निकाल
दिनांक- 21.03.2013
(द्वारा- श्रीमती माधूरी विश्वरुपे, सदस्य)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
तक्रारदारांचे पती श्री.सुनिल आसाराम गोरे हे शेतकरी असून दुर्दैवाने दि.22.07.11 रोजी खून झाला.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्र.2 तालुका कृषी अधिकारी यांचेकडे आवश्यक कागदपत्रांसह दि.05.10.11 रोजी दाखल केला परंतू अद्याप पर्यंत नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही, अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार क्र.1 व 3 यांना नोटीस मिळूनही गैरहजर असल्यामुळे दि.14.08.12 रोजी त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश घेण्यात आला.
गैरअर्जदार क्र.2 यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांचा प्रस्ताव दि.07.10.11 रोजी प्राप्त झाल्यानंतर दि.10.10.11 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड यांचेकडे पाठविण्यात आला.
गैरअर्जदार क्र.4 यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांच्या पतीचा खून झालेला असून त्यांचे प्रेत विहीरीत पडलेले आढळून आले. आरोपी विरुध्द भा.द.वि.कायदा कलम 302 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला, मयताचे प्रेत पोस्टमार्टमसाठी पाठवले. पोलीस तपासामध्ये राजेंद्र सोनवने यांनी तक्रारदारांचे पती श्री. सुनिल गोरे यांचा खून झाल्याबाबत नमुद केले आहे. सदर प्रकरणात पोलीसांनी दिलेला अंतीम अहवाल तसेच व्हिसेरा रिपोर्ट या कागदपत्रांची आवश्यकता असून या संदर्भात दि.12.03.12 रोजी तक्रारदारांना पाठविलेल्या पत्रानुसार फायनल पोलीस रिपोर्ट व व्हिसेरा रिपोर्ट या कागदपत्राची मागणी केली आहे. तक्रारदारांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे सदरची तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, गैरअर्जदार क्र.2 व 4 यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले. तसेच तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.काकडे आणि गैरअर्जदार क्र.4 चे विद्वान वकील श्री.वाघमारे यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांचे पती सुनिल आसाराम गोरे हे दि.19.07.11 रोजी घरी न आल्यामुळे त्यांचा शोध घेतला, परंतू मिळून न आल्यामुळे दि.21.07.11 रोजी पोलीस स्टेशन येथे मिसिंगची फिर्याद दिली. त्यानंतर दि.22.07.11 रोजी त्यांचे प्रेत विहीरीत
(3) त.क्र.40/2012
तरंगताना गावातील लोकांना दिसले. या बाबतची माहिती पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी विहीरीवर येवून प्रेत बाहेर काएले व शवविच्छेदनासाठी पाठवले, असे एफ.आयर.आर.मध्ये नमुद केल्याचे दिसून येते, तसेच घटनेसंदर्भात घटनास्थळ पंचनाम्यात नमुद केले आहे. इन्क्वेस्ट पंचनाम्यानुसार मयत सुनिल गोरे यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केल्याने गंभीर दुखापत होवून मरण पावले असावे, तसेच मयतास डोक्यावर वार करुन त्यास नंतर पाण्यात तारेने व पायास रुमालाने बांधून विहीरीच्या पाण्यात टाकले असावे असा अभिप्राय दिला आहे. वैद्यकीय अहवाल म्हणजेच पोस्टमार्टम अहवालानुसार डोक्यात गंभीर स्वरुपाच्या दुखापतीमुळे मृत्यू झाला असल्याचे नमुद केले आहे.
गैरअर्जदार क्र.4 इन्शुरन्स कंपनीच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांचे पतीचे प्रेत विहीरीत पडलेले आढळून आले असून त्यांचा खून झाल्यामुळे संबंधित आरोपी विरुध्द भा.द.वि.कायदा कलम 302 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रारदारांच्या विमा प्रस्तावासाठी व्हिसेरा रिपोर्ट व पोलीसांचा अंतीम अहवाल आवश्यक आहे. गैरअर्जदार क्र.4 यांचे विद्वान वकील श्री.वाघमारे यांनी युक्तीवादात आरोपीने आत्महत्या केल्याबाबत संशय असल्यामुळे सदर कागदपत्रांची विमा प्रस्तावाकरीता आवश्यक असल्याबाबत सांगितले. गैरअर्जदार क्र.4 विमा कंपनीने तक्रारदारांचा प्रस्ताव अपूर्ण कागदपत्रांच्या अभावी प्रलंबित ठेवला आहे. सदर प्रस्ताव मंजूर अथवा नामंजूर केलेला नाही असे नमुद केले.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.काकडे यांनी तक्रारदारांचे पती श्री.सुनिल गोरे यांचा मृत्यू डोक्याला धारदार शस्त्राने वार केल्यामुळे गंभीर दुखापत होवून झाल्याचे वैद्यकीय अहवालानुसार स्पष्ट होत असल्यामुळे व्हिसेरा रिपोर्टची आवश्यकता नाही. तसेच सदर घटने संदर्भातील एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल वगैरे आवश्यक कागदपत्रे प्रस्तावासोबत दाखल केली असून तक्रारदारांच्या पतीचा खून केल्याबाबत संबंधित आरोपी विरुध्द भा.द.वि.कलम 302 अन्वये दाखल केलेल्या फौजदारी प्रकरणात आरोपींना शासन झाल्याबाबत सांगितले.
तक्रारीतील आलेल्या पुराव्यानुसार तक्रारदारांचे पती शेतकरी असून खून होवून अपघाती मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत गैरअर्जदार क्र.4 विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार सदर प्रसतावाकरीता व्हिसेरा रिपोर्ट, पोलीसाच्या अंतीम अहवालाची आवश्यकता नाही असे न्याय मंचाचे मत आहे. तक्रारीतील दाखल कागदपत्रानुसार तक्रारदार सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असल्याचे स्पष्ट होते.
(4) त.क्र.40/2012
गैरअर्जदार क्र.4 विमा कंपनीने तक्रारदार सदर योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र असूनही विमा प्रस्ताव प्रलंबित ठेवून त्रुटीची सेवा दिली आहे असे न्याय मंचाचे मत आहे.
त्यामुळे गैरअर्जदार क्र.4 विमा कंपनीने तक्रारदारांना सदर योजनेअंतर्गत देय असलेली नुकसान भरपाईची रक्कम रु.1,00,000/- देणे उचित होईल असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) गैरअर्जदार क्र.4 विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना
शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत देय असलेली विमा
लाभ रक्कम रु.1,00,000/- ( अक्षरी रु. एक लाख ) आदेश
मिळाल्यापासून 30 दिवसात द्यावी.
2) वरील रक्कम विहीत मुदतीत अदा न केल्यास 9% व्याजदरासहीत
द्यावी.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड