::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 18/04/2016 )
आदरणीय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …
तक्रारकर्ता क्र. 1 यांचे पती मयत बाबुलाल ओंकारराव अघडते यांचे दि. 1/9/2012 रोजी निधन झाले, तक्रारकर्ता क्र. 1 ही त्यांची पत्नी असून तक्रारकर्ते क्र. 2 ते 8 हे मुले व मुली आहेत. तक्रारकर्ता क्र. 1 हिचे पती व तक्राकरर्ता क्र. 2 ते 8 यांचे वडील मयत बाबुलाल ओंकारराव अघडते यांचे दि. 1/9/2012 रोजी साप चावल्याने निधन झाले. शेतकरी अपघात विमा योजनेच्या अनुषंगाने व मयत बाबुलाल ओंकार अघडते हा शेतकरी असल्या कारणाने रु. 1,00,000/- एवढा विमा रक्कमेच्या लाभ मिळण्यास तक्रारकर्ते हे कायदेशिर वारस म्हणून पात्र ठरत असल्याने, त्यांनी सदर बाबतीत विरुध्दपक्ष क्र. 2 ते 6 यांच्या माध्यमातून विरुध्दपक्ष क्र. 6 व 7 यांच्याकडे मुदतीमध्ये सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन सदर विमा रकमेचा लाभ मिळण्याकरिता अर्ज सादर केला असता, कुठलेही संयुक्तीक कारण न देता, सदर प्रस्ताव नामंजुर करण्यात आला व त्या बाबतचे पत्र तक्रारकर्ते यांना ऑक्टोबर 2014 मध्ये विरुध्दपक्ष क्र. 6 यांचेकडून प्राप्त झाले. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी दि. 11/11/2014 रोजी विरुध्दपक्षास कायदेशिर नोटीस पाठविली. परंतु नोटीस मिळून सुध्दा विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांच्या विमा प्रस्तावाच्या नोटीसची पुर्तता केली नाही, त्यामुळे तक्रारकर्ता यांना सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल करावी लागत आहे. तक्रारकर्ते यांनी सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, मयत बाबुलाल अघडते यांचे विमा पोटीचे रु. 1,00,000/- विरुध्दपक्ष यांच्याकडून व्याजासह मिळवून देण्याचा आदेश व्हावा. तक्रारकर्ते यांना झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु. 50,000/- विरुध्दपक्षाकडून मिळावे. तसेच नोटीस खर्च रु. 2000/- व या प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 20,000/- देण्याचा आदेश व्हावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 18 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 2 यांचा लेखीजवाब :-
02. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी पत्राव्दारे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्र. 4 यांनी प्रकरणाचा खुलासा दाखल केलेला आहे, तरी त्यांनी सादर केलेला खुलासा हा आमच्या विभागाचाच आहे व तोच आम्हाला मान्य आहे, तरी तोच खुलासा या प्रकरणात मान्य करण्यात यावा,
विरुध्दपक्ष क्र. 4 यांचा लेखीजवाब :-
03. विरुध्दपक्ष क्र. 4 यांनी त्यांचा लेखी खुलासा दाखल केलेला आहे. त्यानुसार श्री बाबुलाल ओंकार अघडते, यांचा दि. 20/8/2012 रोजी सर्पदंशाने मृत्यू झाल्याने, प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी बाळापुर मार्फत दि. 29/11/2012 रोजी प्राप्त झाला व त्रुटींची पुर्तता करुन घेऊन सदर प्रस्ताव कबाल इंन्शुरन्स कंपनीस दि. 3/4/2013 रोजी सादर करण्यात आला. त्यानंतर न्यु इंडिया इंशुरंस कंपनी यांनी दि. 24/9/2013 नुसार पुन्हा उणिवा कळविल्यानुसार विरुध्दपक्षाने दि. 7/10/2013 नुसार तालुका कृषी अधिकारी यांना उणिवा कळविण्यात आल्या. त्यानुसार संबंधीत शेतकऱ्यांचे वारसांनी व्हीसेरा रिपोर्ट या कार्यालयासमक्ष दि. 16/9/2013 रोजी सादर केला. त्यानंतर न्यु इंडिया इंशुरंस कंपनी यांचे पत्रानुसार कंपनीने प्रस्ताव नामंजुर केल्याचे या कार्यालयास व संबंधीत शेतकऱ्यांचे वारसदारास कळविले. सदर प्रकरणाबाबत वेळोवेळी संबंधीत शेतकऱ्याचे वारसदार व विमा कंपनीस पत्रव्यवहार करुन योग्य ती कार्यवाही या कार्यालयाने केलेली आहे.
विरुध्दपक्ष क्र. 6 यांचा लेखीजवाब :-
4. विरुध्दपक्ष क्र. 6 यांनी सदर प्रकरणात लेखी जबाब दाखल केलेला आहे. त्यानुसार तक्रारीतील आरोप नाकबुल करुन विरुध्दपक्ष यांनी अधिकचे कथनात असे नमुद केले की, मृतकाचा मृत्यु झाल्याने त्याच्या संबंधीत कागदपत्र तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे सादर केले व त्या दस्तऐवजामधील रिजनल फोरहेन्सीक सायन्स लेबॉटरी महाराष्ट्र येथील तज्ञांनी व्हिसेराचे केमीकल ॲनॅलेसीस केले, व त्या अहवालामध्ये त्यांनी व्हिसेरा मध्ये विषाचा अंश नाही, असे नमुद केले. त्यामुळे विरुध्दपक्षाने तक्रारकर्ते यांचा दावा नाकारला आहे. डॉ. बि.एल.लोखंडे यांनी दिलेल्या दि. 31/01/2014 च्या अहवालानुसार मृतकाचा मृत्यू सर्प दंशामुळे झाला आहे. परंतु डॉ. बी.एल.लोखंडी यांनी मृतकाचा व्हीसेरा, केमीकल ॲनॅलिसीसकरिता सुरक्षीत राखून ठेवला व फोरेन्सींक लेबॉरेटरीमध्ये कार्यरत असलेल्या तज्ञांनी केलेल्या केमीकल ॲनॅलिसीसच्या मत अहवालावर त्यांचा अहवाल अवलंबुन आहे. सदर अहवालामध्ये नमुद केले आहे की, पी.एम.रिपोर्ट मधील फाईंडींग व उपलब्ध असलेल्या केमीकल ॲनॅलिसीस रिपोर्टवरुन मृत्युचे कारण हे सर्प दंश आहे, त्यांनी पुढे याच अहवात म्हटले आहे की, Kindly correlate with Investigation. ह्यावरुन डॉ. लोखंडी यांनी दि. 31/1/2014 रोजीच्या अहवालामध्ये त्यांनी नमुद केलेले त्यांचेच मताशी ते स्वत:च पक्के नाहीत. फोरेन्सीक लेबॉरेटरीमधून आलेल्या अहवालामध्ये विष संबंधी लेबॉरेटरी तज्ञाचे मत निगेटीव आले असतांना सुध्दा डॉ. लोखंडेनी सदरहू तज्ञांचा अहवाल कोणत्या कारणाने डावलला, त्याचे कारण न देण्याचे प्रयोजन काय, ह्याचे स्पष्टीकरण डॉ. लोखंडे यांनी त्यांच्या दि. 31/1/2014 चे अहवालामध्ये कोठेच दिले नाही. फोरहँसिक लेबॉरेटरी मधून आलेल्या केमिकल ॲनॅलीसीसच्या अहवालाला विशेष व अधिकचे महत्व आहे व तो अहवाल विष संबंधी निगेटीव असल्याने विरुध्दपक्षाने त्या अहवालाच्या आधारावरुन मृतकाचा विमा क्लेम नाकारुन व त्या संबंधीचे योग्य ते कारण देवून तक्रारकर्त्यास कळविले आहे. अशा प्रकारे विरुध्दपक्षाने सेवेमध्ये कोणत्याच प्रकारची कुचराई केली नाही व गैर व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्र. 7 यांचा लेखीजवाब :-
5. विरुध्दपक्ष क्र. 7 यांनी सदर प्रकरणात लेखी जबाब दाखल केलेला आहे. त्यानुसार तक्रारीतील आरोप नाकबुल करुन विरुध्दपक्ष यांनी अधिकचे कथनात असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्र. 7 हे केवळ मध्यस्त सल्लागार आहेत व शासनास विना मोबदला सहाय्य करतात. मयत बाबुलाल ओंकार अघडते यांचा मृत्यू बाबतचा प्रस्ताव विरुध्दपक्षास दि. 08/04/2013 रोजी प्राप्त झाला, सदर प्रस्ताव दि. 10/4/2013 रोजी न्यु इंडिया इंन्शुरन्स कंपनीला पाठविला असता, त्यांनी दि. 4/7/2013 रोजीच्या पत्रान्वये व्हिसेरा रिपोर्टची मागणी वारसदारास केली असता, सदरील दाव्यात न्यु इंडिया इन्शुरंस कंपनीने दि. 24/9/2013 च्या पत्रामध्ये त्यांनी दि. 5/4/2013 च्या व्हिसेरा रिपोर्ट मध्ये मृतकाचा मृत्यू फोरेन्सीक सायन्स लिबोरेटरी अमरावती यांचे रिपोर्टमध्ये सर्पाचे विष आढळून आले नसल्याचे रिपोर्टवरुन मृत्यू हा सर्पदंशाने न झाल्याचे नमुद करुन दावा नामंजुर केल्याचे वारसदारास कळविण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे वरील तक्रारीतून विरुध्दपक्षास पुर्णपणे मुक्त करण्यात यावे.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर व लेखी युक्तीवाद दाखल केले व विरुध्दपक्ष क्र. 6 यांनी तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्र. 6, विभागीय व्यवस्थापक, न्यु इंडिया इन्शुरंस कंपनी लि., यांचा लेखी जबाब, व इतर विरुध्दपक्ष ज्यांच्या माध्यमातुन शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा संदर्भात कागदपत्रे विरुध्दपक्ष क्र. 6 कडे पाठविले जातात, त्यांचे स्पष्टीकरण, तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले सर्व दस्तएवेज, तकारकर्ते यांचे प्रतिउत्तर, व लेखी युक्तीवाद, तसेच विरुध्दपक्ष क्र. 6 यांचा तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून नमुद केला,तो येणे प्रमाणे…
सदर प्रकरणात उभय पक्षांना ह्या बाबी मान्य आहेत की, मयत बाबुलाल ओंकारराव अघडते हे शेतकरी होते, त्यामुळे त्यांचा शासनाकडून शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा सन 2012 – 13 या वर्षाकरिता काढण्यात आला होता, त्यांचा मृत्यू दि. 1/9/2012 रोजी झाला होता.
तक्रारकर्ते यांचा असा युक्तीवाद आहे की, बाबुलाल अघडते यांना दि. 20/8/2012 रोजी साप चावला होता. त्यामुळे त्यांना सहारा हॉस्पीटल अकोला येथे भरती करुन ईलाज केला. परंतु दि. 1/9/2012 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सदर विमा योजनेनुसार विरुध्दपक्ष क्र. 6 यांनी विरुध्दपक्ष क्र. 2 ते 5 व विरुध्दपक्ष क्र. 7 यांचे माध्यमातून तक्रारकर्ते यांनी सादर केलेले सर्व दस्तऐवज स्विकारुन रु. 1,00,000/- इतकी विमा रक्कम तक्रारकर्ते यांना देणे भाग होते. परंतु विरुध्दपक्ष क्र. 6 यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा, असे कारण देवून नाकारला की, दिलेल्या कागदपत्रानुसार व्हिसेरा अहवाल दि. 5/4/2013 नुसार मृतकाच्या शरीरात विषाचे अंश नसल्यामुळे विमा दावा नामंजुर करण्यात येत आहे. परंतु विरुध्दपक्ष क्र. 6 चे असे म्हणणे बेकायदेशिर आहे.
यावर विरुध्दपक्ष क्र. 6 / विमा कंपनी यानी रेकॉर्डवर दाखल असलेले सर्व कागदपत्रे मंचाला दाखवून, त्यांनी सदर विमा दावा नाकारुन कोणतीही सेवा न्युनता केली नाही, असे ठामपणे सांगितले. विरुध्दपक्ष क्र. 6 यांनी तक्रारकर्ते यांनी जे दस्त रेकॉर्डवर दाखल केले आहेत, त्यावरुन मंचासमक्ष युक्तीवाद केला, ते सर्व दस्त तपासल्यानंतर मंचाचा निष्कर्ष असा आहे की, तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्त जसे की, मर्ग खबरी, घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, ई. यामध्ये विमाधारक बाबुलाल ओंकार अघडते, यांच्या मृत्युचे कारण सर्पदंश असे नमुद आहे. पोस्टमार्टेम या दस्तात मृत्यूचे कारण असे नमुद आहे की, “ Death due to snake bite, however skin flaps and blood sample has been preserved for chemical analysis if needed” परंतु सदर मृतकाच्या दि. 5/4/2013 च्या व्हिसेरा अहवालात असे नमुद आहे की, “Result for presence of snake venom using polyvalent antisnake—Venom serum are negative in exhibits 1,2, and 3” म्हणून Investigation Officer Balapur police Stattion Dist. Akola यांनी सदर मृतकाचे पोस्टमार्टेम करणारे डॉ. बी.एल.लोखंडे यांचेकडून अभिप्राय मागविला होता व तो त्यांनी दि. 31/1/2014 रोजी खालील प्रमाणे दिला आहे.
Subject :- Opinion into the cause of death of Name: Babulal Omkar Aghadate R/o Ridhora. District: Akola MLPM no 821/12 dated 01/09/2012
Referene : Your Letter no 361/13 Dated 21/12/13
Sir,
I have honour to forward you final opinion into the cause of death of deceased whose particulars are mention above in the subject is as follows.
Sir[ in light of postmortem findings and chemical analysis report no 4162-63/13 dated 05/04/2013 made available. I am of opinion that cause of death is due to “Snake bite”. However kindly Correlate with investigation.”
यावरुन विरुध्दपक्ष क्र. 6 यांनी दि. 30/6/2014 रोजी वरील प्रमाणे कारण देवून तक्रारकर्ते यांचा दावा नाकारला. त्यांच्या मते डॉ. लोखंडे यांनी पी.एम रिपोर्ट मध्ये मृतकाच्या मृत्युचे कारण सर्पदंश असे नमुद केले असतांना सुध्दा मृतकाचा व्हिसेरा तपासणीकरिता सुरक्षीत ठेवला होता. कारण त्यांचे मत हे व्हिसेराच्या केमीकल ॲनेलिसीसवरच अवलंबुन होते व व्हिसेराच्या अहवालात मृतकाच्या शरीरात विषाचे अंश नसल्याचे सिध्द झाले आहे. तरी डॉ. लोखंडे यांनी त्यांच्या मतात kindly Correlate with Investigation असे नमुद करणे म्हणजे ते त्यांच्याच मताशी पक्के नाहीत, असा अर्थ होतो. म्हणून व्हिसेरा अहवाल बाजुला सारता येणार नाही. यावर मंचाचे असे मत आहे की, मृतकाच्या व्हिसेरा अहवालानुसार मृतकाच्या शरीरात विषाचे अंश निघाले नाही, कारण तक्रारकर्ते यांचे कथनच असे आहे की, मृतक बाबुलाल अघडते यांना दि. 20/8/2012 रोजी साप चावला होता व त्यावरील उपचार त्यांनी दि. 1/9/2012 पर्यंत सहारा हॉस्पीटल अकोला येथे घेतले होते, त्याबद्दलचे दस्त तक्रारकर्ते यांनी रेकॉर्डवर दाखल केले आहे. म्हणून सदर उपचारामुळे व्हिसेरात विषाचे अंश कदाचित निघाले नसतील. विरुध्दपक्ष क्र. 6 यांनी सदर वैद्यकीय उपचार दस्तांवर आक्षेप घेत ते वैध नाहीत, असे म्हटले आहे. परंतु त्यांनी त्याबद्दल कुठल्याही तज्ञ डॉक्टरांचे नकारार्थी मत दाखल केले नाही. त्यामुळे सदर उपचाराचे दस्त पुर्णपणे बाजुला सारता येणार नाही. शिवाय तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्त, घटनास्थळ पंचनामा, यामध्ये साक्षीदाराने मृतकाला साप चावतांना पाहील्याचे सांगितले आहे व पोस्ट मार्टेम रिपोर्ट वरुनही डॉ. लोखंडे यांनी मृत्युचे कारण सर्पदंश असेच नमुद केले होते. नुसते त्यांच्या अभिप्राय मधील Correlate with Investigation या शब्दामुळे इतर परिस्थितीजन्य पुरावे दर्लक्षीत करुन, विरुध्दपक्षाच्या मताप्रमाणे निष्कर्ष काढता येणार नाही. तसेच विमाधारकाचा मृत्यू हा अपघाती होता. त्यामुळे सुध्दा तो सदर विमा योजनेचा लाभार्थी होवू शकतो, असे मंचाचे मत आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 6 / विमा कंपनी यांनी तक्रारकर्ते यांना मृतक विमाधारक बाबुलाल ओंकार अघडते यांच्या शेतकरी अपघात विमा योजनेनुसारची रक्कम रु. 1,00,000/- सव्याज, इतर नुकसान भरपाई व प्रकरण खर्चाच्या रकमेसहीत द्यावी या निष्कर्षाप्रत हे मंच आले आहे. म्हणून अंतीम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे.
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्र. 6 विभागीय व्यवस्थापक, न्यु इंडिया इन्शुरंस कंपनी यांनी तक्रारकर्ते / वारसदार यांना मृतक बाबुलाल ओंकार अघडते यांच्या शेतकरी अपघात विमा योजनेची रक्कम रु. 1,00,000 ( रुपये एक लाख ) द.सा.द.शे. 8 टक्के व्याज दराने दि. 21/02/2015 (प्रकरण दाखल दिनांक ) पासून तर रक्कम प्रत्यक्ष अदाईपर्यंत व्याजासहीत द्यावी. तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- ( अक्षरी रु. पांच हजार ) व प्रकरणाचा न्याईक खर्च रु. 3000/- ( अक्षरी रु. तिन हजार ) इतकी रक्कम द्यावी
- सदर आदेशाचे पालन विरुध्दपक्ष क्र. 6 यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावे.
- तक्रारकर्ते यांची तक्रार इतर विरुध्दपक्षांविरुध्द खारीज करण्यात येत आहे.
5) सदर आदेशाच्या प्रती संबंधीतांना निशुल्क देण्यात याव्या.