::: नि का ल प ञ :::
(मंचाचे निर्णयान्वये,श्री. मिलींद बी. पवार(हिरुगडे), मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक: 20.07.2013)
1. त.क.ने ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये सदर तक्रार दाखल केली आहे. तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
2. त.क.यांनी महेन्द्र स्कॉर्पीओ गाडी क्रं. एम.एच. 31 सी.पी. 9275 ही स्वतःच्या वैयक्तिक कामाकरिता दि. 10.12.2007 रोजी खरेदी केली होती व या गाडीचा विमा वि.प. 2 यांच्याकडून काढण्यात आला होता. सदर वाहनाचा पॉलिसी क्रं. 215034/31/11/000370 हा असून त्याचा कालावधी दि. 04.05.2010 ते 03.05.2011 पर्यंत होता. सदर वाहनाचा विमा कालावधीतच म्हणजे दि. 26.06.2010 रोजी अपघात झाला व याबाबत त.क. यांनी वि.प.1 व 2 यांना त्वरित कळविले. सदर घटनेची माहिती पोलिस स्टेशन गिरड, जि. वर्धा येथे देखील देण्यात आली, त्याप्रमाणे घटनास्थळावर पोलिस पंचनामा देखील करण्यात आला.
वि.प.2 यांनी प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करिता सर्व्हेअर, श्री. धनंजय एकरे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यांनी घटनास्थळावर येवून गाडीची पाहणी केली व त्यानंतरच सदर गाडी नॅशनल कार केअर गॅरेज, कापसी, भंडारा रोड, नागपूर येथे दुरुस्तीकरिता पाठविण्यात आली. वाहनाच्या दुरुस्तीकरिता वि.प. यांनी तसेच सर्व्हेअर यांनी दुरुस्तीचे अंदाजपत्रक मागितले, त्यानुसार दि. 2.7.2010 रोजी नॅशनल कार केअर गॅरेज यांनी रु.5,12,112/- रुपयाचे अंदाजपत्रक दिले. सदर अंदाजपत्रक गाडीच्या क्लेम फॉर्मसह व इतर आवश्यक कागदपत्रासह सर्व्हेअर यांच्याकडे दिले. त्यानुसार सर्व्हेअर यांनी त्यांचा सर्व्हे रिपोर्ट दि. 19.3.2011 रोजी वि.प. ला दिला तसेच त्यासोबत त.क.चा विमा दाव्याचे कागदपत्र देखील वि.प. कडे पाठविल्याचे सांगितले.
त.क. यांना गाडी दुरुस्तीकरिता रु.3,07,955/- एवढा खर्च आला व तो त.क.यांनी नॅशनल कार केअर यांनी दिलेल्या पावत्या व इनव्हाईस नुसार अदा केला. वि.प. चे सर्व्हेअर श्री.एकरे यांच्या सर्व्हे रिपोर्टप्रमाणे गाडी दुरुस्तीकरिता रु.2,42,800/- एवढा खर्च आला.
त.क. यांनी विमा क्लेम मिळण्याबाबत वि.प. 1 व 2 यांच्याकडे वारंवांर चौकशी केली व मागणी करुन ही वि.प. यांनी त.क.ला विमा क्लेम दिला नाही. वि.प. यांनी त.क.च्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे दि. 21.10.2011 रजि. नोटीस पाठविली. सदर नोटीस प्राप्त होऊन ही वि.प. 1 ते 3 यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचात दाखल करावी लागली. त.क. ने आपल्या तक्रारीत वाहन दुरुस्तीसाठी आलेला खर्च रु.3,07,955 व वरील व्याज अपघातग्रस्त वाहन ओढून आण्याचा खर्च, मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान तसेच तक्रार अर्जाचा खर्च इत्यादी. ची मागणी केली आहे. त.क. ने आपल्या तक्रार अर्जासोबत नि. 4 वर एकूण 9 कागदपत्रे दाखल केली आहेत.
3 प्रस्तुतची तक्रार पंजीबध्द करुन वि.प. 1 व 3 यांना नोटीस काढण्यात आल्या.
त्याप्रमाणे वि.प. 1 ते 3 हे आपल्या वकिला मार्फत हजर झाले व नि.क्रं.15 वर इंग्रजी मध्ये आपले लेखी म्हणणे दाखल केले व नि.क्र.16 वर मराठीत अनुवाद करुन लेखी म्हणणे दाखल केले. वि.प. यांने त.क. यांचे विमा पॉलिसी फक्त मान्य करुन तक्रारी मधील इतर विपरीत विधाने अमान्य केली आहे.
4 वि.प. यांचे लेखी म्हणण्यानुसार त.क.ची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याला धरुन नाही. वि.प.यांनी धनजय एकरे यांची सर्व्हेअर म्हणून नियुक्ती केली होती. वि.प.यांना दि.15.10.2010 ,दि. 19.11.2010 व दि. 26.11.2010 रोजी त.क. यांना स्मरण पत्रे पाठवून सुध्दा वाहन दुरुस्तीसाठी पाठविले नाही. त्यामुळे त.क. हे वि.प. क्लेम स्विकारण्यास इच्छूक नाहीत म्हणून सदरची फाईल बंद केली. त्यानंतर त.क. यांनी वि.प.यांचे सर्व्हेअर यांच्याशी संपर्क साधून अपघाती वाहनाचा सर्व्हे केला. दि. 19.03.2011 रोजी सर्व्हे रिपोर्ट दिला. त.क. यांनी वि.प.यांचे सर्व्हेअर यांच्याशी हात मिळवणी केलेली आहे. अपघातग्रस्त वाहनाचा सर्व्हे न करता दुस-याच वाहनाचा सर्व्हे केलेला आहे. सदर रिपोर्ट ग्राहय नाही कारण सदर सर्व्हे रिपोर्ट फाईल बंद केल्यानंतर झालेला आहे. सदर वाद दिवाणी न्यायालयात चालविण्यास पात्र आहे. वि.प. यांनी परिच्छेद निहाय तक्रारीस उत्तर दाखल करतानां पुढे सदर अपघातग्रस्त गाडीचा विमा उतरविला होता हे मान्य केलेले आहे. वि.प.यांनी त.क. यांना वेळोवेळी पत्रे पाठविली. परंतु त.क. यांनी प्रतिसाद दिला नाही. वि.प.यांनी पुन्हा-पुन्हा त.क. यांनी वि.प. यांचे सर्व्हेअरशी संगनमत केले आहे व अपघात ग्रस्त वाहना ऐवजी दुस-याच्या वाहनाचा तपासणी अहवाल सादर केला आहे असे कथन केले आहे. त.क. यांची तक्रार प्रार्थनेप्रमाणे नाही त्यामुळे ही खारीज करण्यात यावी.
5 वि.प. यांनी आपले लेखी जबाबासोबत नि.क्रं. 23 वर 5 कागदपत्रे दाखल केले आहे. परंतु सदर लेखी जबाब शपथपत्रावर दाखल केले नाही किंवा त्यानंतर पुराव्याचे शपथपत्र सुध्दा दाखल केले नाही व नि. क्रं. 21 वर लेखी जबाब हेच लेखी युक्तिवाद समजण्यात यावा अशी पुरसीस दाखल केली आहे.
6 तक्रारकर्त्याची तक्रार व सोबत दाखल केलेले दस्ताऐवज, पुराव्याचे शपथपत्र तसेच वि.प. यांनी दाखल केलेले म्हणणे व कागदपत्रे या सर्वांचे अवलोकन करुन प्रस्तुत प्रकरण निकालासाठी ठेवण्यात आले.
उभय पक्षांच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद व दाखल लेखी युक्तिवाद याचे अवलोकन करता खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
// कारणे व निष्कर्ष //
7 त.क. यांनी त्यांचे वाहन क्रं. एम.एच.31 सी.पी. 9275 चा विमा वि.प. यांच्याकडून उतरविला होता व तो दि. 04.05.2010 ते 03.05.2011 या कालावधीपर्यंत होता हे नि.क्रं. 4/2 व 4/9 वरील कागदपत्रावरुन दिसून येते. सदर विमा पॉलिसीबाबत त.क. व वि.प. यांच्यामध्ये वाद नाही. त.क. यांच्या तक्रारीनुसार दि. 26.06.2010 रोजी सदर वाहनाचा अपघात झाला होता हे नि.क्रं. 4/3 वरील पोलिस पंचनामावरुन दिसून येते. त्यावेळी त.क. यांनी तात्काळ वि.प.यांना याबाबत कळविले. त्याप्रमाणे अपघात ग्रस्त वाहनाचा सर्व्हे करण्याकरिता वि.प. यांनी धनंजय एकरे सर्व्हेअर यांची नेमणूक केली व त्यानंतर सर्व्हेअर श्री. एकरे यांनी सदर वाहनाची पाहणी केली व त्यानंतर सदर वाहन नॅशनल कार केअर गॅरेज येथे दुरुस्तीसाठी पाठविले व त्या अपघातग्रस्त वाहनाचे दुरुस्तीचे इन्स्टीमेट रु.5,12,112/- चे काढले हे नि.क्रं. 4/4 वरुन दिसून येते. त्यानंतर त.क. यांनी वेळोवेळी सदर नॅशनल कार केअर या वर्कशॉपला जाऊन वाहनाची दुरुस्ती होईल त्याप्रमाणे स्वतः टप्याटप्याने पैसे अदा केले हे नि.क्रं. 4/5 वरील एकूण 16 पावत्यावरुन दिसून येते. त्यानंतर त.क. यांनी वि.प. यांचे सर्व्हेअर श्री. एकरे यांना सदर वाहन दुरुस्त झाल्यानंतर कळविले. त्याप्रमाणे सर्व्हेअर श्री. एकरे यांनी सदर वाहनाची पाहणी केली व दि. 19.03.2011 रोजी वि.प. यांच्याकडे रिपोर्ट दिला.परंतु वि.प. यांचे लेखी जबाबानुसार सदर वाहनाचे अपघातानंतर वाहन दुरुस्तीसाठी त.क.यांनी आणले नाही म्हणून दि. 15.10.2011 , दि. 19.11.2010 व दि. 26.11.2010 रोजी वेळोवेळी त.क. यांना पत्र पाठविले व वाहन दुरुस्त करुन घेण्यास सांगितले. सदर पत्र नि.क्रं. 20 वर अ.क्रं. 1 ते 3 दाखल केले आहे. तरीही त.क. यांनी दखल केली नाही. मात्र सदर वि.प.यांनी त.क. यांना नि.क्रं. 20 प्रमाणे पाठविलेले पत्रे पोहचल्याबाबतच्या पोच-पावत्या प्रस्तत प्रकरणी दाखल केलेल्या नाहीत. त्यामुळे सदर पत्र व्यवहार झाला होता हे वि.प. यांचे कथन विश्वासाहार्थ वाटत नाही. कारण त.क. यांनी नि.क्रं. 4/5 वर एकूण 16 पावत्या दाखल केलेल्या आहेत त्यावरुन वेळोवेळी वाहन दुरुस्त होईल तसे वर्कशॉपला पैसे अदा केले असल्याचे दिसून येते.
वि.प.यांचे म्हणण्यानुसार त.क. यांचा विमा क्लेम फाईल बंद केल्यानंतर त.क. यांनी वि.प.यांचे सर्व्हेअर यांच्याशी संगणमत करुन सर्व्हे करुन रिपोर्ट दाखल केला आहे. मात्र सदर क्लेम फाईल बंद केल्याबाबत त.क. यांना पाठविलेली नोटीस त.क. ला मिळाल्याबाबतचा पुरावा या प्रकरणी वि.प.यांनी दाखल केलेला नाही. तसेच वि.प. यांचा आक्षेप त.क. यांनी वि.प. यांच्या सर्व्हेअर यांच्याशी संगणमत केल्याचा आरोप सुध्दा विश्वासाहार्य नाही. कारण सर्व्हेअर हा वि.प. यांनी नेमलेला होता व जो सर्व्हे सर्व्हेअर यांनी केला तो वि.प. यांचे आदेशाप्रमाणेच केला असल्याचे कागदपत्रावरुन दिसून येते. याबाबत नि.क्रं. 23/2 वरील सर्व्हेअर यांचे रिपोर्टचे अवलोकन केले असता सर्व्हेअर यांनी त्यांचे रिपोर्ट जो वि.प.चे क्लेम इनचार्ज यांना दिला होता त्यामध्ये ....
Dear Sir, Acting upon the instructions from your office, the undersigned had conducted the Reinspection Survey & above referred LMV (Mahindra Scorpio) at, Repairer’s premises. on dated 17.03.2011असे नमूद आहे. यावरुन सर्व्हेअर श्री. एकरे यांनी केलेला सर्व्हे हा वि.प. यांचे आदेशाप्रमाणेच झालेला आहे हे दिसून येते. त्यामुळे वि.प. यांचा सर्व्हेअर यांनी अपघातग्रस्त वाहन सोडून दुस-या वाहनाचा सर्व्हे केला आहे व त.क. यांनी वि.प. यांचे सर्व्हेअरशी संगणमत केले हा आक्षेप तथ्यहिन ठरतो. वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणण्या मध्ये वि.प. यांचे सर्व्हेअर यांनी त.क. यांचे वाहनाचे सर्व्हे केले नसून दुस-या वाहनाचे सर्व्हे केले आहे याबाबत पुरावेसाठी फोटो दाखल करीत आहे असे कथन केले आहे. मात्र प्रत्यक्षात प्रस्तुत प्रकरणी एक ही फोटो वि.प. यांनी दाखल केलेले नाही. यावरुन वि.प. हे किती खोटे प्रतिपादन करतात हे स्पष्ट दिसून येते व आपली जबाबदारी टाळण्यासाठी विमा धारकावर कोणत्या प्रकारचे आरोप करतात हे स्पष्ट होते.
वि.प. यांनी त.क. यांच्यावर केवळ खोटे व बिनबुडाचे आरोप केले आहे. प्रस्तुत प्रकरणी वि.प. यांनी त्यांचे दाखल केलेले लेखी म्हणणे हे शपथपत्रावर दिलेले नाही. तसेच आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ पुरावा म्हणून देखील शपथपत्र/प्रतिज्ञापत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे त्यांनी केलेली कथने ही पुराव्याच्या दृष्टीने विश्वासाहार्य वाटत नाही असे या मंचाचे मत आहे.
8 विमा काढण्यासाठी वि.प. यांचे एजंट त.क. यांचे सारखे ग्राहकांचे शोधात असतात. वेगवेगळी आश्वासने व विमा पॉलिसीबद्दल माहिती सांगून ग्राहकांना भूरळ पाडतात व विमा पॉलिसी घेण्यास भाग पाडतात. ग्राहक सुध्दा भविष्याची चिंता यांचा विचार करुन वेळ प्रसंगी विमा उपयोगी पडेल याचा विचार करुन मोठया रक्कमेचा विमा हप्ता भरुन विमा पॉलिसी घेतो. परंतु ज्यावेळी एखादी घटना घडते त्यावेळी त्यांना विमा पॉलिसीचा खूप मोठा आधार वाटतो. मात्र वि.प. सारख्या विमा कंपन्या काही तरी कारणे व सबबी सांगून विमा धारकांना वेठीस धरतात व विमा प्रस्ताव नाकारतात. पर्यायाने विमा धारकांना न्यायालयाचे दार ठोठावे लागते. अशाप्रकारे विमा कंपनीची नितिमुल्य ही लोक कल्याणकारी शासन व्यवस्थमध्ये नक्कीच चुकिची व अन्यायकारक ठरते.हे प्रस्तुत प्रकरणातून दिसून येते. त्यामुळे वि.प. यांनी विमा धारकास दिलेली त्रृटीच्या व दुषित सेवेसाठी नुकसान भरपाई मंजूर करणे न्यायोचित ठरेल असे या मंचास वाटते.
9 प्रस्तुत प्रकरणी त.क. यांना अपघातग्रस्त वाहनाच्या दुरुस्तीकरिता रु.3,07,955/- एवढा खर्च आलेला आहे व तेवढी मागणी वि.प.यांच्याकडून केली आहे. त्यासाठी त.क. यांनी सदर रक्कम नॅशनल कार केअरला अदा केल्याबाबतच्या पावत्या नि.क्रं. 4/5 वरील एकूण 16 पावत्या दाखल केलेल्या आहेत. तसेच वि.प. यांनी नि.क्रं. 23/1 ते 5 वर सर्व्हेअर, श्री. एकरे यांचा रिपोर्ट व कागदपत्रे दाखल केली आहेत. यावरुन सदर वाहनास सर्व्हेअर यांचे रिपोर्टवरुन रु. 2,42,800/- एवढी Net loss Assessed दाखविलेली आहे. व त.क. यांच्या मागणी यामध्ये रु.60,000/- इतक्या रक्कमेचा फरक पडत आहे. परंतु त.क. यांनी सदर खर्च स्वतः केलेला असला तरी ही सर्व्हेअर यांचे रिपोर्ट प्रमाणे खर्च साधारणपणे रु.2,50,000/- मंजूर करणे योग्य ठरेल असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
10 त.क. यांनी आपला विमा क्लेम मिळविण्यासाठी वकिलामार्फत वि.प.यांना नोटीस पाठविली हे नि.क्रं. 4/7 वरील नोटीसवरुन दिसून येते. तरीही त्यास वि.प.यांनी कोणतेही उत्तर दिले नाही व उलटपक्षी कागदपत्रे पुरविली नाही म्हणून त.क. यांचा विमा प्रस्ताव नाकारला यावरुन वि.प.यांची ग्राहकांबद्दलची नकारात्मक मानसिकता स्पष्ट दिसून येते. यावरुन त.क. हे आपल्या न्याय हक्कासाठी व विमा रक्कम मिळविण्यासाठी किती झगडत आहेत हे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे त.क. यांचे वाहन दुरुस्तीला आलेला खर्च रु.2,50,000/- व त्यावर तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे 10% दराने व्याज देणे न्यायोचित ठरेल असे या वि.मंचास वाटते.
11 त.क. यांनी आपल्या वाहनाचा विमा उतरविला व अपघातानंतर ती विमा रक्कम त्यांना वेळेत उपयोगी पडली नाही. त्यामुळे त्यांना पैश्याची जुळवाजुळव लोकांकडून, नातेवाईंक यांचेकडून उधार उसणवार करुन सदर अपघातग्रस्त गाडी दुरुस्त करावी लागली. एवढेच नव्हेतर सदर अपघात विमा मिळविण्यासाठी वारंवांर वि.प. यांचेकडे हेलपाटे मारावे लागले, वकिलामार्फत नोटीसा पाठवाव्या लागल्या व अखेर वि.मंचात तक्रार दाखल करावी लागली. यावरुन गाडीचा विमा काढूनही त्याच्या उपभोगापासून त.क. यांना वंचित राहावे लागले. त्यामुळे त.क. यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.3000/- त.क. यांना मंजूर करणे योग्य ठरेल असे या मंचास वाटते.
12 एकंदरीत वरील सर्व कारणे व निष्कर्ष यावरुन वि.प. यांनी त.क. यांना सेवा देण्यात न्यूनता केली असल्याचे निर्णयाप्रत हे मंच आलेले असल्याने खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
// आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) वि.प. 1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिरित्या त.क. यांचे वाहन क्रं. MH 31/CP-9275 या वाहनाच्या अपघात विम्याची रक्कम रु.2,50,000/- व सदर रक्कमेवर त.क. ला प्रत्यक्ष रक्कम प्राप्त होईपर्यंत त्यावर तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 10% दराने व्याज अदा करावे..
(3) वि.प. 1 ते 3 यांनी त.क. यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 3000/- अदा करावे.
(4) वरील आदेशाची अंमलबजावणी वि.प. 1 ते 3 यांनी आदेश पारित तारखेपासून 30 दिवसाच्या आत करावी. अन्यथा उपरोक्त कलम-2 नमूद केलेल्या देय रक्कमेवर द.सा.द.शे. 10% ऐवजी 12% दराने व्याज अदा करावे.
(5) आदेशाची प्रत संबंधितानां पाठविण्यात यावी.