न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
वि.प. हे टाईल्स अॅण्ड इंटेरियर वस्तू विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून ग्रेनाईटचे कडाप्पा, टाईल्स व टाईल्स बसविण्यासाठी लागणारा तदनुषंगिक माल खरेदी केला आहे. त्याचा सविस्तर तपशील तक्रारदाराने तक्रारअर्जात नमूद केला आहे. सदर मालाची एकूण किंमत रु. 70,640/- इतकी होती. सदर मालाची रक्कम तक्रारदाराने वेळोवेळी वि.प. यांना अदा केली आहे. परंतु तक्रारदार हे मालाच्या बिलांपैकी रक्कम रु.52,288/- वि.प. यांना देणे बाकी आहेत. सदरची रक्कम भागविणेस तक्रारदार यांनी कधीही नकार दिलेला नाही. तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे मालाची पक्की बिले मागितली असता त्यांनी तक्रारदारांना खोटी व चुकीची बिले दिली आहेत. त्यामुळे खोटया बिलाची रक्कम तक्रारदार वि.प. यांना देवू शकत नाही. वि.प. यांनी तक्रारदारांना दिलेला माल हा निकृष्ट दर्जाचा आहे. सदरचा माल तक्रारदार यांनी बांधकामामध्ये वापरल्यानंतर त्या मालातील त्रुटी दिसून आल्या. तक्रारदार यांनी घेतलेल्या मालास भेगा पडणे, रंग कमी होणे, तसेच काही फुटका माल वि.प. यांनी दिलेला आहे. सदरचा माल हा 3 महिनेही व्यवस्थित राहिलेला नाही. या निकृष्ट मालाच्या संदर्भात तक्रारदार यांनी एस.एस. इंजिनिअर्स व असोसिएट्स यांच्यामार्फत प्रत्यक्ष वस्तुस्थितीची माहिती घेवून दुरुस्तीकरिता इस्टिमेट करुन घेतले आहे. त्यानुसार तक्रारदारास सदरचा खर्च करावा लागणार आहे. तक्रारदारांनी वि.प. यांना दि. 1/9/2017 रोजी नोटीस पाठविली. परंतु वि.प. यांनी त्यास खोटया स्वरुपाचे उत्तर दिले. निकृष्ट दर्जाचा माल काढून त्याठिकाणी दुसरा माल बसवावयाचा झालेस रु. 10 लाख इतका खर्च येणार आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदारास सेवात्रुटी दिली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून निकृष्ट दर्जाच्या मालाची दुरुस्तीसह होणारी रक्कम रु.10,00,000/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.25,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 6 कडे अनुक्रमे खरेदी मालाची बिले, अकाऊंट तपशील, वि.प. यांना पाठविलेली नोटीस, वि.प. यांचे नोटीस उत्तर, तक्रारदाराचे प्रतिउत्तर, इस्टीमेट वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत दिवाणी दाव्याची प्रत, इन्व्हॉईस, खातेउतारा श्री सुरज चौगुले यांचे उत्तर तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.
iii) वि.प. यांचे श्री सुरज सहदेव चौगुले यांचेशी ओळखीचे संबंध आहेत. श्री चौगुले हे तक्रारदार यांचे घराचे काम पहात होते. त्यांचे विनंतीवरुन वि.प. यांनी तक्रारदार यांना क्रेडीटवर माल खरेदी देणेचे मान्य केले. त्यानुसार वि.प. यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.2,41,089/- या रकमेचा माल दिला. सदर रकमेपैकी तक्रारदाराने वि.प. यांना दिलेल्या रकमांचा तपशील वि.प. यांनी म्हणण्यात नमूद केला आहे. वि.प. यांचे कथनानुसार तक्रारदार यांचेकडून वि.प. यांना अद्यापही रक्कम रु.85,189/- इतकी येणे बाकी आहे. सदर रक्कम तक्रारदार यांनी मान्य करुन ती दि.15/8/2017 पूर्वी पूर्णफेड करण्याचे मान्य केले. मात्र तक्रारदार यांनी सदरची रक्कम देणेस टाळाटाळ केली. वि.प. यांनी तक्रारदारांच्या नोटीसीस उत्तर दिले आहे. तसेच सुरज चौगुले यांनाही उत्तर दिले आहे.
iv) वि.प. यांनी तक्रारदारांना दिलेली बिले ही नियमाप्रमाणे टॅक्सच्या नोंदी करुन दिलेली आहेत. वि.प. यांनी तक्रारदार व सुरज चौगुले यांचे विरुध्द येणे रकमेच्या वसुलीकरिता इचलकरंजी येथील दिवाणी न्यायालयात रे.क.नं. 281/2017 हा दावा दाखल केला असून तो न्यायप्रविष्ठ आहे. सदर दाव्याचे कामी तक्रारदार यांचेविरुध्द एकतर्फा आदेशही पारीत झालेला आहे. तक्रारदार यांनी वि.प. यांना त्रास देणेसाठी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून नुकसान भरपाईपोटी रक्कम मिळणेस व मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण वि.प. हे टाईल्स अॅण्ड इंटेरियर वस्तू विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून ग्रेनाईटचे कडाप्पा, टाईल्स व टाईल्स बसविण्यासाठी लागणारा तदनुषंगिक माल खरेदी केला आहे. त्याचा सविस्तर तपशील तक्रारदाराने तक्रारअर्जात नमूद केला आहे. सदर मालाच्या एकूण रकमेपैकी काही रक्कम तक्रारदाराने वेळोवेळी वि.प. यांना अदा केली आहे व सदरची बाब वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये मान्य केली आहे. तक्रारदारांनी याकामी मालाची बिले दाखल केली आहेत. वि.प. यांनीही याकामी इन्व्हॉईस दाखल केलेले आहेत. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. तक्रारदारांचे कथनानुसार, वि.प. यांनी तक्रारदारांना दिलेला माल हा निकृष्ट दर्जाचा आहे. सदरचा माल तक्रारदार यांनी बांधकामामध्ये वापरल्यानंतर त्या मालातील त्रुटी दिसून आल्या. तक्रारदार यांनी घेतलेल्या मालास भेगा पडणे, रंग कमी होणे, तसेच काही फुटका माल वि.प. यांनी दिलेला आहे. सदरचा माल हा 3 महिनेही व्यवस्थित राहिलेला नाही अशी तक्रारदाराची तक्रार आहे. वि.प. यांनी सदरची बाब नाकारलेली आहे. सदरकामी प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी करणेकरिता कोर्ट कमिशनर म्हणून असोसिएशन ऑफ आर्किटेक्चर अॅण्ड इजिनिअर्स, कोल्हापूर यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी याकामी वादातील बांधकामाची पाहणी करुन अहवाल दाखल केला आहे. सदर अहवालाचे अवलोकन करता तक्रारदाराने वि.प. कडून खरेदी केलेल्या ग्रॅनाईटला तडे गेलेचे व सदरचे ग्रॅनाईट मऊ व ठिसूळ असलेचे तसेच काही ठिकाणी हेअर क्रॅक्स असलेचे स्पष्टपणे कोर्ट कमिशन अहवालामध्ये नमूद आहे. तसेच जिन्यासाठी वापरलेले ग्रॅनाईट हे मऊ व ठिसूळ असल्याचे अनुमानित होत आहे असेही कोर्ट कमिशन अहवालात नमूद आहे. कोर्ट कमिशनर यांनी याकामी अहवालासोबत वादातील फरशीचे फोटो दाखल केले आहेत. सदर फोटोंमध्येही वादातील फरशीला तडे गेल्याचे दिसून येते. सदरचे कोर्ट कमिशन अहवालातील तज्ञाचे मत विचारात घेता, वि.प. यांनी तक्रारदारांना निकृष्ट दर्जाचा माल पुरविल्याची बाब शाबीत होते असे या आयोगाचे मत आहे. सबब वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. तक्रारदारांनी याकामी वरिष्ठ न्यायालयाचा खालील न्यायनिवाडा दाखल केला आहे.
2012 DGLS (SC) 38
Supreme Court of India
National Seeds Corporation Ltd.
Vs.
M. Madhusudhan Reddy and Anr.
9. याकामी तक्रारदार व वि.प. यांनी पुरावा शपथपत्र दाखल केली आहेत तसेच लेखी युक्तिवादही दाखल केलेला आहे. वि.प. ला तोंडी युक्तिवादासाठी वारंवार संधी दिली तसेच युक्तिवादासाठी हजर राहणेबाबत नोटीसही पाठविली. ती मिळूनही वि.प. हे तोंडी युक्तिवादासाठी हजर राहिले नाहीत. सबब, तक्रारदाराचा तोंडी युक्तिवाद ऐकून प्रकरण निकालावर घेण्यात आले.
10. वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये वि.प. यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.2,41,089/- या रकमेचा माल दिला. सदर रकमेपैकी तक्रारदाराने वि.प. यांना रक्कम रु.1,55,900/- अदा केली व वि.प. यांना तक्रारदार यांचेकडून वि.प. यांना अद्यापही रक्कम रु.85,189/- इतकी येणे बाकी आहे असे कथन केले आहे. परंतु त्याबाबत कोणताही ठोस पुरावा वि.प. यांनी दाखल केलेला नाही.
11. तक्रारदारांनी नमूद ग्रॅनाईट निकृष्ट असून त्यास तडे गेलेने ते काढून नवीन बसविणेसाठी रक्कम रु.10 लाख खर्च येईल असे नमूद केले आहे. सदर कथनाचे पुष्ठयर्थ तक्रारदाराने एस.एस. कन्स्ट्रक्शन अॅण्ड एस.एस. इंजिनिअरिंग वर्क्स यांचे, पुन्हा नव्याने ग्रॅनाईट बसविणे व त्याअनुषंगाने इतर कामासाठी रक्कम रु. 2,43,166/- एवढा खर्च येईल असे एस्टिमेट दाखल केले आहे. सदर बाबीचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचेकडून नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 2 लाख इतकी रक्कम वि.प. यांचेकडून मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 2,00,000/- अदा करावेत व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. यांनी तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीं अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.