Exh.No.14
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.57/2015
तक्रार दाखल झाल्याचा दि. 19/10/2015
तक्रार निकाल झाल्याचा दि. 29/01/2016
श्री विनायक विजय पोवार
वय सुमारे 25 वर्षे, व्यवसाय – सिव्हिल इंजिनिअर,
रा.मु.पो.कणकवली, जि.सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
क्ल्यूज नेटवर्क प्रा.लि.
बिल्डिंग नं.112, सेक्टर 44,
गुरगाव – 122 001 (राज्य हरयाणा) ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्रीम. अपर्णा वा. पळसुले. अध्यक्ष
2) श्री कमलाकांत ध. कुबल, सदस्य
3) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे – व्यक्तीशः
विरुद्ध पक्ष – अनुपस्थित.
निकालपत्र
(दि.29/01/2016)
द्वारा : श्री कमलाकांत धर्माजी कुबल, सदस्य.
1) प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्ल्यूज नेटवर्क प्रा.लि. यांचेविरुध्द दुय्यम दर्जाचे बनावट सुगंधी द्रव्य विक्री करुन अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला म्हणून दाखल केलेली आहे.
2) सदर प्रकरणाचा थोडक्यात गोषवारा असा –
तक्रारदार श्री विनायक विजय पोवार, रा.कणकवली हे व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर आहेत. विरुध्द पक्ष ही ऑनलाईन शॉपिंगचा व्यवसाय करणारी भारतातील अधिकृत नामांकित कंपनी आहे. दि.16/09/2015 रोजी कणकवली येथून तक्रारदाराने स्वतःच्या वापराकरीता विरुध्द पक्षाच्या shopclues.com या वेबसाईटद्वारे स्वतःच्या मोबाईलवरुन Carolina Herrera 212 VIP EDT original perfume for men 100 ml. हे सुगंधी द्रव्य ऑर्डर क्र.68216347 ने मागविले. सदरचे मागणी केलेले सुगंधी द्रव्य तक्रारदार यांनी दि.19/09/2015 रोजी तक्रारदाराच्या दिलेल्या राहत्या घराच्या पत्त्यावर ECom कुरियरमार्फत पोहोच केले. सुगंधी द्रव्याची मूळ किंमत रु.5,000/- होती. मात्र त्यादिवशी ऑफरमुळे रु.999/- एवढी किंमत ठेवली होती. सदरची रक्कम सुगंधी द्रव्याचे पार्सल पोहोच केले त्यावेळी रोख स्वरुपात देण्यात आली. नमुद मागणी केलेले सुगंधी द्रव्य उघडताच तक्रारदाराला सदरचे सुगंधी द्रव्य दुय्यम दर्जाचे असल्याचे लक्षात आल्यावर तज्ज्ञ व्यक्तीकडून त्याबाबत शहानिशा करुन घेतली व त्याप्रमाणे विरुध्द पक्षाला त्याच्या अधिकृत दूरध्वनीवर संपर्क साधून पाठविलेले सुगंधी द्रव्य दुय्यम दर्जाचे असून ते बदलून ओरिजिनल देण्याची किंवा रक्कम परत करण्याची मागणी केली. तेव्हा विरुध्द पक्षाने तक्रारदाराला तुमच्या शहरामध्ये त्यांचेकडे पैसे परत करण्याची अगर घेतलेली वस्तु बदलून देण्याची सोय नसल्याचे सांगितले. तसेच तक्रारदाराला दिलेले सुगंधी द्रव्य दुय्यम दर्जाचे वाटत असेल तर पुन्हा आपल्याकडे ऑर्डर करावी असे सांगितले व तक्रारदाराला दिलेले प्रॉडक्ट आपल्या खर्चाने (रु.450 ते रु.500/-) परत पाठवणेत यावे असे विरुध्द पक्षाने सुचविले. तक्रारदाराने परत पाठविलेले प्रॉडक्ट वेअर हाऊसमध्ये पाठवतो व खात्री करुन घेतली जार्इल त्या बदल्यात कोणतीही वस्तु परत मिळणार नाही व तक्रारदाराने दिलेली रक्कम क्रेडिट म्हणून राहिल व त्या रक्कमेचा वापर पुढील ऑनलाईन शॉपिंगसाठी उपयोगात आणता येईल असे सांगितले.
3) या सर्व घटनाक्रमानंतर तक्रारदाराने पुन्हा विरुध्द पक्षाच्या shopclues.com या संकेतस्थळावर त्याचदिवशी दि.19/9/2015 रोजी Tom Ford noir men 100 ml. हे सुगंधी द्रव्य ऑर्डर क्रमांक 68538906 ने मागविले. सदरची मागणी केलेले द्रव्य तक्रारदाराला दि.22/9/2015 रोजी तक्रारदाराच्या राहत्या घरी दिलेल्या पत्त्यावर ECom कुरियरमार्फत पोहोचले. सुगंधी द्रव्याची मूळ किंमत रु.17,000/- एवढी ठेवली होती. तथापि सदरची ऑफर प्राईस रु.1049/- ची रक्कम तक्रारदार यांनी सुगंधी द्रव्याचे पार्सल पोहोच केले त्यावेळी रोख दिली. पुनःश्च पुर्वीप्रमाणेच प्रकार घडला. त्यावेळी विरुध्द पक्षाने पाठविलेले सुगंधी द्रव्य दुय्यम दर्जाचे असल्याचे तक्रारदाराच्या निदर्शनास आले. त्यानंतर तक्रारदाराने विरुध्द पक्षाशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला मात्र विरुध्द पक्षाने समर्पक उत्तरे न देता स्वीकारलेली रक्कम देण्यास नकार दिला व तक्रारीची योग्य दखल घेतली नाही.
4) तक्रारदाराचे असे म्हणणे आहे की, विरुध्द पक्षाने ओरिजिनल असल्याचे सांगून तशी जाहिरातबाजी करुन त्याप्रमाणे संकेतस्थळाला ऑर्डर व पैसे स्वीकारुन तक्रारदाराला दुय्यम दर्जाचे सुगंधी द्रव्य देऊन फसवणूक केलेली आहे व असा व्यवहार दोन वेळा करण्यास तक्रारदारास भाग पाडण्यात आले. त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागला. किंबहूना विरुध्द पक्षाने प्रस्तुत व्यवहारात अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे तक्रारदाराचे म्हणणे असून विरुध्द पक्षाने तक्रारदाराला दयावयाच्या सेवेत कमतरता, निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केल्याने तसेच तक्रारदाराची फसवणूक केल्याने तक्रारदाराकडून स्वीकारलेली रक्कम रु.2,048/-, सेवेतील कमतरता म्हणून रु.1,00,000/- आश्वासन न पाळणे व फसवणूकीपोटी रु.10,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.5,00,000/- , झालेले नुकसान व होणारा खर्च रु.3,50,000/- अशी एकूण 19,58,048/- तसेच प्रकरण खर्चापोटी रु.10,000/- विरुध्द पक्षाकडून वसुल होऊन मिळावेत अशी मागणी केलेली आहे.
5) आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ नि.क्र.3 वर एकूण 2 कागदपत्रे दाखल केलेली आहेत व नि.क्र.10 वर एकूण 5 कागदपत्रे दाखल केली आहेत.
6) तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारीत विरुध्द पक्ष हरियाणा राज्यातील असल्याने त्याला तेथे जाणे शक्य नसल्याने व पैशांचा व्यवहार सिंधुदुर्ग जिल्हयातच झालेला असलेने प्रस्तुत तक्रार सिंधुदुर्ग मंचात चालवणेसाठी परवानगीचा अर्ज दाखल केला तो मंचाने मंजूर केलेला आहे.
7) तक्रारदाराने विरुध्द पक्षाबरोबर झालेल्या संभाषणाची Compact Disk दाखल केलेली आहे. तसेच त्या संभाषणाचे Transcript देखील हजर केले आहे.
8) विरुध्द पक्षाने पोष्टाद्वारे आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्यांनी तक्रारदाराची तक्रार खोटी, खोडसाळ असल्याचे नमूद केलेले असून तक्रारदारांच्या मागण्या फेटाळलेल्या आहेत. विरुध्द पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे आपण केवळ वस्तु पाठविण्याचे तथा विक्री करण्याचे काम करतो. मूळतः वस्तुची सदोषता उत्पादकांची असते. त्यामुळे तक्रारदाराने उत्पादकाला पक्षकार करणे आवश्यक होते. आपण केवळ वस्तु पोहचविण्याचे काम करतो. त्यामुळे तक्रारदाराच्या वस्तु संदर्भातील कोणत्याही बाबीसंदर्भात आपली जबाबदारी नाही. त्यामुळे तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा.
9) तक्रारदाराची तक्रार, दाखल केलेले लेखी पुरावे, विरुध्द पक्षाने केवळ पोष्टाद्वारे पाठविलेले आपले म्हणणे, Compact Disk संभाषण, विरुध्द पक्षाची नोटीस प्राप्त होऊनही मंचासमोरची अनुपस्थिती, तक्रारदाराचा तोंडी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत येत आहेत.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हा विरुध्द पक्ष यांचा ग्राहक आहे काय ? | होय |
2 | विरुध्द पक्षाने तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेली आहे काय ? | होय |
3 | विरुध्द पक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे काय ? | होय |
4 | तक्रारदार अनुतोष मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
5 | आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
10) मुद्दा क्रमांक 1 ते 5 – तक्रारदाराने नि.क्र.3/1 व नि.क्र.3/2 वरील ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ पावत्याचे निरिक्षण केल्यास त्यामध्ये विरुध्द पक्षाने वस्तु देऊन पैसे घेतल्याचे स्पष्ट होते. सबब तक्रारदार विरुध्द पक्षाचा ‘ग्राहक’ असल्याचे स्पष्ट होते.
11) तक्रारदाराकडून वस्तुचा मोबदला घेऊनही वस्तु दर्जेदार न देणे ही सेवेतील त्रुटी ठरते. सदर कृत्य विरुध्द पक्षाने केलेले असल्याने सेवात्रुटी स्पष्ट होते.
12) तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे सुगंधी द्रव्ये खरेदी केल्यानंतर त्याला विक्री करण्यात आलेली सुगंधी द्रव्ये बनावट (duplicate) असल्याचे निदर्शनास आले. तक्रारदार हा सातत्याने सुगंधी द्रव्याचा वापर करीत असल्याने विरुध्द पक्षाकडून पुरविण्यात आलेले सुगंधी द्रव्य त्याला संशयातीत वाटले. यासाठी त्यांने तज्ज्ञ व्यक्तीकडून त्याची खातरजमा करुन घेतली. त्यामुळे सुगंधी द्रव्य बनावट (duplicate) असल्याचे अधोरेखित झाले. कोणतीही वस्तु खरेदी केल्यावर ग्राहकाला मिळणारे समाधान हे सर्वोच्च असते. त्याने मोबदला देऊन खरेदी केलेल्या वस्तु जर सदोष असतील तर किंमतीच्या तुलनेत ग्राहकाचे पूर्णतः समाधान करुन देणे ही विक्रेत्याची न्यायीक जबाबदारी असते. तक्रारदाराला जाहिरातबाजी करुन वस्तु घेणेस प्रवृत्त करायचे, त्यासाठी किंमतीमध्ये सवलत देऊन आमिष दाखवायचे आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करुन बनावट (duplicate) वस्तुचा पुरवठा करायचा ही बाब ग्राहकावर अन्याय करणारी आहे. प्रस्तुत प्रकरणात विरुध्द पक्षाने ही बाब केल्याचे स्पष्ट होते.
13) विरुध्द पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे सुगंधी द्रव्याचा उत्पादक या गोष्टींना जबाबदार आहे. मात्र मंचाला असे वाटते की, तक्रारदाराला सवलतीच्या मुल्याची ऑफर विरुध्द पक्षाने दिलेली होती. त्यामुळे दर्जेदार सुगंधी द्रव्य पुरविण्याची सर्वंकष जबाबदारी ही विरुध्द पक्षाची आहे हे स्पष्ट होते.विरुध्द पक्ष नोटीस प्राप्त होऊनही मंचासमोर हजर राहिलेले नाहीत. त्यांनी आपले म्हणणे पोष्टाद्वारे मंचाकडे पाठविले. यावरुन प्रस्तुत तक्रारीकडे त्रयस्तपणे पाहण्याचा दृष्टीकोन निदर्शनास येतो ही बाब गंभीर आहे असे मंचाला वाटते.
14) तक्रारदाराने आपल्या तक्रार अर्जात एकूण रु.19,58,048/- ची केलेली मागणी अवाजवी व अवास्तव आहे. मात्र ऑनलाईन मार्केटच्या माध्यमातून खरेदी करणा-यांची संख्या लक्षणीय आहे. त्यांची फसवणूक होऊ नये व फसवणूक करणा-या अपप्रवृत्तींना लगाम घालणेचे दृष्टीने प्रस्तुत प्रकरणामध्ये विशेष निर्देश देणेप्रत मंचाला यावे लागत आहे. तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडून स्वीकारलेली रककम रु.2048/- व त्यावर 9% व्याज, शारीरिक, मानसिक त्रासापोटी अवलंब केल्याने रु.30,000/- रक्कम देणे क्रमप्राप्त आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
- विरुध्द पक्षाने तक्रारदाराकडून घेतलेली रक्कम रु.2048/- (रुपये दोन हजार अठ्ठेचाळीस मात्र) 9% व्याजदराने दि.22/09/2015 पासून रक्कम फिटेपर्यंत तक्रारदारास अदा करावेत.
- विरुध्द पक्षाने तक्रारदाराला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.30,000/- (रुपये तीस हजार मात्र) आदेश प्राप्तीच्या दिनांकापासून 45 दिवसांत अदा करणेचे निर्देश देण्यात येतात.
- वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी मुदतीत न केल्यास तक्रारदार विरुध्द पक्ष यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 आणि 27 अन्वये कार्यवाही करु शकतील.
- मा.राज्य आयोग, मुंबई यांचे परिपत्रक्र क्र.राआ/महा/आस्था/-3/जि.मं.कामकाज/ परिपत्रक/2014/3752 दि.05 जुलै 2014 नुसार उभय पक्षकारांनी 45 दिवसानंतर म्हणजेच दि.15/03/2016 रोजी आदेशाची पुर्तता झाली किंवा नाही हे कळवणेसाठी या मंचासमोर हजर रहावे असे आदेश देण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 29/01/2016
Sd/- Sd/- Sd/-
(वफा ज. खान) (अपर्णा वा. पळसुले) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, अध्यक्ष, सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.