(घोषित द्वारा - श्रीमती ज्योती पत्की, सदस्य ) या तक्रारीची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार तापी सहकारी पतपेढी लि., चोपडा जि.जळगाव या बँकेच्या गारखेडा शाखा औरंगाबाद येथे जुना खाते क्रमांक 25/73 व नवा खाते क्रमांक 25/104 मध्ये दिनांक 30/12/2004 ते दिनांक 26/11/2007 या 36 महिन्याच्या कालावधीत प्रतिमाह रु 500/- प्रमाणे नियमितपणे भरणा केली. बँकेच्या योजनेप्रमाणे 36 महिने रक्कम भरल्यानंतर रक्कम रु 21,406/- मिळणार होते. गैरअर्जदार बँकेची गारखेडा येथील शाखा बंद पडल्यानंतर तिचे खाते टीव्ही सेंटर शाखेला वर्ग केले व तेथेही तिने नियमितपणे रक्कम भरणा केली. तक्रारदार गैरअर्जदार बँकेत गेली असता त्यांनी रक्कम देण्यास नकार दिला. गैरअर्जदार बँकेची औरंगाबाद येथे कोणतीही शाखा अस्तित्वात नसल्यामुळे तिने गैरअर्जदार बँकेकडे दिनांक 10/1/2010 रोजी रक्कम मागण्यासाठी अर्ज केला परंतू त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. तक्रारदाराने गैरअर्जदार बँकेकडे वेळोवेळी रक्कम रु 21,406/- ची मागणी केली परंतु त्यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ करुन त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने गैरअर्जदार बँकेने रक्कम रु 21,406/- मानसिक व शारीरिक त्रास व दाव्याच्या खर्चासह द्यावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदारास नोटीसची बजावणी होऊनाही ते मंचात गैरहजर राहिले म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला. तक्रारदाराने दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्राचे मंचाने अवलोकन केले. तक्रारदाराचा युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारदाराने गैरअर्जदार तापी सहकारी पतपेढी लि., चोपडा, जि जळगांव यांच्याकडे मासिक बचत खाते काढून त्यामध्ये रक्कम रु 500/- प्रतिमाह या प्रमाणे दिनांक 30/12/2004 ते दिनांक 26/11/2007 या 36 महिन्याच्या कालावधीत एकूण रु 19,935/- नियमितपणे भरणा केल्याचे बचत खात्याच्या पुस्तिकेवरुन स्पष्टपणे दिसून येते. बचत खात्याच्या पुस्तिकेची पाहणी केली असता 36 महिने रक्कम भरणा केल्यानंतर रक्कम रु 21,406/- तक्रारदारास मिळणार होती. सदर रक्कम मिळावी म्हणून तक्रारदाराने गैरअर्जदाराकडे दिनांक 10/1/2010 रोजी अर्ज पाठवून मागणी केल्याचे तिने दाखल केलेल्या पत्रावरुन दिसून येते. तसेच तक्रारदाराचे मासिक बचत खाते हे शाखा गारखेडा येथे काढल्याचे बचत खात्याचे पुस्तिकेवरुन दिसून येते आणि तिचे बचत खाते गारखेडा शाखेतून टीव्ही सेंटर शाखेमध्ये वर्ग केल्याचे गैरअर्जदार बँकेने तक्रारदारास दिनांक 14/6/2007 रोजी दिलेल्या पत्रावरुन दिसून येते. गैरअर्जदार बँकेने तक्रारदारास मागणी करुनाही रक्कम रु 21,406/- दिनांक 26/11/2007 पासून न देणे ही गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सदर रक्कम दिनांक 26/11/2007 पासून न मिळाल्यामुळे तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रास नक्कीच झालेला असेल म्हणून तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास देखील पात्र आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. आदेश 1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदाराने या आदेशाच्या प्राप्तीपासून 30 दिवसाच्या आत तक्रारदारा रक्कम रु 21,406/- दिनांक 26/11/2007 पासून पूर्ण रक्कम देईपर्यंत 9 टक्के व्याजदराने द्यावेत. तसेच शारीरिक त्रासापोटी रक्कम रु 2000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रु 1,000/- असे एकूण रु 3000/- द्यावेत. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |