यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेमध्ये कसूर केली असलेने सदरचा तक्रारअर्ज मंचात दाखल करणे तक्रारदारास भाग पडले असे तक्रारदार यांचे कथन आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे शेतकरी व शिक्षक असून सांगरुळ येथे राहतात. तक्रारदारांनी आपली शेती गट नं. 425, सांगरुळ ता. करवीर येथे घर बांधण्यास सन 2011 मध्ये सुरुवात केली. पहिला स्लॅब पडणेपूर्वी तक्रारदारांनी एम.आय.डी.सी शिरोली येथून, “अल्ट्राटेक सिमेंट कंपनी” यांचेकडून स्लॅब टाकणेकरिता कॉन्क्रीट खरेदी कले. सदर खरेदीपोटी तक्रारदारांनी रक्कम रु.1,11,000/- आय.डी.बी.आय. क्र. 522440 अन्वये भरले. त्यानुसार दि.16/7/12 ला वि.प. यांनी माल पाठविला. त्यानुसार पहिला स्लॅब व्यवस्थित झाला परंतु दुस-या स्लॅबच्या वेळेला जो माल पाठविला, तो काळपट लगदा होता व तसे तक्रारदारांचे निदर्शनाला आलेनंतर त्यांनी सदर परिस्थितीची कल्पना वि.प.चे इंजिनिअर श्री साठे यांचे निदर्शनास आणून दिली. तदनंतर साठे यांनी स्लॅबला काही झाले तर कंपनी स्वतः जबाबदार राहिल असे सांगून स्लॅब पूर्ण केला. परंतु सदरचा स्लॅब गळू लागला. म्हणून तक्रारदारांनी वि.प. कंपनीकडे तक्रार केली. तदनंतर वि.प. कंपनीचे लोक पाहणी करुन गेले व स्लॅबची गळती काढून देतो असे आश्वासन त्यांनी दिले. परंतु वि.प. कंपनीने दि.7/4/14 रोजी तक्रारदारांना उत्तर देवून वि.प. कंपनीची काही चूक नाही असे कळविले व स्लॅब टाकणा-या मजुरांच्या चुकीमुळे गळती लागली असे कळविले. म्हणून योग्य तो न्याय मिळण्यासाठी तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार या मंचात दाखल केली आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदारांचे स्लॅबची गळती काढून द्यावी, सदरची दुरुस्ती करणे शक्य नसलेस रु.76,850/- मिळावेत, नुकसान भरपाई पोटी रु.20,000/-, तक्रारदारांचा मधुमेहाचा त्रास वाढल्याने झालेल्या वैद्यकीय खर्चापोटी रु.12,000/- व कोर्ट खर्चापोटी रु.12,000/- मिळावेत अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र, कागदयादीसोबत तक्रारदारांनी वि.प. यांना दिलेली पत्रे, वि.प. यांनी तक्रारदारांना दिलेले पत्र, स्लॅब दुरुस्तीकरिता येणारा खर्च, स्लॅबचे फोटो इ. एकूण 7 कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच लेखी युक्तिवादही दाखल केला आहे.
4. जाबदार यांना नोटीस लागू झालेनंतर जाबदार याकामी हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. जाबदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील संपूर्ण कथने अमान्य केली आहेत. जाबदारांचे कथनानुसार, तक्रारदारांनी कधीही व्यक्तीशः आर.एम.सी. ची मागणी वि.प. कंपनीकडे केलेली नव्हती. त्यामुळे ते वि.प. यांचे ग्राहक होत नाहीत. वि.प. यांचेकडे शिवाजी बापूसो नाईक कंत्राटदाराने त्याचे व्यवसायासाठी आर.एम.सी.ची मागणी केली होती व त्यांचे मागणीप्रमाणे वि.प. कंपनीने मालाची पोहोच केली होती. सदरचे कंत्राटदार यांनी सदर मालाबाबत कोणतीही तक्रार आजअखेर केलेली नाही. सदरचे शिवाजी नाईक यांनी व्यावसायिक कारणासाठी माल खरेदी केलेने कंत्राटदार तक्रारदार व वि.प. यांचेदरम्यान कोणत्याही प्रकारे ग्राहक व सेवापुरवठादार असे नातेसंबंध निर्माण झाले नव्हते. तक्रारदार यांना माल पुरविताना तक्रारदार यांचे उपस्थितीत मालाची गुणवत्ता, प्रमाण, माप यांची तपासणी करुन माल पुरवला होता व त्याबाबत सर्व त्या कागदपत्रांची पूर्तता केली आहे. तक्रारदार यांनी कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय कंपनीस दोषी धरणे चालू केले आहे. तक्रारदारांनी तक्रारअर्जात जो खर्च दाखविला आहे, तो कोणत्याही प्रकारे कंपनीच्या मालामुळे उद्भवलेला नाही. तक्रारदार यांनीच जोडलेल्या कागदपत्रानुसार तो स्लॅबचे वॉटरप्रूफींग/कोबाचा आहे. प्रत्येक स्लॅबला कोबा/वॉटरप्रुफींग करणे आवश्यक असते, ती बाबच तक्रारदार यांनी केलेली नाही. वैद्यकीय खर्चाबाबत तक्रारदारांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सबब, तक्रार अर्ज नामंजूर करावा, तक्रारदार यांनी खोटी व चुकीची तक्रार दाखल केलेबद्दल तक्रारदारांना दंड करणेत यावा व कॉम्पेन्सेटरी कॉस्ट रु.20,000/- तक्रारदाराकडून मिळावी अशी मागणी जाबदार यांनी केली आहे.
5. जाबदारांनी म्हणण्याचे पुष्ठयर्थ शपथपत्र दाखल केले असून पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवादही दाखल केला आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, दाखल पुरावे व युक्तिवाद तसेच जाबदार यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन मंचासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | जाबदार यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
7. तक्रारदार यांनी शेती गट नं.425 सांगरुळ, ता. करवीर जि. कोल्हापूर येथे घरासाठी जाबदार यांचेकडून अल्ट्राटेक सिमेंट कंपनी, एम.आय.डी.सी. शिरोली यांचेकडून कॉन्क्रीट आणलेचा कागदोपत्री पुरावा याकामी दाखल केला आहे. तक्रारदाराने दि. 13/6/14 रोजीचे यशवंत सहकारी बँक, शाखा कुडीत्रे या बँकेने तक्रारदार यांचे सेव्हींग्ज ठेव खातेवरील (नं.2475) दि. 10/7/12 रोजी रक्कम रु. 1,16,625/- या रकमेचा अल्ट्राटेक सिमेंट कंपनी लि. या नावाने आय.डी.बी.आय. बॅंकेकडील डी.डी. नं. 522928 दिला आहे. सबब, सदरचा चेक अल्ट्राटेकचाच आहे व तो जाबदार यांचे नावे असलेची बाब स्वयंस्पष्टच आहे. सबब, सदरचा व्यवहार हा तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये झालेची बाब मंचासमोर असलेने तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये सेवा घेणार व सेवा देणार हे नाते निर्माण झाले आहे, सबब, तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(ड) खाली जाबदार यांचा ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, जाबदार यांनी तक्रारदार हा ग्राहक नसलेचा नोंदवलेला आक्षेप हे मंच फेटाळून लावत आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
8. तक्रारदाराने शेती गट नं.425 सांगरुळ, ता. करवीर जि. कोल्हापूर येथे सन 2011 मध्ये घर बांधणेसाठी एम.आय.डी.सी. शिरोली, येथून अल्ट्राटेक सिमेंट कंपनी यांचेकडून स्लॅब टाकणेकरिता कॉन्क्रीट खरेदी केले. तक्रारदार यांनी दि. 16/7/11 रोजी जाबदार कंपनीकडे रक्कम रु.1,11,000/- आय.डी.बी.आय. क्र. 522440 अन्वये पैसे भरुन कॉन्क्रीट खरेदी केले व पहिला स्लॅबही व्यवस्थित झाला. तथापि दुस-या स्लॅबचे वेळी जो माल पाठविला, तो थोडा काळपट असा कॉन्क्रीटचा लगदा होता व तक्रारदाराने तसे जाबदार यांचे निदर्शनास आणून दिले व पुढील कामही थांबविले. मात्र कंपनीचे इंजिनिअर श्री साठे यांनी स्वतः पाहणी करुन जर स्लॅबला काही झाले तर कंपनी स्वतः जबाबदार राहील असेही सांगितले. तथापि वेळोवेळी पत्रे पाठवूनही स्लॅब दुरुस्तीचे विनंतीची जाबदारने कोणतीही दखल घेतली नाही व सेवेत त्रुटी केली असे तक्रारदार यांचे कथन आहे.
9. जाबदार यांचे कथनानुसार कॉन्क्रीटचे नुसते मिश्रणच या गळतीस कारणीभूत असते, असे नसून कॉन्क्रीट योग्य त्या पध्दतीने हाताळणे व त्यांची मांडणी करणे आवश्यक असते तसेच रोजचे रोज कंपनीचे मालाची गुणवत्ताही पडताळली जाते. सबब, कंपनी गुणवत्ता व प्रमाणतेचे दंडक यांचे तंतोतंत पालन करते म्हणूनच कंपनीस आय.एस.ओ. मानांकन मिळालेले आहे. तक्रारदाराने तक्रारअर्जामध्ये दाखविलेला खर्च हा कोणत्याही मालामुळे झालेला नाही. वर नमूद सर्व बाबीही स्लॅबला गळती लागणेस कारणीभूत असलेने जाबदार यांनी सेवात्रुटी केली हे या जाबदार यांना मान्य नसलेने सदरचा तक्रारअर्ज फेटाळण्यात यावा असे जाबदार यांचे कथन आहे.
10. तथापि, तक्रारदार व जाबदार यांचे कथनांचा विचार करता तसेच तक्रारअर्जाचे कामी दाखल असले कागदपत्रांचा विचार करता तक्रारदाराने आपले तक्रारअर्जाचे कामी काही कागदपत्रे दाखल केलेली आहेत. यामध्ये जाबदार यांनी, तक्रारदार यांना दि. 7/4/14 रोजी एक पत्र पाठविले आहे. यामध्ये पॅरा 2 मध्ये “After receiving your first complaint, by registered post, on dated 17/4/13, we visited your site alongwith our senior officials and found a lot of plastic shrinkage cracks on the slab.” असे नमूद आहे. यावरुन असे स्पष्ट होते की, सदरची बाब ही जाबदार यांनी स्वतः जिथे बांधकाम आहे त्या ठिकाणी जाऊन पाहिलेली आहे व तिथे त्यांना बरेच Shrinkage cracks दिसलेले आहेत. प्रश्न इतकाच आहे की, सदरचे क्रॅक्स हे वापरलेल्या कॉन्क्रीटमध्ये काही दोष/कमी प्रतीचे कॉन्क्रीट असलेने झाले का ? जाबदार हे जरी आपले कथनामध्ये सदरचे क्रॅक्स हे फक्त कॉन्क्रीटमुळे नसून त्यास आणखी ब-याच गोष्टी कारणीभूत असू शकतात असे कथन करीत असले तरी तक्रारदाराने दि. 29/11/17 चे आपले प्रतिज्ञापत्रासोबत काही कागदपत्रे दाखल केली आहे. यामध्ये पंचनामा व दि. 14/9/17 च्या Yashodhan Constrolab चा टेस्ट रिपोर्ट दाखल केला आहे व सदरचे टेस्ट रिपोर्टचे अवलोकन केले असता सदरच्या टेस्ट या
i) Non-destructive Test (NDT) by digital rebound hammer
ii) NDT by ultrasonic pulse velocity अशा दोन पध्दतीने होतात.
यामध्ये NDT by ultrasonic pulse velocity या पध्दतीने घेतलेल्या टेस्टचे अवलोकन केले असता 1) Entrance left side hall slab तसेच 2) Bed room slab सदरचे लोकेशन्स मध्ये Concrete quality grading या column मध्ये Doubtful असा remark दिल्याचे दिसून येते. याचाच अर्थ सदरचे कॉन्क्रीट हे ज्या प्रतीचे हवे, त्या प्रतीचे नाही ही बाब स्पष्ट होते तसेच सदरचे रिपोर्टमध्ये Remark मध्ये
The Rebound Hammer Test results shows comparatively satisfactory strength of structural members both beam and slab. In the Rebound Hammer Test, surface of concrete may influence the result.
The Ultrasonic Pulse Velocity (UPV) test conducted to check the integrity of concrete. The result of slab shows doubtful homogeneity of concrete. It means there is cracks/micro cracks/flaws in slab. That why the integrity of concrete of slab is not upto the mark. It may be a main reason for severe leakage in terrace slab. This leakage lead to corrosion of reinforcements in the concrete. And all this process may cause distress to structure. So it is suggested that the immediate waterproofing to the terrace is necessary.
असे निरिक्षण नोंदविले आहे व त्यामध्ये वॉटरप्रूफींग करणेसाठी सुचविले आहे. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, doubtful homogeneity of concrete मुळे स्लॅबला क्रॅक्स पडले आहेत व त्यासाठी टेस्ट रिपोर्ट मध्ये वॉटरप्रूफींग सुचविले आहे. याचे एस्टिमेशनही तक्रारदाराने दाखल केले आहे. तथापि आपल्या कॉन्क्रीटची क्वालीटी ही उत्तमच होती अथवा स्लॅबसाठी योग्यच होती असे दाखविणारा कोणताही पुरावा या मंचासमोर जाबदार कंपनीने आणलेला नाही. तसेच जाबदार कंपनीने, ज्यावेळी कोर्ट कमिशन केले, त्यावेळी त्याठिकाणी प्रत्यक्ष हजर राहणे गरजेचे होते मात्र जाबदार याठिकाणी हजरही नव्हते. सबब, याचाच अर्थ जाबदार यांना आपल्या अपरोक्ष झालेले कोर्ट कमिशन मान्य आहे या निकष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदरचे टेस्ट रिपोर्ट अहवालास छेद देणारा असा कोणताच पुरावा जाबदार यांनी या मंचासमोर दाखल केलेला नाही. सबब, सदरचे टेस्ट रिपोर्टमध्ये नोंदविलेले निरीक्षणाचा विचार हे मंच करीत आहे व जाबदार यांनीच तक्रारदारास कथन केलेप्रमाणे जर काही असे घडले तर त्यास कंपनी जबाबदार राहील. त्याप्रमाणे सदरचे त्रुटीस जाबदार हेच जबाबदार आहेत असे मंचाचे स्पष्ट मत झाले आहे. सबब, सदरचे होणारे नुकसानीस /खर्चास जाबदारच जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. वॉटरप्रूफींगचे कोटेशन तक्रारदाराने दाखल केले आहे, मात्र त्यास आपण जबाबदार नसलेचे तोंडी कथन तक्रारदार यांनी केले आहे. तथापि सदरचे वॉटरप्रूफींग करणेची वेळ निश्चितच कॉन्क्रीटची क्वालीटी योग्य नसलेने आलेची बाब या मंचास नाकारता येत नाही. सबब, तक्रारदार यांनी दाखल केलेप्रमाणे वॉटरप्रूफींगचे कामाकरिता येणारा खर्च त्यास देणे क्रमप्राप्त आहे. तथापि तक्रारदाराने जे काही पहिले कॉन्क्रीट आणले ते चांगले होते असे तक्रारदाराचे कथन आहे. सबब, सदरचे वॉटरप्रूफींगची सर्वच रक्कम तक्रारदारास देणे या मंचास संयुक्तिक वाटत नसलेने रक्कम रु.50,000/- जाबदार यांनी तक्रारदारास देणेचे आदेश जाबदार यांना करणेत येतात. तसेच जाबदार यांनी सदरची सर्व गळती काढून देणेचे आदेश करणेत येतात अथवा जर दुरुस्ती करणे शक्य नसेल तर रक्कम रु.50,000/- दुरुस्तीसाठी लागणारा खर्च देणेचे आदेश करणेत येतात.
11. तक्रारदाराने मागितलेली नुकसान भरपाईची रक्कम रु.20,000/- तसेच तक्रारअर्जाचा खर्च रु.12,000/- हा या मंचास संयुक्तिक वाटत नसलेने नुकसान भरपाईपोटी रु.5,000/- व अर्जाचा खर्च रु.2,000/- देणेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच मधुमेहाचा त्रास वाढलेने तक्रारदाराने उपचाराचा खर्च रु.12,000/- ची मागणी केली आहे. तथापि तसा कोणताही पुरावा या मंचासमोर दाखल नाही. सबब, हे मंच ही बाब विचारात घेत नाही. सबब, हे मंच खालील आदेश करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार यांना तक्रारदाराचे संपूर्ण स्लॅबची गळती काढून देणेचे आदेश करणेत येतात.
अथवा
जर जाबदार यांना संपूर्ण स्लॅबची गळती काढून देणे शक्य नसेल तर दुरुस्तीसाठी येणारा खर्च रक्कम रु.50,000/- तक्रारदारास देणेचे आदेश करणेत येतात.
3. जाबदार यांनी तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.5,000/- अदा करावेत.
4. जाबदार यांनी तक्रारदारास अर्जाचे खर्चापोटी रु.2,000/- अदा करावेत.
5. वर नमूद आदेशांची पूर्तता जाबदार यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6. विहीत मुदतीत जाबदार यांनी आदेशाची पूर्तता न केलेस तक्रारदारास ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 खाली दाद मागणेची मुभा राहिल.
7. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.