::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 08.02.2012) 1. अर्जदाराने, प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत गै.अ. चे विरुध्द वाहन दुरुस्ती खर्च मिळण्याकरीता दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात येणे प्रमाणे.
2. अर्जदार यांनी स्वतःचे उपजिविके करीता महिन्द्रा अन्ड महिन्द्रा लिमी कंपनीचे चॅम्पीयन अल्फा पास ऑटो क्र. एम.एच. 34/डी – 6011 विकत घेतला. अर्जदाराने सदर महिन्द्रा ऑटोचा विमा पॉलिसी क्र. 3368/00310009/000/01 दि.06/01/2010 ते 5/1/2011 पर्यंत विमाकृत होता. ऑटो ची विमा कंपनीने ठरविलेली किंमत 1,32,953/- रु होती. 3. अर्जदार दि. 22/05/2010 रोजी मामाच्या घरी गडचांदुर येथे गेला होता. राञी मुक्काम करुन सकाळी 8.15 चे दरम्यान ऑटोने परत टेम्बुरवाही येथे जाण्यास निघाला असता राजुरा रोडने गडचांदुर येथील रेल्वेलाईन क्रॉसिंग केली असता, समोरुन एक पांढ-या रंगाची टाटा सुमो क्र. एम.एच.31/झेड- 9388 येताना दिसली. टाटा सुमो अती वेगात आली. टाटा सुमोच्या ड्रायव्हरने एकदम ब्रेक लावल्याने अर्जदारा-याचे ऑटोला आदळली. तेव्हा ऑटो पलटी झाला सदर अपघातात अर्जदाराचा उजवा पाय ऑटोखाली दबून फ्रॅक्चर झाला, हाताला व छातीला मार लागला. येणा-या-जाणा-या लोकांनी अर्जदाराला बाहेर काढले. अर्जदाराने अपघातानंतर महिन्द्रा अन्ड महिन्द्रा कंपनी लिमिटेड शोरुम मे.प्रोव्हीशियल ऑटोमोबाईल कंपनी लिमी.चंद्रपूर मध्ये दुरुस्ती करीता दाखल केले. अपघाताची सुचना गै.अ.ला दिली. विम्याच्या नियमानुसार नुकसान भरपाईची मागणी केली. गै.अ. नी क्लेम क्र. 3368006849 पंजीबध्द करुन अपघातग्रस्त अटोचे श्री. पोद्दार मार्फत निरिक्षण केले. त्यानुसार दुरुस्ती खर्च रु.60,000/- होणार असल्याचा निष्कर्ष काढला. जेव्हा की, मे.प्रोव्हीशियल अटोमोबाईल कंपनी लिमी. यांनी दुरुस्तीचा खर्च रु.1,26,038/- होणार असल्याचे सांगीतले. गै.अ. यांनी नुकसान भरपाई दिलेली नसल्याने, वकील श्री. एम.आर देवाळकर मार्फत दि.14/1/11 रोजी नोटीस पाठविला. परंतु आजपर्यंत गै.अ. ने विम्याच्या नियमानुसार भरपाईची रक्कम अर्जदारास दिलेली नाही. 4. गै.अ. ने दुरुस्तीचा खर्च देण्यास टाळाटाळ केली असल्याने अटो दुरुस्तीचा खर्च रु.1,26,038/- स्वतःचे खिशातुन देऊन दुरुस्त करावा लागला. अर्जदाराने ऑटो दि. 15/4/11 रोजी दुरुस्त करुन आणला. गै.अ. ने अर्जदाराची कायदेशीर मागणी टाळत असुन दुरुस्तीचा खर्च देण्यास टाळण्यासाठी बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करीत आहे. गै.अ. चे सदर कृत्य अनुचित व्यापार पध्दती असुन न्युनतापूर्ण सेवा आहे. गै.अ.याने अर्जदाराच्या मागणीची पूर्तता 1 वर्षापेक्षा जास्त काळापर्यंत पूर्ण केलेली नाही. अर्जदारास फायनान्स ची रक्कम चुकवावी लागली आहे. अर्जदार दरमहा रु 15,000/- कमवीत होता. आटो नादुरुस्त राहील्याने कमाईचे साधना पासुन मुकावे लागले. अर्जदाराने व्यवसायात कमविलेली पत आणि जोडलेले संबंध दुरावलेले आहे. अर्जदाराला नाहक मानसिक, शारीरीक ञास व व्यवसायात नुकसान सहन करावे लागले असुन आजही सहन करावे लागत आहे. अर्जदाराने आटो दुरुस्तीचा चुकविलेला खर्च रु, 1,26,038/- गै.अ. यास देण्याचे निर्देश दयावे. अर्जदारास मानसीक, शारीरीक ञासापोटी रु. 50,000/- आणि व्यवसायात झालेल्या नुकसानी करीता रु.1,80,000/- गै.अ.यास देण्याचे निर्देश दयावे व तक्रार खर्च रु,10,000/- गै.अ. वर लादुन अर्जदारास देण्यात यावे. तसेच सर्व रक्कमेवर 12 टक्के द.सा.द.शे. व्याज विमा रक्कमेची मागणी केल्यापासुन, रककम मिळे पर्यंत गै.अ. कडून देण्यात यावी अशी प्रार्थना केली आहे. 5. अर्जदाराने तक्रारी सोबत नि. 4 नुसार एकूण 15 झेरॉक्स दस्तऐवज दाखल केले. तक्रार दि.1/10/11 ला स्विकृत करुन गै.अ. यास नोटीस काढण्यात आले. गै.अ. हजर होवून आशीष विठ्ठल कापसे सिनियर मॅनेजर क्लेम नागपूर, यांचे पावर ऑफ अटर्नी व्दारे नि. 12 नुसार लेखीउत्तर सादर केले. 6. गै.अ. यांनी नि. 12 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात कथन केले की, प्रस्तुत तक्रार ही पूर्णपणे बनावटी, खोटी असल्याने खारीज करण्यात यावी अर्जदार गै.अ. कडे आला व वाहतूक पॅकेज अंतर्गत विमा पॉलीसी घेतली. प्रिमियम रु.3,221/- भरणा केला पॉलीसी क्र. 3368/00310009/01 विमा कालावधी 6/1/10 ते 5/1/11 च्या मध्यराञी पर्यंत ची विमा पॉलीसी चॅम्पीयन अल्फा पास एम.एच 34/डी 6011 काढली. विमा पॉलीसीच्या शर्ती व अटीनुसार काढली असुन IDV 1,32,953 ठरविण्यात आली. पॉलीसी व त्याचे शेडयुल विमा धारकास देण्यात आले. हे म्हणणे खोटे आहे की, अर्जदार दि. 22/5/10 ला मामाचे गावाला गेला होता. परत येताना रेल्वे क्रॉसीग जवळ टाटा सुमो क्रं.एम.एच 31/झेड - 9388 ने धडक दिली. हे म्हणणे अमान्य आहे की, रु. 1,26,038/- चा इस्टीमेट गॅरेज ने दिला. हे म्हणणे खोटे आहे की, अर्जदार यास गै.अ. कायदेशीर जबाबदारी टाळून विमा दावा देण्यास टाळाटाळ करीत आहे. अर्जदाराची तक्रार अमान्य असुन अर्जदार गै.अ. कडून कोणताही विमा दावा मिळण्यास पाञ आहे हे म्हणणे अमान्य आहे. अर्जदाराने केलेली मागणी अमान्य आहे. 7. गै.अ.यांनी लेखी बययानातील विशेष कथनात कथन केले की, प्रस्तुत तक्रार व्देषबुध्दीने, जास्तीचा लाभ गै.अ. कंपनी कडून मिळण्याकरीता दाखल केले आहे. अर्जदारास सत्य परिस्थिती माहीत असुन हेतुपुरस्परपणे मंचासमोर न आणता, सत्य माहीती लपवून, स्वच्छ हाताने तक्रार आणली नाही. या कारणावरुन तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. 8. अर्जदारास तक्रार दाखल करण्याची लोकसस्टॅन्डी नाही. सेवा देण्यात न्युनता केल्याची केस नाही. त्यामुळे तक्रार मंचाचे अधिकार क्षेञात ग्राहक संरक्षण कायद्या 1986 च्या अंतर्गत येत नाही, यावरुनही तक्रार खारीज करण्यात यावी. तक्रार कायद्याच्या दृष्टीने तसेच वस्तुस्थिती नुसार मान्य (Maintainable) नाही, यावरुनही तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. अर्जदाराने तक्रारीत केलेली प्रार्थना तांञीक स्वरुपाची असुन इतर कायदेशीर बाबीचा समावेश असल्याने मंचाच्या अधिकार क्षेञाबाहेरील आहे. अर्जदाराची तक्रार खोटी, बनावटी व खोटे कथनाचे आधारावर असल्याने ग्राहक सरंक्षण कायद्या 1986 चे कलम 26 प्रमाणे रु. 10,000/- खर्च लादुन खारीज करण्यात यावी.
9. अर्जदाराने तक्ररीच्या कथना पृष्ठार्थ नि. 15 नुसार सरतपासणी शपथपञ दाखल केला. तसेच नि. 17 नुसार मूळ 11 दस्तऐवज दाखल केले. अर्जदाराने आपले तर्फे साक्षदार दिवाकर महादेव धोंगडे यांचे शपथपञ अ – 11 नुसार दाखल केला. गै.अ.यांनी लेखीउत्तरातील मजकुर पुरावा शपथपञ म्हणून स्विकारीत आहे अशी पुरसीस नि. 19 दाखल केले. तसेच नि. 21 च्या यादी नुसार क्लेम फॉर्म, सर्व्हे रिपोर्ट, गै.अ.यांचे पञ असे 3 दस्तऐवज दाखल केले. 10. अर्जदार व गै.अ. यांनी दाखल केलेले दस्तऐवज शपथपञ व उभय पक्षाच्या वकीलांनी केलेल्या तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे : उत्तर 1) अर्जदाराची तक्रार मंचाला चालविण्याचा अधिकार आहे काय ? : होय 2) अर्जदार वाहन क्र. एम.एच.34/डी- 6011 चे दुरुस्तीचा खर्च मिळण्यास पाञ आहे काय ? : विवेचनानुसार 3) गै.अ.यांनी सेवा देण्यात न्युनता केली आहे काय ? होय. 4) या तक्रारीचा अंतिम निकाल काय ? :अंतिम आदेशा प्रमाणे // कारण मिमांसा // मुद्दा क्र. 1 : 11. अर्जदाराने वाहन क्र. एम.ए. 34/ डी - 6011 ला दि. 23/5/10 रोजी झालेल्या अपघातामुळे दुरुस्तीचा खर्च मिळण्याकरीता ही तक्रार दाखल केली आहे. गै.अ यांनी लेखीउत्तरात असा मुद्दा उपस्थिज केला की, तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्या 1986 च्या तरतुदी अंतर्गत मंचाच्या अधिकार क्षेञाबाहेरील आहे. त्यामुळे तक्रार खारीज करण्यात यावी. गै.अ यांनी अधिकार क्षेञाचा उपस्थित केलेला मुद्दा संयुक्तिक नाही. गै.अ यांनी अर्जदाराच्या मालकीच्या वाहनाचा विमा काढला होता. हे मान्य केले आहे. गै.अ ने अर्जदार हा ग्राहक नाही असा मुद्दा घेतलेला नाही. तरी, तक्रार मंचाचे अधिकार क्षेञाबाहेरील आहे या गै.अ च्या म्हणण्यात काहीही तथ्य नाही. अर्जदाराने गै.अ कडून विमा काढला आहे. आणि विमा कालावधीतीत वाहनाचा अपघात झाला आहे. वाहन दुरुस्तीचा खर्च मिळण्याकरीता क्लेम सादर केला. गै.अ यांनी अर्जदारास क्लेमची रक्कम मागणी करुनही दिली नाही. ही गै.अ ची सेवेतील न्युनता असल्याने तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे तरतुदी अंतर्गत निकाली काढण्या पाञ आहे. अर्जदाराने तक्रारीत 20 लाखापेक्षा कमी रकमेचा तक्रार दाखल केला आहे.त्यामुळे गै.अ याने उपस्थित केलेला अधिकार क्षेञाचा मुद्दा ग्राहय धरण्यास पाञ नाही असे या न्यायमंचाचे ठाम मत असल्याने मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे. मुद्दा क्र. 2 व 3 : 12. अर्जदार याने तक्रारी सोबत अ- 1 वर प्रथम सुचना रिपोर्टची प्रत दाखल केली. त्यात दि. 23/05/2010 रोजी सकाळच्या वेळात गडचांदुर ते राजुरा रोड हिंदुस्थान पेट्रोलपंप समोर पांढ-या रंगाच्या टाटा सुमो क्र. एम.एच.31 झेड/ 9388 ने धडक दिल्यामुळे ऑटो पलटी होवून वाहनाचे नुकसान झाले. अर्जदाराने अपघातानंतर महिन्द्रा अन्ड महिन्द्रा कंपनीचा अधिकृत दुरुस्ती केंद्र मेसर्स प्रोव्हीशियल ऑटोमोबाईल चंदपूर यांचेकडे दुरुस्ती करीता नेण्यात आला. अधिकृत दुरुस्ती केंद्राकडून वाहनाची पाहणी केल्यावर इस्टीमेंट तयार करुन दिला. सदर इस्टीमेट नुसार दुरुस्तीचा खर्च रु.1,26,038/- सांगीतला. परंतु गै.अ यांनी दुरुस्तीचा खर्च देण्यास टाळाटाळ केली. अर्जदाराने गै.अ कडून रु.1,26,038/- ची मागणी केली आहे. त्याकरीता प्रोव्हीशियल ऑटोमोबाईल चंद्रपूर यांना दिलेल्या रकमेच्या पावत्या दाखल केल्या आहेत. सदर पावत्या नि. 17 च्या यादी प्रमाणे दाखल आहेत. अर्जदाराच्या तक्रारीतील कथनानुसार दि.15/4/2011 रोजी दुरुस्तीच्या खर्चाची रक्कम देऊन वाहन आणले आहे. दस्त अ-3 टॅक्स इन्वाईस मध्ये 1,15,815/- चा आहे. गै.अ यास दिलेला पञ अ-4 मध्ये 1,20,000/- ची मागणी केले. तसेच वकील नोटीस अ-8 मध्ये सुध्दा 1,20,000/- मागणी केली आहे आणि आता तक्रार मध्ये 1,26,038/- ची मागणी करीत आहे. यावरुन अर्जदार वेळोवेळी वेगवेगळा दुरुस्ती खर्च, क्लेम केलेला आहे. 13. अर्जदार यांनी वाहन दुरुस्ती खर्च म्हणून रु. 1,26,038/- मागणी केली परंतु त्याबाबत ठोस पुरावा दाखल केलेला नाही. अर्जदाराने नि. 17 च्या यादीनुसार मे. प्रोव्हीशियल ऑटोंमोबाईल्स चंद्रपूर यास दिलेल्या रक्कमेच्या पावत्या दाखल केलेल्या आहे. वाहन दुरुस्ती करीता 19/6/2010 पासुन 30/3/2011 पर्यंत दिलेल्या रक्कमे संदर्भात आहेत. सदर दिलेली रक्कम ही वाहन क्र. एम.एच.34/डी – 6011 ला झालेल्या नुकसान संदर्भातील आहे असे स्प्ष्ट होत नाही. अ-3 टॅक्स इन्वाईस ही 28/3/11 ची असुन दि.30/3/11 ला 48815 ची पावती आहे अशा स्थितीत ठोस पुरावा अर्जदाराने सादर केला नाही. प्रोव्हीशियल ऑटोमोबाईल्सला दिलेल्या रकमेवरुन दुरुस्ती खर्चाची अर्जदाराची मागणी ग्राहय धरता येणार नाही. त्याकरीता तज्ञांचा अहवाल किंवा सर्व्हे रिपोर्ट असणे आवश्यक आहे. अर्जदार याने मेसर्स प्रोव्हीशियल ऑटोमोबाईल्स यांनी दि. 23/5/10 रोंजी झालेल्या अपघातातील वाहन दुरुस्ती करीता रु.1,15,815/- मिळाले. याबाबतचा शपथपञ सादर केला नाही. त्यामुळे अर्जदाराने रु. 1,26,038/- ची केलेली मागणी मंजुर करण्यास पाञ नाही. अर्जदाराने विमा पॉलीसी प्रत दाखल केले त्यात वाहनाचा 2008 पासुनचा घसारा काढून रु.1,32,953/- विमा मुल्य (IDV) निश्चित केले आहे. एवढी IDV च्या वाहनाला दुरुस्तीचा खर्च 1,26,038/- असल्याचा इस्टीमेट दिला. असे अर्जदाराचे म्हणणे आहे. अशा वेळी सदर अपघातग्रस्त वाहन हे टोटल लॉस होवू शकतो. परंतु अर्जदाराचे वाहनास तेवढा लॉस झालेला नव्हता त्यामुळे श्री. पोद्दार यांनी वाहनाचा सर्व्हे केला असताना वाहन दुरुस्तीचा खर्च 61,709.69/- एवढा काढलेला आहे. गै.अ यांनी सर्व्है रिपोर्ट ची प्रत नि. 21 च्या यादी नुसार दाखल केलेली आहे. सदर सर्व्हे रिपोर्ट हा ठोस पुरावा म्हणून ग्राहय धरण्यास पाञ आहे. अर्जदाराने सदर सर्व्है रिपोर्ट चुकीचा आहे असा दुसरा कुठलाही पुरावा रेकॉर्डवर आणलेला नाही. किवा फायनल सर्व्हे रिपोर्ट सुध्दा रेकॉर्डवर नाही. त्यामुळे कायद्याचे दृष्टीने श्री पोद्दार यांचा सर्व्है रिपोर्ट ग्राहय धरण्यास पाञ आहे. गै.अ यांचे वकीलांनी मा. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्ली यांनी ओरियंटल इंन्सुरन्स कंपनी लिमी. विरुध्द मेहता उल स्टोर III (2007) CPJ 317 (NC) या प्रकरणाच्या न्यायनिवाडयाची प्रत सादर केले. सदर न्यायनिवाडयात दिलेल्या मताप्रमाणे सर्व्हेअरचा रिपोर्ट हा ठोस पुरावा म्हणून ग्राहय धरण्यात यावा असा आहे. सदर मत याप्रकरणालाही लागु पडतो. यावरुन अर्जदार वाहन दुरुस्तीचा खर्च श्री पोद्दार यांचे सर्व्हे रिपोर्ट पुरावा म्हणून ग्राहय धरण्यास पाञ आहे त्यानुसार रु, 61,709.69/- पूर्ण आकडयात 61,710/- रु. मिळण्यास अर्जदार पाञ आहे. 14. गै.अ यांचे वकीलांनी युक्तीवादात असे सांगीतले की श्री पोद्दार यांचे सर्व्हे रिपोर्ट नुसार रु.60,000/- देण्यास तयार होता. परंतु अर्जदाराने ती रक्कम स्विकारली नाही व जास्त रकमेची मागणी केली. गै.अ यांचे हे म्हणणे ग्राहय धरण्यास पाञ नाही. गै.अ यांनी अर्जदारास रु.60,000/-चा धनादेश पाठविला परंतु तो घेतला नाही. याबाबत कोणताही दस्ताऐवज दाखल नाही. उलट गै.अ.यास श्री. पोद्दार यांनी दि. 12 जुलै 2010 ला सर्व्हे रिपोर्ट सादर केला. त्यानंतर धनादेशाव्दारे वाहन दुरुस्तीचा खर्च अर्जदारास देण्याची जबाबदारी गै.अ ची होती. परंतु गै.अ यांनी आजपर्यत वाहन दुरुस्तीचा क्लेम सर्व्हे रिपोर्ट नुसार दिला नाही. ही सेवेतील न्युनता असल्याची बाब सिध्द होतो. गै.अ यांनी न्युनतापूर्ण सेवा दिलेली आहे या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असुन अर्जदार वाहन दुरुस्तीचा खर्च रु. 61,710/- सर्व्हे रिपोर्ट मिळाल्याचा दि.12 जुलै 2010 च्या नंतर 1 महिना म्हणजेच 12 ऑगस्ट 2010 पासुन व्याजासह रक्कम देण्यास गै.अ पाञ आहे. 15. गै.अ यांनी अर्जदारास विमा क्लेम देण्यास विलंब केल्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे तसेच मानसीक, शारीरीक ञास अर्जदारास सहन करावा लागला. गै.अ यांनी विमा क्लेम देण्यास विलंब केल्यामुळे उपजिविकेच्या कमाई पासुन वंचीत रहावे लागले. दरमहा 15,000/- रु. कमवीत असल्याचे कथन तक्रारीत केले आहे. याचे पृष्ठार्थ अर्जदाराने साक्षदार दिवाकर धोंगडे याचा शपथपञ अ-11 नुसार दाखल केला. त्यातही रु. 15,000/- अर्जदार कमवीत होता. तो सुध्दा ऑटो चालक आहे हे शपथेवर सांगीतले आहे. सदर साक्षदाराचे कथन व अर्जदाराचे कथन यावरुन आर्थिक नुकसान झाले ही बाब स्पष्ट होतो. त्यामुळे गै.अ नुकसान भरपाई, दुरुस्तीच्या खर्चा व्यतिरिक्त देण्यास पाञ आहे असे या न्यायमंचाचे ठाम मत असल्याने मुद्दा क्रं. 2 चे उत्तर विवेचनानुसार व मुद्दा क्र. 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे. मुद्दा क्र. 4 वरील मुद्दा क्र. 1 ते 3 च्या विवचनेवरुन तक्रार अंशतः मंजुर करण्यास पाञ आहे. या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश // (1) गै.अ याने आटो क्र. एम.एच.34/ डी - 6011 च्या दुरुस्तीचा खर्च रु. 61,710/- दि. 12 ऑगस्ट 2010 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने आदेशाच्या दिनांकापासुन 30 दिवसाचे आत दयावे. (2) गै.अ ने सालव्हेज स्वतःकडे घ्यावे. (3) गै.अ ने अर्जदारास आर्थिक नुकसानीपोटी रु.20,000/- आणि मानसीक,शारीरीक ञासापोटी रु. 2,000/- आदेशाच्या दिनांकापासुन 30 दिवसाचे आत दयावे. (4) गै.अ ने अर्जदारास तक्रारीच्या खर्चापोटी रु. 1,000/- आदेशाच्या दिनांकापासुन 30 दिवसाचे आत दयावे. (5) गै.अ.वरील मुद्दा क्रं. 1 चे पालन विहीत मुदतीत न केल्यास सदर रक्कम अर्जदाराचे पदरी पडे पर्यंत 12 टक्के व्याज देय राहील. (6) अर्जदार व गै.अ. यांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक : 08/02/2012. |