निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 07/07/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 13/07/2010 तक्रार निकाल दिनांकः- 21/12/2010 कालावधी 05 महिने 08 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. गोपीनाथ संतोबा मुंढे. अर्जदार वय 57 वर्षे,धंदा शेती. अड.डी.यु.दराडे. रा.पिंपळदरी.ता.गंगाखेड.परभणी. विरुध्द 1 चोला मंडलम एस.एस.जनरल इंन्शुरंन्स कं.लि. गैरअर्जदार. तर्फे व्यवस्थापक,शाखा ओबेराय टॉवर, अड.अजय व्यास. सिव्हील लाईन.अमरप्रीत हॉटेल समोर,जालना रोड. औरंगाबाद. 2 भारत संचार निगम लि. अड.जी.एम.आनेराव. तर्फे जनरल मॅनेजर,परभणी. --------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. -------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.) बी.एस.एन.एल कंपनीच्या ग्राहकांचा गैरअर्जदार इन्शुरन्स कंपनीकडून घेतलेल्या ग्रुप जनता अपघाती विमाची नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीने नाकारले म्हणून प्रस्तुतची तक्रार आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत. अर्जदारचा मयत मुलगा इंद्रजित हा गैरअर्जदार क्रमांक 2 भारत संचार निगम यांचा ग्राहक होता.गैरअर्जदार क्रमांक 2 ने देशातील सर्व टेलिफोन ग्राहकांचा गैरअर्जदार क्रमांक 1 चोलामंडलम जनरल इन्शु.कंपनी कडून ग्रुप जनता अपघात विमा पॉलिसी उतरविलेली होती.त्या पॉलिसीचा अर्जदारचा मुलगा ही लाभार्थी होता.तारीख 19/09/2009 रोजी मुंबई दादर रेल्वे स्टेशनवर उपनगरीय रेल्वेच्या धडकेने अर्जदारचा मुलगा अपघातात मरण पावला. दादर पोलिस स्टेशनला अपघात क्रमांक 132/2009 दाखल झाला पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा व प्रेताचे पी.एम.करुन घेतले होते. अर्जदाराने त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 2 यांना मुलाच्या अपघाती मृत्यूची माहिती कळविल्यावर त्यांनी क्लेमफॉर्म भरुन देण्यासाठी अर्जदारकडे पाठविले व त्यासोबत कागदपत्राची यादी दिली. अर्जदाराने त्याप्रमाणे ता.07/12/2009 रोजी आवश्यक त्या कागदपवत्रांसह क्लेमफॉर्म गैरअर्जदार क्रमांक 2 कडे हस्तपोच दिला.त्यानंतर माहे डिसेंबर अखेर गैरअर्जदार कडून त्याबाबत काहीही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून स्मरणपत्र पाठविले होते.त्यालाही दाद दिली नाही शेवटी तारीख 05/06/2010 रोजी वकीला मार्फत नोटीस पाठवुन नुकसान भरपाईची मागणी केली होती.त्याला तारीख 21/05/2010 चे उत्तर पाठवुन मयत ग्राहकाकडील दिनांक 04/03/2009 व 04/01/2009 या दोन महिन्याची बिले मृत्यू तारखेपर्यंत भरली नसल्यामुळे अपघाती विम्याची नुकसान भरपाई देय होत नाही असे कळवले.अर्जदाराचे म्हणणे असे की, त्याचे मुलाकडे पूर्वीची कोणतीही टेलिफोन बाकी नव्हती व बाकी असेलतर विमा नुकसान भरपाई मिळणार नाही अशी विमा करारात अट ही नाही त्यामुळे गैरअर्जदार ने बेकायदेशिर कारणास्तव अर्जदाराचा क्लेम नामंजूर करुन सेवात्रुटी केली आहे.म्हणून ग्राहक मंचात प्रस्तुतची तक्रार दाखल करुन मुलाच्या डेथ क्लेमची नुकसान भरपाई रु.50,000/- तारीख 19/09/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह मिळावे याखेरीज मानसिकत्रासापोटी रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- गैरअर्जदाराकडून मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र ( नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.5 लगत माहे नोव्हेंबर 09 चे टेलिफोन बिल, मुलाचे डेथ सर्टीफिकेट, रेल्वे डिपार्टमेंट कडून मिळालेले मुलाच्या अपघाती मृत्यू संबंधीचा रिपोर्ट, पोलिस निरीक्षक यांचा सी.आर.नं.132/09 मधील रिपोर्ट, क्लेमफॉर्मची प्रत आणि गैरअर्जदार क्रमांक 1 चे तारीख 21/05/2010 चे क्लेम नाकारल्याचे पत्र अशी 6 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तारीख 31/11/2010 रोजी आपला लेखी जबाब ( नि.20) आणि गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तारीख 16/09/2010 रोजी लेखी जबाब (नि.16) दाखल केला आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी लेखील जबाबातून (नि.20) तक्रार अर्जातील सर्व विधाने नाकारली आहेत.त्याचे म्हणणे असे की, कंपनी व विमादार यांच्या दरम्यान विमासंबंधी झालेला करार व पॉलिसीतील अटी उभयतांवर काटेकोरपणे बंधनकारक आहे. त्या अटीच्या बाहेर जावुन विमेदाराला नुकसान भरपाई मागता येणार नाही.बी.एस.एन.एल.ने त्यांच्या ग्राहकाचा गैरअर्जदाराकडून ग्रुप जनता पॉलिसी उतरविलेली होती हे त्यांनी नाकारलेले नाही. तसेच अर्जदाराच्या मयत मुलाच्या डेथ क्लेम नंबर बी.एस.एन.एल /09/01168 तारीख 07/12/010 रोजी मिळालेला होता हे ही त्यांना मान्य आहे.परंतु क्लेम दाखल केल्यावर गैरअर्जदाराने दुर्लक्ष केले हे तक्रार अर्जातील कथन त्यांनी नाकारलेले आहे. पॉलिसी अटी प्रमाणे लाभार्थीचा विमा प्रस्ताव घटना घडल्या पासून 60 दिवसांत दाखल करणे प्रमुख अट आहे.त्याप्रमाणे अर्जदाराच्या मुलाचा क्लेम वरील मुदतीत दाखल झालेला नाही तसेच अर्जदाराच्या मुलाकडे तारीख 04/03/2009 व तारीख 04/01/2009 या दोन महिन्याची टेलिफोन बिले त्याने भरलेली नव्हती. क्लेमची नुकसान भरपाई मिळण्यासाठी ग्राहकाकडे पूर्वीच्या टेलिफोनची बाकी शुन्य असली पाहिजे.अशी प्रमुख अट आहे त्यामुळे अर्जदाराच्या मुलाच्या मृत्यूची नुकसान भरपाई मिळण्याच्या संदर्भात अटीचे उल्लंघन झालेले असल्यामुळे तो मंजुर केलेला नाही.याबाबत गैरअर्जदाराकडून कोणत्याही प्रकारे सेवात्रुटी झालेली नाही.सबब खर्चासह तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार 1 चे शपथपत्र ( नि.21) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.22 लगत विमा पॉलिसीचे माहितीपत्रक, पॉलिसीची कॉपी, अर्जदाराशी केलेल्या पत्रव्यवहाराच्या स्थळप्रती, क्लेम नामंजुरीचे पत्र, व माहे जानेवारी व मार्च 09 ची न भरलेल्या टेलिफोन बिलाच्या पावत्या वगैरे 9 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी आपल्या लेखी जबाबात ( नि.16) त्यांचा विरुध्द प्रस्तुतची तक्रार कायद्याने चालणेस पात्र नाही असे म्हंटले आहे.तक्रार अर्जात नमुद केल्याप्रमाणे गैरअर्जदार क्रमांक 1 कडून त्यांच्या ग्राहकाची ग्रुप विमा पॉलिसी उतरविलेली होती यासंबंधीचा मजकुर त्यांनी नाकारलेला नाही मात्र त्यांच्या विरुध्द तक्रार अर्जातील केलेली बाकीची सर्व विधाने त्यांनी साफ नाकारलेली आहेत.अतिरिक्त लेखी जबाबात पुढे असा खुलासा केला आहे की, अर्जदाराच्या मुलाच्या अपघाती मृत्यूची घटना घडल्यानंतर अर्जदाराने पॉलिसी कंडीशन प्रमाणे 60 दिवसांच्या आत विमा दाखल केलेला नाही त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यास तो पात्र नाही तसेच मयत ग्राहकाकडे 04/01/2009 व 04/03/2009 च्या दोन बिलांची थकबाकी होती पॉलिसी कंडीशन प्रमाणे ग्राहकाकडे थकबाकी असेल तर नुकसान भरपाईची रक्कम देय होत नाही.व अर्जदाराच्या मुलाचा अपघाती मृत्यू झालेला नव्हता त्याने आत्महत्या केली होती यांही कारणास्तव नुकसान भरपाई मिळणेस तो पात्र नाही. गैरअर्जदार नं 1 विमा कंपनी आणि बी.एस.एन.एल. यांच्या दरम्यान विमा पॉलिसी संबंधी जो करार झाला होता त्यातील अटीनुसार बी.एस.एन.एल. ने घेतलेल्या पॉलिसी संबंधीचे सर्व हप्ते गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीकडे जमा केलेले असल्यामुळे लाभार्थी पॉलिसी होल्डरना नुकसान भरपाई देण्याची सर्वस्वी जबाबदारी ही फक्त गैरअर्जदार क्रमांक 1 यांचीच आहे.गैरअर्जदार 2 वर टाकता येणार नाही. या सर्व बाबी विचारात घेवुन त्यांच्या विरुध्द केलेला तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 2 चे शपथपत्र (नि.17) दाखल केले आहे. तक्रार अर्जाचे अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदारतर्फे अड.दराडे आणि गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे अड.अजय व्यास व गैरअर्जदार क्रमांक 2 तर्फे अड.जी.एम.आनेराव यांनी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर. 1) गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदाराच्या मयत मुलाच्या अपघाती मृत्यची नुकसान भरपाई पॉलिसी हमी प्रमाणे देण्याचे तारीख 21/05/2010 च्या पत्रातून बेकायदेशिररित्या नाकारुन सेवात्रुटी केली आहे काय ? होय. 2) अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? होय. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 गैरअर्जदार क्रमांक 2 बी.एस.एन.एल ने त्यांचे टेलिफोन लँडलाईन धारक वायरलेस धारक, पी.सी.ओ.धारक पोस्टपेड मोबाईल धारक ग्राहकांची एकत्रित जनता वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी प्रत्येकी रु.50,000/- नुकसान भरपाई देण्याच्या हमीची तारीख 14/01/2009 ते तारीख 13/01/2010 या मुदतीची विमा पॉलिसी घेतलेली होती ही अडमिटेड फॅक्ट आहे.गैरअर्जदार क्रमांक 1 ने पुराव्यात बी.एस.एन.एल.ला दिलेला पॉलिसी क्लेम माहिती पत्रक व नियम अटीसह पॉलिसी शेडयुल ( नि.22 /1) दाखल केलेले आहे. अर्जदारचा मयत मुलगा इंद्रजित गोपीनाथ मुंढे यांचे नांवे लँडलाईन टेलिफोले क्रमांक 265111 होता व त्याचा व तो गैरअर्जदार क्रमांक 2 चा ग्राहक असल्यामुळे वर नमुद केलेल्या ग्रुप जनता वैयक्तिक अपघात विमा पॉलिसीचाही लाभार्थी होता ही अर्जदाराने पुराव्यात नि.5/1 वर दाखल केलेल्या माहे नोव्हेंबर 09 च्या टेलिफोन बिलाच्या कॉपीवरुन शाबीत केलेले आहे. तारीख 19/09/2009 रोजी विमा लाभार्थी इंद्रजित याचा मुंबईत दादर उपनगरी रेल्वे स्थानकावर रेल्वेने धडक दिल्याने अपघाती मृत्यू झाला होता ही अर्जदाराने पुराव्यात नि.5/3 ला दाखल केलेल्या स्टेशन मॅनेजर दादर रेल्वे स्टेशन यांचे 19/09/2009 चे जी.आर.पी.मेमोची छायाप्रत, पोलिस निरीक्षक दादर रेल्वे पोलिस ठोणे यानी अ.