निकालपत्र (दि.17.10.2014) व्दाराः- मा. सदस्या - सौ. रुपाली डी. घाटगे
1 प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे सामनेवाले चौधरी यात्रा कंपनी यांनी सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
2 प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले क्र.1 व 2 यांना नोटीसचा आदेश झाला. सामनेवाले यांनी उपस्थित राहून त्यांचे म्हणणे दाखल केले आहे. तक्रारदारांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की,
3 तक्रारदार क्र.1 व 2 हे पती-पत्नी असून त्यांनी धार्मिक यात्रेसाठी जाण्यासाठी सामनेवाले कंपनीकडे सर्व सोयीसुविधाची चौकशी करुन 79 क्रमांकाच्या 22 दिवसांची गंगासागर, जगन्नाथपुरी, नेपाळ यात्रेसाठी प्रत्येकी रक्कम रु.14,441/- अशी एकूण रक्कम रु.29,822/- देऊन बुकींग केले होते. सामनेवाले क्र.2 यांनी दि.06.04.2012 रोजी रु.5,000/- पर्यंत सीट क्र.3 व 4 प्रिमीयम रेंजमधील तिकीटे दिली. परंतु दि.07.04.2012 रोजी सामनेवाले क्र.2 यांनी प्रिमीयम रेंज सीट क्र.3 व 4 ऐवजी 5 व 6 सीट घेणेविषयी विनंती केली असता, प्रस्तुतची विनंती सामनेवाले यांनी मान्य करुन तक्रारदारांच्या तिकीटाच्या मागील बाजूस सीट क्र.5 व 6 नमुद करुन दिले. दि.15.05.2012 रोजी तक्रारदारांनी उर्वरीत रक्कम रु.19,822/- भरले. सामनेवाले कंपनीने सीट क्र.5 व 6 न देता तक्रारदारांना सीट क्र.3 व 4 वर बसले. अयोध्या यात्रेच्या स्थळापासून प्रस्थान करतेवेळी सामनेवाले कंपनीच्या गाडीतील मॅनेजर-प्रकाश बदलले. सामनेवाले कंपनीने दुसरी बस प्रवासासाठी आयोजित केली. तिचा मॅनेजर-रामचंदर यांनी नाशिक ऑफीसमधून मिळालेल्या लिस्टनुसार तक्रारदारांना सामनेवाले क्र.2 यांनी दिेलेल्या सीट क्र.3 व 4 बदलून ते सीट क्र.1 व 2 केला आहे. तक्रारदारांनी सीट क्र.5 व 6 बुक केले असल्याचे सांगितले असताना रामचंदर यांनी लिस्टप्रमाणे बसावे लागेल असे उद्दध्दटपणे उत्तर दिले. त्या कारणाने नाईलाजास्तव सीट क्र.1 व 2 वर बसविले. सीट क्र.1 व 2 सीटस् ड्रायव्हरच्या सीटच्या मागे असलेने तक्रारदारांना धड पाय पुढे पसारताही येत नव्हते व नीट बसता येत नव्हते. मे महिना असल्याने उन्हाचा व इंजिनच्या प्रचंड उष्णतेचा प्रचंड त्रास झाला व सतत अवघडलेल्या अवस्थेत बसावे लागले होते. त्यामुळे तक्रारदारांना पाठीचाही त्रास सुरु झाला. मानसिक तणाव व मनस्तापामुळे त्यांना यात्रेचा आनंद उपभोगता आला नाही. प्रचंड उष्णता असल्याने फॅनही लावला नाही, मनोरंजनासाठी टी.व्ही., टेप असतानाही त्याचा वापर केला नाही. तक्रारदार व इतर सहप्रवशांना नाष्टा हा दुपारच्या जेवणाच्या वेळेस दिले असल्यामुळे त्यावेळी दुपारचे जेवण कधीकधी सामनेवाले यांनी दिले नव्हते. नेपाळ हद्दीतील जंगल घाटामध्ये रात्रीचे 11 च्या सुमारास घाटात बंद पडली. त्यावेळी सामनेवाले कंपनीचे कोणीही प्रतिनिधी हजर नव्हता. सर्वांनी ती रात्रसुध्दा प्रचंड तणावात काढली. पहाटेच्या सुमारास 25 सीटरच्या दोन गाडया आणल्या. त्यावेळेस देखील सामनेवाले कंपनीचा कोणताही प्रतिनिधी नव्हता. तक्रारदारांनी सीट क्र.3 व 4 देणेविषयी विनंती केली असता, सामनेवाले यांनी कोणतीही दखल घेतली नाही. दि.05.06.2012 रोजी तक्रारदारांची मुलगी-शितल शिवाजी माने यांनी सदर गैरसोयीबद्दल अर्ज दिला असता, सदर अर्ज नाशिक येथे फॅक्सद्वारे पाठविला असता, सदर अर्जाची कोणतीही दखल घेतलेली नाही.
4 तक्रारदार क्र.2 यांची बुध्दगयाला जात असताना प्रचंड उष्णता व इंजिनची उष्णता यामुळे तक्रारदारांचा बी.पी. वाढल्यामुळे तब्येत खूप बिघडली. अशावेळी तक्रारदार क्र.1 यांनी अनोळखी माणसाला विनंती करुन रस्त्याकडेला असलेल्या बोअरमधून बेडसीट पाण्यात भिजवून देणेविषयी सांगितले. सामनेवाले क्र.2 यांची शारिरीक व मानसिक अवस्था ठीक नसल्याचे कळविले. सामनेवाले कंपनीच्या प्रतिनिधींनी, त्यांनी कोणीही मदत/धीर दिला नाही. तसेच तक्रारदारांच्या मानसिक अवस्थेची व भावनांची कदर केली नाही. तक्रारदार क्र.1 हे तक्रारदार क्र.2 यांना बुध्दगया वर्मा हेल्थ सेंटरमध्ये उपचारासाठी घेऊन गेले असता, तक्रारदार क्र.2 यांचा बी.पी.150/100 वाढला होता व त्यांनी विश्रांती घेण्यासाठी सल्ला दिला. तक्रारदारांची शारिरीक अवस्था पाहूनही त्यांना त्यांचे सीट नंबर दिले नाहीत. सामनेवाले कंपनीचे प्रतिनिधी हे तक्रारदार व इतर सहप्रवाशी यांचे बरोबर कधीच कोणत्या स्थळापर्यंत आले नाहीत. संपूर्ण प्रवासी जेवणाची सोय अत्यंत वाईट होती, जेवणाला दर्जा नव्हता, पाण्याची सोय नव्हती, स्वच्छता व सुरक्षिततेचा अभाव होता. जेवण करण्यासाठी सोबत आणलेला कर्मचारी वर्ग स्वच्छतेने वागत नव्हते. सदरचे जेवणाने तक्रारदारांचे पोट बिघडले. अयोध्या येथील दवाखान्यातून त्यांना इंजेक्शन व गोळया घ्याव्या लागल्या. परतीचा प्रवासी अण्णावरम सोडल्यानंतर रात्री 9 वाजता पेट्रोलपंपावर सामनेवाले कंपनीचे यांचे प्रतिनिधीने गाडी थांबवून तिथल्या टॉयलेटेच्या व दुर्गंधीयुक्त घाणेरडया जागेत जेवण शिजवले व तेथील पाणी वापरले. त्याकारणाने तक्रारदारांना व इतर सहप्रवाशांना उलटया झाल्या. “प्रवाशाच्या सेवेसाठी “हे ब्रीद वाक्य कधीही पाळलेले नाही. या सर्वांचा परिणाम म्हणजे तक्रारदार क्र.2 हयांना प्रवासातून आले दिवसापासून डॉ.रणजीत सावंत यांचेकडे ट्रिटमेंट सुरु केली. त्यावेळी तक्रारदारांचा बी.पी.-150/100 असल्याने त्यांना गोळया देऊन बेडरेस्ट घेण्यास सांगितले. परंतु बी.पी.कमी आल्याने व तक्रारदारांची शारिरीक व मानसिक अवस्था पाहता, डॉ.अडनाईक यांना दाखविले असता, तक्रारदारांचा बी.पी.150-100 असल्याने तक्रारदारांना दि.18.06.2012 ला अँजिओग्राफी केली. सामनेवाले यांच्या गैरसोयीमुळे तक्रारदारांना खूप आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास झाला. त्याकारणाने, सामनेवाले कंपनीने तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रुटी केल्याने तक्रारदारांनी यात्रेसाठी भरलेली रक्कम रु.29,000/- व रु.7,154 मानसिक शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.2,00,000/- व इतर खर्चासहीत रक्कम रु.2,44,946/- द.सा.द.शे.18टक्के व्याजदराने मिळावेत अशी सामनेवाले यांचेकडून विनंती केली.
5 तक्रारदारांनी तक्रारीसोबत एकूण 17 कागदपत्रे दाखल केली आहेत. अ.क्र.1 व 2 ला रु.5,000/- भरलेल्याची पावती, अ.क्र.3 ला रु.19,822/- भरलेल्याची पावती, अ.क्र.4 ला बुकींगचा अर्ज, अ.क्र.5 ला वर्मा हेल्थ केअर सेंटरमध्ये घेतलेले औषधोपचाराची पावती, अ.क्र.6 ला स्वस्तीक हॉस्पीटलमध्ये दाखविल्याची प्रिस्कीप्शन पावती, अ.क्र.7 ला तक्रारदार क्र.2 ची केलेली अँजिओग्राफी, अ.क्र.8 ला डिस्चार्ज कार्ड, अ.क्र.9 ला डॉ.आडनाईक यांचे बिलपेड केलेबाबतची पावती, अ.क्र.10 ला डॉ.आडनाईक यांनी औषधे लिहून दिलेली पावती, अ.क्र.11 ला तक्रारदारांनी खरेदी केलेची औषधे, अ.क्र.12 ला तक्रारदारांची देसाई पॅथोलॉजी येथे केलेली टेस्ट, अ.क्र.13 व 14 ला सामनेवाले यांना पाठविलेल्या नोटीसा, अ.क्र.15 ला सामनेवाले क्र.2 ला पोहोच झालेली पोहचपावती, अ.क्र.16 ला तक्रारदाराने पोस्ट खात्यात दिलेला अर्ज व अ.क्र.17 ला तक्रारदारांचे सामनेवाले कंपनीतील ओळखपत्र तसेच दि.21.12.2013 रोजी अधिकराव शिंदे व विमल शिंदे यांचे पुराव्याचे शपथपत्र, दि.28.08.2014 रोजीचे तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र, दि.05.06.2012 रोजीचे तक्रारदारांच्या मुलीचा तक्रार अर्ज, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
6 सामनेवाले यांची तक्रारदारांच्या तक्रारीस दि.13.06.2013 रोजी म्हणणे दाखल केले असून तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदारांनी यात्रीसंबंधीची माहितीपत्रक घेऊन रक्कम भरली व तसेच लेखी करार केला ही गोष्ट लपवून ठेवली आहे. त्या कारणाने, Suppression of Material Facts from the Court या कारणाने तक्रारदारांचा तक्रार अर्ज फेटाळावा लागला. मोटार वाहन कायदा व मोटार वाहन व्हेन्युअल्स अॅन्ड रुल्स् प्रमाणे बस वाहनाची निर्मिती असते. बसच्या पुढील भागातील तुलनात्मकरित्या मागच्या सीट आरामदायी व आनंददायक असतात असा लोकांचा समज आहे म्हणून सामनेवाले यांनी चार रागांना प्रिमीयम सीट संबोधले आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्या सीट बुकींग अर्जामध्ये प्रॉस्पेक्टचे पान क्र.2 मध्ये, यात्रेकरुच्या सीट क्रमांकामध्ये एखादया वेळेस कोणतेही कारण न कळविता यात्रेकरुंच्या सीटमध्ये बदल करण्याचा अधिकार कंपनीकडे कंपनीने राखून ठेवलेला आहे. तसेच भाडयाच्या छोटया अगर मोठे वाहन आयोजित असू शकते याची मला जाण आहे असे स्पष्टपणे नमुद केलेले आहे. मोटार व्हेईकल कायदयातील तरतुदीप्रमाणे मोटार वाहनाची रचना केली असता, इंजिनची उष्णता ही वाहनाच्या तळभागातून मागे जाईल व वाहनाची हवा गाडीच्या कुठल्या परिस्थितीत ड्रायव्हरच्या केबीनमध्ये येणार नाही अशा पध्दतीने इंजिन व वाहनाची रचना केलेली असते. म्हणूनच बसमधील प्रवशांपेक्षा चालकाची बसण्याची जागा ही जास्त असते. तक्रारदारांस स्लिपर बसने प्रवास न करता सीटी बसच्या प्रवास भाडयात अनुभव घ्यावयाचा होता. म्हणून ड्रायव्हरच्या केबीनमध्ये आतमध्ये पाय पसरुन झोपावयाचे होते. परंतु ड्रायव्हरला व केबीनमधील असलेल्या सहायकास अडचणीची व अयोग्य स्थिती असल्यामुळे तक्रारदारास तसे समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला असता, यात्रा पूर्ण झाल्यावर इंगा दाखवितो अशी धमकी तक्रारदारांनी सामनेवाले यांचे कर्मचा-यांना दिली. इंजिनच्या उष्णतेचा व मे महिना असल्यामुळे उन्हाचा प्रचंड त्रास होत होता, हे तक्रारदारांचे म्हणणे खोटे व लाबडीचे आहे. बसचे फ्लोरींग हे फायरपप्रुफ लाकडी प्लायवुडचे असल्याने इंजिनाच्या शेजारी बसुन ड्रायव्हर अत्यंत उत्तमपणे व शांतपणे वाहन चालवू शकतो. तक्रारदारांनी यात्रेत जाऊन अत्यंत उत्तमपणे यात्रेचा आनंद उपभोगला असून सर्व देवधर्म करुन, पुण्य पदरी पाडून केवळ पैसे उकळण्यासाठी सदरचा खोटा मजकुर दिला आहे. तक्रारदारांची यात्रा ही एसी बसने व व्हीडीओ कोचने यात्रा नव्हती. व्हिडीओ कोच असल्यामुळे बसमध्ये टी.व्ही., फॅन, पडदे व आरामदायी सीट असतात. तक्रारदारांची यात्रा ही साध्या बसची असल्यामुळे टी.व्ही. टेप किंवा फॅन हे चालू ठेवण्याचे कुठलेच कारण नव्हते. तसेच बसमध्ये सदर गोष्टींचा वापर केला जाईल असा कुठलाही करार तक्रारदारासोबत सामनेवाले कंपनीचा नव्हता. सामनेवाले कंपनी ही तक्रारदार तसेच इतर सहप्रवाशी यांना यात्रा दरम्यान सकाळी नाश्ता, सायंकाळी जेवण, एकवेळ चहा दिला जाते. सदरची गोष्ट अटीमध्ये लिहलेली आहे. यात्रा पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारचा उत्तम ब्रॅंडेड किराणा माल नाशिक येथूनच दिला जातो. स्थानिक ठिकाणी फक्त भाजीपाला वापरला जातो. तक्रारदार सोडून इतर कुठल्याही यात्रेकरुंना जेवणाबद्दल त्रास नाही. उलट, तक्रारदारांस त्यांचे विनंतीप्रमाणे शक्य असेल त्यावेळेस दुपारीसुध्दा जेवण दिलेले आहे. जेवण वेळेवर दिले जात नव्हते, नाश्ता भरपेट दिला जातो व नंतर सायंकाळी जेवण दिले जाते. यात्रे दरम्यान नाश्ता, गरम-गरम तयार करण्यासाठी जिथे जास्तीत जास्त जागा मिळेल अशा ठिकाणी किचन स्टाफ थांबून नाश्ता तयार करतो. त्यामुळे सकाळचे वेळेस कधीही दिला जातो व त्यास तास-दोन तासाचा फरक पडू शकतो. अमुक वेळेस नाश्ता दिला जाईल असा करार नाही. ब्रेक रिटार्डर ही विशेष व्यवस्था कंपनीने करुन घेतलेली आहे. त्यामुळे सर्व त्या सोयी सुविधा आणि सेवा सवलती या यात्रेकरुंना पुरवित असल्यामुळेच भारत पर्यटन मंत्रालया तर्फे मान्यता प्राप्त यात्रा कंपनी आहे याबाबत तक्रारदारांची कुठलीही तक्रार नाही. रात्री 11 चे सुमारास बस घाटात परमुलखात, घनदाट जंगलात बंद पडली असता, सामनेवाले कंपनीने लगेचच ताबडतोब बस आणून यात्रेकरुंची सुविधा केली. याबद्दल सामनेवाले कंपनीस धन्यवाद देऊन शाबासकी देण्याचे सोडून केवळे सामनेवाले कंपनीवर खोटे-नाटे आरोप तक्रारदारांनी केलेले आहेत. तक्रारदारांनी सामनेवाले यांचे मॅनेजरकडे कधीही सीट बदलून मागितले नाही किंवा त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल कल्पना दिली नाही कारण त्यांना कोठलाही त्रास होत नव्हता. तक्रारदारांची मुलगी कु.शितल शिवाजी माने हिने तक्रारदारांना होणा-या गैरसोयीबद्दल दि.05.06.2012 रोजी कार्यालयात अर्ज दिला. हे तक्रारदारांचे कथन पूर्णपणे खोटे आहे. सामनेवाले कंपनीने ही केवळ शारीरिक व मानसीक त्रास यात्रा भ्रमण करण्यासाठी सक्षम असलेल्या यात्राकरुंना सहल घडवित असतात. त्या कारणाने, शारिरीक दृष्टया सक्षम असल्याबद्दलचे अभिवचन घेत असतो व ते खरेच दयावे. त्याकारणाने शारिरीक व मानसीक त्रासापोटी त्रास झाल्यास सामनेवाले कंपनी त्यांची जबाबदारी घेत नाही व त्याबाबत नुकसानभरपाई मागण्याचा हक्क नाही. नियम क्र.4 मध्ये नियमीत लागणा-या औषधांचा पुरेसा साठा व औषधे सोबत घ्यावीत व त्यांनीच ती नियमी घ्यावीत. सामनेवाले एकत्रितरित्या यात्रेकरुंना प्रवास घडवीत असल्यामुळे वैयक्तीक एका यात्रेकरुकडे लक्ष ठेवीत नसते. नियम क्र.5 मध्ये पर्यटन यात्रेदरम्यान प्रकृतीस व परिणामास यात्री स्वत: जबाबदार असतो असे नमुद आहे. वृध्द आजारी व्यक्तीस सोयीसुविधा करण्याचे काम सामनेवाले कंपनी करीत नाही असे स्पष्टपणे करारात नमुद आहे. सामनेवाले कंपनीने रात्री 9.00 वाजता पेट्रो पंपाजवळ घाणेरडया व दुर्गंधीयुक्त वासात जेवण बनविले हे तक्रारदाराचे कथन बिनबुडाचे व बिनपुराव्याचे आहे. सामनेवाले कंपनी हे पर्यटन स्थळाचे ठिकाणी जे स्थानिक नागरीक पाणी पिण्यासाठी वापरतात तेच पाणी पुरविते. त्यामुळे या पाण्याव्यतिरिक्त स्वतंत्र वेगळया पाण्याची व्यवस्था सामनेवाले करीत नसतात. त्यामुळे यात्रेकरुंना जर बाटलीबंद पाणी हवे असल्यास त्यांना त्याची स्वखर्चाने व्यवस्था करावी लागते असे सामनेवाले कंपनीचे यांचेबरोबर करार आहे. तक्रारदाराने तक्रारीत कथन केल्याप्रमाणे सेवा पुरविण्याचा कुठलाही करार सामनेवाले कंपनीने तक्रारदारासोबत केलेला नव्हता व तक्रारदारांनी महत्त्वाची माहिती लपवून ठेवून तक्रार दाखल केले असल्यामुळे सदरचा अर्ज नामंजूर करुन सामनेवाले यांना रक्कम रु.5,00,000/- कॉम्पेनसेटरी कॉस्ट म्हणून सामनेवाले यांना मिळावा अशी विनंती सामनेवाले यांनी केलेली आहे.
7 तक्रारदारांची तक्रार, सामनेवाले क्र.1 व 2 यांची कैफियत, दाखल कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र तसेच उभय पक्षकारांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद तसेच विचार होता न्यायनिर्णसाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | सामनेवाले तक्रारदारांना दयावयांच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय. |
2 | तक्रारदार हे मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय. |
3 | आदेश काय ? | अंतिम निर्णयाप्रमाणे. |
कारणमिमांसाः-
मुद्दा क्र.1:- तक्रारदार क्र.1 व 2 हे पती-पत्नी असून त्यांनी धार्मिक यात्रेसाठी जाण्यासाठी सामनेवाले कंपनीकडे सर्व सोयीसुविधाची चौकशी करुन 79 क्रमांकाच्या 22 दिवसांची गंगासागर, जगन्नाथपुरी, नेपाळ यात्रेसाठी प्रत्येकी रक्कम रु.14,441/- अशी एकूण रक्कम रु.29,822/- देऊन बुकींग केले होते. सामनेवाले क्र.2 यांनी दि.06.04.2012 रोजी रु.5,000/- पर्यंत सीट क्र.3 व 4 प्रिमीयम रेंजमधील तिकीटे दिली. परंतु दि.07.04.2012 रोजी सामनेवाले क्र.2 यांनी प्रिमीयम रेंज सीट क्र.3 व 4 ऐवजी 5 व 6 सीट घेणेविषयी विनंती केली असता, प्रस्तुतची विनंती सामनेवाले यांनी मान्य करुन तक्रारदारांच्या तिकीटाच्या मागील बाजूस सीट क्र.5 व 6 नमुद करुन दिले. दि.15.05.2012 रोजी तक्रारदारांनी उर्वरीत रक्कम रु.19,822/- भरले. तथापि सामनेवाले कंपनीने सीट क्र.5 व 6 न देता तक्रारदारांना सीट क्र.3 व 4 वर बसविले. तक्रारदारांच्या मानसिक अवस्थेची व भावनांची कदर केली नाही. त्यामुळे तक्रारदारांना सदरचे प्रवासामध्ये वेळोवेळी मानसिक, आर्थिक व शारिरीक त्रास होऊन यात्रेचा आनंद उपभोगता आला नाही. सबब, सामनेवाले यांनी तक्रारदारांचेकडून मोबदला स्विकारुन तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्दयाचे अनुषंगाने तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, अ.क्र.1 ते 3 कडे तक्रारदारांनी सामनेवाले कंपनीकडे एकूण रक्कम रु.29,822/- भरल्याचे पावत्यां दाखल केलेल्या आहेत. अ.क्र.4 कडे सीट बुकींग अर्ज असून सदर अर्जावर यात्रेकरुंचे गंगासागर, जगन्नाथपुरी, नेपाळ असे नमुद असून निवासी व्यवस्था कॉमन असे नमुद असून त्यावर तक्रारदारांची सही आहे. दि.06.04.2012 रोजीचे सीट बुकींग पावतीवर सीट क्र.3 व 4 आणि एकूण बुकींग रक्कम रु.29,822/- असे नमुद आहे. सदरचे कागदपत्रांवरुन तक्रारदारांनी सामनेवाले कंपनीला धार्मिक यात्रेसाठी रक्कम रु.29,822/- इतका मोबदला देऊन सीट क्र.3 व 4 बुकींग केले होते असे दिसून येते. त्या कारणाने तक्रारदार हे सामनेवाले कंपनीचे ग्राहक आहेत.
सामनेवाले यांनी तक्रारदारांना योग्य ती सेवा दिली नाही. तक्रारदारांना ड्रायव्हरच्या मागील सीट क्र.1 व 2 दिलेने तक्रारदारांना इंजिनच्या उष्णतेचा त्रास झाला व त्याकारणाने तक्रारदार क्र.2 यांचे बी.पी.वाढले. अशा प्रसंगी समानेवाले कंपनी यांचे प्रतिनिधींनी कोणतीही मदत केली नाही अथवा धीर दिला नाही असे तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केलेले आहे. सदर मुद्दयाचे अनुषंगाने तक्रारदाराने दाखल केलेल्या अ.क्र.5 कडे बुध्दगया येथील वर्मा हेल्थ केअर सेंटरमध्ये घेतलेली औषधे, अ.क्र.6, 7 व 8 कडे स्वस्तिक हॉस्पीटल यांचेकडे घेतलेल्या औषधोपचारांची कागदपत्रे दाखल केलेल्या कागदपत्रांवर त्यांचा बी.पी.-150/100 असे नमुद आहे. तसेच डिस्चार्ज कार्ड वर डायग्नोसीसमध्ये हायपर टेन्शन नमुद असून, अ.क्र.9 कडे बील पावती, एकूण रक्कम रु.5,000/- असे नमुद आहे. अ.क्र.10 व 12 कडे तक्रारदारांनी औषधोपचार खरेदी केल्याची व देसाई पॅथोलॉजी येथे टेस्ट केल्याची पावत्यां दाखल आहेत. वरील सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदार क्र.2 यांना सदर प्रवासामध्ये शारिरीक त्रास झाल्याने त्यांनी वेळोवेळी उपचार घेतलेचे सिध्द होते.
सामनेवाले यांनी तक्रारदारांना योग्य ती सेवा दिली नाही तसेच तक्रारदारांना मानसिक अवस्थेची व भावनाची कदर केली नाही. तक्रारदारांना व इतर सहप्रवाशी यांना यांची संपूर्ण प्रवासात जेवणाची सोय अत्यंत वाईट होती. जेवणाला दर्जा नव्हता, स्वच्छता व सुरक्षिततेचा अभाव होता असे तक्रारदारांनी त्यांचे तक्रारीत नमुद केले आहे. तथापि सामनेवाले यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये, ठरावीक सोयी-सुविधा देण्याचे काम सामनेवाले कंपनी करीत नाही असे स्पष्टपणे करारामध्ये नमुद आहे. त्याकारणाने, यात्रे दरम्यान झालेल्या गैरसोयीबद्दल सामनेवाले जबाबदार नाहीत असे कथन केले आहे. परंतु सामनेवाले यांनी त्या अनुषंगाने कोणताही करार अथवा कागदोपत्री पुरावा या मंचात दाखल केलेला नाही. त्या कारणाने सामनेवाले यांचे हे म्हणणे हे मंच विचारात घेत नाही. तसेच सामनेवाले यांनी तक्रारदारांची तक्रारीतील कथने बिनपुराव्याचे व बिनबुडाचे असल्याने नाकारलेले आहेत. सदर मुद्दयाच्या अनुषंगाने, या मंचाने तक्रारदारांनी दि.20.08.2014 रोजी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, अ.क्र.2 कडील तक्रारदारांची मुलगी-कु.शितल शिवाजी माने हीने दि.05.06.2012 रोजी, संचालक चौधरी यात्रा कंपनी, यांचेकडील अर्जाचे अवलोकन केले असता, सदर अर्जामध्ये काशीमध्ये जेवण व्यवस्था नीट नव्हती, तिथेही दवाखान्यात जायची वेळ आली. सीट क्र.1 व 2 वर उष्णतेचा प्रचंड त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे. सदर प्रवाशाचे वय 66 व 59 असल्याने आम्ही त्यांची मुले प्रचंड तणावात आहोत. सदर यात्रा पूर्ण होणेस अजून 6 दिवस आहेत. उर्वरीत काळात सदर प्रवाशांना योग्य सेवा आणि बुकींग सिट दिल्या व इतर यात्रेकरु विरुध्द योग्य ती कारवाई करण्यात येईल असे नमुद असून त्यावर कु.शितल शिवाजी माने यांची सही आहे. तसेच तक्रारदारांनी दि.28.08.2014 रोजी पुराव्याचे शपथ्पत्र दाखल केले असून सदरचे शपथपत्रामध्ये आम्हीं फेब्रुवारी, 2014 मध्ये सहलीला जाऊन आलो आहोत. सदर सहलीमध्ये आमची शारिरीक तब्बेत उत्तम होती, आम्हांस कोणताही त्रास झाला नाही व परंतु सामनेवाले यांचे सहलीमध्ये प्रचंड त्रास झाला असे नमुद आहे. तसेच तक्रारदार तर्फे अधिकराव निवृत्त शिंदे व विमल शिंदे यांनी पुराव्याचे शपथपत्र दि.31.12.2013 रोजीचे दाखल केलेले असून सदरचे शपथपत्रामध्ये सदर यात्रेमध्ये आमचे बरोबर शामराव माने व त्यांची पत्नी यात्रेमध्ये आल्या होत्या. यात्रेमधील मॅनेजर तसेच स्टाफ यांच्या असहायतेमुळे, बेफीकीरीमुळे, गैरनियोजनामुळे संपूर्ण यात्रेमध्ये मानसिक तणाव व मनस्ताप होऊन यात्रेचा आनंद घेता आला नाही. वेळेवर नाश्ता, जेवण दिले गेले नाही, पेट्रोल पंपावर अगदी टॉयलेटच्या शेजारी घाणेरडया व दुर्गंधीयुक्त ठिकाणी बेचव स्वयंपाक करुन आम्हांला व इतर प्रवयशांना दिला गेला त्या कारणाने अनेक प्रवाशंचे पोट बिघडले. बसमधील फॅनपासून उन्हाळयाचा दिवसामध्ये सुध्दा वा-याची आवश्यकता असताना देखील आम्हांला व इतर प्रवाशांना फॅनचे वारे घेता आलेले नाही. तक्रारदार क्र.1 व 2 यांना ड्रायव्हरच्या सीटच्या मागे सीटवर अवघडलेल्या स्थितीत बसविले होते. तक्रारदार क्र.2 ची तब्बेत बिघडली, त्यांचा बी.पी.वाढल्याने तब्बेत अस्वस्थ झाली. प्रथमोपचार देखील करण्याचे कर्तव्य चौधरी यात्रा कंपनीचे कर्मचा-यांनी केले नाही अथवा औषधोपचार तसेच दवाखान्यात दाखविल्याबाबत कोणतीही मदत अथवा मार्गदर्शन देखील केले नाही. भरमसाट प्रवास खर्चाची उकळणी करुन प्रत्यक्ष प्रवासामध्ये प्रवाशांना देण्यात येणा-या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे आम्हीं प्रत्यक्ष अनुभवले आहे.
वरील सर्व कागदपत्रांचा व पुराव्याचे शपथपत्रांचे या मंचाने बारकार्इने अवलोकन केले असता, तक्रारदारांना सामनेवाले यांच्या असहकार्यामुळे, बेफीरीमुळे संपुर्ण यात्रेमध्ये मानसिक मनस्ताप होऊन यात्रेचा आनंद उपभोगता आलेला नाही. तसेच सामनेवाले यांच्या प्रतिनिधी आणि कर्मचारी यांचेकडून यात्रेचे बुकींग ज्या सेवा सुविधा तसेच प्रवासातील समाधान मिळण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याची कोणतीही परिपुर्णत: सामनेवाले यांचेकडून झालेली नाही असे दिसून येते. त्याकारणाने, सामनेवाले कंपनीने तक्रारदार यांचेकडून मोबदला स्विकारुन देखील तक्रारदारांना दयावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2:- उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता, तक्रारदारांनी 22 दिवसांची यात्रा सामनेवाले कंपनीकडे बुकींग केलेल्या तिकीटाप्रमाणे उपभोगलेली आहे. तथापि सामनेवाले कंपनीने तक्रारदारांना दयावयाच्या सोयी सुविधा, जेवण-खाणे-पाणी यामधील स्वच्छतेचा अभाव, हीन दर्जाची वागणूक देऊन तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे. तक्रारदारांना शारिरीक, मानसिक त्रास सोसावा लागला, त्याकारणाने तक्रारदार हे, दवाखाना, औषधोपचार खर्च रक्कम रु.7,154/- तसेच आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईकरीता रक्कम रु.8,000/- तसेच इतर खर्च रक्कम रु.5,000/- अशी एकूण रक्कम रु.20,154/- व सदर रक्कमेवर तक्रार दाखल दि.13.03.2013 पासून सदरची रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.9% व्याज मिळण्यास पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3:- सबब, हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येतो.
- सामनेवाले यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रुटी केल्याने तक्रारदारास शारिरीक व मानसिक त्रासापोटी व तक्रार अर्जाचे खर्चापोटी अशी एकूण रक्कम रु.20,154/- व सदर रक्कमेवर तक्रार दाखल दि.13.03.2013 पासून सदरची रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.9% व्याज अदा करावे.
- आदेशाच्या प्रमाणीत प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.