(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक : 05 मे, 2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता हा व्यवसायाने शेतकरी असून मुक्काम – मेंडकी, पो. सोनोली, ता. काटोल, जिल्हा – नागपूर येथील रहिवासी आहे, त्याचा मुख्य व्यवसाय शेती असून कुंटूंबाचे पालनपोषण हे शेतीच्या भरोशावर आहे. विरुध्दपक्ष क्र.1 ही चौधरी अॅग्रो टेक हा शेतीला लागणारे बियाणे विकण्याचा व्यवसाय करतो व विरुध्दपक्ष क्र.2 व 3 हे बियाणे उत्पादक आहे. तक्रारकर्ता यांनी दिनांक 8.3.2011 रोजी धने बियाणे ‘चैम्पीयन’ 18 किलो भाव रुपये 150/- प्रती किलो प्रमाणे रुपये 2520/- चे बियाणे विरुध्दपक्ष क्र.1 कडून विकत घेतले, ज्याचा पावती क्रमांक 1456 असून तक्रारकर्त्याने सदर बियाणाची पेरणी आपल्या शेतात केली, परंतु सदर बियाणे वापले नाही. त्यानंतर, तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्र.1 याला सदरबाबत सुचना दिली, परंतु विरुध्दपक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्याला दिनांक 8.3.2011 रोजी पुन्हा नवीन बियाणे दिले व त्यांना समजावून व पटवून दिले की, सदर बियाणे हे उत्तम दर्जाचे आहे व ते वापतीलच, त्यामुळे तक्रारकर्त्याने ‘मृदूल संशोधीत धनिया’ वाणाचे एकूण 18 पॉकीटे 500 ग्रॅम पॅकींगप्रमाणे व आर.जे. बायोटेक, औरंगाबाद उत्पादीत कंपनीचे (विरुध्दपक्ष क्र.3) दर 180/- प्रमाणे 9 नग एकूण किंमत रुपये 1620/- व ‘एस-909 (रिसर्च)’ वाणाचे एकूण 18 पॉकीटे प्रत्येकी 500 ग्रॅम पॅकींगचे जिंदल क्रॉप सायन्स प्रा.लि., जालना उत्पादीत कंपनीचे (विरुध्दपक्ष क्र.2) रुपये 180/- प्रमाणे 9 नग एकूण 1620/- असे एकूण 3150/- किंमतीचे बियाणे विकत घेतले. त्याचा पावती क्रमांक 1787 असा आहे. सदरच्या बियाणाची तक्रारकर्त्याने शेतातील जमिनीमध्ये पेरणी केली व पेरणी केल्यानंतर 19-20 दिवसांनंतरही बियाणाची उगवण झाली नाही, त्याची तक्रार दिनांक 26.6.2011 रोजी कृषि अधिकारी, पंचायत समिती, काटोल यांचेकडे केली. तसेच, जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने तक्रारकर्त्याच्या शेताला प्रत्यक्ष भेट देवून शेताची पाहणी केली असता, पाहणीच्या वेळी धने (सांबार) बियाणांची उगवण 5 % झाली असल्याचे दिसून आले. तसेच, कृषि अधिकारी, काटोल यांनी दिनांक 4.6.2011 रोजी प्रत्यक्ष तक्रारकर्त्याच्या शेताला भेट दिली असता, धने (सांबार) बियाणाची उगवण अत्यंत कमी 1% पेक्षा कमी होती. तसेच, बियाणे जिल्हा तक्रार निवारण समितीने शिफारस केलेला चौकशी अहवाल सन 2011-12 पंचनामा दिनांक 26.6.2011 अन्वये तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.1 यांचे दुकानातून दिनांक 2.5.2011 रोजी विकत घेतलेले बियाणे विरुध्दपक्ष क्र.2 व 3 या कंपनीचे बियाणामध्ये दोष आहे, असे सिध्द होते. त्यामुळे तक्रारकर्ताचे निश्चितच नुकसान झाले आहे व विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्त्याला दोषपूर्ण बियाणे पुरविले ही तक्रारकर्त्याची सेवेत ञुटी व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याची बाब स्पष्ट होते. तक्रारकर्ता पुढे असे नमूद करतो की, तक्रारकर्त्याला रुपये 1,00,000/- नुकसान झाले आहे. कारण, 1 किलो धन्याला अंदाजे 100 किलो सांबार निघतो, असे एकूण 18 ते 20 क्विंटल सांबाराचे उत्पादन तक्रारकर्त्याला झाले असते. सांबाराचा भाव रुपये 5000/- ते 6000/- क्विंटल असा आहे. करीता, तक्रारकर्त्याला विरुध्दपक्षाने पुरविलेल्या दोषपूर्ण बियाणांमुळे शारीरीक, मानसिक व आर्थिक ञास सहन करावा लागला, त्यामुळे तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई रुपये 1,50,000/- विरुध्दपक्षाकडून मिळावयास हवा. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांचेकडे वारंवार सदरची नुकसान झाल्याबाबत नुकसान भरपाई मिळण्याकरीता विनंती केली. परंतु, विरुध्दपक्षाने कुठल्याही प्रकारचे उत्तर दिले नाही व नेहमी टाळाटाळ करीत राहीले, म्हणून सरते शेवटी दिनांक 19.9.2011 रोजी वकीला मार्फत नुकसान भरपाईची मागणी करण्याबाबत नोटीस पाठविला, परंतु विरुध्दपक्ष क्र.3 यांनी नोटीसला उत्तर पाठवून नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. करीता, तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचात दाखल करुन खालील प्रमाणे मागणी केली आहे.
(1) विरुध्दपक्ष यांच्या सेवेतील ञुटीमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या आर्थिक नुकसान भरपाई म्हणून रुपये 1,00,000/- दिनांक 2.5.2011 पासून 12% व्याजासह देण्याचे आदेशीत करावे.
(2) विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांना आदेशीत करावे की, विरुध्दपक्ष यांचे सेवेतील ञुटीमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या आर्थिक, शारीरीक व मानसिक ञासापोटी रुपये 50,000/-, नोटीसचा खर्च रुपये 1,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- देण्याचे आदेशीत व्हावे.
3. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांना मंचामार्फत नोटीस बजावण्यात आली. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारीला आपले उत्तर सादर करुन त्यात नमूद केले की, तक्रारकर्त्याने त्यांच्याकडून दिनांक 8.3.2011 रोजी ‘चॅम्पीयन’ वाणाचे धने बियाणे 18 किलो प्रती 150/- प्रमाणे रुपये 2520/- चे विकत घेतले. परंतु, तक्रारकर्त्याने आपल्या शेतात बियाणांची पेरणी केली नाही. तसेच, तक्रारकर्ता याच्या मालकीची शेती मौजा – मेंडकी, त.सा.क्र.20, भोग वर्ग-1, भूमापन क्र.223 असून त्या शेतीची मशागत व पेरणी करतात. परंतु, तक्रारकर्त्याचे कुंटूंबाचा उदरनिर्वाह शेतीवर चालते ही बाब खोटी आहे. तसेच, दिनांक 2.5.2011 रोजी तक्रारकर्त्याने बियाणाची उगवण झाली नाही याबाबत सांगितले नाही किंवा सुचना दिली नाही. तसेच, दिनांक 8.3.2011 रोजी विकत घेतलेले बियाणे वापले नाही याची तक्रार सुध्दा विरुध्दपक्ष क्र.1 यांचेकडे तक्रारकर्त्याने केली नाही. तसेच ही बाब सत्य आहे की, दिनांक 2.5.2011 रोजी तक्रारकर्त्याने पुन्हा धने बियाणे (मृदूल) विरुध्दपक्ष क्र.2 व 3 चे उत्पादीत असणारे बियाणे विकत घेतले व शेत जमिनीमध्ये पेरणी केली. परंतु, ही बाब खोटी नमूद केली आहे की, 19-20 दिवसानंतर सुध्दा त्या बियाणांची उगवण झाली नाही.
4. तसेच, विरुध्दपक्ष क्र.1 यांनी पुढे असे नमूद केले की, बियाणे जिल्हा तक्रार निवारण समितीने शिफारस केलेला चौकशी अहवाल सन 2011-12 व पंचनामा दिनांक 26.6.2011 अन्वये तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.1 यांचे दुकानातून दिनांक 2.5.2011 रोजी विकत घेतलेले बियाणे विरुध्दपक्ष क्र.2 व 3 या कपंनीच्या बियाणामध्ये दोष आहे हे सिध्द होते. त्यामुळे तक्रारकर्त्याचे निश्चितच नुकसान झाले आहे, हे म्हणणे पुर्णतः चुकीचे, खोटे व बिनबुडाचे आहे. कारण, विरुध्दपक्ष क्र.1 येथे स्पष्ट करु इच्छितो की, निमयाप्रमाणे व परिपञकाप्रमाणे विक्रेता व उत्पादक कंपनीचे प्रतिनीधी यांनी मोक्यावर बोलावून त्यांच्या समक्ष पंचनामा तयार करावयास पाहिजे होता. तक्रार प्राप्त झाल्यापासून 8 दिवसांत जिल्हास्तरीय समितीचे चौकशीचे गठन करुन त्यामध्ये योग्य त्या सभासदांची व अध्यक्षाची निवड करुन त्याप्रमाणे कामकाज करावयास पाहिजे होते, परंतु तसे केले नाही त्यामुळे तक्रारकर्त्याची सदरची तक्रार खोटी व बनावटी आहे हे स्पष्टपणे दिसून येते. विरुध्दपक्ष क्र.1 यांचेकडून कोणत्याही प्रकारची सेवेत ञुटी दिल्याचे दिसून येत नाही, तसेच दोषपूर्ण बियाणे विकले नसून तक्रारकर्त्याने सदरची खोटी तक्रार दाखल केली आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार दंडासह खारीज करण्यात यावी.
5. विरुध्दपक्ष क्र.2 यांनी सदरच्या तक्रारीला उत्तर सादर करुन त्यात असे नमूद केले व मान्य केले की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.1 यांचेकडून धन बियाणे विकत घेतले व तसेच दिनांक 8.3.2011 रोजी घेतलेले बियाणे वापले नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर बियाणे वापले नाही अशी तक्रार विरुध्दपक्ष क्र.1 यांचेकडे केली व विरुध्दपक्ष क्र.1 यांनी दिनांक 2.5.2011 रोजी ‘मृदूल संशोधीत धनिया बिज’ वाणाचे एकूण 18 पॉकीटे, आर.जे.बायोटेक, औरंगाबाद उत्पादीत कंपनीचे दर 180/- प्रमाणे 9 नग किंमत रुपये 1620/- व ‘एस-909 (रिसर्च)’ वाणाचे एकूण 18 पॉकीटे प्रत्येकी 500 ग्रॅम प्रमाणे जिंदल क्रॉप सासयन्स प्रा.लि., जालना उत्पादीत कंपनीचे दर 180/- प्रमाणे 9 नग किंमत रुपये 1620/- असे एकूण रुपये 3150/- चे बियाणे खरेदी केले. परंतु, तक्रारकर्त्याने सदरचे बियाणाचे सुध्दा उगवण झाले नाही, ही बाब खोटी आहे. याबाबत, कृषि अधिकारी, पंचायत समिती, काटोल यांचेकडे दिनांक 26.6.2011 रोजी जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने तक्रारकर्त्याच्या शेताला प्रत्यक्ष भेट देवून शेतीची पाहणी केली व बियाणाचे उगवण 5 % टक्के झाली असल्याचे दिसून आले, हे सुध्दा खोटे आहे. पुढे त्यांनी आपल्या उत्तरात असे नमूद केले की, त्यांच्या उत्पादन केलेले बियाणे हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असल्यामुळे शेतकरी वरच्यावर बियाणांची मागणी करतात. तसेच, तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल दाखल केला आहे. परंतु प्रस्तुत समितीचा अहवाल संपूर्ण सदस्यांनी भेट देवून तयार केलेला अहवाल नसून फक्त एकाच अधिका-याच्या स्वाक्षरीने तयार केलेला अहवाल आहे, त्यामुळे त्या अहवालाला कुठलेही कायदेशिर पाठबळ नाही. मुळात प्रत्येक जिल्हास्तरावर बियाणे जिल्हा तक्रार निवारण समितीचे सात सदस्य गठीत केले आहे व प्रत्यक्ष सातही सदस्यांची मोक्का पाहणी करुन अहवाल देणे बंधनकारक आहे. त्यामुळे दाखल केलेला समितीचा अहवाल हा सात सदस्यांचे समितीचा अहवाल नसल्यामुळे ग्राह्य धरता येत नाही.
6. तक्रारकर्त्याने दिनांक 8.3.2011 रोजी 18 किलोचे ‘चॅम्पीयन धने’ बियाणे विकत घेवून त्या बियाणांची पेरणी शेतात केली. परंतु, सदर बियाणे वापले नाही म्हणून आर.जे. बॉयोटेक प्रा.लि. या कंपनीचे धने बियाणे विकत घेतले, तसेच जिंदल क्रॉप सायन्स प्रा.लि. कंपनीचे बियाणे घेतले, दोन्ही कंपनीचे बियाणे सुध्दा वापले नाही व तपासणी केली असता बियाणे जसेच्या–तसे आढळून आले. याचाच अर्थ तक्रारकर्त्याच्या शेतातील जमिनीमध्ये पुरेसा आलोवा नव्हता, म्हणजेच सिंचन योग्य प्रकारे झाले नाही. कारण, कुठलेही बियाणे साधे धने जरी असले तरी ते ओल्या जमिनीत टाकल्यानंतर त्याला पाने-फुले येतात हा जमिनीचा साधा नियम आहे. आश्चर्याची बाब की, तक्रारकर्त्याला वेगवेगळ्या तीन कंपनीचे बियाणे विकत घेवून सुध्दा उगवण शक्ती होत नाही याचाच अर्थ बियाणांमध्ये दोष नसून त्याच्या जमिनीतील सिंचन प्रक्रीयेतील व इतर घटक यांचेमध्ये दोष असल्यामुळे बियाणांची उगवण शक्ती झाली नाही. तक्रारकर्ता स्वतःचा दोष झाकण्याकरीता नुकसान एक एकरामध्ये दोन वेगवेगळ्या कंपनीचे 36 बँग धने बियाणे लागवड होऊ शकत नाही व आलेल्या वाफ्यातून पेरणी करणे योग्य क्षेञ तक्रारकर्त्याजवळ उपलब्ध नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार चुकीची व खोटी आहे हे स्पष्ट होते. करीता तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
7. विरुध्दपक्ष क्र.3 यांनी आपल्या उत्तरात असे नमूद केले आहे की, ‘मुदूल’ बियाणे लॉट क्रमांक 101301/2008 दिनांक 23.8.2010 हे बियाणे दिनांक 26.10.2010 रोजी दिलेल्या अहवालाप्रमाणे बियाणाची उगवण 89% टक्के आहे व लॉट क्रमांक 101301/2008 हे बियाणे दिनांक 1.4.2011 ते 3.10.2011 या दरम्याने रुपये 4530 किलो विकलेले असून त्या अहवालाप्रमाणे त्याची उगवण क्षमता सुध्दा 89% टक्के आहे. दोन्ही बियाणे मोठ्या दर्जामध्ये विकून सुध्दा एकाही शेतक-यानी किंवा डिलरने कोणत्याही प्रकारची तक्रार केली नसून फक्त तक्रारकर्त्याने ही खोटी तक्रार केली आहे. तसेच, तक्रारकर्त्याचा हेतू हा फक्त विरुध्दपक्ष कंपनीची बदनामी करुन त्यांचेकडून पैसे उकडण्याकरीता तक्रारकर्त्याने तक्रार दाखल केली आहे. करीता, तक्रारकर्त्याची खोटी तक्रार खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे. तसेच, बियाणांचे शासकीय प्रयोग शाळेतून बियाणाच्या उगवण क्षमतेबाबत अहवाल नसल्यामुळे मा. मंचाला सदर प्रकरणात योग्य निर्णय घेता येत नाही. करीता सदरची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे.
8. तक्रारकर्त्याने सदरच्या तक्रारीबरोबर 1 ते 20 दस्ताऐवज दाखल करुन प्रामुख्याने त्यात बियाणाचे खरेदी कॅश मेमो, 7/12 चा उतारा, गांव नमुना- 8 अ, तक्रारीचा चौकशी अहवाल, पंचनामा, तक्रार अर्ज, चौकशी अहवाल, ‘मृदूल धनिया सीडचे पॉकीट, जिंदल सीडचे पॉकीट, तक्रार अर्ज, पोष्टाच्या पावत्या, विरुध्दपक्ष यांना पाठविलेला नोटीस, विरुध्दपक्षाकडून आलेल्या नोटीसचे उत्तर, इत्यादी दस्ताऐवज दाखल केलेले आहे. विरुध्दपक्ष क्र.3 यांनी आपल्या उत्तराबरोबर दस्ताऐवज दाखल केले असून प्रामुख्याने त्यात Certification of Incorporation, Board Resolution, License for seed Business, Certificate of Importer-Exporter Code, Certificate of registration as seed Importer, Anseme Invoice Copy, Certificate of Seed Analysis of Anseme, Permit to import Seeds, Seed Analysis Report of Respondent no.3 Lab, Dispatch Details of Coriander Mrudul Lot No. 101301/2008 व इतर दस्ताऐवज दाखल केले आहे. विरुध्दपक्ष क्र.1 यांनी आपल्या उत्तरात परिपञक दाखल केलेले असून सरच्या परिपञकात बियाणे उगवण शक्ती कमी असणे किंवा पिके पेरणीनंतर भेसळ निघालेल्या तक्रारीचा चौकशी करण्याबाबत दिनांक 1.7.1998 पासून महाराष्ट राज्यात एक खिडकी योजना लागू करण्यात आली आहे. एक खिडकी योजनेमध्ये झालेल्या बदलानुसार सदर जिल्हास्तरीय चौकशी समितीचे पुनर्गठीत केले. त्यात एक अध्यक्ष, व सात सदस्यांची समिती गठीत करुन समितीचा अहवाल घेणे बंधनकारक शेतक-याला केले आहे, याबाबतचे परिपञक दाखल केले आहे.
9. सदर प्रकरणात दोन्ही पक्षांनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला व मंचासमक्ष मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. उभय पक्षांनी अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष यांचा ग्राहक होतो काय ? : होय
2) विरुध्दपक्ष यांचेकडून तक्रारकर्त्यास सेवेत ञुटी किंवा : होय
अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब दिल्याचे दिसून येते काय ?
3) आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
10. तक्रारकर्त्याची सदरची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.2 व 3 यांचे उत्पादीत धने बियाणे एकूण 36 बॅग दिनांक 2.5.2011 रोजी विरुध्दपक्ष क्र.1 यांचे दुकानातून विकत घेतले व सदर बियाणाचे खरेदी बिल क्रमांक 1787 सुध्दा तक्रारकर्त्याने घेतले. सदर बियाणांची एकूण किंमत रुपये 3150/- होती, परंतु बियाणांची पेरणी करुन त्याची 19-20 दिवस वाट बघून सुध्दा त्याची उगवण झाली नाही, त्याकरीता तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.1 यांना सुचना दिली व विरुध्दपक्ष क्र.2 व 3 यांना कायदेशिर नोटीस पाठविला. विरुध्दपक्ष क्र.2 व 3 यांनी तक्रारकर्त्याला टाळाटाळ करणारी उत्तरे दिली. तक्रारकर्त्याच्या शेतात धने बियाणांची उगवण न झाल्यामुळे तक्रारकर्त्याला आर्थिक, शारिरीक व मानसिक ञास झाला, अशी तक्रारकर्त्याची तक्रार आहे.
11. विरुध्दपक्ष क्र.1 हे विक्रेते आहे व त्यांनी ही बाब मान्य केली आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.2 व 3 यांचे उत्पादीत असलेले धनिया बियाणे तक्रारकर्त्याला विकले व तक्रारकर्त्याला हमी दिली की, सदरचे बियाणे हे उत्कृष्ट दर्जाचे आहे. विरुध्दपक्ष क्र.2 यांनी आपल्या उत्तरात असे नमूद केले की, तक्रारकर्त्याने त्यांचे उत्पादीत बियाणे घेण्यापूर्वी ‘चॅम्पीयन’ वाणाचे 18 किलो धने शेतात टाकण्याकरीता विकत घेतले होते ते बियाणे सुध्दा उगविले नाही. त्यामुळे बियाणामध्ये दोष नसून तक्रारकर्त्याने जमिनीचे सिंचन व्यवस्थित केले नाही, तसेच पंचनाम्या दरम्यान धन्याची उगवण झाली नाही किंवा 5 % टक्के उगवण झाली असा अहवाल आहे. याचाच अर्थ असा की, तक्रारकर्त्याने जमिनीचे सिंचन व्यवस्थित केले नाही. तसेच, जिल्हास्तरीय पंचनामा करण्याकरीता शासनाने गठीत केलेले सहा सदस्य व एक अध्यक्षाच्या समिती प्रमाणे असलेला अहवाल तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल करावयाचा होता. परंतु, अहवाल त्या पध्दतीचा नसल्यामुळे दाखल केलेल्या बियाणे जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिताचा चौकशी अहवाल सदर प्रकरणात ग्राह्य धरता येणार नाही.
12. विरुध्दपक्ष क्र.3 यांनी आपल्या उत्तरात नमूद केले की, तक्रारकर्त्याने वापरलेल्या बियाणांचा लॉट जवळपास 5000 किलो बियाणे बाजारात विकलेले आहे, तसेच त्यांच्या वैयक्तीक संशोधन लॅबचे प्रमाणपञाप्रमाणे बियाणाची उगवण क्षमता ही 89% टक्के आहे व तसेच, त्यादरम्यान विकलेल्या बियाणांची कोणत्याही शेतक-यांनी उगवण न झाल्याबाबतची तक्रार विरुध्दपक्ष यांचेकडे आली नाही. यावरुन ही बाब सिध्द होते की, तक्रारकर्ता हा पैसे उकडण्याकरीता व कंपनीच्या नावावर गालबोट लावण्याकरीता सदरची तक्रार दाखल करुन कंपनीकडून पैसे उकडण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार दंडासह खारीज व्हावी.
13. सदरच्या प्रकरणात तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्र.1 यांचेकडून बियाणे विकत घेतले. तसेच, तक्रारकर्ता हा शेतकरी आहे व विरुध्दपक्ष क्र.1 यांचेकडून बियाणे विकत घेतल्याबाबतचे कॅश मेमोरी अभिलेखावर दाखल केले आहे, त्यामुळे तक्रारकर्ता हा ग्राहक होतो.
14. तसेच, दिनांक 25.6.2011 रोजी मा.विभागीय कृषि सहसंचालक, नागपूर विभाग, नागपूर यांनी बियाणे उगवण बाबत तक्रार व चौकशी अहवाल याकरीता केलेला अर्ज व तसेच विरुध्दपक्ष क्र.2 व 3 चे उत्पादीत बियाणे यांची लागवड न झाल्यामुळे बियाणे जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीने शिफारस केलेला चौकशी अहवाल सन 2011-12 यावरुन असे दिसून येते की, मृदूल- 10-1301-2008 धनिया (सांबार), एस -909 (रिसर्च) व मृदूल वाणाचे जिंदल क्रॉप सायन्स प्रा.लि.जालना व आर.जे.बायोटेक, औरंगाबाद उत्पादीत या दोन्ही बियाणांचे उगवण न झाल्यामुळे पाहणी व चौकशी दरम्यान बियाणांची उगवण ही 5% टक्के झाल्याबाबत अहवालामध्ये नमूद आहे. तसेच मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार ही त्यांनी विरुध्दपक्ष क्र.2 व 3 यांनी उत्पादीत केलेल्या धनिया बियाणांची उगवण झाले नाही अशी तक्रार आहे. तेंव्हा, विरुध्दपक्ष क्र.2 व 3 यांची प्राथमिक जबाबदारी होती की, त्यांनी उत्पादीत केलेले बियाणे उत्कृष्ट दर्जाचे व 100 % टक्के उगवण असणारे आहे याबाबतचा पुरावा म्हणून शासकीय प्रयोग शाळेतून प्राप्त झालेला उगवण क्षमतेबाबतचा प्रमाणपञ मंचासमक्ष आणणे भाग होते. परंतु, विरुध्दपक्ष क्र.2 व 3 यांनी तसा कुठलाही पुरावा अभिलेखावर आणला नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याला विरुध्दपक्षाकडून उत्पादीत असलेले बियाणे उगविले नाही व त्यामुळे तक्रारकर्त्याचे शेतात त्याला पाहिजे असलेले योग्य उत्पादन मिळाले नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याला आर्थिक फटका बसला, असे स्पष्टपणे दिसून येते. महाराष्ट्रातील शेतकरी हा पाऊसाच्या अभावामुळे व पीक कर्ज या गोष्टींपासून अतिशय ञस्त आहे. कित्येक शेतकरी पीक न झाल्यामुळे, कर्ज मुक्त न झाल्यामुळे, त्याचे कुंटूंबावर होणा-या आर्थिक आघातामुळे आत्महत्या करण्यास बाध्य होत आहे. अशापरिस्थितीत, उत्पादक कंपन्या शेतक-यांना योग्य ते बियाणे उत्कृष्ट दर्जाचे न पुरविता भेसळयुक्त बियाणे पुरवून एकप्रकारे शेतक-यांची फसवणूक करतात, ही अतिशय गंभिर बाब आहे. तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईसाठी विरुध्दपक्ष क्र.2 व 3 कारणीभूत आहे, असे मंचाला वाटते. तसेच, विरुध्दपक्ष क्र.1 हे विक्रेता असून त्यांनी सुध्दा योग्य कंपनीचे व योग्य प्रतीचे बियाणे ग्राहकांना/ शेतकरी यांना विकणे त्यांची नैतीक जबाबदारी आहे की, त्यांनी नेहमी उत्कृष्ट दर्जाचे बियाणे शेतक-यांना विकले पाहीजे, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.1 हा सुध्दा नुकसानीस जबाबदार आहे, असे मंचाला वाटते. सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्रमांक 2 व 3 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांच्या कंपनीचे निकृष्ठ दर्जाचे बियाणे तक्रारकर्त्याला पुरविले व त्याची उगवण न झाल्यामुळे तक्रारकर्त्याला झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी रुपये 50,000/- (पन्नास हजार रुपये फक्त) द्यावे.
(3) तसेच, विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी निकृष्ठ कंपनीचे बियाणे तक्रारकर्त्याला विकले त्याकरीता तक्रारकर्त्यास झालेल्या नुकसानीपोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 5,000/- (पाच हजार रुपये फक्त) तक्रारकर्त्याला अदा करावे.
(4) तसेच, विरुध्दपक्ष क्र.2 व 3 यांना आदेशीत करण्यात येते की, तक्रारकर्त्याला सेवेत ञुटी व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्यामुळे तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरीक व मानसिक ञासापोटी रुपये 20,000/- (वीस हजार रुपये फक्त) व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 1,000/- (एक हजार रुपये फक्त) द्यावे.
(5) विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांनी आदेशाची पुर्तता निकालपञाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(6) विरुध्दपक्ष क्र.2 व 3 यांनी मुदतीत आदेशाची पुर्तता न केल्यास दिनांक 2.5.2011 पासून द.सा.द.शे. 12 % टक्के व्याजासह येणारी रक्कम तक्रारकर्त्यास अदा होईपावेतो देण्यात यावी.
(7) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 05/05/2017