जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 327/2010. तक्रार दाखल दिनांक : 20/05/2010. तक्रार आदेश दिनांक :24/11/2010. श्री. अरुण कृष्णात जमाले, वय 56 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. कसबे तडवळे, ता. जि. उस्मानाबाद. तक्रारदार विरुध्द चोलामंडलम एम.एस. जनरल इन्शुरन्स कं.लि., पहिला मजला, 82, रेल्वे लाईन्स्, कनाळे प्लाझा, डफरीन चौक, सोलापूर (समन्स/नोटीस मॅनेजर यांच्यावर बजवावी.) विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : जी.एच. कुलकर्णी विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : एस.सी. नदाफ आदेश सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांचे वाहन क्र.एम.एच.25/आर.5051 हे विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपामध्ये 'विमा कंपनी') यांच्याकडे पॉलिसी क्र.3362/00306517/000/00 अन्वये दि.27/10/2008 ते 26/10/2009 कालावधीकरिता रु.7,32,810/- करिता विमा संरक्षीत करण्यात आलेले आहे. घटना घडेपर्यंत त्यांना पॉलिसीच्या अटी व शर्ती पुरविलेल्या नाहीत. तक्रारदार दि.7/6/2009 रोजी वैयक्तिक कामानिमित्त बारामती येथे गेले असता वाहनाच्या इंजीनमध्ये आवाज येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वाहनाच्या दुरुस्तीकरिता रु.1,09,561/- खर्च येणार असल्याचे अंदाजपत्रक देण्यात आले आहे. त्याबाबत विमा कंपनीस कळविले असता विमा कंपनीने स्पॉट सर्व्हे केला. तक्रारदार यांनी क्लेम फॉर्म, इस्टीमेट व वाहनाची इतर कागदपत्रे विमा कंपनीस वेळोवेळी सादर केली आहेत. वारंवार पाठपुरावा करुनही विमा कंपनीने त्यांना क्लेमबाबत कळविले नाही आणि त्यानंतर क्लेम नाकारल्याबाबत तोंडी सांगितलेले आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन विमा रक्कम रु.1,05,261/- व्याजासह मिळावी आणि नुकसान भरपाई व खर्चापोटी एकूण रु.20,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे. 2. विमा कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विमा जोखीम देण्याचा करार हा निश्चित अटी व शर्तीस अधीन राहून आहे. विमा कंपनीने त्यापृष्ठयर्थ 2 (1999) सी.पी.जे. 13 (एन.सी.) व 1 (2009) सी.पी.जे. 6 (एस.सी.) या निवाडयाचा संदर्भ घेतला आहे. तक्रारदार यांनी वाहन चालविण्याकरिता असलेल्या मानदंडाप्रमाणे वाहन चालविले नाही आणि वाहनामध्ये ऑईल न भरल्यामुळे वाहन थांबून त्यामध्ये आवाज निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. आनुषंगिक हाणी झाल्यामुळे तक्रारदार यांचा क्लेम नाकारला असून तक्रारदार नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र नाहीत आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांच्या फोर्ड फिएस्टा वाहन क्र. एम.एच.25/ आर.5051 चा विमा कंपनीकडे विमा उतरविण्यात आल्याविषयी विवाद नाही. तसेच दि.7/6/2009 रोजी तक्रारदार हे वैयक्तिक कामानिमित्त बारामती येथे गेले असता वाहनाच्या इंजीनमध्ये आवाज येऊन वाहन बंद पडल्याविषयी विवाद नाही. तसेच तक्रारदार यांनी वाहनाची दुरुस्ती केल्याविषयी विवाद नाही. 5. तक्रारदार यांना विमा रक्कम न मिळाल्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करण्यात आली आहे. उलटपक्षी, विमा कंपनीने क्लेम नाकारल्याचे नमूद करुन त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्याचे म्हटले आहे. विमा कंपनीने प्रामुख्याने विमा करार हा पॉलिसीच्या अटी व शर्तीस अधीन असल्याचे नमूद करुन कराराचा भंग झाल्यास करार अवैध ठरतो, असे नमूद केले आहे. 6. विमा कंपनीने विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती रेकॉर्डवर दाखल केलेल्या नाहीत. तसेच तक्रारदार यांच्याकडून कोणत्या अटी व शर्तीचा भंग झालेला आहे, हे स्पष्ट केलेले नाही. विमा कंपनीने रेकॉर्डवर स्पॉट सर्व्हे व असेसमेंट रिपोर्ट दाखल केला आहे. विमा कंपनी रु.16,845/- रक्कम देण्यास जबाबदार असल्याचे असेसमेंट रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. वास्तविक पाहता, सदर रिपोर्टमध्ये केवळ पाच स्पेअर पार्टसचे मुल्यांकन केलेले आहे. परंतु तक्रारदार यांच्या वाहनाकरिता विविध प्रकारचे पार्ट बसवून दुरुस्ती केल्याच्या पावत्या रेकॉर्डवर आहेत. त्याप्रमाणे तक्रारदार यांना रु.1,09,561/- खर्च आल्याचे निदर्शनास येते. तक्रारदार यांच्या वाहनाच्या दुरुस्तीकरिता रु.1,09,561/- खर्च आलेला असताना सर्व्हेअरने दुरुस्ती खर्चाचे मुल्यांकन करण्यासाठी सर्व पार्ट का विचारात घेतले नाही ? याचा खुलासा करण्यात आलेला नाही. तक्रारदार हे वाहनाकरिता करावा लागलेला संपूर्ण खर्च मिळविण्यास पात्र ठरतात आणि सदर रक्कम न देऊन विमा कंपनीने सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे, या अंतीम निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. तक्रारदार हे रु.1,05,261/- तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास पात्र ठरतात. 7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना रु.1,05,261/- दि.20/5/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना उपरोक्त नमूद रक्कम तीस दिवसाचे आत न दिल्यास मुदतीनंतर त्यावर द.सा.द.शे. 12 टक्के व्याज द्यावे. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/201110)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONORABLE Miss Sangeeta S Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |