::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, कल्पना जांगडे (कुटे)मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- १२.१०.२०१७)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
१. अर्जदाराने आपल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदाराच्या मालकीचे महिंद्रा बोलेरो क्रं. एम एम ३४ - ए, बी – ५३८२ चे वाहन असून सदर वाहन गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमा पॉलिसी क्रं. २०१०११८७०२६९ अन्वये दि. २६.०७.२०१४ ते दि. २५.०७.२०१५ या कालावधी करीता विमा प्रीमियम रक्कम रुपये २२,५६०/- अदा करुन विमाकृत केली होती व आहे. तक्रारदाराचे सदर वाहनाचा दिनांक ०२.०८.२०१४ रोजी मौजा टेंमुर्डा ते पिचदुरा या मार्गाने जात असताना अपघात झाला. त्या मध्ये सदर वाहनाला क्षती पोहचली. तक्रारकर्त्याने सदर वाहन दुरुस्तीकरीता देण्यापूर्वी विमा कंपनीला कळविले होते. त्याप्रमाणे वि.प. यांनी त्यांचे अभियंता श्री. कृष्णकांत पोद्दार यांना सदर वाह्नाचे परीक्षण करण्याकरिता प्रोव्हिनशिअल ऑटोमोबाईल कंपनी प्रा. लि. चंद्रपूर येथे पाठविले. त्यावेळी सदर अभियंता याने सदर वाहनाचे परीक्षण करुन सर्विस कोटेशन लेटरवर बरोबर अशी खूण करुन परीक्षण अहवाल तयार केला व तक्रारकर्त्यास प्रथम सदर क्षतीग्रस्त वाहन दुरुस्त करण्याचा खर्च देण्यास सांगून त्यानंतर सदर खर्चाची परतफेड विमा कंपनी करेल असे सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदाराने सदर वाहन अधिकृत विक्रेता प्रोव्हीन्शीयल ऑटोमोबाईल यांच्याकडे दुरुस्त करून वाहनाच्या खर्चाची रक्कम रु. १,२१,८२९/- चे बिल पैसे उधार घेऊन दिले. त्यानंतर सदर बिलाची अस्सल पावती वि. प. यांच्याकडे देऊन दुरूस्तीच्या खर्चाच्या रक्कमेची मागणी केली. परंतु वि.प. यांनी सदर बिलापोटी केवळ रक्कम रु. १७,०००/- देण्याचे ठरविले, त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर रक्कम स्वीकारली नाही. तक्रारकर्त्याने वि.प यांना सदर पूर्ण रक्कम देण्याची विनंती केली, परंतु रक्कम न दिल्याने अर्जदाराने गैरअर्जदारांकडे लेखी तसेंच तोंडी स्वरुपात मागणी केली परंतु गैरअर्जदारांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही अर्जदाराला विमा दावा रक्कम मिळालेली नाही, म्हणून अर्जदाराने दि. ०७.०२..२०१५ रोजी अधिवक्त्यांमार्फत नोटीस पाठविला सदर नोटीस मिळून सुध्दा त्याची पुर्तता गैरअर्जदारांनी केली नाही. गैरअर्जदारांनी अर्जदाराला विमादावा रक्कम न देवून सेवेत ञृटी केली आहे. म्हणून अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली.
२. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदारांनी अर्जदारास दिलेली सेवा न्युनतापूर्ण ठरविण्यात यावी. तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास त्याचे विमाकृत गाडीचे दुरूस्तीच्या खर्चाची रक्कम रु. १,२१,८२९/- व त्यावर द.सा.द.शे. १८ टक्के प्रमाणे व्याज द्यावे तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रु. २५,०००/- व तक्रारीचा खर्च १०,०००/- रु. गैरअर्जदारांकडून मिळण्याचा आदेश व्हावा.
३. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र १ व २ यांना नोटीस प्राप्त होऊनसुद्धा ते मंचासमक्ष हजर न झाल्याने दिनांक 4/8/2017 रोजी त्यांचेविरूध्द नि.क्र.17 वर एकतर्फा आदेश पारित करण्यात आला.
4. वि.प. क्र ३ हजर होऊन त्यांनी आपले लेखी कथन दाखल केले. त्यांनी आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, विरूध्द पक्ष क्र.1 व 2 हे इंश्युरंस कंपनी आहेत. वि.प.क्र.३ ने तक्रारकर्त्याला विरूध्द पक्ष क्र.1 कडून पॉलिसी काढून दिली. सदर पॉलिसी काढून दिल्यानंतर वि.प. क्र. 3 ची कोणतीही भुमिका नव्हती. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने वि.प.क्र.३ ला विरूध्द पक्ष क्र.1 व 2 चा अभिकर्ता दर्शविले असून विरूध्द पक्ष क्र.1 व 2 चा अभिकर्ता म्हणून पक्षकार न करता वैयक्तिीकरीत्या पक्षकार करून चुक केली आहे. विमा दावा मंजूर करणे अथवा नाकारण्याचा विरूध्द पक्ष क्र.3 ला अधिकार नाही. वि.प.3 ने तक्रारकर्त्यास कोणतीही सेवेतील त्रुटी दिलेली नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यांत यावी अशी त्यांनी विनंती केलेली आहे.
5. तक्रारकर्त्याचा तक्रारअर्ज, दस्तावेज, शपथपञ व तक्रारअर्ज व शपथपत्र हेच लेखी युक्तिवाद समजण्यांत यावा अशी पुरसीस दाखल, विरूध्द पक्ष क्र.3 चे लेखी उत्तर, तसेच लेखी उत्तरालाच शपथपत्र व लेखी युक्तिवाद समजण्यांत यावे अशी अनुक्रमे नि.क.14 व 20 वर पुरसीस दाखल, तक्रारकर्ता व वि.प.क्र.3 यांचा तोंडी युक्तीवाद आणि तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(१) तक्रारकर्ता विरूध्दपक्षांचा ग्राहक आहे काय ? होय.
(२) विरूध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? होय.
(3) विरूध्दपक्ष क्र.3 यांनी तक्रारकर्त्यास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? नाही
(4) आदेश काय ? अंशतः मंजूर.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. १ बाबत ः-
6. तक्रारकर्त्याने त्याच्या मालकीच्या महिंद्रा बोलेरो क्रं. एम एम ३४ / ए, बी – ५३८२ चे वाहन विरूध्द पक्ष क्र.3 मार्फत विरूध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीकडे विमा पॉलिसी क्रं. २०१०११८७०२६९ अन्वये दि. २६.०७.२०१४ ते दि. २५.०७.२०१५ या कालावधी करीता विमा प्रीमियम रक्कम रुपये २२,५६०/- अदा करुन विमाकृत केली होती. यासंदभार्त तक्रारकर्त्याने दस्त क्र.अ-3 दाखल केले आहे. यावरून तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचा ग्राहक आहे असे सिध्द होत आहे, सबब मुद्दा क्रं. १ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. २ बाबत ः-
7. तक्रारकर्त्याचे उपरोक्त वाहनाचा मौजा टेंमुर्डा ते पिचदुरा या मार्गाने जात असताना अपघात झाल्याने सदर वाहनाला क्षती पोहचून नुकसान झाले हे तकारकर्त्याने दाखल कलेल्या घटनास्थळ पंचनाम्यावरून सिध्द होते. त्याने सदर वाहन दुरुस्तीकरीता देण्यापूर्वी विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांना कळविले होते. त्याप्रमाणे अभियंता कृष्णकांत पोद्दार यांना सदर वाह्नाचे परीक्षण करण्याकरिता प्रोव्हिनशिअल ऑटोमोबाईल कंपनी प्रा. लि. चंद्रपूर येथे येवून परिक्षण केले. त्यावेळी सदर अभियंता याने सदर वाहनाचे परीक्षण करुन सर्विस कोटेशन लेटरवर बरोबर अशी खूण करुन परीक्षण अहवाल तयार केला व तक्रारकर्त्यास प्रथम सदर वाहन दुरुस्त करण्याचा खर्च देण्यास सांगून त्यानंतर सदर खर्चाची परतफेड विमा कंपनी करेल असे सांगितले. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने सदर वाहन दुरूस्त केले. सदर वाहनाच्या दुरुस्तीकरीता रक्कम रु. १,२१,८२९/- एवढा खर्च आला हे तकारकर्त्याने सादर केलेल्या दस्त क्र. 6 पावती वरून सिध्द होते. तक्रारकर्त्याने सदर बिलाची रक्कम उधार घेवून दिली. त्यानंतर त्याने विमा कंपनीकडे सदर बिलाची अस्सल पावती देऊन रक्कमेची मागणी केली. परंतु वि.प. यांनी सदर बिलापोटी केवळ रक्कम रु. १७,०००/- देण्याचे ठरविले, त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर रक्कम स्वीकारली नाही. तक्रारकर्त्याने वि.प यांना सदर दुरूस्तीखर्चाची पूर्ण रक्कम देण्याची विनंती केली, परन्तु रक्कम न दिल्याने अर्जदाराने गैरअर्जदाराकडे लेखी तसेंच तोंडी स्वरुपात मागणी केली परंतु गैरअर्जदारांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही. विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी हजर होवून तक्रारकर्त्याचे कथन खोडून काढलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचे कथन ग्राहय धरण्यायोग्य आहे.
8. सबब मंचाच्या मताप्रमाणे विरूध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्त्याच्या क्षतिग्रस्त वाहनाच्या दुरूस्ती खर्चाची रक्कम न देवून सेवेत त्रुटी दिलेली आहे. तसेच रक्कम न दिल्यामुळे तक्रारकर्त्यांस शारिरीक, मानसीक त्रास झाला आहे. सबब मुद्दा क्रं. ०२ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
9. तक्रारकर्त्याने त्याच्या मालकीच्या महिंद्रा बोलेरो क्रं. एम एम ३४ / ए, बी – ५३८२ या वाहनाची विमा पॉलिसी विरूध्द पक्ष क्र.3 मार्फत विरूध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीकडे काढली होती. या व्यवहारात वि.प.क्र.3 यांनी केवळ अभिकर्ता म्हणून विमा पॉलिसी काढली असल्याने विरूध्द पक्ष क्र.3 हे तक्रारकर्त्यांस कोणतीही रक्कम देण्यांस जबाबदार नाहीत. सबब मुद्दा क्र.3 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यांत येते.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
10. मुद्दा क्रं. १ ते ३ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(१) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.197/2015 अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(२) विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरीत्या
तक्रारकर्त्यास विमाकृत वाहनाची दुरूस्ती खर्चाची विमा दावा रक्कम
रु. 1,21,829/- द.सा.द.शे. 10 टक्के व्याजासह आदेशाच्या
दिनांकापासून ३० दिवसाचे आत दयावी.
(३) विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरीत्या
तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार खर्च मिळून एकूण रक्कम रु. २५,०००/- आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसाचे आत दयावी.
(4) विरूध्द पक्ष क्र.3 विरूध्द कोणताही आदेश नाही.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 12/10/2017
(अधि. कल्पना जांगडे (कुटे))(अधि. किर्ती गाडगिळ (वैदय)) (श्री.उमेश व्ही. जावळीकर)
मा.सदस्या. मा. सदस्या मा.अध्यक्ष.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.