जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 887/2008
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः – 19/07/2008
सामनेवाला यांना नोटीस लागलेली तारीखः 25/08/2008.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 13/08/2009
श्रीमती मुमताज इलियास,
उ.व.सज्ञान, धंदाः नौकरी,
रा.क्वॉर्टर नं. के 455/ऐ एफ.डी.ऑफीस जवळ,
भुसावळ, जि.जळगांव. .......... तक्रारदार
विरुध्द
1. मे.चौधरी मोटर्स (ऑथराईज्ड डिलर
हिरोहोंडा करीता प्रोप्रा. सौ.मनिषा महेश चौधरी)
प्लॉट नं. 50/51, सर्व्हे नंबर 255/2, साकेगांव शिवार,
जळगांव रोड, भुसावळ.
2. हिरोहोंडा मोटर्स लि,
(करीता हेड ऑफीस – चिफ डायरेक्टर )
34, कम्युनिटी सेंटर, बसंत लोक, वसंत विहार,
न्यु दिल्ली 110 057.
3. रिजनल झोन, हिरोहोंडा मोटर्स लि,
(करीता रिजनल मॅनेजर वेस्ट झोन मुंबई )
15 ए, भाले इस्टेट, रेअरविंग, तिसरा मजला,
पुणे मुंबई रोड, वाकडेवाडी, पुणे 411 003. ....... सामनेवाला.
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 13/08/2009)
(निकाल कथन न्याय मंच अध्यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून )
तक्रारदार तर्फे कु.सविता एन.बैसवाल वकील हजर
सामनेवाला तर्फे श्री.प्रफुल्ल आर.पाटील वकील हजर.
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. तक्रारदार ही भुसावळ येथील रहीवाशी असुन तेथेच नौकरी करते. तक्रारदार हिने दि.25/11/2006 रोजी सामनेवाला क्र. 1 यांचेकडुन हिरोहोंडा कंपनीची प्लेजर ही गाडी रजिस्ट्रेशन क्रमांक एम.एच.19 ऐके 6484 रक्कम रु.42,060/- रोख देऊन खरेदी केली. सदर वाहन खरेदी केल्यानंतर 2/3 दिवसातच स्ट्रट्रींग प्रॉब्लम येवू लागला. सदर वाहनाचा अटोमॅटीक स्विच असून देखील सदरची गाडी किक मारल्याशिवाय चालू होत नसे. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र. 1 यांचेकडे तक्रार केली असता त्यांनी सदर वाहन तात्पुरते दुरुस्त करुन दिले. त्यानंतर सदर वाहनाची बॅटरी वारंवार डिसचार्ज होवू लागली त्यानंतर मार्च,2007 मध्ये तक्रारदाराच्या मुलीचे प्रॅक्टीकल परिक्षेला जात असतांना वाहनाचे चाक रस्त्यातच जाम होऊन बंद पडल्यामुळे तक्रारदाराच्या मुलीचे नुकसान झाले. सदरचे वाहन तक्रारदाराने त्याच दिवशी मेकॅनिकच्या ताब्यात दिले व दुरुस्ती करुन घेतली तथापी त्यानंतर देखील सदर वाहनात बॅटरी प्रॉब्लम, एसीड सांडणे, चक्का जाम होणे इत्यादी प्रकार होत राहीले. तक्रारदाराने सदरील दोष वारंवार सामनेवाला यांचे निर्दशनास आणुन दिलेनंतर सामनेवाला यांनी अमीगो कंपनीची बॅटरी लावून दिली तथापी वाहनाचा त्रास कायम राहीला. त्यानंतर दि.15/5/2008 रोजी सदरचे वाहन चाक जाम होऊन गुजरात स्वीट समोर बंद पडल्यामुळे तक्रारदारास ट्रॅफीक पोलीसाकडुन समज देखील मिळाली. त्यानंतर दि.19/5/2008 रोजी रेग्युलर सर्व्हीसींग करुन देखील दि.4/6/2008 रोजी सिंधी कॉलनीत रात्री 10.00 वाजता सदरची गाडी बंद पडली. वारंवार सर्व्हीसींग करुन देखील तसेच काही ना काही पार्ट बदलुनही वाहनाची बॅटरी सॉकेट मधुन निघुन बाहेर पडणे, वारंवार डिसचार्ज होणे, चाक जाम होणे, फयूल मिटर बंद होणे, हॉर्न बंद होणे, किक लूज होणे वगैरे सारखे प्रॉब्लम वारंवार होवु लागले तेव्हा सामनेवाला यांनी वॉरंटी कालावधीत जुजबी दुरुस्ती करुन वेळ निभावुन नेली. तक्रारदार ही एका पायाने पोलीओ ग्रस्त असुन शारिरिकदृष्टया अपंग असल्याचा फायदा घेऊन सामनेवाला यांनी तक्रारदारास डिफेक्टीव्ह वाहन देऊन तसेच अपंगाना रोड टॅक्स माफ असतांना देखील सदरची सवलत न देता जास्त रक्कम घेऊन तक्रारदाराची फसवणुक केली. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारास विक्री केलेले वाहन वारंवार दुरुस्त करुनही दुरुस्त होत नसल्याने सदरचे वाहन बदलुन त्या बदल्यात दुसरे वाहन किंवा वाहनाची संपूर्ण रक्कम तक्रारदारास परत करणेबाबतचे आदेश व्हावेत, आर्थिक नुकसानीपोटी रु.5,000/-, भर रस्त्यात वाहन बंद पडल्याने झालेल्या अपमानाचे नुकसानीदाखल रु.10,000/- व प्रस्तुत तक्रारीचा खर्च रु.10,000/- मिळावा अशी विनंती तक्रारदारांनी केली आहे.
2. सामनेवाला यांनी तक्रारदार हिची तक्रार नाकारली आहे. तक्रारदाराचे वाहन खरेदी केल्यानंतर वारंवार त्यात बिघाड होऊन ते बंद पडू लागल्याचे तक्रारदाराचे कथन खोटे, लबाडीचे व दशाभुल करणारे असुन सामनेवाला यांना मान्य नाही. तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडुन वाहन घेतेवेळी व घेतल्यानंतर सुध्दा कोणतीही तक्रार वाहनाबाबत अगर वाहनाच्या सर्व्हीसींग बाबत केलेली नव्हती व तशी तोंडी व लेखी तक्रारही दिलेली नव्हती. आजपर्यंत तक्रारदाराने वाहन घेतल्यानंतर अंडर वॉरंटी सर्व्हीसींग करुन घेतलेली आहे. तक्रारदाराने दि.6/2/2007 रोजी वाहनाची पहीली फ्री सर्व्हीस केली असुन त्यामध्ये तक्रारदाराच्या विनंतीनुसार फील्टर नट बदलुन दिलेला आहे. दि.30/3/2007 रोजी दुसरी फ्री सर्व्हीस करुन दिली आहे. दि.28/8/2007 रोजी तक्रारदाराच्या वाहनाचे मागचे ब्रेक जोरात लागतात त्याचबरोबर ऍव्हरेज मिळत नसल्याची तक्रार दुर केलेली आहे. दि.15/9/2007 रोजी अंडर वॉरंटी मध्ये वाहनाची बॅटरी बदलुन दिलेली आहे. दि.6/11/2007 रोजी चौथी फ्री सर्व्हीसींग सामनेवाला यांनी करुन दिली आहे त्यात हॅण्डलॉक, साईड मिरर, सिलेंडर फीटींग इत्यादी किरकोळ काम केलेले आहे. दि.24/2/2008 रोजी पाचवी फ्री सर्व्हीसींग करुन देतेवेळी त्यात साईड नॉईज व इतर किरकोळ कामे केलेली आहेत. दि.19/5/2008 रोजी शेवटचे फ्री सर्व्हीसींग मध्ये वाहन चालू करतांना त्रास होतो असे सांगीतले असता सामनेवाला यांचे सर्व्हीस इंन्चार्ज यांनी तक्रारदारास त्यांचे वाहनातील पेट्रोल हे पाणी मिश्रीत असल्याचे लक्षात आणुन दिले होते व त्याचबरोबर गाडीमध्ये पेट्रोल भरण्याबाबत काळजी घेण्याचे सांगीतले होते. त्यानंतर तक्रारदाराने योग्य ती काळजी न घेतल्याने पुन्हा दि.4/6/2008 रोजी अंडर वॉरंटी मध्ये तक्रारदाराच्या वाहनाची दुरुस्ती करुन दिलेली आहे. त्यावेळी देखील वाहनात भेसळ मिश्रीत पेट्रोल असल्याबाबत सामनेवाला यांनी तक्रारदारास कल्पना दिली होती. दि.8/6/2008 रोजी तक्रारदाराने त्याचे वाहन लवकर चालु होत नसल्याबाबतची तक्रार केली असता वाहनात भेसळ मिश्रीत पेट्रोल असल्याने त्याबरोबर वाहन चालु करण्याची पध्दत सामनेवाला यांनी तक्रारदारास समजावुन सांगीतली होती. सामनेवाला यांनी तक्रारदाराचे विनंतीस मान देऊन आजपर्यंत दोन वेळा बॅटरी बदलुन दिलेली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारास आजपर्यंत सर्व फ्री सर्व्हीसींग व अंडरवॉरंटी सर्व्हीस सुध्दा करुन दिलेली आहे. तक्रारदाराने वाहनाबाबत कोणतीही तक्रार केलेली नव्हती त्याचबरोबर दोन वर्षात वाहन पाच ते सात हजार कि.मी.चालायला पाहीजे असतांना तक्रारदाराचे वाहन घरीच पडून असल्याने साहजीकच वाहन सेल्फ स्टार्ट करतांना थोडाफार तरी त्रास होतोच. तक्रारदारास सामनेवाला यांनी आजतागायत डिलर या नात्याने सर्वतोपरी मदत केलेली आहे. सामनेवाला यांनी कोणताही हलगर्जीपणा, निष्काळजीपणा केलेला नाही व सेवेत कसुर केलेली नाही. तक्रारदाराने दि.25/11/2006 रोजी वाहन विकत घेतले होते तेव्हापासुन साधारणतः दिड वर्षामध्ये तक्रारदाराने कोणतीही कारवाई केली नाही. सबब वरील सर्व कारणांचा विचार होऊन तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह रद्य करावा अशी विनंती सामनेवाला यांनी केली आहे.
3. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे अवलोकन केले असता व उभयंतांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1) सामनेवाला यांनी तक्रारदारास सदोष वाहन विक्री करुन
त्रृटीयुक्त सेवा प्रदान केली आहे किंवा कसे ? नाही.
2) असल्यास काय आदेश ? शेवटी दिलेप्रमाणे.
मुद्या क्र. 1
4. तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडुन खरेदी केलेले दुचाकी वाहन हिरोहोंडा प्लेजर कंपनीचे रजिस्ट्रेशन क्रमांक एम.एच.19/ऐके 6484 दि.25/11/2006 रोजी खरेदी केले हे विवादीत नाही. तथापी सदरचे वाहन खरेदी केल्यानंतर 2/3 दिवसातच सदर वाहनात स्टाट्रींग ट्रबल येऊ लागला ही तक्रारदाराची तक्रार असुन तक्रारदाराने वाहन खरेदी केल्यानंतर सामनेवाला यांचेकडे वेळोवेळी वादातील वाहनाची सर्व्हीसींग केल्याचे सामनेवाला यांनी दाखल केलेंल्या जॉब कार्ड वरुन निर्दशनास येते. सामनेवाला यांनी दाखल केलेंल्या जॉब कार्डचे बारकाईने अवलोकन केलें असता सामनेवाला यांनी वेळोवेळी तक्रारदाराच्या वाहनातील उदभवलेले दोष दुर केलेले दिसुन येतात तसेच सामनेवाला यांनी तक्रारदाराची बॅटरी देखील बदलुन दिल्याचे स्पष्ट होते. सामनेवाला यांनी सदरचे वाहन दुरुस्त करुन देतांना तक्रारदारास त्यात भेसळमिश्रीत पेट्रोल असल्याचे निर्दशनास आणुन दिल्याचे प्रतिपादन करुन वाहन चालवणेबाबत काय दक्षता घ्यायला हवी होती याचे मार्गदर्शन केल्याचे प्रतिपादन केलेले आहे. सामनेवाला यांचेकडुन वाहन खरेदी घेतल्यापासुन साधारणतः दिड वर्षात तक्रारदाराने कोणतीही कारवाई केली नसल्याचेही सामनेवाला यांनी या मंचाचे निर्दशनास आणुन दिले. तक्रारदाराने तक्रारीसोबत नि.क्र. 1 ला सामनेवाला यांचेकडे तक्रारी अर्ज केलेंल्या स्थळप्रतीचे अवलोकन केले असता तक्रारदाराने दि.5/5/2008 रोजी म्हणजेच वाहन खरेदी केल्यापासुन जवळपास दिड वर्षे इतका कालावधी उलटुन गेल्यानंतर तक्रार उपस्थित केलेचे दिसुन येते. तसेच सदर वादातील वाहनात उत्पादीत दोष असल्याबाबतची तक्रारदाराची तक्रार असल्याने तक्रारदाराने तक्रारी अर्जासोबत वाहनात उत्पादीत दोष असल्याबाबत तज्ञ अहवाल दाखल करणे गरजेचे होते तथापी तसा कोणताही अहवाल तक्रारदाराने तक्रारी अर्जासोबत दाखल केलेचे दिसुन येत नाही. केवळ वाहन निट चालत नाही या सबबीवरुन ते तब्बल दिड वर्षे कालावधीनंतर बदलुन मागणे अगर त्याची रक्कम मागणे हे कायदेशीरदृष्टया योग्य दिसुन येत नाही. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारास विक्री केलेले वाहनात उत्पादीत दोष असल्याचे तक्रारदाराने सिध्द न केल्याने तक्रारदाराची तक्रार फेटाळण्याचे निष्कर्षाप्रत हा मंच आलेला आहे. सबब आदेश.
आ दे श
( अ ) तक्रारदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो.
( ब ) खर्चाबाबत आदेश नाही.
ज ळ गा व
दिनांकः- 13/08/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष