(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक : 10 नोव्हेंबर 2016)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रार थोडक्यात स्वरुप अशाप्रकारे आहे की, तक्रारकर्ता ही अमेरीकेत राहात असून तिचे आई-वडील निला पारीख व श्री दिलीप पारीख हे नागपूर येथे राहातात. तक्रारकर्ती व तिचे तिन वर्षाचा मुलगा नामे महेक सिध्दार्थ शहा याला घेवून आपल्या आई-वडीलाच्या भेटीला नागपूरला आली होती. विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांचे मार्फत परतीच्या प्रवासाची बुकींग विरुध्दपक्ष क्र.1 व्दारे ट्रीप आय.डी. नं.1007291363 दिनांक 29.7.2010 रोजी केले होते. सदर विमान प्रवास हा विरुध्दपक्ष क्र.2 विमान क्रमांक एस 2 - 383 नागपूर ते मुंबई दिनांक 29.12.2010 रिझर्वेशन कोड नं. KHQ 4 VA हा होता. सदर विमानाचे उडान राञी 8-30 मिनीटाचे होते व ते विमान 9-40 मिनीटांनी पोहचणे अपेक्षित होते. तक्रारकर्ती व तिचा मुलगा आंतरराष्ट्रीय विमानात अमेरीकेला जाण्याकरीता दिनांक 30.12.2010 ला पहाटे 4-00 वाजता बसणार होते त्या उद्देशाने तिने दिनांक 29.12.2010 चे नागपूर ते मुंबई चे विमान प्रवासाची व्यवस्था केली होती. तक्रारकर्ती पुढे असे नमूद करते की, तक्रारकर्ती दिनांक 29.12.2010 ला सुमारे सायकांळी 7-00 वाजता पोहचली असता विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी त्यांना सांगितले की, ऑक्टोंबर 2010 पासून उड्डान क्रमांक एस 2 – 383 हे बुधवारचे विमान रद्द झालेले आहे. सदरची गोष्ट एकताच तक्रारकर्तीला आश्चर्याचा धक्का बसला व ही बाब विरुध्दपक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्तीला पहिल्यांदा सांगितले, जेंव्हा तक्रारकर्ती विमानतळावर पोहचली होती. सदरची बाब विरुध्दपक्ष क्र.2 यांनी कधीही व कुठल्याच माध्यमातून प्रवासी विमान रद्द झाले आहे, याबाबत कळविले नव्हते. विरुध्दपक्ष क्र.2 यांचेकडे तक्रारकर्तीचा ई-मेल आय.डी., फोन नंबर होता, परंतु प्रवासाची योजना बदलली याबद्दलची माहिती दिली नाही व इतकेच नव्हेतर विरुध्दपक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्तीची पूर्व परवानगी न घेता विमान क्रमांक एस 2 – 384 ने मुंबई इंदोर मार्गे जाणा-या विमानात त्यांची व्यवस्था केली. याची पूर्व सुचना कोणत्याच माध्यमातून तक्रारकर्तीला देण्यात आली नाही व सदरचे विमा क्रमांक एस 2 -384 हे विमान सायकांळी 6-00 वाजता आधीच निघून गेले होते. तक्रारकर्ती पुढे असे नमूद करते की, तक्रारकर्ती हिने विमानाचे प्रवासी टिकीट आरक्षित करतांना तिची बहीण नामे धारा दिलीप वारे हीचा फोन नंबर व ई-मेल आय.डी. सुध्दा दिला होता. सदरच्या घटनेची चौकशी केली असता, विरुध्दपक्ष क्र.2 यांनी त्याक्षणी मोबाईलवर सुमारे 8-40 मिनिटानी संदेश दिला की, मुंबईला इंदोर मार्गे जाणारे विमान हे इंदोरवरुन वेळेवर उडान घेईल. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, विरुध्दपक्ष क्र.2 यांचा खोटारडेपणा व टिकीट आरक्षित करतांना प्रवास करणा-यांची पूर्ण माहिती घेवून सुध्दा त्यांना व्यवस्थित सेवा देता येत नाही. तसेच विरुध्दपक्ष क्र.2 हे आपली जबाबदारी विरुध्दपक्ष क्र.1 वर ढकलण्याचा प्रयत्न करतात.
2. तक्रारकर्ती पुढे असे नमूद करते की, एवढी घटना घडून सुध्दा विरुध्दपक्ष क्र.2 यांनी त्यावेळी तक्रारकर्ती समोर दुसरा प्रस्ताव असा ठेवला की, पुण्याला जाण्याची त्यांची व्यवस्था करतील व तेथून तक्रारकर्तीने टॅक्सीने मुंबईला जावे. तक्रारकर्तीला तेंव्हा ही आश्चर्याचा धक्का बसला, तिचा 3 वर्षाचा लहान बाळ घेवून राञी टॅक्सी पुण्यावरुन मुंबईला जावे व तेथून आंतरराष्ट्रीय विमानतळावर जावे व दिनांक 30.12.2010 चे पहाटे 4-00 वाजताचे अमेरीकेला जाणारे विमान पकडावयाचे होते. त्यामुळे सदरचा दिलेला प्रस्ताव हा अतिशय दगदगीचा व पूर्णतः निर्दयी स्वरुपाचा होता. सदरची तक्रार विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांची गैरजबाबदारी निर्दयी व नियमबाह्य होती. तसेच, या सर्व गोष्टीमधील शोकांतीका अशी आहे की, जरी विरुध्दपक्ष क्र.2 हे मुंबईला जाण्यापर्यंतची तक्रारकर्तीची व्यवस्था करण्यास असमर्थ होते, पण हेच लोक असे सांगत होते की, ते आंतरराष्ट्रीय विमान सेवेशी बोलून तक्रारकर्तीची त्याच विमानात व्यवस्था करुन देतील. सरते शेवटी तक्रारकर्तीला मुंबईला जाण्यासाठी इंडिगो कंपनीच्या विमानाने राञी 8-35 मिनीटांनी जाण्यासाठी तक्रारकर्तीने स्वतः व्यवस्था केली व तिचे टिकीट वेळेवर रुपये 6,681/- प्रमाणे दोन टिकीटे घ्यावी लागले. सदरचे टिकीट तक्रारकर्ता क्रमांक 3 यांचे आय.सी.आय.सी.आय. बँक क्रेडीट कार्ड क्रमांक 2006 च्या व्दारे इन्वॉइस क्रमांक 002777 आणि 002778 दिनांक 29.12.2010 ला नागपूर विमानतळावर केले.
3. तक्रारकर्ती पुढे असे नमूद करते की, तक्रारकर्तीला व तिच्या लहान बाळाला सोडण्याकरीता तक्रारकर्तीचे आई-वडील, बहीण यांना सुध्दा अतिशय शारिरीक व मानसिक ञास सहन करावा लागला. तक्रारकर्तीच्या आई-वडील व बहीणीला विमानतळाच्या प्रेक्षक गॅलरीमधून तक्रारकर्तीचे तिच्या मुलाबरोबर होणारे विरुध्दपक्षाकडून गैरसोय व धावपळ व या काउंटरवरुन त्या काउंटरवर जाण्याची लगबघीने घाई गॅलरीमधून पाहण्यावाचून दुसरे कोणतेही गत्यंतर नव्हते. त्यामुळे तक्रारकर्ती व तिच्या 3 वर्षाच्या लहान बाळाला व सामानाला घेवून तक्रारकर्तीला बरीच धावपळ करावी लागली व तक्रारकतीच्या कुंटूंबाला सदरची परिस्थिती पाहून अतिशय शारिरीक व मानसिक ञास सहन करावा लागला व विरुध्दपक्षाच्या गैरसोयीमुळे त्या दरम्यान अतिशय धांदल तक्रारकर्तीला व विरुध्दपक्ष क्र.3 यांना सहन करावा लागला. तक्रारकर्ती पुढे असे नमूद करते की, या सर्व विरुध्दपक्ष क्र.2 च्या गोंधळामुळे व गैरव्यवस्थेमुळे तक्रारकर्तीला अमेरीकेला जाण्याचे विमान आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचण्याकरीता अवघ्या 5 मिनीटाच्या कालावधीपूर्वी जावून विमा पकडावे लागले व तसेच विरुध्दपक्ष क्र.2 यांचे अधिका-यांनी पूर्वीचे टिकीट रद्द झाल्याबाबतचा शिक्का तक्रारकर्तीच्या टिकीटावर सुमारे 8-20 मिनीटानी नं.सी सी 122020 व्दारे लावला व पावती देण्यात आली. सदरची प्रक्रीया जेंव्हा तक्रारकर्तीने दुस-या विमानाचे टिकीट काढल्यानंतर करण्यात आले ही संपूर्ण घटना बघता विरुध्दपक्ष क्र.2 यांची सेवेत ञुटी व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब ठरतो व तसेच तक्रारकर्तीबरोबर तक्रारकर्ता क्र.2 व तिन वर्षाचे लहान मुलगा यांना व तसेच तक्रारकर्ता क्रमांक 3 तक्रारकर्तीचे वडील यांना सुध्दा अतिशय शारिरीक व मानसिक ञास विरुध्दपक्षाच्या चुकीमुळे करावे लागले व त्यामुळे तक्रारकर्ता यांना विरुध्दपक्ष क्र.2 यांनी झालेल्या ञासाबद्दल नुकसान भरपाई व वेळेवर काढलेल्या टिकीटाची रक्कम परत मागण्याकरीता कायदेशिर नोटीस दिली. सदरची नोटीसाला विरुध्दपक्षाने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. सरते शेवटी तक्रारकर्तीला सदरची तक्रार मंचामध्ये दाखल करुन खालील मागण्या केलेल्या आहेत.
1) विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे सेवेत ञुटी व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे, असे घोषीत करावे.
2) विरुध्दपक्ष क्र.1 ला निर्देश द्यावे की, त्यांनी विरुध्दपक्षाला रुपये 3,00,000/- नुकसान भरपाई व शारिरीक व मानसिक ञासाबद्दल देण्याचे आदेशीत करावे.
3) तसेच विरुध्दपक्ष क्र. 2 यांना सुध्दा निर्देशीत करावी की, त्यांना रुपये 5,00,000/- नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशीत करावे.
4) विरुध्दपक्ष क्र.1 ला आदेशीत करावे की, त्यांनी तक्रारकर्ती हिला रुपये 13,362/- चे वेळेवर काढलेल्या विमान प्रवासाचे टिकीटपोटी देण्याचे आदेशीत करावे.
4. तक्रारकर्तीचे तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना मंचाची नोटीस बजावण्यात आली. त्यावर विरुध्दपक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीला लेखीउत्तर दाखल करुन त्यात स्पष्ट नमूद केले की, विरुध्दपक्ष क्र.1 ही क्लिअर ट्रीप क्रमांक 001 असून विमानाची सेवा प्रवासाची व त्यासोबत सुविधा पुरविण्याचे व्यवसायात कार्यरत आहे. तसेच, विरुध्दपक्ष क्र.2 ही खाजगी स्वरुपाची हवाईसेवा पुरविणारी असून ती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उड्डाने करते, तसेच भारत सरकार कडून परवाने मिळाले असून ही सेवा सरकारने केलेले नियम व कायद्याला अनुसरुन देते. विरुध्दपक्ष क्र.1 ही www.cleartrip.com ही वेबसाईट असून विरुध्दपक्ष क्र.1 ही या वेबसाईटच्या माध्यमातून प्रवास व त्याचेकडे सुविधा पुरविण्याची वयवस्था करते. तसेच सेवेचा लाभ घेण्याकरीता जो व्यक्ती सेवा घेतो त्या व्यक्तीचा व विरुध्दपक्ष क्र.1 यांचेशी ऑनलाईन करारनामा होतो त्या करारनाम्याप्रमाणे सेवा घेणा-या व्यक्तींना सेवेमध्ये काही ञुटी आढळल्यास त्याचे निराकरण लवादा मार्फत करण्यात येईल, असे स्पष्ट स्वरुपाची अट असते व सदरचा वाद मध्यस्थ व लवाद कायदा 19996 चे कलम 8(1) प्रमाणे लवादाकडे जावून मिटविण्यात येतो.
5. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्र.1 यांचेकडून विमानाचे टिकीट बुक केली होती. विमानाच्या प्रवासाची सेवा ही विरुध्दपक्ष क्र.2 यांची होती. तसेच विमानाची बदलेली वेळ व व्यवस्था तक्रारकर्तीला कळविण्याची प्राथमिक जबाबदारी ही विरुध्दपक्ष क्र.2 यांची होती, त्याकरीता विरुध्दपक्ष क्र.1 हे जबाबदार नाही. तक्रारकर्तीने प्रवास करण्याकरीता जे विमानाचे टिकीट घेतले होते त्याची संपूर्ण माहिती व टिकीट खरेदी झाल्यानंतर होणारी संपूर्ण प्रक्रीया विरुध्दपक्ष क्र.1 यांनी पारपाडली होती. त्यामुळे तक्रारकर्तीची सदरच्या तक्रारीत विरुध्दपक्ष क्र.1 ही कोणत्याही प्रकारे सेवेत ञुटी झाल्याबाबत सिध्द होत नाही. तसेच तक्रारकर्ता क्र.3 यांचेशी कोणताही व्यवहार उदा. टिकीट बुकींग विरुध्दपक्ष क्र.1 व 2 सोबत झालेला नाही, त्यामुळे सदरची तक्रार ही या कार्यक्षेञात बसत नाही, करीता तक्रार खारीज करण्यात यावी. विरुध्दपक्ष क्र.1 यांनी पुढे असे नमूद केले की, विरुध्दपक्ष क्र.1 याचे ‘cleartrip.com’ नावाने ऑनलाईन एजंसी हवाई सेवाचे टिकीट तसेच हॉटेल बुक करण्याचे संपूर्ण सेवा देण्याचे काम करते. तसेच टिकीट बुक झाल्यानंतर विरुध्दपक्ष क्र.2 यांच्या हवाई सेवेची सेवा देण्यासाठी ठरविले होते त्यामुळे तक्रारकर्तीचा संबंध थेट विरुध्दपक्ष क्र.2 यांचेशी पडतो व झालेल्या संपूर्ण घटनेला कारणीभूत विरुध्दपक्ष क्र.2 हे आहेत. तसेच विरुध्दपक्ष क्र.1 व 2 हे एकमेकांच्या संबंधात राहून सदरचा व्यवहार करते, परंतु विरुध्दपक्ष क्र.1 यांची फक्त तक्रारकर्तीकडून किंवा ग्राहकांकउून टिकीट बुक करण्याची व्यवस्था आहे, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.1 यांनी आपले काम प्रामाणिकपणे पारपाडले आहे व त्यामुळे तक्रारकर्तीला झालेला शारिरीक व मानसिक ञास नुकसान देण्यास व झालेल्या तक्रारकर्तीला व तिच्या लहान बाळाला झालेल्या गैरसोयीबाबत जबाबदार नाही व झालेली नुकसान भरपाईपोटी विरुध्दपक्ष क्र.1 जबाबदार नाही. तसेच तक्रारकर्तीने लावलेले दोषारोपन व प्रत्यारोपन विरुध्दपक्ष क्र.1 यांनी आपले उत्तरात खोडून काढले व सदरची तक्रार ही बिनबुडाची असून खारीज होण्यास पाञ आहे.
6. विरुध्दपक्ष क्र.2 यांनी तक्रारीला लेखीउत्तर दाखल करुन असे नमूद केले की, तक्रारकर्तीची सदाची तक्रार ही खोटी, निराधार असून या मंचात चालविण्या योग्य नाही, त्यामुळे सदरची तक्रार ही खारीज करण्यात यावी. पुढे त्यांनी आपल्या उत्तरात नमूद केले की, तक्रारकर्ता क्रमांक 3 हे कोणत्याही माध्यमातून ग्राहक होत नाही व ते तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 यांचे मार्फत तक्रार दाखल करु शकत नाही. तसेच, ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 11(2)(b) प्रमाणे तक्रारकर्ते क्रमांक 1 व 2 हे मुळ भरतीय निवासी नाही, त्यामुळे सदरची तक्रार दाखल करण्यास ते पाञ नाही व तसेही सदरच्या मंचाला ही तक्रार चालविण्याचे कार्यक्षेञ येत नाही. तसेच विरुध्दपक्ष क्र.2 यांचे नागपूर अधिकारक्षेञामध्ये कोणतेही कार्यालय किंवा शाखा कार्यालय नाही, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.2 विरुध्द या मंचात तक्रार चालविण्याचा कोणताही अधिकार नाही. विरुध्दपक्ष क्र.2 पुढे आपल्या उत्तरात असे नमूद करतात की, तक्रारकर्त्याने दिनांक 29.7.2010 रोजी नागपूर ते मुंबई जाण्याचे दिनांक 27.9.2011 चे टिकीट बुक केले होते त्याचा फ्लाईट क्रमांक एस 2 -383 होता. परंतु, मुंबई ते नागपूर हवाई मार्गाची व्यवस्था बदलल्यामुळे ते नागपूर इंदोर मार्गे मुंबई या मार्गाने 7-30 वाजता दिनांक 27.9.2010 रोजी जाणार होते. त्याबाबतचे मॅसेज तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दुरध्वनी क्रमांकावर पाठविलेले होते आणि सदरचा मॅसेज हा ऑटोमॅटीक जनरेट सिस्टीमव्दारे पाठविण्यात आला होता, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.2 यांचे सेवेत ञुटी झाली नाही व तसेच दिनांक 25.9.2010 रोजी त्यांना ई-मेलव्दारे कळविण्यात आले.
7. तक्रारकर्तीने ज्या विमानाचे टिकीट घेतले ते तिकीट मिळाल्यानंतर किंवा घेतांना एअर अॅक्ट 1972 प्रमाणे जो अस्तित्वात कायदा आहे तो कायदा दोन्ही पक्षांना लागु होतात व त्यामधील झालेल्या करारनाम्याच्या अटी व शर्ती दोन्ही पक्षांना जरी त्यांनी वेबसाईट वरुन टिकीट घेतले किंवा ई-टिकीट घेतले किंवा पेपर टिकीट घेतले त्या सर्वांना हा कायदा लागु पडतात. तक्रारर्तीने पुढे लावलेले दोषारोपन व प्रत्यारोपन आपल्या उत्तरात खोडून काढले व ही बाब खोडून काढली की, त्यांनी तक्रारकर्तीला टॅक्सीव्दारे पुणे ते मुंबई प्रवास करण्याचे सांगितले किंवा सल्ला दिला. विरुध्दपक्ष क्र.2 च्या संपूर्ण स्टॉफने तक्रारकर्तीला मदत होईल अशाप्रकारे वागणूक दिली, त्यामुळे तक्रारकर्तीने दोषारोपन व खोटी बाब तक्रारीत नमूद केली आहे. विरुध्दपक्ष क्र.2 यांचेकडून तक्रारकर्तीला कोणत्याही प्रकारची गैरसोय झालेली नाही त्यामुळे तक्रारकर्तीची सदरची तक्रार खोटी, बिनबुडाची व फक्त विरुध्दपक्षांना ञास देण्याची असल्यामुळे तक्रार खारीज करण्यात यावी.
8. तक्रारकर्तीने सदरच्या तक्रारीबरोबर 1 ते 9 दस्ताऐवज दाखल करुन त्यात प्रामुख्याने विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना पाठविलेल्या नोटीस, त्याचप्रमाणे विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना नोटीस प्राप्त झाल्याबाबत पोहचपावती, दिनांक 29.7.2010 रोजी वेळेवर तक्रारकर्ता क्र.1 व 2 चे घेतलेल्या टिकीटाची प्रत, तसेच अमेरीकेला जाण्याकरीता घेतलेल्या विमानाच्या टिकीटाची प्रत, इत्यादी दस्ताऐवज दाखल केली. तसेच विरुध्दपक्ष क्र.1 यांनी आपल्या उत्तराबरोबर दस्ताऐवज दाखल करुन त्यात प्रामुख्याने अटी व शर्ती ग्राहकासोबत टिकीट घेतांना अटी व शर्ती बंधनकारक असतात त्याची प्रत दाखल केली.
9. दोन्ही पक्षाने सदर प्रकरणात लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच दोन्ही पक्षांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला व अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ता क्र.1 ते 3 हे विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांचे ग्राहक : होय
होतात काय ?
2) विरुध्दपक्ष यांचेकडून तक्रारकर्त्यांना सेवेत ञुटी किंवा : होय
अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब झाल्याचे सिध्द होते काय ?
3) आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
10. तक्रारकर्ते क्रमांक 1 ते 3 यांनी सदरची तक्रार ही तक्रारकर्ती क्रमांक 1 व 2 यांनी नागपूर विमानतळावरुन मुंबईला जावून तेथून आंतरराष्ट्रीय विमानाव्दारे अमेरीकेत जावयाचे होते, त्याकरीता तक्रारकर्ती हिने दिनांक 29.7.2010 रोजी नागपूर ते मुंबई जाण्याचे टिकीट विरुध्दपक्ष क्र.1 ‘cleartrip.com’ यांचे मार्फत केलेले होते व विरुध्दपक्ष क्र.2 ही हवाईसेवा पुरविणारी कंपनी आहे. तक्रारकर्ता क्र.1 व 2 हे निवासी अमेरीकेचे असून तक्रारकर्ता क्र.3 हे तिचे वउील आहे. तक्रारकर्ती ही आपल्या 3 वर्षाचे बाळाला घेवून नागपूरला आपल्या आई-वडील व बहिणीला भेटायला आली होती. परंतु, परतीच्या प्रवासाचे वेळी दिनांक 29.7.2010 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विमानतळ येथे गेली असता, तिने आरक्षित केलेले विमान एस 2 – 383 हे विमान आधीच निघून गेलेले होते. विरुध्दपक्ष क्र.2 यांनी विमान उडण्याच्या किंवा विमान सेवेच्या व्यवस्थेमध्ये झालेल्या बदलाची कोणत्याही प्रकारची बातमी तक्रारकर्तीला दिली नाही, त्यामुळे तक्रारकर्तीची नागपूर विमानतळावर गैरसोय झाली. तिला तिच्या लहान बाळाला व सोबत असलेला लगेज घेवून प्रत्येक काऊंटरवर जावून विचारपूस करुन अतिशय धांदल झाली व त्यामुळे तक्रारकर्तीला अतिशय शारिरीक व मानसिक ञास झाला, तसेच तक्रारकर्तीचे आई-वडील व बहीण विमानतळावर सोडायला आली होती त्यांना सुध्दा अतिशय ञास झाला. त्यांना स्वतःच्या मुलीला झालेली गैरसोय व तिची धावपड व ते तिथे उपस्थित राहून सुध्दा काहीच करु शकत नव्हते, कारण ते फक्त विमानतळाच्या गॅलरीमधून बघण्या व्यतिरिक्त काहीच करु शकत नव्हते. तक्रारकर्ता क्रमांक 3 हे तक्रारकर्ती क्र.1 चे वडील असून त्यांनी सरते शेवटी इंडींगो एअर लाईन्सचे वेळेवर रुपये 6,681/- प्रमाणे दोन तिकीट घ्याव्या लागल्या. परंतु महत्वाची बाब अशी की, तक्रारकर्ती क्र.1 ला तिच्या बाळासोबत मुंबई विमानतळावर जावून अमेरीकेला जाणारे पहाटे 4-00 वाजताचे विमान पकडायचे होते, परंतु विरुध्दपक्ष क्र.2 यांच्या निष्काळजीपणामुळे विमान व्यवस्थेमध्ये झालेल्या बदलाबाबत सुचना न दिल्यामुळे तक्रारकती व तिच्या बाळाला ताबडतोब दुस-या विमानाची व्यवस्था करुन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जावे लागले व ती अवघ्या पाच मिनीटांपूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचू शकली. यावरुन तक्रारकर्ती व तिचे लहान बाळाला अतिशय शारिरीक व मानसिक ञास सहन करावा लागला. विरुध्दपक्षाने आपल्या उत्तरात नमूद केले की, तक्रारकर्तीचे विमान क्रमांक एस 2 – 383 हे बुधवारचे विमान रद्द झाले होते व त्यांनी एस 2 -384 हे मुंबईला इंदोर मार्गे जाणारे विमानात त्यांची व्यवस्था केली व ते विमान सायकांळी 6-00 वाजताचे होते. जेंव्हा तक्रारकर्ती नागपूर विमानतळावर पोहचली तेंव्हा ज्या विमानात तक्रारकर्तीची व्यवस्था केली होती ते विमान 6-00 वाजता निघून गेले होते. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, विरुध्दपक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्तीला प्रवास सेवेत झालेल्या बदलाबाबत कोणतीही सुचना दिली नाही. तसेच विरुध्दपक्ष क्र.2 यांनी सदरच्या झालेल्या बदलाबाबत पुराव्यानिशी तक्रारकर्तीला कळविल्याबाबतचे कोणतेही दस्ताऐवज किंवा मॅसेजची प्रत अभिलेखावर दाखल केलेली नाही. उलट, विरुध्दपक्ष क्र.2 यांनी आपल्या उत्तरात असे नमूद केले की, प्रवासाचे कोणत्याही चुकीमुळे विमान चुकले तर आम्हीं प्रर्यायी व्यवस्था कशी करता येईल याचा सल्ला देतो व त्यामुळे त्यांनी तक्रारकर्तीला नागपूर ते पूणे जावून पुण्यातून टॅक्सीतून प्रवास करुन मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठा असा सल्ला दिला. याप्रमाणे दिलेला सल्ला हा सर्व साधारण आहे. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, विरुध्दपक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्ती व तिच्या बाळाला झालेल्या गैरसोयीचे कोणतीच तसदी घेतली नाही व ही बाब स्पष्ट होते की, विरुध्दपक्ष क्र.2 हे झालेल्या गैरसोयीस जबाबदार आहे, असे मंचास वाटते.
11. तक्रारकर्ता यांनी सदरच्या प्रकरणात मा.सर्वोच्च न्यायालय यांचा न्यायनिवाडा दाखल केलेला असून (2000) 5 Supreme Court Cases 294 यात मा. सर्वोच्च न्यायालयाने ही बाब नमूद केली आहे की, दोन्ही पक्षामध्ये करारनाम्यात आरबीट्रेशन अॅक्ट 1940 च्या माध्यमातून होणारे तंटे सोडविले जातील अशी करारनाम्यात अट जरी असेल तरीसुध्दा प्रकरणात वादीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या अंतर्गत दावा मंचात चालविला तर तो दावा मंचाने चालविण्याचा पुरेपूर अधिकार मंचाला आहे. तसेच तक्रारकर्त्याला/वादीला मंचात न्याय मागण्याचा अधिकार वंचीत होऊ शकत नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष यांनी आपल्या आक्षेपार्ह नमूद केलेली बाब की, सदर मंचाला हा दावा चालविण्याचे अधिकार नाही, ही बाब खोडून काढते.
12. तसेच विरुध्दपक्ष क्र.1 ही ग्राहकांना टिकीट पुरविणारी कंपनी असून त्याचा संपूर्ण व्यवहार इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन केला जातो व तक्रारकर्तीला व तिच्या मागणी प्रमाणे तिला टिकीट पुरविले, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.1 तक्रारकर्तीला सेवेत ञुटी पुरविली आहे, ही बाब सिध्द होत नाही. विरुध्दपक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्तीला सेवेत ञुटी दिल्याचे सिध्द होते. करीता गैरसोयी, शारिरीक व मानसिक ञासापोटी झालेल्या नुकसानीला विरुध्दपक्ष क्र.2 जबाबदार आहेत.
सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्र.2 यांना आदेशीत करण्यात येते की, तक्रारकर्ता यांना झालेलया गैरसोय, शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 50,000/- द्यावे.
(3) विरुध्दपक्ष क्र.1 यांना तक्रारीतून वगळण्यात येते.
(4) तसेच, विरुध्दपक्ष क्र.2 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या चुकीमुळे व गैरव्यवस्थेमुळे तक्रारकर्ता क्रमांक 3 यांना वेळेवर मुंबई प्रवासाचे टिकीटाचे भाडे घेण्यात आलेल्या मुंबई प्रवास टिकीटाचे भाडे रुपये 13,362/- द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह आदेश दिनांकापासून परत करावे.
(5) विरुध्दपक्ष क्र.2 यांना आदेशीत करण्यात येते की, शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 25,000/- व तक्रार खर्च म्हणून रुपये 20,000/- द्यावे.
(6) उभय पक्षाने आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आंत करावे.
(7) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 10/11/2016