(आदेश पारीत व्दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी- मा.अध्यक्ष )
1. तक्रारकर्ताने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये सदर तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारकर्ताने तक्रारीत असे कथन केले आहे की, तक्रारकर्ताचे वडीलांना राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजने अंतर्गत स्मार्ट कार्ड देण्यात आलेले आहे. सदर स्मार्ट कार्ड तक्रारकर्तास नोव्हेंबर 2011 मध्ये मिळालेले आहे. सदर योजने अंतर्गत तक्रारकर्ताचे वडलील व कुटूंबातील इतर तीन सदस्यांना विमा संरक्षण देण्यात आलेले आहे. सदरच्या योजने अंतर्गत तक्रारकर्ता व तक्रारकर्ताचे कुटूंबातील सदस्य योजनेमध्ये सहाभागी हॉस्पिटलमध्ये उपचारापर्यंतचा पुर्ण खर्चासाठी कॅशलेस सुविधा मिळण्यास पात्र आहेत. सामनेवाला नं.2 कडे सदर योजने अंतर्गत विमा संदर्भात बांधील आहेत व सामनेवाला क्र.1 हॉस्पीटल योजने अंतर्गत नेटवर्क हॉस्पिटल आहे. दिनांक 30.05.2012 रोजी तक्रारकर्ताचा मौजे खंडाळा येथे ढंपरमधुन पडल्यामुळे अपघात झाला. त्यात तक्रारकर्तास त्याच दिवशी सामनेवाला क्र.1 यांचे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तक्रारकर्ताने सामनेवाला क्र.1 यांचेकडून उपचार घेतले. अपघातामुळे तक्रारकर्ताची मानसिक स्थिती योग्य नसल्याने त्या दिवशी तक्रारकर्ता यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करते वेळी स्मार्ट कार्ड आणले नव्हते. परंतू तक्रारकर्ता यांनी कुटूंबातील सदर योजनेअंतर्गत विमा सरंक्षण योजने अंतर्गत विमा संरक्षण मिळण्यास पात्र असल्याबाबत माहिती सामनेवाला क्र.1 यांना दिलेली होती. दिनांक 31.05.2012 रोजी सदरचे स्मार्ट कार्ड तक्रारदाराचे कुटूंबियांनी सामनेवाला क्र.1 यांना सादर केले. परंतू सामनेवाला क्र.1 यांनी सदरचे स्मार्ट कार्ड नाकारुन तक्रारकर्तास कॅशलेस सुविधा देण्यास तसेच स्वास्थ्य विमा फायदा देण्यास नकार दिला. तक्रारकर्तास हॉस्पिटलचा खर्च रु.20,000/- झाला, औषधाचा खर्च 16,483/- इतका खर्च आला. सदर सर्व बिले तक्रारकर्ताने स्वतः भरलेली आहेत. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारकर्तास स्मार्ट कार्ड सुरक्षा योजना नाकारुन व शासनाचे गाईड लाईन नुसार तक्रारकर्ताला कॅशलेस सुविधा दिली नाही. त्यामुळे तक्रारकर्ताला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. सदर तक्रारकर्ताने वकीलामार्फत दिनांक 16.03.2013 रोजी नोटीस देवून सामनेवाला नं.1 व 2 यांचेकडून रक्कम मागणी केली. सदरची नोटीस मिळाल्यानंतर सामनेवाला क्र.1 यांनी नोटीस प्राप्त झाल्यावर त्यांनी दिनांक 18.04.2013 रोजी खोटे उत्तर दिले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. अशा प्रकारे सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराचेप्रति न्युनत्तम सेवा व अनुचति प्रथेचा अवलंब केला असल्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
3. तक्रारकर्ताने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवाला यांनी तक्रारकर्ताचे हॉस्पीटलचा खर्च रु.30,000/- व्याजासह व तक्रारकर्तास झालेल्या शारीरीक मानसिक त्रासापोटी व या तक्रारीचा खर्च मिळण्याचा आदेश व्हावा अशी मागणी केली आहे.
4. तक्रारकर्ताची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसा काढण्याचा आदेश पारीत करण्यात आला. सामनेवाला नं.2 यांना नोटीस प्राप्त होऊनसुध्दा ते प्रकरणात हजर झाले नाही. म्हणून त्यांचे विरुध्द सदर तक्रार एकतर्फा चालविण्याचा आदेश निशाणी 1 वर पारीत करण्यात आला.
5. सामनेवाला क्र.1 हे प्रकरणात हजर झाले व त्यांनी निशाणी क्र.13 वर त्यांची लेखी कैफियत दाखल केली. सामनेवाला क्र.1 ने कैफियतीत असे कथन केले आहे की, तक्रारकर्ता यांनी तक्रारीत सामनेवाला क्र.1 चे विरुध्द लावलेले आरोप खोटे असून ते नाकबूल आहेत. पुढे सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे कैफियतीत मान्य केले आहे की, तक्रारकर्ता दिनांक 30.05.2012 ते 02.06.2012 मध्ये उपचारासाठी अॅडमिट होते. परंतू त्या काळात तक्रारकर्ताने कधीही सामेनवाला क्र.1 यांना राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेखाली सभासद असल्याबाबत सांगितले नाही. अथवा कोणतीही कागदपत्रे पडताळणीसाठी सादर केलेले नाहीत. तसेच तक्रारकर्ताने या योजनेअंतर्गत मिळालेले स्मार्ट कार्ड दाखविलेले नाही. म्हणून तक्रारकर्तास सदर योजनेचा लाभ मिळू शकत नाही. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेऊन त्यांचे आजाराबाबत योग्य तो औषधोपचार, ऑपरेशन, ट्रिटमेंट करुन सर्व प्रकारची योग्य ती सेवा पुरविलेली आहे. तक्रारकर्ता यांना सेवा देणेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही किंवा अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. सदर तक्रार तक्रारकर्ताने सामनेवाला क्र.1 यांचे हॉस्पीटलचे नाव बदनाम करुन त्याकरता बेकायेदशिररित्या रक्कम मिळविण्याकरीता दाखल करण्यात आली असून सदर तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
6. तक्रारकर्ताची तक्रार, दाखल केलेले दस्तावेज, तक्रारकर्ताचे शपथपत्र, सामनेवला क्र.1 ची कैफियत, सामनेवाला क्र.1 ची कागदपत्रे, दाखल केलेले शपथपत्र पुरावा, उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद ऐकला व मंचासमोर खालील मुद्दे उपस्थित होतात.
| मुद्दे | उत्तर |
1. | तक्रारकर्ता हे सामेनवाला क्र.1 चे ग्राहक आहेत काय.? | ... होय. |
2. | सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारासप्रति न्युनत्तम सेवा दर्शविलेली आहे काय. ? | ... नाही. |
3. | आदेश काय ? | ...अंतीम आदेशानुसार. |
का र ण मि मां सा
7. मुद्दा क्र.1 बाबत – तक्रारकर्ताचे वडीलांचे नांवे राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजने अंतर्गत स्मार्ट कार्ड देण्यात आले होते व सदर स्मार्ट कार्डचा नं.00027511273297708 असा आहे व त्या योजनेअंतर्गत सामनेवाला क्र.2 कंपनीचे विमा संरक्षण देण्यास बांधील होते ही बाब तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीतील निशाणी 6 वर दाखल दस्त क्र.1 वरुन सिध्द होते. म्हणून तक्रारकर्ता हे सामनेवालाचे ग्राहक आहेत असे सिध्द होते. तक्रारकर्ता यांनी सामनेवाला नं.1 चे हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आहेत. दिनांक 30.05.2012 ते 02.06.2012 पावेतो अॅडमिट होते ही बाब उभय पक्षांना मान्य असून या नात्याने तक्रारकर्ता हे सामनेवाला नं.1 चे ग्राहक आहेत. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
8. मुद्दा क्र.2 – सामनेवाला यांनी निशाणी 13 वर कैफियत व निशाणी 14 शपथपत्र दाखल केले आहे, त्यात ही बाब नाकारली आहे की, तक्रारकर्ता यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडे राष्ट्रीय स्वास्थ्य योजनेचे सभासद असल्याबाबत स्मार्ट कार्ड / त्याबाबत कोणतीही कागदपत्रे पडताळणीसाठी सादर केलेली होते ही बाब सिध्द करु शकले नाही म्हणून तक्रारकर्ता यांनी नि.6 वर दाखल केलेले दस्तावेजावरुन निष्पन्न होत नाही. तक्रारकर्ताने सामनेवाला क्र.1 हे राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजने अंतर्गत असण्याबाबत स्मार्ट कार्ड सामनेवाला क्र.1 कडे सादर केलेले आहे किंवा प्रयत्न करण्यात आला आहे. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारकर्ताचे विमा दावा सामनेवाला क्र.1 व 2 कडे पाठवू शकले नाही असे सिध्द होते. व सामनेवाला क्र.1 ने तक्रारदाराचेप्रति कोणतीही न्युनत्तम सेवा दर्शविलेली नाही हे ही सिध्द होते.
सामनेवाला क्र.2 सदर प्रकरणात सामील झाले नाही. परंतू तक्रारकर्ताचे म्हण्याप्रमाणे तक्रारकर्ताचा विमा दावा सामनेवाला क्र.2 कडे पाठविला नाही. म्हणून सामनवाला क्र.2 ने तक्रारकर्ताला मिळणारी कॅशलेस सुविधा देता आली नाही यावर सामनेवाला नं.2 चा कोणताही निष्काळजीपणा व कोणतीही सेवेत त्रुटी तक्रारदारासप्रति दर्शवित नाही. सबब सामनेवाला नं.2 यांना तक्राकर्ताचेप्रति कोणतीही न्युनत्तम सेवा दिली नाही असे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
9. मुद्दा क्र.3 – सदर तक्रारीची पडताळणी करतांना असे दिसून आले की, तक्रारकर्ताने राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजने अंतर्गत राष्ट्रीय स्वास्थ्य स्मार्ट कार्ड घेतलेले आहे व विमा दावा सामनेवाला क्र.2 कडे मिळाले नसल्याने सदर विमा दावा किंवा त्यावर मिळणारे लाभाची रक्कम तक्रारकर्ताला मिळू शकली नाही. मंचाचे असे मत झाले आहे की, तक्रारकर्ताला राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजने अंतर्गत तक्रारकर्ताला स्वास्थ्याकरीता लाभ मिळणे आवश्यक आहे. सबब न्यायाचे दृष्टीने खालील प्रमाणे आदेश पारीत करणे न्यायोचित ठरेल.
- अंतिम आदेश -
1. तक्रारकर्ताची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. तक्रारकर्ताने सामनेवाला क्र.2 यांचेकडे दिनांक 30.05.2012 ते 02.06.2012 पर्यंत घेतलेले उपचाराबाबतची सर्व कागदपत्रे या आदेशाची प्रत मिळालेपासून 30 दिवसाचे आत सामनेवाला क्र.2 यांचेकडे सादर करावी.
3. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारकर्ताचे विमा दाव्याची कागदपत्रे मिळाल्यानंतर 30 दिवसाचे आंत योग्य व नियमाप्रमाणे तक्रारकर्ताचा विमा दावा निकाली करावा.
4. सामनेवाला क्र.1 चे विरुध्द कोणतेही आदेश पारीत नाही.
5. उभय पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
6. उभय पक्षकार यांना या आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
7. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.