निकालपत्र :- (दि.19.11.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या व सामनेवाला यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, शहर कोल्हापूर येथील बी वॉर्ड सि.स.नं.1800/ब पैकी 42.00 चौ.मिटर क्षेत्र ही इमारत तक्रारदारांनी श्री.विजय जयसिंगराव मेथे व मनोज जयसिंगराव मेथे यांचेकडून दि.19.11.2009 रोजी नोंद खरेदपत्रान्वये खरेदी केली. सुरवातीस सदर मिळकतीमध्ये जुने पाणी कनेक्शन तक्रारदारांच्या नांवे ट्रान्स्फर करणेसाठी सामनेवाला यांचेकडे अर्ज केला असता त्यावेळेस सदर मिळकतीचे मुळ मालक श्री.लिंगम व मेथे यांनी ना-हरकत स्वरुपी प्रतिज्ञापत्र देणेस नकार दिला. त्यानंतर तक्रारदारांनी पाणी कनेक्शनसाठी नविन अर्ज दिला. त्यावेळेस मिळकतीचे मुळ मालक श्री.लिंगम व श्री.मेथे यांच्या नांवे थकित असलेली रक्कम रुपये 15,967/- इतकी रक्कम भरलेनंतर कनेक्शन दिले जाईल असे सांगितले. वास्तविक, जुनी थकबाकी भरणेची जबाबदारी तक्रारदारांची नसून सदर श्री.लिंगम व मेथे यांच्या आहे. सामनेवाला यांची सदरची कृती ही त्यांच्या सेवेतील त्रुटी आहे. सबब, तक्रारदारांच्या नांवे नविन पाणी कनेक्शन देणेचा आदेश व्हावा व तक्रार अर्जाचा खर्च देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत पाणी कनेक्शन मिळणेबाबत दि.16.01.2010, दि.20.03.2010 व दि.05.05.2010 रोजीचे अर्ज, पोचपावती, रुपये 15,967/- चे देयक तसेच, वटमुखत्यारपत्र व खरेदीपत्र इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी तक्रारीत उल्लेख केलेल्या मिळकतीमध्ये नविन पाणी कनेक्शनची मागणी केलेप्रमाणे सदर मिळकतीचे पूर्व मालक श्री.मनोहर दत्तोबा लिंगम यांच्या नांवे कनेक्शन थकबाकी नोव्हेंबर 2000 अखेर रुपये 16,000/- आहे. सदर रक्कम दिलेनंतर पाणी कनेक्शन देणेत येईल असे तक्रारदारांना सांगण्यात आले. सि.स.नं.1800/ब या मिळकतीचे पूर्व मालक श्री.लिंगम यांनी श्री.मेथे यांना विकलेली आहे व श्री.मेथे यांचेकडून सदरची मिळकत तक्रारदारांनी खरेदी केली आहे. मिळकतीतील नळ वापर सर्व मिळकतधारकांनी केला आहे व सध्या तक्रारदार त्याचा वापर करीत आहेत. सामनेवाला यांचेकडील पाणी पुरवठा विभागाच्या नियमानुसार संपूर्ण थकबाकी भरणे आवश्यक आहे व ती भरलेनंतर जुन्या मालकाचे रुपये 100/- च्या स्टँपवर लेखी नाहरकत असणे जरुरीचे असते व नियमाप्रमाणे रुपये 1,075/- नांवात बदल करणेची फी भरणे गरजेचे असते. सदरची थकबाकी बुडविणेच्या उद्देशाने तक्रारदार हे नविन कनेक्शनची मागणी करीत आहेत. तसेच, मिळकतीवर थकबाकी नसलेबाबतचा दाखला घेणे आवश्यक असते, तसा दाखला तक्रारदारांनी घेतलेला नाही. तक्रारदारांच्या या चुकीमुळे महानगरपालिकेची थकबाकी बुडविता येणार नाही. सदरची थकबाकी व कनेकशनसाठी लागणारी योग्य ती फी तक्रारदारांनी भरलेस सामनेवाला हे पाणी कनेक्शन देणेस तयार आहे. सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा अशी विनंती केली आहे. (5) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद सविस्तर व विस्तृतपणे ऐकला आहे. तक्रारीत उल्लेख केलेली मिळकत ही श्री.विजय जयसिंगराव मेथे व मनोज जयसिंगराव मेथे यांनी श्री.मनोहर दत्तोबा लिंगम यांच्याकडून खरेदी घेतलेली आहे व तक्रारदारांनी सदर मिळकत श्री.मेथे यांचेकडून खरेदी घेतली आहे. सदर मिळकतीमध्ये सामनेवाला पाणी पुरवठा विभागाचे पाणी कनेक्शन होते. तसेच, सदर पाणी कनेक्शनचे थकित देयक आहे व सदर थकित देयक भरलेस तसेच नविन पाणी कनेक्शनसाठी योग्य ती फी देवून पाणी कनेक्शन देणेची तयारी सामनेवाला पाणी पुरवठा विभागाने दर्शविली आहे. सदर थकित रक्कम देणेची रक्कम तक्रारदारांची नाही असा युक्तिवाद प्रस्तुत प्रकरणी केलेला आहे. परंतु, मालमत्तेवर असलेली महापालिकेची कोणतीही थकबाकी भरणेची जबाबदारी ही मालमत्ताधारकावर असते. सद्यस्थितीत तक्रारीत उल्लेख केलेली मिळकतीचे मालमत्ताधारक हे तक्रारदार आहेत. त्यावर असलेली महानगरपालिकेची तसेच पाणी पुरवठा विभागाची असलेली थकबाकी भरणेची जबाबदारी सद्यस्थितीत तक्रारदार हे मालमत्ताधारक असलेने त्यांचेवर येते. याचा विचार करता, सामनेवाला यांनी असलेली थकबाकी तसेच नविन कनेक्शनसाठी लागणारी योग्य ती फी स्विकारुन तक्रारदारांना नविन पाणी कनेक्शन द्यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करणेत येते. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला यांनी असलेली थकबाकी तसेच नविन कनेक्शनसाठी लागणारी योग्य ती फी स्विकारुन तक्रारदारांना नविन पाणी कनेक्शन द्यावे. 3. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |