तक्रारदार : त्यांचे वकील श्री.डी.एन.वानखेळे मार्फत हजर.
सामनेवाले : त्यांचे वकील श्रीमती सपना भुपतानी मार्फत हजर.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*--
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. तक्रारदार ही विमा कंपनी आहे. तक्रारदारांनी त्यांची मोटार सायकचा विमा सा.वाले विमा कंपनीकडे काढला होता. व तो विमा करार दिनांक 17.8.2005 ते 16.8.2006 या एक वर्षाच्या कालावधीकरीता वैध होता.
2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे दिनांक 5.3.2006 रोजी तक्रारदार त्यांचे नातेवाईक यांना भेटणेकामी विठ्ठलधाम सहकारी संस्था, पौदार रोड, मलाड (पूर्व) मुंबई येथे गेले होते. व तक्रारदारांनी आपली मोटार सायकल रस्त्याचे बाजूला उभी केली होती. तक्रारदार आपल्या नाईवाईकांना भेटून रात्री 11.30 च्या सुमारास परत आल्यानंतर तक्रारदारांना आपली मोटार सायकल जागेवर दिसून आली नाही. तक्रारदारांनी बरीच शोधाशोध केली, परंतु त्यांना आपली मोटार सायकल आढळून आली नाही. तक्रारदारांनी दुसरे दिवशी म्हणजे दिनांक 6.3.2006 रोजी दिंडोशी पोलीस स्टेशन येथे घटणेची माहीती दिली व पोलीस निरीक्षक, दिंडोशी यांनी एका कागदावर तारीख व वेळ लिहून दिली व तक्रारदारांना मोटार सायकलचा शोध घेण्यास सांगीतले व शोध घेऊनमोटरसायकल आढळून आली नाहीतर फीर्याद देण्यास पोलीस स्टेशन येथे यावे अशी सूचना दिली. तक्रारदारांनी नंतर एक आठवडा मोटार सायकलचा शोध घेतला. परंतु तक्रारदारांना आपली मोटार सायकल आढळून आली नाही. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 13.3.2006 रोजी दिंडोशी पोलीस स्टेशन येथे फीर्याद नोंदविली. तक्रारदारांनी दिनांक 22.3.2006 रोजी सा.वाले विमा कंपनीकडे मोटार सायकलच्या किंमतीची विमा करारान्वये नुकसान भरपाईची मागणी केली व सा.वाले विमा कंपनीने विमा निरीक्षकांची नेमणूक केली व तक्रारदारांनी विमा निरीक्षकांचे मागणी प्रमाणे कागदपत्रांची पुर्तता केली. अंतीमतः सा.वाले यांनी दिनांक 9.10.2006 रोजी तक्रारदारांच्या नुकसान भरपाईची मागणी फेटाळली व त्यात असे कारण नमुद केले की, तक्रारदारांनी चोरीच्या घटणेची विमा कंपनीस उशिरा माहीती दिली. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे पत्र व्यवहार केला. परंतु सा.वाले यांनी नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. अंतीमतः तक्ररदारांनी दिनांक 6.6.2008 रोजी सा.वाले विमा कंपनीचे विरुध्द नुकसान भरपाईकामी प्रस्तुतची तक्रार दाखल केली.
3. सा.वाले यांनी आपली लेखी कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये असे कथन केले की, विमा करारातील अटी व शर्ती प्रमाणे विमा धारकांनी घटणे बद्दलची माहिती विमा कंपनीस त्वरीत देणे आवश्यक असते. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये तक्रारदारांनी दिनांक 5.3.2006 रोजी घडलेल्या तथाकथीत चोरीच्या घटणेची माहिती सा.वाले यांना दिनांक 25.3.2006 रोजी म्हणजे खुपच उशिराने दिली. या प्रमाणे तक्रारदारांनी विमा कराराचे शर्ती व अटींचा भंग केला असे कथन करुन सा.वाले यांनी नुकसान भरपाई देण्याच्या नकाराचे समर्थन केले.
4. तक्रारदारांनी सा.वाले यांच्या कैफीयतीस आपले प्रति उत्तराचे शपथपत्र दाखल केले. व त्यामध्ये असे कथन केलें की, तक्रारदारांनी पोलीस स्टेशनमध्ये लगेचच माहिती दिली होती व दिनांक 23.3.2006 रोजी सा.वाले विमा कंपनीकडे मागणीपत्र सादर केले होते. यावरुन तक्रारदारांनी सा.वाले विमा कंपनीस माहिती देण्यास कुठलाही उशिर केलेला नाही असे कथन केले.
5. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता देखील केली. या उलट सा.वाले विमा कंपनी यांनी विमा कराराची प्रत हजर केली आहे. तसेच त्यांचे अधिकारी श्री. उत्पल चटर्जी यांचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी लेखी युक्तीवाद दाखल केला.
6. प्रस्तुत मंचाचे तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना कराराप्रमाणे नुकसान भरपाई अदा करण्यास नकार देवून तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2. | तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय-रक्कम रु.35,035/-व्याजासह. |
3. | अंतीम आदेश ? | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
7. सा.वाले यांनी तक्रारदारांना विमा कराराप्रमाणे नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्याचे पत्र दिनांक 9.10.2007 ची प्रत तक्रारदारांनी कागदपत्रामध्ये पृष्ट क्र.38 वर दाखल केलेली आहे. त्याचे वाचन केले असतांना असे दिसून येते की, सा.वाले यांना तक्रारदारांनी घडलेल्या घटणेची माहिती विमा कंपनीस तात्काळ कळविली नाही या कारणावरुन करारातील अटी व शर्ती मधील अट क्र.1 चा भंग केला असे नमुद करुन नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. तक्रारदार यांनी सा.वाले विमा कंपनीकडे दिनांक 22.3.2006 रोजी घटणेची माहिती दिली होती. व त्या पत्राची प्रत तक्रारदारांनी तक्रारीच्या पृष्ट क्र.32 वर हजर केलेली आहे. यावरुन दिनांक 25.3.2006 रोजी नव्हेतर दिनांक 23.3.2006 रोजी सा.वाले विमा कंपनीस चोरीच्या घटणेची माहिती दिली असे दिसून येते.
8. दरम्यान तक्रारदारांनी घटणेच्या दुस-या दिवशी सकाळी म्हणजे दिनांक 6.3.2006 रोजी दिंडोशी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना चोरीच्या घटणेची माहिती दिली होती. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीत व लेखी युक्तीवादात असे कथन केले आहे की, पोलीस निरीक्षक, दिंडोशी पोलीस स्टेशन यांनी तक्रारदारांना एका कागदाचे चिठ्ठीवर पोलीसाचे नांव, निरीक्षकाचे नांव, दिनांक व पोलीस स्टेशनमधील दैनंदिनीचा नोंदणी क्रमांक ही माहिती लिहून दिली. तक्रारदारांनी या कथनाचे पृष्टयर्थ त्या माहितीची छायांकित प्रत तक्रारी सोबत जोडलेली आहे. त्यानंतर तक्रारदारांनी जवळ पास एक आठवडा मोटार सायकलचा शोध घेतला परंतु मोटार सायकल त्यांना आढळून न आल्याने दिनांक 13.3.2006 रोजी तक्रारदारांनी दिंडोशी पोलीस स्टेशन येथे मोटार सायकल चोरीची फीर्याद दिली. त्या फीर्यादीची प्रत तक्रारदारांनी तक्रारीच्या पृष्ट क्र.21 वर हजर केलेली आहे. त्यामध्ये तक्रारदारांनी दिनांक 6.3.2006 रोजी दिंडोशी पोलीस स्टेशन येथे घटणेची माहिती दिली होती असे नमुद केलेले आहे. या सर्व बाबी वरुन असे दिसून येते की, तक्रारदारांनी दिंडोशी पोलीस स्टेशन येथे घटणेच्या दुस-या दिवशी सकाळी माहिती दिली व एक आठवडा शोध घेतल्यानंतर दिंडोशी पोलीस स्टेशनला मोटार सायकल चोरीची फीर्याद केली. पोलीसांनी तपासाअंती महानगर दंडाधिकारी यांचेकडे आपला अहवाल सादर केला व तो गुन्हा खरा आहे परंतु शोध न लागलेला या स्वरुपाची अ वर्गीकरण समरी मिळण्याची विनंती केली.
9. वरील पुराव्या वरुन असे दिसून येते की, तक्रारदारांनी पोलीस स्टेशन येथे लगेचच माहिती दिली होती व शोध घेणेकामी पोलीसांना जागरुक केले होते व स्वतः शोध घेवून मोटार सायकल न सापडल्याने दिनांक 13.6.2006 रोजी पोलीस स्टेशन दिंडोशी यांचेकडे फीर्याद दिली. त्यानंतर पोलीसांनी तपास पूर्ण केला परंतु मोटार सायकल सापडली नसल्याने अ समरी अहवाल महानगर दंडाधिकारी यांचेकडे दाखल केला.
10. विमा करारातील अटी व शर्ती नुसार तक्रारदारांनी सा.वाले विमा कंपनी यांना घटणेची फीर्याद ताबडतोब (Immediately) असे देणे आवश्यक असेल तर त्या मागचा उद्देश हा घटणेची चौकशी करण्यास विलंब होऊ नये हा असतो. ईथे तक्रारदारांनी पोलीसांकडे दुस-या दिवशी सकाळी मोटार सायकलची माहिती दिली व त्यानंतर एक आडवडयाने फीर्याद दिली. तक्रारदारांनी तपास देखील केला परंतु मोटार सायकल सापडून आली नाही. म्हणजे विना विलंब तपास करण्याची प्रक्रिया पोलीसांमार्फत का होईना पूर्ण करण्यात आली. सा.वाले यांनी आपल्या विमा निरीक्षकांचा अहवाल दाखल केलेला नाही. या प्रकारे विमा निरीक्षक यांनी उशिर झाल्याने तपास करण्यास अडचणी उदभवल्या असा पुरावा सा.वाले यांचेकडून दाखविला नाही. एकूणच तक्रारदारांनी 15 दिवसानंतर सा.वाले यांना माहिती दिल्याने तपास कामात अडथळा निर्माण झाला असे दिसून येत नाही. यावरुन सा.वाले यांनी केवळ तांत्रिक कारणावरुन तक्रारदारांची नुकसान भरपाईची मागणी फेटाळली असे दिसून येते. विमा कंपनीने चोरीची घटणा झालीच नाही किंवा तक्रारदारांनी पोलीसांकडे खोटी फीर्याद दाखल केली असे कथन केलेले नाही. या परिस्थितीमध्ये केवळ सा.वाले यांना उशिराने माहिती देण्यात आली यावरुन नुकसान भरपाई अदा करण्यास विमा कंपनी जबाबदार नाही असा निष्कष नोंदविला जाऊ शकत नाही. या संदर्भात तक्रारदारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नॅशनल इनश्युरन्स कंपनी लिमिटेड विरुध्द नितीन खंडेलवाल (2008) ACJ 2035 या न्याय निर्णयाचा आधार घेतला. त्यामध्ये चोरीच्या प्रकरणामध्ये करारातील शर्ती व अटींचा भंग हा नुकसान भरपाई नाकारण्यास समाधानकारक पूरावा होऊ शकत नाही असा अभिप्राय नोंदविला आहे.
11. वरील परिस्थितीत सा.वाले यांनी तक्रारदारांना विमा करारा प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यास नकार देवून तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष नोंदवावा लागतो. विमा करारापमाणे नुकसान भरपाईची रक्कम रु.35,053/- अशी होती. ही रक्कम सा.वाले यांनी तक्रारदारांना विमा कराराप्रमाणे नुकसान भरपाई म्हणून अदा करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त नुकसान भरपाई नाकारल्याचे दिनांकापासून म्हणजे दिनांक 9.10.2007 पासून देय रक्कमेवर 9 टक्के व्याज अदा करणे योग्य राहील असे मंचाचे मत झाले आहे.
12. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील आदेश करण्यात येतो
आदेश
1. तक्रार क्रमांक 307/2008 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार विमा कराराप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यास नकार देवून सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना विमा कराराप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम रुपये 35,053/- त्यावर 9 टक्के व्याज दिनांक 9.10.2007 पासून रक्कम अदा करेपर्यत हया प्रमाणे अदा करावे.
4. या व्यतिरिक्त सामनेवाले यांनी तक्रारदार संस्थेला तक्रारीच्या खर्चाबद्दल रुपये 2000/- अदा करावेत असाही आदेश देण्यात येतो.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.