मृ.र. 132/2009 चे कामी वरीष्ठ पो.निरीक्षक यांना अर्जदाराच्या मुलाच्या अपघाती मृत्यू संबंधीचा रिपोर्टची छायाप्रत या दोन्ही पुराव्यातून शाबीत झाले आहे.गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी लेखी जबाबामध्ये मयत इंद्रजित मुंढे याचा अपघाती मृत्यू झाला नव्हता त्याने आत्महत्या केली होती असा बचाव घेतलेला आहे परंतु मयताने आत्महत्या केली होती या संबंधीचा कसलाही ठोस पुरावा मंचापुढे सादर केलेला नसल्यामुळे आणि विमा कंपनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी मयताच्या अपघाती मृत्यू संबंधी कोणताही आक्षेप घेतलेला नसल्यामुळे अर्जदार क्रमांक 2 यांचा बचाव / आक्षेप मान्य करता येणार नाही. अर्जदारचा मुलगा वर नमुद केलेल्या ग्रुप जनता वैयक्तिक अपघात पॉलिसीचा लाभार्थी असल्यामुळे त्याच्या मृत्यू पश्चात विमा पॉलिसी हमी प्रमाणे नुकसान भरपाई मिळणेसाठी गैरअर्जदार क्रमांक 2 ला घटनेची माहिती लगेच टोल फ्री क्रमांक 18002005544 वर दिल्यानंतर त्याला क्लेमफॉर्म व त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे पाठविण्या संबंधीची यादी पाठवली होती.त्यानुसार अर्जदाराने तारीख 07/12/2009 रोजी कागदपत्रांसह क्लेमफॉर्म भरुन हस्तपोच गैरअर्जदार क्रमांक 2 कडे दिला होता.ही अडमिटेड फॅक्ट आहे.याही बाबतीत गैरअर्जदाराने मुदतीचा आक्षेप घेवुन पॉलिसी अटी प्रमाणे 60 ते 90 दिवसांत अर्जदाराने क्लेमफॉर्म नियमा प्रमाणे दिला नाही असा बचाव घेतलेला आहे.तो चुकीचा असून मुळीच मान्य करता येणार नाही कारण टोल फ्री नंबरवर अर्जदारने दिलेली माहिती व भरुन दिलेला क्लेमफॉर्म वरील मुदतीतच दिला असल्याचे तारखेवरुन स्पष्ट होते शिवाय मुदतीसंबंधीच्या अटी बद्दलचा उल्लेख क्लेम नामंजुरीच्या पत्रात केलेला नसल्यामुळे तो मान्य करता येणार नाही. अर्जदारने क्लेमफॉर्म व कागदपत्रे दिल्यानंतर गैरअर्जदार कंपनीने तारीख 21/05/2010 च्या पत्राव्दारे ( नि.5/6) अर्जदाराचा विमा क्लेम नामंजुर केला होता. त्या पत्रात क्लेम नामंजुरीचे कारण असे दिले आहे की, तारीख 04/01/09 व तारीख 04/03/09 या दोन बिलांच्या रक्कमा अपघाताची घटना घडली त्यावेळेस भरलेल्या नव्हत्या असे दिसून आले आहे.पॉलिसी कंडीशन प्रमाणे घटनेच्यावेळी थकबाकी असल्यास क्लेम स्विकारता येत नाही नो क्लेम या कारणास्तव तो नामंजुर केला आहे. क्लेम नाकारण्याच्या बाबतीत विमा कंपनीने वरील प्रमाणे जो बचाव घेतलेला आहे तो खरोखर कंडीशन प्रमाणे घेतला आहे का ? व कायदेशिररित्या ग्राहय धरता येईल का एवढचा मुद्दा प्रकरणाच्या निर्णयाच्या बाबतीत महत्वाचा असल्यामुळे पुराव्यातील वस्तुस्थिती विचारात घेता असे दिसून येते की, क्लेम नामंजुरीच्या पत्रातच विमा कंपनीने असा उल्लेख केला आहे की, This scheme is applicable to all individual subscribers of working land line / WLL/ Postpaid mobile services and land line P.C.O. Operators with all bill paid on the date of occurrence. अर्जदाराच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता त्यावेळी त्याच्या घरातील टेलिफोन चालू होता(Working land line) हे गैरअर्जदारांनी नाकारलेले नाही दुसरी गोष्ट टेलिफोनची तारीख 04/03/09 व 04/01/09 ही दोन्ही बीले थकीत होती म्हणून पॉलिसी कंडीशनचे उल्लंघन झाले असे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे, परंतु गैरअर्जदार क्रमांक 1 ने पुराव्यात नि.22/2 ला दाखल केलेल्या पॉलिसी शेड्युल सोबतच्या कंडीशनचे बारकाईने अवलोकन केले असता थकीत बिला संबंधीच्या कंडीशनचा कोठेही उल्लेख नाही किंवा ती अट नाही युक्तिवादाच्या वेळी गैरअर्जदार क्रमांक 2 तर्फे अड.आनेराव यांनी या संदर्भात संबंधीत विमा स्कीमच्या माहिती पत्रकाकडे (नि.22/1) मंचाचे लक्ष वेधुन असे निवेदन केले की, माहिती पत्रकातील तपशिल क्रमांक 3.2 मध्ये अपघात घटनेच्या वेळी ग्राहकाची सर्व बिले जमा पाहिजेत असा उल्लेख दिसत असला तरी मुळातच 3.2 चा तपशिल हा फक्त विमा पॉलिसी अंतर्गत ग्राहकाला लाभार्थी म्हणून सामावुन घेण्यापुरता लागु पडतो.अर्जदाराचा मुलगा हा त्या अगोदरच विमा पॉलिसीचा लाभार्थी झालेला होता ही वस्तुस्थिती आहे तसेच अर्जदाराच्या घरातील वर नमुद केलेल्या दोन महीन्याची टेलिफोन बिले थकीत होती तर मग त्याचे टेलिफोन सेवा बंद का केली नाही ? आणि मागील थकबाकी वसुल न करताच पुढील बिले कशी काय जमा करुन घेंतली.हा ही प्रश्न उरतोच. उलट क्लेम नामंजुरीच्या पत्रात थकीत बिले तारीख 22/10/09 रोजी भरलेली असल्याचे विमा कंपनीनेच कबुल केलेले आहे.तसेच टेलिफोन बंद नव्हता हे गैरअर्जदारांनाही मान्य आहे.त्यामुळे क्लेम नामंजुर करण्याच्या बाबतीत थकीत बिलाचे दिलेले कारण एकतर विमा कंपनीच्या पॉलिसीच्या नियम अटी मध्ये नसल्यामुळे व अर्जदाराच्या मुलाची मृत्यूची घटना घडल्यापासून आजतागायत चालू स्थितीत असल्यामुळे क्लेम नामंजुरीचे दिलेले कारण चुकीचे व बेकायदेशिर असल्याचेच यातून अनुमान निघते. गैरअर्जदार विमा कंपनीने ज्या कारणाखाली क्लेम नाकारला आहे तो नि.22/1 वर डाक्युमेंट मुळातच पॉलिसी कंडीशनची कॉपी नाही. ते स्कीमचे माहिती पत्रक आहे व त्यातील तपशिल क्रमांक 3.2 वरील खुलास्याचा पॉलिसी अट म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीस मुळीच अट म्हणून वापर करता येणार नाही. व तो बचाव ग्राहयही धरता येणार नाही.संबंधीत माहिती पत्रक विमा कंपनीचे पॉलिसी संदर्भातील आहे.ते शाबीत करण्यासाठी माहितीपत्रकावर गैरअर्जदार क्रमांक 1 ची सही देखील नाही त्यामुळे नि.22/1 वरील 3.2 चा तपशिल पॉलिसी अट होवु शकत नाही. वरील सर्व बाबी विचारात घेता गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदारला डेथक्लेमची नुकसान भरपाई देण्याचे 21/05/2010 च्या पत्रातून बेकायदेशिरीरित्या नाकारुन सेवात्रुटी केली असल्याचे सिध्द झाले आहे.पॉलीसीचे सर्व हप्ते गैरअर्जदार क्रमांक 1 ने स्वीकारुन नुकसान भरपाई देण्याची हमी दिलेली असल्याने गैरअर्जदार क्रमांक 1 हेच नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत.सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने आदेश तारखे पासून 30 दिवसाचे आत अर्जदारास विमा हमी प्रमाणे नुकसान भरपाई रु.50,000/- द.सा.द.शे.9 टक्के दराने म्हणजे तारीख 21/05/2010 पासून होणा-या व्याजासह द्यावी. 3 याखेरीज मानसिकत्रासापोटी रु.1,500/- व अर्जाचा खर्च रु.1,000/- आदेश मुदतीत द्यावा 4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |