जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 136/2011 तक्रार दाखल तारीख – 12/09/2011
तक्रार निकाल तारीख– 15/02/2013
श्रीमती कमल भ्र.दिलीप मुंडे,
रा.नाथ्रा ता.परळी(वै) जि.बीड. ... अर्जदार
विरुध्द
1) महाराष्ट्र शासन मार्फत-जिल्हाधिकारी,
जिल्हाधिकारी कार्यालय, नगर रोड,
बीड ता.जि.बीड.
2) तहसिलदार, तहसिल कार्यालय,
परळी(वै.) ता.परळी(वै.) जि.बीड.
3) तालुका कृषी अधिकारी,
परळी(वै.) ता.परळी(वै.) जि.बीड.
4) जिल्हा कृषी अधिकारी,
धानोरा रोड, बीड ता.जि.बीड.
5) न्यु इंडिया अश्युरन्स कंपनी लि.,
द्वारा- शाखा व्यवस्थापक, साठे चौक,
बीड ता.जि.बीड. ... गैरअर्जदार
समक्ष - श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
तक्रारदारातर्फे - अड.एन.पी.वाघमारे,
गैरअर्जदार क्र.1, 2, 3, 4 गैरहजर.
गैरअर्जदार क्र.5 तर्फे अड.एस.एल.वाघमारे.
---------------------------------------------------------------------------------------
(2) त.क्र.136/11
निकाल
दिनांक- 15.02.2013
(द्वारा- श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
तक्रारदार मयत शेतकरी दिलीप याची पत्नी आहे. मयताचे उपजिवीकेचे प्रमुख साधन शेती होते, मयताचा दि.29.11.10 रोजी खून झाला, पुढे बंटी या आरोपीने अचानक झालेल्या भांडणातून खून केल्याचे निष्पन्न झाले, बंटी व दिलीप यांचे शत्रुत्व नव्हते.
सदर शेतकरी अपघात विमा दि.15.8.10 ते 14.8.11 करता गैरअर्जदार क्र.5 कडे शासनाने काढला होता, त्याची प्रत शासनाकडे आहे. अर्जदाराने विहीत कागदपत्रांसह शेतकरी अपघात विमा मिळणेकामी अर्ज केला, तेव्हा गैरअर्जदार क्र.5 यांनी मयत व्यक्ती शत्रुत्वाची बळी ठरली आहे व अपराधी दृष्टीकोनातून कायद्याचे उल्लंघन झाले आहे असे कारण दाखवून अर्जदाराचा दावा फेटाळला. सबब अर्जदाराने सदरची तक्रार दाखल केली आहे व तया अंतर्गत रु. एक लाख विम्याची रककम 12 टक्के व्याजासह घटनेपासून मागितली आहे.
अर्जदाराने अर्जासोबत मयताचे विम्यासंबंध्ंातील सर्व कागदपत्रे तसेच त्याचा खून झाला आहे हे दर्शवणारी कागदपत्रे दाखल केली, त्यात आरोपीचा जबाब, शवविच्छेदन अहवाल, प्रथम खबर इत्यादीचा समावेश आहे. तसेच गैरअर्जदार क्र.5 यांचे दावा नाकारल्याचे पत्र आहे.
गैरअर्जदार क्र.1 ते 5 मंचासमोर हजर झाले असून त्यांचे लेखी जबाब दाखल आहेत.
गैरअर्जदार क्र.5 यांनी दि.24.4.11 रोजी दिलेल्या पत्राप्रमाणे दावा नाकारण्याचे एकमेव कारण म्हणजे मयताचा मृत्यू मद्याच्या नशेत असताना झाला आहे. मयत व्यक्ती शत्रुत्वाची बळी ठरली आहे व अपराधी दृष्टीकोनातून कायद्याचे उल्लंघन झाले असे आहे. इतर कोणत्याही कागदपत्रांबाबत त्यांना काहीही आक्षेप नाही.
वरील सर्व बाबींचा विचार करुन मंच खालील मुददे विचारार्थ घेत आहे व त्या अनुषंगाने निष्कर्ष मांडत आहे.
(3) त.क्र.136/11
मुददे निष्कर्ष
1) अर्जदाराने तो शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत
विमा रकमेस पात्र आहे, हे त्याने सिध्द केले
आहे का? होय.
2) कोणता आदेश? अंतिम हुकूमानुसार
कारणमिमांसा
मुददा क्र.1 साठी – अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन मयताचा खून झालेला आहे ही बाब अर्जदाराने सिध्द केली आहे. अर्जदाराचे वकील श्री.नितिन वाघमारे यांनी महाराष्ट्र शासनाचा शेतकरी अपघात विमा योजनेचा शासन निर्णय युक्तीवादादरम्यान दाखल केला. त्यातील प्रपत्रात ‘खून’ हे अपघाताचे स्वरुप म्हणून लिहीले आहे. तसेच त्यांनी तक्रारी बरोबर फिर्यादीची नक्कल, आरोपीचा जबाब इत्यादी कागदपत्रे तसेच मयत शेतकरी होता हे दर्शवणारी कागदपत्रे, वैद्यकीय अहवाल इत्यादी गोष्टी दाखल केल्या आहेत. या सर्व गोष्टींवरुन मयत शेतकरी असून त्याचा खून झाला आहे आणि खून झाला त्या दिवशी त्याची पॉलिसी अस्तित्वात होती हे समजते. त्यामुळे अर्जदाराने ती शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विम्यास पात्र आहे हे सिध्द केले आहे.
गैरअर्जदार क्र.5 यांनी विम्याच्या दाव्यासंबंधातील इतर कोणत्याही बाबींबददल हरकत घेतलेली नाही. वैद्यकीय अहवालानुसार मयताचा मृत्यू डोक्याला दुखापत झाल्याने झाला असा पुरावा आहे. अशा परिस्थितीत मयताचा खून पूर्ववैमनस्यातून झाला किंवा त्याने मद्यप्राशन केलेले होते किंवा तो गुन्हा करण्याच्या उददेशाने कायद्याचे उल्लंघन करत असताना हा खून झाला हे सिध्द करण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्र.5 ची आहे.
परंतू आरोपी बंटीच्या जबाबाव्यतिरिक्त कोणताही पुरावा गैरअर्जदार क्र.5 यांनी दिलेला नाही. गैरअर्जदार क्र.5 यांनी युक्तीवादात सांगितले की, आरोपीचा जबाब हा फौजदारी प्रक्रिया संहिता क.164 प्रमाणे आहे, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवावा लागेल. परंतु त्याला पूरक असा दुसरा कोणताही जबाब नाही, तसेच मयताने व आरोपीने मद्यप्राशन केले हे दाखवणारा रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल नाही.
त्याचप्रमाणे आरोपी बंटीचा जबाब आहे तसा वाचला तरी पण त्या दोघांच्यात पूर्व शत्रुत्व होते असे कोठेही आलेले नाही. उलटपक्षी अचानक उदभवलेल्या
(4) त.क्र.136/11
भांडणातून हा खून झाल्याचे दिसते, तसेच मयत कोणताही गुन्हा करता होता, कायद्याचे उल्लंघन करत होता असेही दिसत नाही. घडलेली घटना ही अपघाती खून नसून पूर्ववैमनस्यातून झालेला, ठरवून केलेला खून आहे हे सिध्द करण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्र.5 ची होती परंतु ते तसे सिध्द करुन शकलेले नाही. गैरअर्जदार क्र.5 च्या वकिलांनी, श्री.एस.एल.वाघमारे यांनी विमा कंपनीच्या अटी व शर्ती असलेला कागद दाखल केला पण वर सांगितलेल्या कारणमिमांसेवरुन त्यातील चार क्रमांकाच्या शर्तीत वरील घटना बसत नाही.
वर उल्लेखलेल्या कारणमिमांसेवरुन मयत विमा धारक दिलीप याचा खून झालेला असल्यामुळे अर्जदार ही शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रु.एक लाख) यास पात्र आहे असा निष्कर्ष मंच काढत आहेत व त्या अनुषंगाने मंच खालील आदेश करत आहेत.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र.5 विमा कंपनी यांना आदेश देण्यात येतो की,
तक्रारदाराला शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत विमा लाभ
रक्कम रु.1,00,000/-(अक्षरी रु.एक लाख) आदेश मिळाल्यापासून 30
दिवसात द्यावेत.
3) गैरअर्जदार क्र.5 यांनी वरील रक्कम विहीत मुदतीत अदा न केल्यास
9 टक्के व्याजदरासहीत रक्कम तक्रारदाराला द्यावी.
4) खर्चाबाबत आदेश नाही.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड