श्री. विजयसिंह राणेयांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 22/03/2012)
1. तक्रारकर्ते यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून तक्रारकर्त्यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, ते गैरअर्जदारांचे क्रेडीट कार्ड क्र. 5203 8601 3694 3009 चे ग्राहक 15.01.2007 पासून असून रु.75,000/- ची मर्यादा त्याद्वारे त्यांना देण्यात आली होती. सदर कार्डचे देयक हे 5 तारखेच्या आत येणे आवश्यक असतांना ते नेहमी 15 ते 20 तारखेच्या दरम्यान येत होते व त्यामुळे तक्रारकर्त्यावर अनावश्यक व्याजाचा भुर्दंड बसत होता. तक्रारकर्त्याला देयकामध्ये गैरअर्जदारांनी केलेली आकारणीसुध्दा समजत नव्हती व व्याजाचा दर मान्य व्याजाप्रमाणे लावल्या जात नव्हता, म्हणून तक्रारकर्त्याने दि.16.10.2009 पासून सदर क्रेडीट कार्ड त्यावरील संपूर्ण थकीत रक्कम भरुन बंद केले. तक्रारकर्त्याला खात्याचे विवरण पत्र देण्यात आले नाही व गैरअर्जदारांनी रक्कम मागण्याचा तगादा लावला व तक्रारकर्त्याला अवैध पध्दतीने त्रास देणे सुरु केले, म्हणून तक्रारकर्त्यांनी वकीलांमार्फत नोटीस पाठविला. याउपरही गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला रु.72,900/- चे देयक 08.06.2010 रोजी पाठविले व पुढे गैरअर्जदारांच्या काही लोकांनी तक्रारकर्त्याचे दुकानात भांडण केले. त्यामुळे तक्रारकर्त्याला मानसिक त्रास झाला व त्यांनी सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन, तीद्वारे मागणी केली की, मानसिक त्रासाची क्षतिपूर्ती, वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती, तक्रारीचा खर्च याबाबत एकूण रु.1,05,000/- ची मागणी केलेली आहे. आपल्या तक्रारीसोबत तक्रारकर्त्याने एकूण 6 दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना देण्यात आली असता गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र. 3 यांना नोटीस प्राप्त होऊनही त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले नाही किंवा मंचासमोर हजरही झाले नाही, म्हणून मंचाने दि.14.12.2010 रोजी एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला.
3. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारीवर प्राथमिक आक्षेप घेऊन नमूद केले की, सदर तक्रार खाजगी करारावर आधारीत असून, करारपत्रातील अटी व शर्तींशी संबंधित आहे. ऋणको व धनको मधील संबंध असल्याने मंचासमोर तक्रार चालू शकत नाही. अधिनियमाच्या कलम 2 (1) (क) मध्ये दिलेल्या आवश्यकतांची पूर्तता तक्रारीद्वारे होत नसल्याने सदर तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
आपल्या परिच्छेदनिहाय उत्तरात गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केलेल्या सर्व बाबी नाकारुन, तक्रारकर्त्याला थकीत रकमेच्या परतफेडीची योजना देण्यात आली होती व तिच्या अटी व शर्ती मान्य केल्यावर तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराचे नावे धनादेश जारी केले, त्यामुळे तक्रारकर्त्याच्या खात्यावर कोणतीही रक्कम थकीत नाही आणि त्याला खात्याचे विवरण पत्रक देण्यात आले नव्हते हे म्हणणे नाकारले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची कोणतेही नुकसान झालेले नाही, म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार मागणीसह नाकारण्यात यावी अशी मागणी गैरअर्जदारांनी सदर उत्तराद्वारे केलेली आहे.
4. तक्रारकर्त्याचा युक्तीवाद मंचाने ऐकला. गैरअर्जदार क्र. 1 व 2 आणि तक्रारकर्त्यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
5. सदर प्रकरणामध्ये तक्रारकर्त्यास गैरअर्जदारांचे लोकांनी वसुलीच्या कारणावरुन विशेषतः गैरअर्जदार क्र. 3 ने गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्या वतीने त्रास दिलेला आहे ही बाब सकृतदर्शनी दिसून येते, कारण तक्रारकर्त्यांनी यासंबंधाने पोलिस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकारची गैरपध्दत अवलंबिण्याचे अधिकार कोणासही नाही. ही पध्दत गैरकायदेशीर आणि कायदा हातात घेऊन केलेली विकृती या संदर्भात मोडते.
6. तक्रारकर्त्यांची मागणी अतिशय साधी आहे. त्यांचे म्हणणे त्यास विवरण पत्र मिळावे, ते देण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्र. 1 व 2 ची आहे. परंतू त्यांनी असे कोणतेही हिशोब मंचामध्ये जवाबासोबत सादर केलेले नाही. तक्रारकर्त्याने केलेल्या इतर मागण्या मानसिक त्रासापोटीची रक्कम रु.50,000/-, वैद्यकीय खर्चाची क्षतिपूर्ती रु.50,000/- याबाबत योग्य असे दस्तऐवज ज्याद्वारे सिध्द केल्या जाईल. वरील परिस्थितीचा विचार करुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्यांना त्यांचे क्रेडीट कार्ड खातेसंबंधी संपूर्ण विवरण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत, आदेश प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत पुरवावे.
3) तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.5,000/- गैरअर्जदार क्र. 3 ने तक्रारकर्त्यांना द्यावे व गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने रु.2,000/- तक्रारीच्या खर्चाबाबत तक्रारकर्त्यांना द्यावे.
5) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.