जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 47/2016.
तक्रार दाखल दिनांक : 19/01/2016.
तक्रार आदेश दिनांक : 08/12/2016. निकाल कालावधी: 00 वर्षे 10 महिने 19 दिवस
योगेश यशवंतराव कामे, वय 33 वर्षे,
रा. कोट गल्ली, उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
चोलामंडलम एम.एस. जनरल इन्शुरन्स कंपनी,
हेड ऑफीस, दारे हाऊस, सेकंड फ्लोअर क्र.2,
एन.एस.सी. बोस रोड, चेन्नई, द्वारा : चोलामंडलम
एम.एस.जी.आय.सी. लि., ब्लॉक नं.3, मालिनी बिल्डींग,
विश्वास नगर, होटगी रोड, सोलापूर 413 003. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ : पी.डी. शिंदे
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : डी.आर. कुलकर्णी
न्यायनिर्णय
श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारकर्ता यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, चोलामंडलम एम.एस. जनरल इन्शुरन्स कंपनीच्या उस्मानाबाद येथील कार्यालयातून त्याच्या महिंद्रा मॅक्स पिक-अप कमर्शियल वाहन रजि. क्र.एम.एच.12/एफ.डी.1663 चा दि.18/9/2012 रोजी रु.2,72,000/- रकमेचा दि.19/9/2015 ते 18/9/2016 कालावधीकरिता विमा उतरवलेला होता. तक्रारकर्ता दि.23/9/2015 रोजी सदर वाहनाने पुणे येथून परत येत असताना भिगवनजवळ दुस-या वाहनाशी धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये गाडीचे रेडीएटर, वॉटर बॉडी, रेडीएटर फॅन, पाटे, ग्लास, बम्पर, मडगार्ड, बोनट, स्टेअरींग, बॉल्टी, चेसी बेंड इ. नुकसान झाले. विरुध्द पक्ष यांनी सर्व्हे व पंचनामा केल्यानंतर त्यांच्या सूचनेप्रमाणे त्याने उस्मानाबाद येथील बिलाल शो-मेकर व नसीर शो-मेकर अॅन्ड स्प्रे पेंटीग येथे वाहनाचे काम केले. तक्रारकर्त्याला वाहन दुरुस्तीसाठी रु.74,250/- व पेंटींगसाठी रु.14,000/- असा रु.88,250/- खर्च आला. त्यानंतर विरुध्द पक्ष यांनी त्यास रु.22,000/- पेक्षा जास्त रक्कम मिळू शकत नाही, असे सांगितले आणि ती रक्कम तक्रारकर्त्याच्या खात्यावर जमा करण्यात आली. उर्वरीत रक्कम देण्याकरिता विरुध्द पक्ष यांनी नकार दिल्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करुन उर्वरीत रु.66,250/- व्याजासह देण्याचा आणि मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यास आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
2. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, पॉलिसी प्रमाणपत्र, वाहन दुरुस्तीचे बिले, बँक खात्यावर विमा रक्कम जमा केल्याचा उतारा इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
3. विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले असून तक्रारीतील विधाने व मजकूर अमान्य केला आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे विमा करारामध्ये नमूद असलेल्या जोखिमेनुसार झालेल्या नुकसानीबाबत सक्षम अधिका-यांनी / सर्व्हेअरने दिलेल्या अहवालानुसार रु.22,000/- रक्कम तक्रारकर्त्यास वेळीच व मुदतीमध्ये दिलेली आहे. तक्रारकर्ता याची उर्वरीत मागणी करारांतर्गत येत नसल्यामुळे ती मागणी विरुध्द पक्ष यांच्यावर बंधनकारक नाही. त्यांचे सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
4. तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी उत्तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या वादमुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये
त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? नाही.
2. तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
5. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारकर्त्याने ही तक्रार चोलामंडलम इन्शुरन्स कंपनी, चेन्नई यांच्याविरुध्द दाखल केलेली आहे. मात्र तक्रारीत द्वारा चोलामंडलम इन्शुरन्स कंपनी, उस्मानाबाद असे लिहिले होते. त्यानंतर तक्रारीत दुरुस्ती करुन तक्रारकर्त्याने म्हटले आहे की, उस्मानाबादचे ऑफीस आता सोलापूर येथे स्थलांतरीत झाले आहे; म्हणून उस्मानाबाद कार्यालयाऐवजी सोलापूर कार्यालयाला विरुध्द पक्षकार म्हणून सामील केलेले आहे. उस्मानाबाद कार्यालयाने तक्रारकर्त्याच्या पिक-अप वाहनाची इन्शुरन्स पॉलिसी काढल्यामुळे तक्रारकर्त्याला ही तक्रार या मंचात दाखल करावयाची होती. म्हणून त्याने दाखल केलीही; मात्र तसा पुरावा दिलेला नाही. मात्र उस्मानाबाद ऑफीसला पाठवलेली नोटीस सदर ऑफीस अस्तित्वात नसल्यामुळे परत आली. त्यानंतर तक्रारीत दुरुस्ती करुन सोलापूर कार्यालयास विरुध्द पक्षकार करण्यात आले. ते कार्यालय या ग्राहक मंचाच्या कार्यक्षेत्रात येत नाही.
6. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे दि.23/9/2015 रोजी पुणे रस्त्यावर भिगवनजवळ त्याच्या वाहनाला अपघात झाला. त्यानंतर त्याने विरुध्द पक्षाकडे इन्शुरन्स क्लेम दाखल केला. इन्शुरन्स क्लेम विरुध्द पक्षाच्या उस्मानाबाद कार्यालयात दाखल केला, हे दाखवण्यासाठी तक्रारकर्त्याने कोणतेही कागदपत्रे दाखल केली नाहीत. विरुध्द पक्षातर्फे विमा भरपाई म्हणून तक्रारकर्त्याला रु.22,000/- देण्यात आली आहे. ती घटना सुध्दा या ग्राहक मंचाच्या कार्यक्षेत्रात घडल्याचे तक्रारकर्त्याने म्हटलेले नाही. ग्राहक संरक्षण कायदा, कलम 11 प्रमाणे ज्या मंचात ही तक्रार चालली असती, त्यामध्ये या मंचाचा समावेश होऊ शकत नाही. त्यामुळे या मुद्दयावर तक्रार चालणार नाही.
7. तक्रारकर्त्याने पुढे म्हटले आहे की, अपघातामध्ये गाडीचे अपघातामध्ये गाडीचे रेडीएटर, वॉटर बॉडी, रेडीएटर फॅन, पाटे, ग्लास, बम्पर, मडगार्ड, बोनट, स्टेअरींग, बॉल्टी, चेसी बेंड इ. नुकसान झाले. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला गाडी दुरुस्त करुन घेण्यास सांगितले. विरुध्द पक्ष यांच्या सर्व्हेअरने अपघात ठिकाणी पंचनामा केला. तक्रारकर्त्याने उस्मानाबाद येथील बिलाल शो-मेकर या गॅरेजमध्ये गाडी दुरुस्तीसाठी नेऊन दुरुस्ती करुन घेतली. कलरसाठी नासीर शो-मेकर व स्प्रे पेंटींग यांच्याकडे नेली. दुरुस्तीसाठी रु.74,250/- व पेंटींगसाठी रु.14,000/- खर्च आला. मात्र विरुध्द पक्ष यांनी रु.22,000/- तक्रारकर्त्याच्या खात्यावर दि.29/10/2015 रोजी जमा केले. उर्वरीत रक्कम रु.66,250/- न देऊन सेवेत त्रुटी केली आहे. या उलट विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याने घटनेची तात्काळ माहिती विरुध्द पक्षाला दिली नाही. सर्व्हेअरने दिलेल्या अहवालानुसार व करारातील जोखिमेनुसार देय रक्कम रु.22,000/- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दिलेली आहे.
8. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या खात्यात रु.22,000/- दि.29/10/2015 रोजी जमा केली असताना तक्रारकर्त्याने ही तक्रार सुमारे 3 महिन्याने दि.19/1/2016 रोजी दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याचा खाते नंबर विरुध्द पक्षाला त्यानेच दिला असणार. म्हणजेच खात्यात विमा रक्कम जमा करताना तक्रारकर्त्याची संमती होती. त्याच प्रमाणे खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर तक्रारकर्त्याने ताबडतोब विरोध दर्शवलेला नाही. त्यामुळे आता दिलेली विमा रक्कम योग्य नाही, अशी तक्रारकर्त्याची तक्रार चालणार नाही.
9. काहीही असले तरी तक्रारकर्ता याने विरुध्द पक्ष यांच्याकडून विमा रक्कम स्वईच्छेने स्वीकारलेली आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांच्यातील विमा करार पूर्णत्वास गेला आहे आणि तक्रारकर्ता यास पुन: रक्कम मागणी करण्याचा हक्क मिळत नाही, असे या जिल्हा मंचाचे मत आहे. आम्ही या ठिकाणी मा. राष्ट्रीय आयोगांच्या ‘योगेश कुमार शर्मा /विरुध्द/ नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.’, 2 (2013) सी.पी.जे. 178 (एन.सी.) व ‘नॅशनल इन्शुरन्स कं.लि. /विरुध्द/ अन्वर अली’, 4 (2015) सी.पी.जे. 612 (एन.सी.) या निवाडयांचे संदर्भ विचारात घेत आहोत. ज्यामध्ये विमेदाराने विनाअट विमा कंपनीकडून विमा रक्कम स्वीकारली असल्यास करार संपुष्टात येऊन त्यांच्यातील ‘ग्राहक’ व ‘सेवा पुरवठादार’ नाते संपुष्टात येते आणि तक्रारकर्त्याची तक्रार समर्थनीय ठरत नाही, असे न्यायिक प्रमाण विषद केले आहे. उपरोक्त विवेचनावरुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
(1) तक्रारकर्ता याची तक्रार रद्द करण्यात येते.
(2) उभय पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
(3) न्यायनिर्णयीची प्रथम प्रत उभय पक्षांना नि:शुल्क देण्यात यावी.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-
(संविक/स्व/श्रु/81216)