निकालपत्र :- (दि.11/10/2010) (सौ.प्रतिभा जे. करमरकर,सदस्या) (1) तक्रारीची थोडक्यात हकीगत अशी की – यातील तक्रारदार यांचा कॉन्ट्रॅक्टींगचा व्यवसाय असून ते त्यांच्या उपजिविकेचे एकमेव साधन आहे. तक्रारदार यांनी आपल्या जेसीबी मशिनकरिता सामनेवाला विमा कंपनीकडून विमा पॉलीसी उतरवली होती. सदर पॉलीसीचा क्र.ECM-00001114-000-00 होता व पॉलीसीची मुदत दि.19/12/2008 ते 18/12/2009 पर्यंत होती. सदर वाहनाचा वाघबीळ, कोल्हापूर- रत्नागिरी रोड ता.पन्हाळा जि.कोल्हापूर येथे दि.17/06/2009 रोजी अपघात झाला. त्यामुळे वाहनास झालेल्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे दि.29/07/2009 रोजी विहीत नमुन्यात सर्व कागदपत्रे जोडून क्लेम दाखल केला व त्याव्दारे सदर वाहनास झालेल्या रक्कम रु.1,45,667/- इतक्या नुकसान भरपाईची मागणी केली. तदनंतर सामनेवाला यांनी सर्व्हेअर यांची नेमणूक केली व त्यांनी प्रस्तुत वाहनाचा सर्व्हे केला. असे असताही सामनेवाला यांनी अनेक दिवस तक्रारदार यांचे क्लेमवर योग्य तो निर्णय घेतला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे क्लेमबाबत अनेकवेळा विचारणा केली. परंतु सामनेवाला यांनी योग्य तो प्रतिसाद दिला नाही. तसेच त्यांनी दि.30/11/200 9 रोजी तक्रारदार यास पत्र पाठवून त्याचा कायदेशीर क्लेम नाकारला असलेचे कळवले. तसेच सदर पत्रामध्ये सामनेवाला यांनी ‘’विमा उतरविलेले वाहन विमा स्थलसिमेत येत नसलेने नाकारला असे कळवले.’’ (2) तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, सामनेवाला यांनी प्रस्तुत विमा उतरविताना तक्रारदार यांचे वाहनाचा सर्व्हे केला होता व सदरचे वाहन हे चलित स्वरुपातील असूनही सदरचे वाहन अन्य ठिकाणी जाणार याची माहिती व कल्पना असूनही सामनेवाला यांनी तक्रारदार यांना प्रस्तुत वाहनाची विमा पॉलीसी दिली होती व आहे. त्यामुळे सामनेवाला यास तक्रारदार यांचे वाहन कोठेही व कोणत्याही ठिकाणी जावू शकते याची माहिती होती व आहे. तरीही सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा कायदेशीर क्लेम निव्वळ विम्याने सुरक्षित असणा-या वाहनाचा पत्ता बदलला आहे असे खोटे कारण सांगून नामंजूर केलेला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे वाहनाची विमा पॉलीसी दिली असून कोणत्याही जागेची पॉलीसी दिलेली नाही. तसेच सदरची पॉलीसी उतरविताना प्रस्तुत वाहन हे मुक्काम पोस्ट गावडी, मिटंक ता.शाहूवाडी जि.कोल्हापूर येथे होते व ही माहिती सामनेवाला यांना पॉलीसी शेडयूलमध्ये दिलेली आहे. तसेच सामनेवाला यांनी अथवा त्यांचे प्रतिनिधी यांनी तक्रारदार यांस लेखी, तोंडी अथवा पॉलिसीव्दारे कधीही विमा उतरविलेले वाहनाची जागा बदलल्यास विम्याची रक्कम देता येणार नाही असे कळवलेले नव्हते व नाही. अपघातानंतर तक्रारदाराने संबंधीत सर्व कागदपत्रांसह सामनेवाला विमा कंपनीकडे नुकसानभरपाईची मागणी केली असता सामनेवाला विमा कंपनीने अत्यंत चुकीच्या कारणाने व बेजबाबदारपणे तक्रारदाराचा न्याय्य क्लेम नाकारला आहे. ही सामनेवालाच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे म्हणून त्याविरुध्द दाद मागण्यासाठी तक्रारदाराने प्रस्तुत मंचाचा दरवाजा ठोठावला आहे व आपल्या पुढीलप्रमाणे मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून विनंती केली आहे. वाहनाच्या नुकसान भरपाईची क्लेमने मागणी केलेली रक्कम रु.1,44,667/-, तसेच वाहन बंद राहिलेने त्याची नुकसान भरपाईची रक्कम रु.10,000/-,शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,00,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.25,000/- सामनेवाला यांचेकडून वसूल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत पॉलीसी शेडयूल, क्लेम नाकारलेचे सामनेवाला यांचे पत्र, तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे केलेला पत्रव्यवहार इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला विमा कंपनीने आपल्या लेखी कथनात असे म्हणतात की, सामनेवाला यांना तक्रारदाराचा विमा क्लेम दि.14/06/2009 रोजी मिळाला. त्यांनतर सामनेवाला विमा कंपनीने सर्व्हेअर श्री परमार यांची सर्व्हे करण्यासाठी नेमणूक केली. मे. परमार सवर्हेअर यांनी सदर जेसीबी मशीनचा सर्व्हे केला. त्यावेळी सदर मशीन वाघबीळ, पन्हाळा येथे काम करीत असताना अपघात झाल्याची बाब समोर आली. सामनेवाला आपल्या कथनात पुढे असे सांगतात की, तक्रारदाराच्या तक्रारीतील पॅरा 4 व 5 वरुन हे स्पष्ट होत आहे की तक्रारदाराला पॉलीसी घेण्यापूर्वी आपले जेसीबी मशीन हे एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी कामासाठी हलवले जाणार आहे याची माहिती होती. तरीही त्यांनी ही पॉलीसी सर्व टर्मस समजून स्विकारली आहे. पॉलीसीमध्ये लिहीलेल्या गावडी तालुका शाहूवाडी येथून अपघाताच्या वेळी तक्रारदाराचे जेसीबी मशीन वाघबीळ ता.पन्हाळा जि.कोल्हापूर येथे हलवलेले स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे पॉलीसीतील महत्वाच्या अटींचा भंग केल्यामुळे सामनेवाला विमा कंपनीने पूर्ण जबबादारीने व योग्य विचार करुनच सदर क्लेम नामंजूर केला आहे व त्यामध्ये सामनेवाला विमा कंपनीची कुठलीही सेवात्रुटी नाही. त्यामुळे तक्रारदाराची तकार खर्चासह फेटाळून टाकावी अशी विनंती सामनेवालाने सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत, विमा पॉलीसी, परमार यांचा सर्व्हे रिपोर्ट, सर्व्हेअर यांचे अॅफिडेव्हीट, पॉलीसीचे अनेक्श्चर इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (6) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकीलांचे युक्तीवाद ऐकले. तसेच त्यांनी दाखल केलेली कागदपत्रेही काळजीपूर्वक तपासले. (7) तक्रारदार यांचे जेसीबी मशीन भाडयाने देण्याचा उपजिविकेचा व्यवसाय आहे हे त्यांनी प्रथमत: स्पष्ट केले आहे. जेसीबी मशीन प्रामुख्याने आवश्यक तेथे खणण्याचे(Excavation)चे काम करण्यासाठी उपयोगात येते.जेसीबी मशीनच्या व व्यवसायाच्या कामाच्या या स्वरुपावरुन हे स्पष्ट होते की सदर मशीन जेथे जेथे आवश्यकता असेल तेथे जाऊन Excavationचे काम करणारे मशीन आहे. या सेवेसाठी जो मोबदला मिळेल त्यावर तक्रारदाराची उपजिविका चालते. त्यामुळे प्रस्तुत जेसीबी मशीन एका जागेवर स्थिर असणारच नाही याची कल्पना व माहिती सामनेवाला विमा कंपनीला होती हे तक्रारदाराचे म्हणणे हे मंच ग्राहय मानत आहे. सामनेवाला विमा कंपनीने विमा पॉलीसी ही वाहनाची दिली होती. त्याच्या जागेची नव्हे हे तक्रारदाराचे म्हणणेही हे मंच ग्राहय धरत आहे. त्यामुळे कामासाठी तक्रारदाराचे जेसीबी मशीन मूळ ठिकाणाहून दुसरीकडे नेले गेले यामध्ये तक्रारदाराचे विमा पॉलीसीच्या महत्वाच्या अटींचा भंग केला हे सामनेवालाचे म्हणणे हे मंच फेटाळत आहे व या कारणाने तक्रारदाराचा विमा क्लेम नामंजूर करण्याचा सामनेवाला विमा कंपनीचा निर्णय ही निश्चितच त्यांच्या सेवेतील त्रुटी आहे अशा निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (8) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराच्या जेसीबी मशीनला अपघात झाल्यानंतर मे. परमार सर्व्हेअर यांनी सर्व्हे करुन आपला सर्व्हे रिपोर्ट दिला आहे व त्यामध्ये नुकसानभरपाईच्या रक्कमेचा अंदाज त्यांनी दिला आहे. सर्व्हेअर हे याबाबतीत तज्ञ असल्याने हे मंच सर्व्हेअरचा सर्व्हे रिपोर्ट ग्राहय मानून पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराला नुकसानभरपाई दाखल रक्कम रु.1,03,888/- (रुपये एक लाख तीन हजार आठशे अठ्ठयाऐंशी फक्त) दि.30/11/2009 रोजी पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह अदा करावी. 3) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासाबद्दल रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.1,000/- (रुपये एक हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |