(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 31.10.2011) अर्जदार यांनी सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये तक्रार दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 1. अर्जदार क्र.1 ही अर्जदार क्र.2 ची पत्नी आहे. अर्जदारांना 1 मुलगा व दुसरी मुलगी आहे. अर्जदार क्र.2 हा घर बांधकामाचे ठेके घेवून त्या उत्पन्नावर आपल्या कुंटूंबाचा उदरनिर्वाह करतो. अर्जदार यांनी राष्ट्रीय कुंटूंब कल्याण कार्यक्रमा अंतर्गत स्ञी-नसबंदी शस्ञक्रिया दि.23.9.2008 रोजी उप-जिल्हा रुग्णालय, वरोरा येथे गै.अ.क्र.2 ने केले. अर्जदार हे सुशिक्षीत असल्यामुळे ‘’छोटे कुंटूंब सुखी कुंटूंब’’ ह्या संज्ञेखाली पुढील भविष्यातील जिवनाचा व मुलाबाळाच्या शिक्षणाचा विचार करुन, भारत सरकारचा व महाराष्ट्र सरकारच्या कुंटूंब कल्याण योजनेअंतर्गंत स्ञी नसबंदी दि.23.9.2008 ला केले. उप-जिल्हा रुग्णालय, वरोरा यांचेकडून प्रमाणपञ क्र.245 अर्जदारांनी सरकारच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांनी दिले. स्ञी नसबंदी झाल्यानंतर अर्जदार क्र.1 ची मासीक पाळी आली नाही, म्हणून दि.7.1.09 रोजी उप-जिल्हा रुग्णालय, वरोरा येथे जावून तिने बाह्यरुग्ण विभागाची पञिका क्र.985 काढून, तीने गर्भधारणे संबंधाने लघवीची तपासणी करुन घेतली असता, ती गरोदर असल्याचे आढळून आले. त्यादिवशी दुपारी 12.00 ते 12.30 वाजता दरम्यान तिची स्ञी नसंबंदी शस्ञक्रिया करणारे डॉक्टर, गै.अ.क्र.2 यांना भेटली. त्यावेळी, गै.अ.क्र.2 ने लघवीचा मुळ रिपोर्ट कुंटूंब नियोजनाचे मुळ पञ क्र.245 घेवून तिला चेंबरमध्ये एकटीला बोलावले व तिला तपासून त्याचदिवशी स्वतः जवळची 1 गोळी देवून स्वतःच्या बॉटलमधील पाणी ग्लासात दिले व स्वतः त्यांनी पाणी पाजले. तसेच, त्यांनी को-या कागदावर अर्जदार क्र.1 ची सही करुन घेतली. उपरोक्त दस्ताऐवज स्वतःजवळ ठेवून अर्जदार क्र.1 हिला दि.9.1.09 रोजी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे भेटण्यास सांगितले. दि.9.1.2009 रोजी 11.00 वाजता दोघेही उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे जावून गै.अ.क्र.2 ला भेटले, तेंव्हा त्यांनी ‘’स्वतः जवळचे रुपये 5000/- देतो, तक्रार करु नका व पुन्हा चेकअप करुन गोळ्या देतो म्हणाले.’’ गै.अ.क्र.2 ने दि.7.1.09 ला दिलेल्या गोळीमुळे तिला रक्तस्ञाव दि.10.1.09 नंतर सुरु झाला. अर्जदारांना कळून चुकले की, स्ञी नसबंदी करतांना गै.अ.क्र.2 ने निष्काळजीपणा केला म्हणून ती गरोदर राहीली. 2. अर्जदारांनी दि.12.1.09 ला वैद्यकीय अधिक्षक, वरोरा यांचेकडे तक्रार अर्ज दिला. दि.17.1.09 ला पोलीस स्टेशन वरोरा येथे रिपोर्ट दिली. त्यासंबंधाने, गै.अ.क्र.1 ने चौकशी करीता, चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात त्यांचे कार्यालयीन पञ दि.16.3.09 अन्वये दि..21.3.09 रोजी हजर राहण्यास सांगितले. दि.21.3.09 ला अर्जदार क्र.1 व 2 चे बयान सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे गै.अ.क्र.1 यांनी नोंद केले व अर्जदार क्र.1 ची शारीरीक निदान करुन दि.7.1.09 ला गै.अ.क्र.2 ने दिलेल्या गोळीमुळे गर्भपिशवीला सुजन आल्याचे सांगितले. अर्जदार क्र.1 ला शारीरीक खुप ञास सुरु झाला, म्हणून अर्जदार क्र.1 ही डॉ.चांडक, वरोरा यांचे दि.24.5.09 पासून नोव्हेंबर 09 पर्यंत औषोधोपचार घेतले व सोनोग्राफी सुध्दा केली, परंतु तिला कोणताही आराम झाला नाही. त्यामुळे, ती डॉ.मानवटकर, चंद्रपूर यांचे दवाखान्यात फेब्रूवारी 2010 मध्ये तपासणी केली असता, गर्भपिशवीवर सुजन आल्याचे सांगण्यात आले व एक महिन्याचा औषधोपचार केला, तरीही तिला फायदा झाला नाही. त्यामुळे, तिने डॉ.राजलक्ष्मी यांच्या दवाखान्यात जावून तपासणी केली असता, त्यांनी सुध्दा गर्भपिशवीवर सुजन आल्याचे सांगितले व गर्भशयातील पाण्याची बॉटलमध्ये सॅन्पल घेऊन डॉ.अल्लुरवार यांच्याकडे पाठविले. डॉ.अल्लुरवार यांनी तपासणी करुन दि.16.12.2010 ला रिपोर्ट दिला. 3. गै.अ.क्र.2 ने स्वतः, अर्जदार क्र.1 ची स्ञी नसबंदी शस्ञक्रिया दि.23.9.08 रोजी केली, ती निष्काळजीपणे केली गेली व यशस्वी झाली नाही. त्याचा परिणाम अर्जदार क्र.1 व 2 ला भोगावा लागत आहे. त्यामुळे, तिला 7 जानेवारी 09 पासून मानसिक, शारीरीक, आर्थिक, वेदना व हाणी सहन करावे लागत आहे. एवढेच नव्हेतर समाजात बदनामी होऊन अर्जदारांना मानसिक तणाव निर्माण झाला. गै.अ.क्र.1 व 2 ने अर्जदाराला वैद्यकीय निष्काळजीपणा करुन अर्जदारांची भरुन न निघणारे नुकसान केले. त्यामुळे, अर्जदार क्र.1 व 2 यांनी नुकसान भरपाई म्हणून औषधोपचार व प्रवास खर्च रुपये 50,000/-, मानसिक व शारीरीक यातना रुपये 3,00,000/- व बदनामी झाल्याबाबत नुकसान रुपये 3,00,000/- असे एकूण रुपये 6,50,000/- नुकसान भरपाईसाठी गै.अ.क्र.1 व 2 पूर्णतः जबाबदार असून 3 रे अपत्य पोसण्याची व शिक्षणाची, उदर निर्वाहाची, वैद्यकीय उपचाराची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे, तसेच सरकारने सदर खर्चाची जबाबदारी पूर्णतः स्विकारावी, अशी मागणी केली. तसेच, सरकारी नोटीफ्रिकेशन अन्वये 3 रे अपत्य झाल्यामुळे अर्जदारांना शासकीय नोटीफ्रिकशन योजनेअन्वये मिळणारे फायद्यापासून वंचीत झाल्यामुळे पुढील आयुष्याची हाणी झाली ती नुकसान भरपाई रुपये 10,00,000/- सरकारने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा. अर्जदार क्र.1 ही 5 महिन्याची गरोदर आहे व जन्मास येणा-या बाळाची संपूर्ण शिक्षणाची, पालनपोषणाची, उदरनिर्वाहाची वैद्यकीय सेवेची संपूर्ण मदत सरकारने वेळोवेळी अर्जदाराचे कुंटूंबाना दरमहा करावी असा आदेश व्हावा व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- गैरअर्जदारांवर लादण्यात यावा, अशी प्रार्थना केली आहे. 4. अर्जदारांनी नि.4 नुसार 47 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आले. गै.अ.क्र.1 हजर होऊन नि.16 नुसार लेखी उत्तर व सोबत 2 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. गै.अ.क्र.2 हजर होऊन नि.18 नुसार लेखी उत्तर व सोबत 8 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. 5. गै.अ.क्र.1 ने लेखी बयानात नमूद केले की, यात वाद नाही की, अर्जदार क्र.1 हीने दि.23.9.2008 रोजी उप-जिल्हा रुग्णालय, वरोरा येथे गै.अ.क्र.2 कडून राष्ट्रीय कुंटूंब कल्याण कार्यक्रम अंतर्गत स्ञी नसबंदी शस्ञक्रिया करुन घेतली होती. यात वाद नाही की, उपजिल्हा रुग्णालय, वरोरा यांचेकडून प्रमाणपञ क्र.245 अर्जदार बाईला दिले. हे म्हणणे कबूल आहे की, गै.अ.क्र.1 यांनी चौकशी करीता, चंद्रपूर रुग्णालय त्यांचे कार्यालयीन पञ दि.16.3.09 अन्वये दि.21.3.2009 रोजी हजर राहण्यास सांगितले. परंतु, हे म्हणणे नाकबूल आहे की, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे गै.अ.क्र.1 यांनी अर्जदारांचे बयान नोंद करुन घेतले. हे म्हणणे खोटे असल्यामुळे नाकबूल आहे की, अर्जदार क्र.1 चे शारीरीक निदान करुन दि.7.1.2009 ला गै.अ.क्र.2 ने दिलेल्या गोळीमुळे गर्भपिशवीला सुजन आल्याचे सांगितले. वास्तविक, अर्जदार हे चौकशीला बोलावून सुध्दा आले नाहीत. अर्जदाराला सदरहू तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारणा घडलेले नाही. मंचापुढे तक्रार चालू शकत नाही.
6. गै.अ.क्र.1 ने लेखी बयानातील विशेष कथनात नमूद केले की, कुंटूंब कल्याण कार्यक्रम हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम वाढत्या लोकसंख्येवर आळा व लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढू नये, म्हणून वेळोवेळी शासनाच्या निर्देशानुसार शासन अधिनस्त यंञणेकडून राबविण्यात येते. लोकसंख्या कमी करण्याचा उदात हेतू असा आहे की, त्यामुळे सामान्य नागरीकांचा सर्वांगीण विकास होईल. गै.अ.क्र.2 हे स्ञीरोग तज्ञ आहेत, त्यांनी एम.बी.बी.एस., डी.जी.ओ. ही शैक्षणीक अर्हता धारण केलेली आहे. त्यांचेकरवी, अर्जदार क्र.1 ची दि.23.9.2008 रोजी स्ञी नसबंदी शस्ञक्रिया करण्यांत आली. ही नसबंदी शस्ञक्रिया करण्यापूर्वी लाभार्थी अर्जदार क्र.1 कडून परिशिष्ठ 4 मध्ये तिने समंती व प्रतिज्ञापञक स्वमर्जीने व स्वईच्छेने भरुन दिलेले आहे व त्यावर सही आहे. अर्जदाराची शस्ञक्रिया अयशस्वी झाल्यानंतर अर्जदाराचा गर्भपात करुन दुस-यांदा नसबंदी शस्ञक्रिया करण्यास प्रवृत्त केले आहे, परंतु अर्जदार दुस-यांदा नसबंदी शस्ञक्रिया मोफत करुन घेण्यास तयार नव्हती, म्हणून गै.अ.क्र.2 नी जाणीवपूर्वक अर्जदाराची अयशस्वी नसबंदी शस्ञक्रिया केली, हे स्पष्ट होत नाही. गै.अ.क्र.2 यांनी अर्जदाराची नसबंदी शस्ञक्रिया निशुल्क करुन देण्याचे सांगितल्यावरही अर्जदार नसबंदी शस्ञक्रिया करण्यास तयार नव्हती. म्हणून अर्जदार नुकसान भरपाई किंवा अयशस्वी नसबंदी शस्ञक्रियेचा मोबदला मिळण्यास पाञ ठरु शकत नाही.
7. गै.अ.क्र.2 ने लेखी बयानात नमूद केले की, लघवीच्या तपासणीव्दारे होणारे निदान गर्भधारणेचे अचूक निदान नसते. सोनोग्राफी व्दारे होणारे निदान हे अचूक व अंतिम असते. त्यामुळे, गै.अ.क्र.2 सारख्या अनुभवी स्ञीरोग तज्ञाने केवळ लघवी तपासणी अहवालावर विसंबून कोणताही उपचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे अमान्य आहे की, स्ञी नसबंदी करतांना गै.अ.क्र.2 ने निष्काळजीपणा केला. गै.अ.क्र.2 सारख्या जेष्ठ आणि प्रतिष्ठीत डॉक्टरवार असे बिनबुडाचे बेछूट, बेजबाबदार आणि बदनामीकारक आरोप करण्याचे धाडस अर्जदारांनी करावे, ही दुर्दैवी बाब आहे. अर्जदार क्र.1 ने पाठविलेल्या दि.25.3.11 च्या नोटीसाचे समर्पक आणि मुद्देसूद उत्तर गै.अ.क्र.2 ने आपले वकील श्री प्रसन्न राठी, नागपूर यांचेमार्फत पाठविले. परंतु, अर्जदारांनी सदर उत्तराचा तक्रारीत उल्लेख केला नाही. तक्रार अर्ज सादर करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. दि.7.1.09 च्या लघवी तपासणीत अर्जदार क्र.1 गरोदर असल्याचे निष्पन्न झाले, ही बाब यापूर्वीच गै.अ.क्र.2 ने नाकारली आहे. त्यादिवशी गै.अ.क्र.2 ने अर्जदार क्र.1 ला कोणतीच गोळी दिली नाही. गै.अ.क्र.2 ने कोणताही निष्काळजीपणा केला नाही. त्याने अर्जदार क्र.1 ची कुंटूंब नियोजन शस्ञक्रिया केलीच नाही. गै.अ. कोणतीही नुकसान भरपाई देण्यास पाञ नाहीत. अर्जदारांच्या औषधोपचाराचा व प्रवासाचा खर्चा बाबतचा मजकूर अवास्तव व चुकीचा आहे. नुकसान भरपाईसाठी गै.अ.क्र.1 व 2 जबाबदार आहेत, हे अमान्य आहे. गै.अ.क्र.2 ची कोणतीच चुक निष्काळजीपणा किंवा सेवेत न्युनता झालेली नाही.
8. गै.अ.क्र.2 ने लेखी बयानातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदार हे गै.अ.क्र.1 किंवा 2 चे ग्राहक नाहीत. अर्जदारांनी, गै.अ.क्र.1 किंवा 2 यांना कोणताही मोबदला दिलेला नाही. दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठीच्या सवलतीचा फायदा घेवून शासकीय योजनेचा लाभ मिळविण्याच्या दृष्टीने विनामुल्य सेवाचा लाभ त्यांनी घेतला आहे. त्यामुळे, उप-जिल्हा रुग्णालयाने अर्जदारास दिलेली सेवा ही ग्राहक संरक्षण अधिनियमाच्या कक्षेबाहेर आहे. सबब तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. गै.अ.क्र. 2 ने 1982 साली एमबीबीएस ची पदवी प्राप्त केली व 1984 पासून तो वैद्यकीय सेवेत आहे. 1986 साली त्याने प्रसुतिविज्ञान आणि स्ञीरोगशास्ञ यांचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. एवढेच नव्हेतर 2000 मध्ये गै.अ.क्र.2 ने नागपूर विद्यापिठाच्या पदव्युत्तर विभागाकडून प्रसुतिविज्ञान आणि स्ञीरोगशास्ञ या विषयांचा एक वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करुन विद्यापिठाची सदर विषयातील पदव्युत्तर पदविका परिक्षा उत्तीर्ण होवून पदविका (डी.जी.ओ.) मिळविली आहे. स्ञीरोगशास्ञ हे मान्य करते की, सरासरी 0.4 % स्ञी नसबंदी शस्ञक्रिया अयशस्वी होतात. म्हणूनच कोणत्याही व्यक्तिंची नसबंदी शस्ञक्रिया करण्यापूर्वी शासनाने नेमलेल्या मतपरिर्तका मार्फत संततिप्रतिबंधनाच्या सर्व साधनांच्या असफलतेची पूर्णपणे कल्पना देण्यात येते. त्याशिवाय, एक छापील संमती व प्रतिज्ञापञ वाचून दाखविले जाते आणि तिने समजून घेतल्यावर तिची सही प्रतिज्ञापञावर घेतली जाते. या नियमानुसार अर्जदार क्र.1 वर दि.23.9.2008 रोजी स्ञी नसबंदी शस्ञक्रिया करण्यापूर्वी मतपरिर्तका रत्नमाला ढोले यांनी समजावून देवून अर्जदार क्र.1 ने वाचून घेवून प्रतिज्ञापञावर सही करुन दिली आहे. गै.अ.क्र.2 ने अर्जदार क्र.1 वर पोटावरुन होणा-या “MODIFIED POMEROY’S METHOD” वापरुन निर्बिजीकरण म्हणजे नसबंदी शस्ञक्रिया केली. गै.अ.क्र.2 ने, व्यावसायीक ज्ञान, आणि स्ञी नसबंदी शस्ञक्रियांचा 25 वर्षाचा अनुभव याचा यथायोग्य उपयोग करुन अत्यंत काळजीपूर्वक आपले कर्तव्य बजावीत शस्ञक्रिया केली. तरी ही अपवादात्मक परिस्थितीत नसबंदी शस्ञक्रिया अयशस्वी होवू शकते. याच कारणास्तव शासनाने अशा प्रकरणात मोफत गर्भपात करुन देण्याची तरतूद केली आहे. अर्जदारांच्या म्हणण्यासप्रमाणे अर्जदार क्र.1 ला डिसेंबर 2010 मध्ये गर्भ राहिला. यदाकदाचीत गर्भ राहिला असला तरी प्रतिज्ञापञाप्रमाणे अर्जदारांनी 15 दिवसांच्या आत तिचा गर्भपात करवून घ्यावयास हवा होता. परंतु, अर्जदारांनी प्रतिज्ञापञातील सर्वच संबंधीत अटींचा भंग केला. त्यामुळे, गै.अ.क्र.1 व 2 कोणत्याही परिणामांना जबाबदार नाहीत. अशा परिस्थितीत, गै.अ.क्र.1 व 2 नुकसान भरपाई किंवा खर्च भरुन देण्यास जबाबदार नाही. गै.अ.क्र.2 ने दि.6.2.2010 ते 5.2.2011 या दरम्यान वैध असलेल्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची हानिरक्षण विमा पॉलिसी क्र.230200/46/09/35/00001468 अन्वये हानिरक्षण विमा काढलेला आहे. गै.अ.क्र.2 ने नुकसान भरपाई रक्कम भरण्याचा आदेश झालाच तर रक्कम सदर विमा कंपनीकडून देय होईल. त्यामुळे, नैसर्गीक न्यायच्या तत्वानुसार या प्रकरणात विमा कंपनीचे म्हणणे मांडण्याची संधी देणे आवश्यक आहे. या प्रकरणात विनाकारण गैरअर्जदारांवर बेछूटपणे अवास्तव आणि बिनबुडाचे बदनामीकारक आरोप करुन केलेली प्रस्तूत तक्रार रुपये 25,000/- नुकसान भरपाई खर्चासह खारीज करण्यात यावे, अशी विनंती केली आहे. 9. अर्जदाराने नि.23 नुसार शपथपञ व नि.24 नुसार 4 व नि.35 सोबतचे यादीन्वये 4 दस्ताऐवज दाखल केले. तसेच, नि.26 नुसार अर्जदार क्र.2 ने शपथपञ व नि.27 नुसार 3 दस्ताऐवज दाखल केले. गै.अ.क्र.2 ने नि.29 नुसार 4 व नि.32 नुसार 2 दस्ताऐवज दाखल केले, त्यामध्ये गै.अ.क्र.2 चे शपथपञ दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदारांनी दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ व उभय पक्षाच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे : उत्तर
1) अर्जदार हे गैरअर्जदारांचे ग्राहक होतात काय ? : होय. 2) गै.अ.क्र.2 यांनी दि.23.9.08 ला अर्जदार क्र.1 ची स्ञी : नाही. नसबंदी शस्ञक्रिया करण्यात वैद्यकीय निष्काळजीपणा केला आहे काय ? 3) गै.अ.क्र.1 व 2 यांनी सेवा देण्यात न्युनता केली : नाही. आहे काय ? 4) गै.अ.क्र.1 व 2 अर्जदारांना नुकसान भरपाई अाणि जन्मास : नाही. आलेल्या 3 रे आपत्याकरीता नुकसान भरपाई देण्यास पाञ आहेत काय ? 5) तक्रार मंजूर करण्यांस पाञ आहे काय ? : नाही. 6) या तक्रारीचा अंतिम निकाल काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे // कारण मिमांसा // मुद्दा क्र. 1 : 10. अर्जदार क्र.1 व 2 हे पती-पत्नी असून मौजा वरोरा येथील रहिवासी आहेत. गै.अ.क्र.1 च्या अधिपत्याखाली गै.अ.क्र.2 उप-जिल्हा रुग्णालय, वरोरा येथे प्रसुती विज्ञान आणि स्ञीरोगशास्ञ तज्ञ डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. अर्जदार क्र.1 ची स्ञी नसबंदी शस्ञक्रिया राष्ट्रीय कुंटूंब कल्याण कार्यक्रमा अंतर्गत दिनांक 23.9.08 झाली. अर्जदार क्र.1 ची स्ञी नसबंदी शस्ञक्रिया झालेली असतांनाही गर्भ धारणा झाल्यामुळे गै.अ.क्र.2 ने केलेल्या स्ञी नसबंदी शस्ञक्रिया करण्यांत वैद्यकीय निष्काळजीपणा केला, त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याकरीता आणि झालेल्या मुलाच्या भविष्यात होणा-या शिक्षण आणि पालनपोषनावर होणा-या खर्चाकरीता नुकसान भरपाईची मागणीकरीता ही तक्रार दाखल केलेली आहे. 11. गै.अ. यांनी लेखी उत्तरात असा मुद्दा घेतला आहे की, अर्जदार ही गै.अ.ची ग्राहक नाही. अर्जदारांनी कोणताही मोबदला, गै.अ.ना दिलेला नाही. दारिद्रय रेषेखालील नागरीकांच्या सवलतीचा फायदा घेऊन शासकीय योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने विनामुल्य सेवेचा लाभ त्यांनी घेतला आहे. त्यामुळे, अर्जदार ही ग्राहक या संज्ञेत येत नाही. दिलेली सेवा ही ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत मोडत नाही, या कारणावरुन तक्रार खारीज करण्यांत यावी. गै.अ.यांनी उपस्थित केलेल्या वरील मुद्या संदर्भात अर्जदाराचे वकीलांनी असे सांगितले की, शासकीय रुग्णालय, जरी विनामुल्य सेवा कोणताही मोबदला न घेता देत असले तरी ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत सेवा या सदरात मोडतो, त्यामुळे ही तक्रार या मंचाला चालविण्याचा अधिकार आहे. गै.अ.चे वकीलांनी या कथना पृष्ठयर्थ मा.सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या निकालाचा हवाला दिला. मा.सर्वोच्च न्यायालय यांनी वैद्यकीय सेवा ही ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदी अंतर्गत मोडतो, तसेच विनामुल्य देण्यात येणारी सेवा सुध्दा, सेवा या सदरात ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2(1)(ओ) या अंतर्गत मोडतो, असे मत दिले आहे. इंडियन मेडिकल असोशियन-वि.- व्ही.पी.शांता व इतर, III (1995) CPJ 1 (SC), वरील न्यायनिवाड्यात दिलेले मत या प्रकरणालाही लागू पडते. अर्जदार हीने शासकीय जिल्हा उप रुग्णालयात स्ञी नसबंदी शस्ञक्रिया करुन घेतली आहे, ही बाब गै.अ.क्र.1 व 2 यांनी मान्य केले आहे, त्यामुळे अर्जदार ही ग्राहक संरक्षण कायद्याच्या 2(1)(डी) या ग्राहक या सज्ञेत मोडतो. शासकीय रुग्णालय सेवा देणा-या संस्थे अंतर्गत समावेश होतो, असे मत वरील न्यायनिवाडयातील पॅरा 43, 44 व 55 यामध्ये विस्तृत वर्णन दिले आहे. मा.पंजाब राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, यांनी परमजीत कौर व इतर –वि.-हरियाना सरकार मार्फत सचीव, आरोग्य विभाग व इतर, 2011 (3) CPR 109, या प्रकरणात मा.सर्वोच्च न्यायालयांनी पारीत केलेल्या निकालाचा उल्लेख केलेला आहे. तसेच, राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली यांनी वैद्यकीय सेवा देणारे शासकीय रुग्णालय हे सेवा या परिभाषेत मोडतात, असे मान्य केले आहे. वरील न्यायनिवाड्यात दिलेले मत विचारात घेतले असता, अर्जदार ही ग्राहक या संज्ञेत मोडतो. अर्जदार क्र.1 ही शासकीय रुग्णालयाचा लाभ घेणारी लाभ धारक (Beneficiary) असल्याने, ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदी अंतर्गत अंतर्भाव होतो, त्यामुळे अर्जदार हे गै.अ.क्र.1 व 2 चे ग्राहक आहेत. 12. गै.अ.क्र.2 यांनी असा मुद्दा उपस्थित केला की, अर्जदार क्र.1 चा स्ञी नसबंदी शस्ञक्रिया राष्ट्रीय कुंटूंब कल्याण योजने अंतर्गत विनामुल्य करण्यांत आले. तसेच, शासकीय योजनेनुसार स्ञी नसबंदी शस्ञक्रिया केल्यानंतर रुपये 600 अनुदान देण्यात आले व ते अर्जदार क्र.1 यांनी स्विकारले आहे. गै.अ.यांनी ग्राहक होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला असला तरी, उपलब्ध रेकॉर्डवरुन आणि मा.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे (Law laid down by the Hon’ble Supreme Court in Shiv Ram’s a Case AIR 2005 SC 3250 and V.P. Shantha S Case III (1995) CPJ 1 (SC) ) यात दिलेल्या मतावरुन जरी विनामुल्य सेवा पुरविली असले तरी अर्जदार हे ग्राहक या संज्ञेत येत असून, गै.अ. देत असलेली सेवा ही, सेवा या सदरात मोडत असल्याने, अर्जदार ही गै.अ.ची ग्राहक होतो, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले असल्याने, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे. मुद्दा क्र. 2 ते 4 :
13. अर्जदार क्र.1 ची स्ञी नसबंदी शस्ञक्रिया दि.23.9.08 रोजी करण्यांत आली, ही शस्ञक्रिया स्ञी रोग तज्ञ डॉक्टर गै.अ.क्र.2 यांनी केले आहे. अर्जदार यांचे असे म्हणणे आहे की, गै.अ.क्र.2 यांनी स्ञी नसबंदी शस्ञक्रिया निष्काळजीपणा केली व ती यशस्वी झाली नाही. गै.अ.क्र.2 च्या वैद्यकीय निष्काळजीपणामुळे स्ञी नसबंदी, शस्ञक्रिया अर्जदार क्र.1 ची केलेच नाही व स्ञी नसबंदी झाल्याचे प्रमाणपञ दिले. अर्जदार यांच्या वरील म्हणण्यात तथ्य नाही. अर्जदार क्र.1 ची स्ञी नसबंदी शस्ञक्रिया दि.23.9.08 ला केल्यानंतर गर्भधारणा झाल्याची बाब जिल्हा उप रुग्णालय वरोरा येथे दि.7.1.09 ला लघवीच्या तपासणीत समजले. अर्जदार यांनी, अ-2 वर 7 जानेवारी 2009 च्या कार्डची झेरॉक्सप्रत रेकॉर्डवर दाखल केली आहे, त्यात एलएमपी 26.11.08 असे नमूद केले आहे आणि अडव्हाईसमध्ये युपीटी-पॉझीटीव्ह नमूद केले आहे. अर्जदार क्र.1 हिला मासीक पाळी ही दि.26.11.08 ला आली होती. यावरुन दि.23.9.08 स्ञी नसबंदी शस्ञक्रिया केल्यानंतर पाळी येईपर्यंत अर्जदार हिला कुठलीही गर्भधारणा झाली नाही व नियमीत पाळी आली. त्यामुळे, गै.अ.क्र.2 यांनी अर्जदार हिची स्ञी नसबंदी शस्ञक्रिया केलीच नाही, या अर्जदाराच्या म्हणण्यात काहीही तथ्य नाही. 14. अर्जदारांनी तक्रारीतील परिच्छेत 3 मध्ये असे कथन केले आहे की, अर्जदार दि.7.1.2009 ला दवाखान्यात गेली असता, गै.अ.क्र.2 यांनी आपले जवळील गोळी देवून स्वतःच्या बॉटलमधील पाणी ग्लासात दिले व स्वतः त्यांनी पाणी पाजले. तसेच, त्यांनी एका को-या कागदावर अर्जदार क्र.1 ची सही करुन घेतली व स्वतः जवळ ठेवून घेतले आणि दि.9.1.2009 रोजी भेटण्यास सांगितले. गै.अ.क्र.2 यांनी दिलेल्या गोळीमुळे रक्तस्ञाव 10.1.09 नंतर सुरु झाला. त्यावेळी, अर्जदार क्र.1 व 2 ला कळून चुकले की, स्ञी नसबंदी करतांना, गै.अ.क्र.2 ने निष्काळजीपणा केला म्हणून ती गरोदर राहिली. अर्जदार यांनी या घटनेबाबत, पोलीस स्टेशनला दि.17.1.09 ला तक्रार दिली. तसेच, दि.12.1.09 ला वैद्यकीय अधिक्षक, वरोरा यांचेकडे तक्रार अर्ज दिला. अर्जदार क्र.2 यांनी शपथपञ नि.26 मधील पॅरा 8 मध्ये असे कथन केले की, ‘‘जर गै.अ.नी दि.7.1.09 ला सांगितले असते की, तिचा इंशुरन्स काढलेला असून तिचा गर्भपात करुन घ्यावयास पाहिजे व कायद्यान्वये तिला रुपये 20,000/- मिळेल, तर पुढील बाब उपलब्ध झाल्या नसत्या.’’ यावरुन, असे स्पष्ट होते की, अर्जदारांनी पहिल्यांदा गै.अ.क्र.2 चे विरुध्द अवैध गर्भपाताचा आरोप लावून वैद्यकीय अधिक्षक वरोरा यांना लेखी तक्रार दिली, तसेच पोलीस निरिक्षक वरोरा यांना 17.1.09 ला अवैध गर्भपात केल्याची लेखी तक्रार देवून वर्तमान पञात बातमी प्रकाशीत केली. अशास्थितीत, गै.अ.क्र.2 यांनी वेळीच माहिती दिली असती तर प्रसंग ओढावला नसता, या म्हणण्यात तथ्य नाही. उलट, अर्जदारांनी वाईट हेतुनेच हा मुद्दा उचलून धरला, त्यामुळेच लगेच गै.अ.क्र.2 चे विरुध्द तक्रारी करणे सुरु केले, असेच दाखल दस्ताऐवजावरुन सिध्द होतो. अर्जदाराचे वकीलानी युक्तीवादाचे वेळी खालील न्यायनिवाडे सादर केले.
(1) State of Haryana & ors.-Vs.- Smt. Santra, I(2000) CPJ 53 (SC), (2) Prasanth S. Dhananka-Vs.- Nizam’s Institute of Medical Sciences & Ors., I(1999) CPJ 43 (NC) गै.अ.क्र.1 चे वकीलांनी खालीलप्रमाणे न्यायनिवाडे सादर केले. (1) INS. Malhotra (Ms) –Vs.- A.Kriplani (Dr.) and others, 2009 (5) Mh.L.J 17 Supreme Court (2) State of Haryana & others-Vs.- Sudesh, AIR 2009 (NOC) 1385 (P.&H.) (3) Smt. Bimla devi –Vs.- State of H. P. & others, AIR 2009 Himachal Pradesh 73. (4) Kanaka Rana –Vs.- State of Orissa & Ors., AIR 2009 Orissa 17. तसेच, गै.अ.क्र.2 चे वकीलांनी खालीलप्रमाणे न्यायनिवाडे सादर केले. (1) Santhi –Vs.- The Joint Director and Chief, SA No.724/2010 Judgment dated 21 July 2010 (2) Appeal (Civil) 2743/2002, State of Haryana & ors. –Vs.- Raj Rani, Judgment Dated 29/8/2005. (3) Indian Medical Association –Vs.- V.P. Shantha and others, AIR 1996 Supreme Court 550. 15. अर्जदार यांनी, गै.अ.कडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अर्जदाराचे म्हणणे नुसार, गै.अ.क्र.2 यांनी केलेल्या वैद्यकीय निष्काळजीपणाकरीता गै.अ.क्र.1 हा जबाबदार आहे. गै.अ.क्र.1 चे अधिपत्याखाली गै.अ.क्र.2 काम करीत असल्यामुळे दोन्ही गै.अ.नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे, याकरीता अर्जदाराचे वकीलांनी वरील उल्लेखीत न्यायनिवाडयातील श्रीमती संञा च्या निकालाचा हवाला दिला. सदर न्यायानिवाडयात वैद्यकीय निष्काळजीपणाबाबत रेशो दिलेला आहे. त्यात, उजव्या बाजुची फालोपीन ट्युब (fallopin tube) चा ऑपरेश केला, परंतु डाव्या बाजुची फालोपीन ट्युब (fallopin tube) जोडली नाही, हे वैद्यकीय तज्ञाने आपल्या पुराव्यात सांगितले. सदर न्यायनिवाडयात वैद्यकीय निष्काळजीपणा सिध्द झाला असल्यामुळे नुकसान भरपाई मान्य केले आहे. परंतु, प्रस्तुत प्रकरणात, गै.अ.क्र.2 यांनी स्ञी नसबंदी शस्ञक्रिया करण्यांत निष्काळजीपणा केला, हे अर्जदारांनी सिध्द केले नाही. उलट, वैद्यकीय शास्ञानुसार स्ञी नसबंदी शस्ञक्रिया असफल होण्याचे प्रमाण 0.3 ते 7 % प्रचलीत वैद्यकीय पध्दतीत मान्य केले आहे. मा. सर्वोच्च न्यायालय यांनी श्रीमती राज रानीच्या निकाल पञात आपले मत दिले आहे. तसेच, स्ञी नसबंदी शस्ञक्रिया झाल्यानंतर पुर्नजोडणी (Recannalisation of the fallopian tubes) कोणतेही बाह्य कारणाशिवाय (Spontaneous) होण्याची शक्यताचे प्रमाण सुध्दा वैद्यक शास्ञाने मान्य केले आहे. अशास्थितीत, गै.अ.क्र.2 यांनी वैद्यकीय निष्काळजीपणा स्ञी नसबंदी शस्ञक्रिया करण्यांत केला, ही बाब सिध्द होत नाही. 16. अर्जदार हिच्या कथनानुसार दि.7.1.09 ला जिल्हा उप रुग्णालय, वरोरा येथे गेली असता, गै.अ.क्र.2 ने गोळी दिल्यामुळे दि.10..1.09 ला रक्तस्ञाव झाला. त्यानंतर, गर्भाशयाला सुज आल्याचे गै.अ.क्र.1 ने सांगितले. अर्जदाराचे कथनानुसार डॉ.चांडक वरोरा यांच्याकडे दि.24.5.09 पासून नोव्हेंबर 2009 पर्यंत औषधोपचार घेतले व सोनोग्राफी केली. परंतु, तिला कोणताही आराम झाला नाही. अर्जदार हिने डॉ.मानवटकर यांचेकडून ही औषधोपचार करुन घेतला, तसेच, डॉ.राजलक्ष्मी हिच्याकडून औषधोपचार करुन घेतला. अर्जदार क्र.1 ची सोनोग्राफी डॉ.चांडक यांनी करुन घेतले असता, पूर्वी केलेले स्ञी नसबंदीचे ऑपरेशन झाले किंवा नाही, हे सुध्दा पाहणी करता येत होती. परंतु, अर्जदार यांनी रोखठोकपणे गै.अ.क्र.2 यांनी स्ञी नसबंदी केलीच नाही, असा आरोप कोणताही पुरावा नसतांनी केला. वास्तविक, अर्जदार हिने आधी ऑपरेशन झाले किंवा नाही, ह्या बाबत तज्ञाचा पुरावा सादर केला नाही. उलट, श्री संञा केसमध्ये डॉ. सुशीलकुमार गोयल, D.W.2 यांनी पुराव्यानिशी नसबंदी शस्ञक्रिया करण्यात निष्काळजीपणा सिध्द केला. त्यामुळे, वैद्यकीय निष्काळजीपणा ग्राह्य (held) केला आहे, परंतु प्रस्तुत प्रकरणात अर्जदार हिने असा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तसेच, स्ञी नसबंदी शस्ञक्रिया असफल होत असल्याचे वैद्यक शास्ञाने मान्य केले असल्यामुळे, गै.अ.क्र. 2 यांनी वैद्यकीय निष्काळजीपणा केला, हे सिध्द होत नाही. 17. अर्जदार हिने, स्ञी नसबंदी शस्ञक्रिया झाल्यानंतर तिला गर्भधारणा होऊन मुलगा दि.21.8.2011 रोजी झाला, या संबंधात दस्ताऐवज दाखल केले. अर्जदार हिने ईच्छा नसतांनाही अपत्य (unwanted child) झाले. त्याच्या भरण पोषन व भविष्यात होणा-या खर्चाबाबत रुपये 10,00,000/- मागणी केली आहे. परंतु, गै.अ.यांनी वरील प्रमाणे सादर केलेल्या न्यायनिवाडयात दिलेल्या मतानुसार अर्जदार हे कोणतीही नुकसान भरपाई मिळण्यास पाञ नाही. अर्जदाराने ‘‘छोटा कुंटूंब सुखी कुंटूंब’’ या उद्देशानेच एक मुलगा व एक मुलगी झाल्यानंतर नसबंदी ऑपरेशन करुन घेतले. अर्जदार हिने स्ञी नसबंदी ऑपरेशन झाल्यानंतर गर्भधारणा झाली, हे तिच्या तक्रारीतील कथनानुसार डॉ.राजलक्ष्मी हिच्या कडे डिसेंबर 2010 ची पाळी न आल्यामुळे 28.1.2011 ला केलेल्या सोनोग्राफीत गर्भधारणा झाल्याचे निदर्शनास आले. दि.31.1.2011 रोजी डॉ.राजलक्ष्मी याचे दवाखान्यात तपासणी करुन घेतली आणि डॉ.अल्लुरवार यांचेकडून सोनोग्राफी करुन घेतले, तेंव्हा 2 ते अडीच महिन्याचे गरोदर असल्याचे सांगितले. अर्जदार हिने अ-40 वर उप जिल्हा रुग्णालय वरोरा यांनी दिलेला सोनोग्राफीचा रिपोर्ट सादर केला, त्यात 8 आठवडे 6 दिवस (+_ कमी-जास्त) गर्भधारणा असल्याचे सांगितले. हीच बाब, अ-43 वर दाखल केलेल्या डॉ.अल्लुरवारच्या रिपोर्टमध्ये सुध्दा नमूद आहे. अर्जदार दोन महिन्याची गरोदर होती, त्याचवेळी शासन मान्य गर्भपात केंद्रातून सुरक्षीत गर्भपात करु शकत होती. अर्जदार हिने, नको असलेले गर्भपात न करता, गर्भधारणा पाळली आणि दि...21.8.2011 ला तिसरे अपत्य झाल्यानंतर, नसबंदी शस्ञक्रिया डॉ.राजलक्ष्मी यांचेकडून केल्याचे प्रमाणपञ सादर केला. वास्तविक, सदर हॉस्पीटल हे शासन मान्य गर्भपात केंद्र सुध्दा आहे असे गै.अ.क्र.1 चे वकीलांनी युक्तीवादात सांगितले. अर्जदार ही पहिल्या वेळीच डॉ.राजलक्ष्मी कडूनही गर्भपात करुन दुस-यांदा स्ञी नसबंदी शस्ञक्रिया करता येत होती. परंतु, अर्जदार हीने गर्भपात करुन घेतला नाही, आणि उलट छोटे कुंटूंब सुखी कुंटूंब या तिच्या कथनाच्या विरुध्द कृत्य केले आहे. वैद्यकीय शास्ञानुसार दोन ते तिन महिन्यापर्यंतच्या गर्भधारणेची वैद्यकीय शास्ञानुसार शासन मान्य गर्भपात केंद्रातून गर्भपात करता येतो, असे मान्य केले आहे. अर्जदाराचे वकीलानी श्रीमती संञा केसचा हवाला दिला. त्यात वादीला गर्भधारणा होऊन कालावधी लोटला होता, त्यामुळे गर्भपात करण्यास जिवाला धोका होता, असे डॉक्टरांनी मान्य केल्यामुळे गर्भपात केला नाही. परंतु, प्रस्तुत प्रकरणात अर्जदार ही सुरक्षीत गर्भपात करुन किंवा जिल्हा उप रुग्णालयात रुपये 100/- भरणा करुन सोनोग्राफी काढली. (अ-40) त्याचवेळी गर्भपात करता आले असते आणि नको असलेले अपत्य (unwanted) टाळता आले असते. परंतु, अर्जदार हिने स्वतः नको असलेले अपत्य कायम ठेवले आणि आता त्याची जबाबदारी म्हणून सरकार कडून नुकसान भरपाईची मागणी प्रस्तूत तक्रारीत केली आहे, ती वरील न्यायनिवाडयात दिलेल्या निकालावरुन आणि उपलब्ध दस्ताऐवजावरुन मंजूर करण्यास पाञ नाही, या निष्कर्षाप्रत न्यायमंच आले आहे. 18. अर्जदार हिने, गै.अ.क्र.2 च्या वैद्यकीय निष्काळजीपणाकरीता गै.अ.क्र.1 कडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. परंतु, वरील विवेचनावरुन आणि वैद्यकीय शास्ञाने असफलतेचे प्रमाण मान्य केल्याप्रमाणे गै.अ.क्र.2 यांनी वैद्यकीय निष्काळजीपणा केला नाही, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले असल्याने प्रातिनिधीक जबाबदारी (Vicarious liability) म्हणून कोणतीही नुकसान भरपाई देण्यास गै.अ.क्र.1 पाञ नाही, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 19. गै.अ.क्र.2 यांनी लेखी उत्तरात असा मुद्दा घेतला आहे की, स्ञी नसबंदी शस्ञक्रिया असफल झाल्यास, नॅशनल इंन्शुरन्स कंपनीकडून रुपये 20,000/- चे नुकसान भरपाईची तरतूद आहे. प्रस्तुत प्रकरणात अर्जदाराने विमा कंपनीला पक्ष केलेले नाही. गै.अ.क्र.2 यांनी असे युक्तीवादात सांगितले की, अर्जदार हिने स्वतः गर्भधारणा पाळली. गै.अ.क्र.2 यांनी स्ञी नसबंदी शस्ञक्रिया करण्यात निष्काळजीपणा केला, ही बाब अर्जदार यांनी सिध्द केले नाही. तसेच, गै.अ.यांनी सेवा देण्यात न्युनता केली नाही, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले आहे. 20. गै.अ.क्र.2 यांनी, मॉडीफाईड प्रोमोररी मेथडचा (Modified Pomeroy’s Method) वापर करुन, पोटावरुन शस्ञक्रिया केली. अर्जदाराचे वकीलांनी प्रतियुक्तीवादात सांगितले की, सालफीनोग्राफी या पध्दतीने दोन्ही टयुब बंद केले आहे किंवा नाही, ही पाहण्याची पध्दत आहे. अर्जदार हिने, गै.अ.क्र.2 यांनी ऑपरेशन केल्यानंतर तिला गर्भधारणा झाली, त्यामुळे सदर अर्जदाराच्या वकीलाने सांगितलेल्या पध्दतीचा वापर करुन दोन्ही टयुब बंद केल्या होत्या किंवा नाही, हे सिध्द करण्याची जबाबदारी अर्जदाराची आहे. परंतु, अर्जदार यांनी, ते सिध्द केले नाही, यामुळे गै.अ.क्र.2 यांनी वैद्यकीय निष्काळजीपणा केला, हे ग्राह्य धरता येत नाही. 21. गै.अ.क्र.2 नी लेखी उत्तरात असे कथन केले की, तो प्रसुती विज्ञान व स्ञी रोगशास्ञाचे प्रशिक्षण घेतले असून, सन 1984 पासून वैद्यकीय सेवेत आहेत आणि कुंटूंब नियोजन शस्ञक्रिया करण्याचा मागील 25 वर्षापासून दांडगा अनुभव आहे. अर्जदार क्र.1 ची शस्ञक्रिया झाल्यानंतर दि.26.11.08 पर्यंत तिला नियमीत पाळी आली आणि त्याचेनंतर पाळी न आल्याने दि.7.1.09 ला दवाखान्यात गेल्यानंतर लघवी तपासणी गर्भधारणा झाल्याचे समजले. परंतु, लघवी तपासणीवरुन गर्भधारणा झाली ही निश्चित करता येत नाही, त्याकरीता सोनोग्राफी करणे आवश्यक आहे. गै.अ.क्र.2 यांनी स्ञी नसबंदी शस्ञक्रिया करण्याचेपूर्वी अर्जदारास नसबंदी झाल्यानंतर होणा-या परिणामाचे आणि परिणामाबाबत, रत्नमाला स.ढोले मतपरिर्तका हिने समजावून सांगितले. शस्ञक्रिये पूर्वी अर्जदाराने परिशिष्ट 4 नुसार प्रतिज्ञापञावर सही करुन दिले. त्यातील 8 मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, संतती प्रतींबधक निर्बिजीकरण शस्ञक्रियेनंतर पाळी चुकल्यास 15 दिवसाचे आंत त्याची माहिती शस्ञक्रिया करणा-या अधिकारी/रुग्णालय यांना देईल व वैद्यकीय गर्भपात मोफत करुन घेईल. अर्जदार क्र.1 ला ही बाब माहीत असून ही पाळी आली नाही तर लगेच संबंधीत वैद्यकीय अधिकारी यांचेशी संपर्क करुन प्रतिज्ञापञानुसार गर्भपात करुन घेण्याची नैतीक जबाबदारी होती. परंतु, अर्जदार यांना त्याचा मुद्या करुन घ्यावयाचे होते, म्हणूनच त्याचा गाजाबाजा केला. 22. एकंदरीत, गै.अ.क्र.2 नी स्ञी नसबंदी शस्ञक्रिया करण्यात वैद्यकीय निष्काळजीपणा केला नाही, तसेच अर्जदार हिने प्रतिज्ञापञात नमूद केलेल्या बाबीचा अवलंब केला नाही, गै.अ.क्र.1 नी मुळ परिशिष्ट 4 ची प्रत युक्तीवादाचे वेळी सादर केले. त्यातील, क्र.7, 8, 9, 10 व 11 मध्ये दिलेल्या बाबीवरुन तक्रार मंजूर करण्यास पाञ नाही, सदर शस्ञक्रियेपूर्वी भरुन दिलेल्या प्रतिज्ञापञावर अर्जदार हिची सही आहे, आणि होणा-या परिणामाबाबत आणि उद्भवणा-या परिस्थितीची जाणीव, मतपरिर्तका हिने जाणीव करुन दिल्यानंतर सही केली आहे. अर्जदार हिला सर्व जाणीव असूनही जाणून-बुजून तिसरे अपत्य करुन घेतले, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले असल्याने, अर्जदार गै.अ.क्र.1 व 2 कडून कोणतीही नुकसान भरपाई मिळण्यास पाञ नाही, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने, मुद्दा क्र.2 ते 4 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे. मुद्दा क्र.5 : 23. अर्जदार हिने, तक्रारीत कुंटूंब कल्याण शस्ञक्रिया गै.अ.क्र.2 यांनी केली नाही, म्हणून नुकसान भरपाईची मागणी, तसेच मानसिक, शारीरीक ञासापोटी आणि बदनामी झाल्याबाबत केलेली मागणी, त्याचप्रमाणे तिसरे अपत्य पोषणाची व शिक्षणाची जबाबदारी ही सरकारची आहे, ती सरकारने पूर्णपणे स्विकारावी अशी केलेली मागणी वरील मुद्दा क्र.2 ते 4 चे विवेचनावरुन मंजूर करण्यास पाञ नाही. अर्जदारांची तक्रार उपलब्ध रेकॉर्डवरुन आणि गै.अ.यांनी केलेल्या कथनावरुन मंजूर करण्यास पाञ नाही, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने मुद्दा क्र.5 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे. मुद्दा क्र. 6 : 24. वरील मुद्दा क्र. 1 ते 5 च्या विवेचने वरुन, तक्रार नामंजूर करुन, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदारांची तक्रार खारीज. (2) अर्जदार व गैरअर्जदारांनी आपआपला खर्च सहन करावा. (3) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी. |