श्रीमती. अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 25 एप्रिल 2012
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणार यांनी बांधलेल्या श्रीनिधी अपार्टमेंट, सर्व्हे नं 52/35, कोथरुड, पुणे मध्ये सदनिका क्र.27 सन 2005 मध्ये खरेदी केली. दिनांक 15/12/2005 पासून तक्रारदार सदरहू सदनिकेमध्ये रहात आहेत. सन 2006 मध्ये पावसामुळे सदनिकेतील पाण्याची, भिंतींमधील ओल तक्रारदारांच्या लक्षात आली. अपुर्ण दुरुस्त्यांमुळे तक्रारदारांनी सदनिकेचे खरेदीखत आजपर्यन्त करुन घेतले नाही. जाबदेणार यांनी यासंदर्भात तक्रारदारांना स्मरणपत्र देखील पाठविलेले आहे. अपुर्ण कामे तक्रारदारांनी जाबदेणार यांना सांगितली. काही कामे पूर्ण झाली परंतु काही अपूर्णच आहेत. भिंतीमधील ओल अजुनही थांबलेली नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार सदनिकेतील दोष खात्रीपुर्वक, संपुर्णत:, व्यवस्थितरित्या दुरुस्त करुन मागतात, तसेच मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 1,00,000/- व तक्रारीचा खर्च मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. सदनिकेचा ताबा घेतल्यानंतर सुमारे तीन वर्षानंतर तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. तक्रार दाखल करण्यास कारण घडलेले नाही. तक्रारीत नमूद केलेले सदनिकेतील दोष आजमितीस अस्तित्वात नाहीत. सदनिकेचा ताबा देतांना सर्व कामे पूर्ण झालेली होती. तक्रारदारांनी दिनांक 15/12/2005 ची ताबा पावती लिहून दिलेली आहे. ताबा दिल्यानंतर जुन 2006 मध्ये पहिल्या पावसाच्या वेळी भिंतीला आलेल्या ओली बद्यल तक्रारदारांनी तक्रार केल्यानंतर तेथे वॉटर प्रुफिंगचे काम करुन देण्यात आलेले आहे. उर्वरित काम जुन 2008 मध्ये करण्यात आलेले आहे. सध्या भिंतीमधील ओल कशामुळे आलेली आहे याचा खुलासा तक्रारदारांनी केलेला नाही. करारातील स्पेसिफिकेशन्स नुसार कामे पुर्ण करण्यात आलेली आहेत. तक्रारदारांनी ताबा घेतल्यानंतर त्यांच्या टॉयलेट ब्लॉक मध्ये काही बदल केलेले आहेत त्यामुळे गळती होत असेल तर त्यास जाबदेणार जबाबदार नाहीत. तक्रारदारांनी वेळोवेळी केलेल्या तक्रारींचे जाबदेणार यांनी निराकरण केलेले आहे. जाबदेणार यांच्या सेवेत त्रुटी नाही म्हणून तक्रार खर्चासह नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली.
3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने अवलोकन केले. तक्रारदारांनी सदनिकेचा ताबा दिनांक 15/12/2005 रोजी घेतला असे तक्रारीत नमूद केलेले आहे. सन 2006 च्या पावसामुळे त्यांच्या सदनिकेमध्ये ओल येत होती. यासाठी व सदनिकेतील काही अपुर्ण बांधकाम राहिले म्हणून ही तक्रार जाबदेणार यांच्याविरुध्द दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी सन 2005 मध्ये सदनिकेचा ताबा घेतला व सदनिकेत ओल आली व अपूर्ण बांधकाम पूर्ण व्हावे म्हणून जाबदेणार यांच्याविरुध्द सन 2009 मध्ये प्रस्तूत तक्रार दाखल केलेली आहे. यासाठी तक्रारदारांनी सन 2007 पर्यन्त तक्रार दाखल करावयास हवी होती. तक्रारदारांनी विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला नाही. ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 24 ए नुसार तक्रार मुदतबाहय आहे. तक्रारदारांनी तक्रारीमध्ये जाबदेणार खरेदीखत करुन देण्यास तयार आहेत असे नमूद केलेले आहे. परंतु अपूर्ण बांधकामामुळे तक्रारदार स्वत: खरेदीखत करुन घेत नाहीत असे तक्रारीतच नमूद करतात. जाबदेणार यांच्या दिनांक 31/07/2008 च्या पत्रावरुन व जाबदेणार यांच्या लेखी जबाबावरुन असे दिसून येते की ते खरेदीखत करुन देण्यास तयार होते परंतु तक्रारदारच खरेदीखत करुन घेण्यास तयार नव्हते. यामध्ये जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी मंचास दिसून येत नाही. म्हणून तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून खरेदीखत करुन घ्यावे असे तक्रारदारांना आदेश देऊन मंच तक्रारदारांची तक्रार मंच नामंजुर करीत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
2. खर्चाबद्यल आदेश नाही.
आदेशाची प्रत दोन्ही पक्षांस विनामूल्य पाठविण्यात यावी.