::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, श्री. विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- १६/०३/२०१६ )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम १२ सह कलम १४ अन्वये दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
१. अर्जदाराने आापल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदाराने स्वतःच्या रोजगाराकरीता गैरअर्जदार क्रं. ३ कडून कर्ज घेवून ट्रक विकत घेतला होता. सदर वाहनाकरीता गैरअर्जदार क्रं. १ व २ कडून विमा काढला होता. सदर विम्याची कालावधी दि. ०१.०६.२०१२ ते ३१.०५.२०१३ पर्यंत वैध होती. दि. २१.०७.२०१२ रोजी अचानक अर्जदाराचा सदर ट्रक वणी येथे देरकर पेट्रोल पंप येथून चोरीला गेला. सदर माहीती अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. १ व २ कडे दिली होती. पोलिसांनी सुरुवातीला अर्जदाराची तक्रार नोंदविण्याकरीता टाळमटाळ करीत असल्याने अर्जदाराने वि. न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय वणी येथे दि. ०५.०१.२०१३ रोजी गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलीसाकडे गुन्हयाची दखल घेतली गैरअर्जदार क्रं. २ ने अर्जदाराला वेळोवेळी दस्ताऐवजाची पुर्तता करीत असल्याचे सांगितले असता अर्जदाराने दस्ताऐवजताची पुर्तता केली. अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. ३ कडे घेतलेल्या कर्जाची रक्कम व व्याज शिल्लक रु. ३,०३,३२०/- राहीले होते. गैरअर्जदार क्रं. १ व २ यांनी अर्जदारास विमा क्लेमची रक्कम देण्यास टाळमटाळ करीत असल्याने अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. १ व २ ला दिनांक २०.०९.२०१३ रोजी अधिवक्ता मार्फत कायदेशिर नोटीस पाठविले व विमा पॉलिसीची रक्कम अर्जदाराला देण्याबाबत कळविले. गैरअर्जदार क्रं. १ व २ यांना सदरहु नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार क्रं. २ च्या अधिका-यांनी अर्जदाराला दुरध्वनीव्दारे कळविले की, त्यांनी गैरअर्जदार क्रं. ३ ला कर्जाची शिल्लक रक्कम दिली आहे व अर्जदाराची रक्कम सुध्दा लवकरात लवकर देण्यात येईल. अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. ३ कडे चौकशी केली असता ते सुध्दा अर्जदाराला टाळमटाळ उत्तर देत आहे व त्यांना इल्शुरन्स कंपनीकडून पूर्ण रक्कम मिळाली नसून काही रक्कम अर्जदाराकडून घेणे बाकी आहे. परंतु नेमकी किती रक्कम त्यांना मिळाली आहे याची माहीती देण्यास गैरअर्जदार क्रं. ३ टाळमटाळ करीत आहे. सदर कृत्य गैरअर्जदाराचे अर्जदाराप्रती अनुचित व्यवहार पध्दती असून सबब सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्यात आली आहे.
२. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदार क्रं. १ व २ यांनी अर्जदाराच्या विम्या दाव्याची रक्कम रु. १६,१५,०००/- व्याजासह देण्याचा आदेश व्हावे. गैरअर्जदार क्रं. ३ ने अर्जदारावर उल्लेखित ट्रक संबंधीत वसुलीबाबत कोणतेही कार्यवाही करण्यात येवू नये व शिल्लक असलेली रक्कम गैरअर्जदार क्रं. ३ ने गैरअर्जदार क्रं. १ व २ कडून वसूल करावी तसेच अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
३. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्रं. १ व २ हजर होवून नि. क्रं. २२ वर आपले लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्रं. १ व २ ने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत लावलेले सर्व आरोप हे खोटे असून ते नाकबुल केले आहे. गैरअर्जदार क्रं. १ व २ यांनी विशेष कथनात असे नमुद केंले कि, अर्जदाराने चोरीच्या घटनेबाबत वेळीच सुचना दि�नांक २३.०७.२०१२ रोजी गैरअर्जदार क्रं. १व २ कडे दिली दिनांक २६.०७.२०१२ रोजी गैरअर्जदार क्रं. १ व २ यांनी अर्जदाराला पञाव्दारे आवश्यक दस्ताऐवज बद्दल कळविले व कारटेल सर्व्हीसेस इन्व्हेसटिगेटर प्रा.लि. यांना प्रकरणाची चौकशी करण्यास कळविले त्यांनी गैरअर्जदार क्रं. १ व २ कडे दिनांक ०३.११.२०१२ रोजी तपासाचा अहवाल दिला. त्यांच्या तपासणी बयाणात अर्जदाराने कबुल केले आहे कि, अर्जदार स्वतः ठेकेदारीचे काम करतो व त्यांनी उपरोक्त ट्रक त्यांचे दोन्ही मुल संदीप व सुनील यांना देखभाली करीता दिला होता. ते स्वतः वाहन चालवून रोजगार चालवित नाही. सदर वाहन व्यापारिक करण्याकरीता होत असल्याने सदर तक्रार वि. मंचाच्या कार्यक्षेञात येत नाही. गैरअर्जदार क्रं. १ व २ यांनी अर्जदारास कोणतीही न्युनतम सेवा दिली नाही अर्जदाराने त्यांच्या वाहनाची सुरक्षितता ठेवली नव्हती. अर्जदाराला गैरअर्जदार क्रं. ३ यांनी फक्त रु. ३,०३,३२०/- व्याजासह देणे बाकी होंते या करीता कोणतेही हिशोब प्रकरणात दाखल नाही व अर्जदाराचा क्लेम बंद करण्याची सुचना दिली नाही. अशा परिस्थितीत सदर तक्रार खारीज होण्यास पाञ आहे.
४. गैरअर्जदार क्रं. ३ यांनी नि. क्रं.१६ वर आपले लेखीउत्तर दाखल केले आहे. . गैरअर्जदार क्रं. ३ ने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत लावलेले सर्व आरोप हे खोटे असून ते नाकबुल केले आहे. गैरअर्जदार क्रं. ३ ने विमा कंपनीला असे सांगितले आहे कि, अर्जदार दिनांक ०७.०१.२०१२ पासून कर्जाचे हप्ते देण्यास असमर्थ ठरला होता. गैरअर्जदार क्रं. ३ ला अर्जदाराकडून रु. ८,०७,५००/- थकीत कर्जाची रक्कम घ्यायची होती. गैरअर्जदार क्रं. १ व २ यांनी दि. ३०.०३.२०१३ रोजी धनादेशाव्दारे सदरहु रक्कम दिली होती व रक्कम देत असतांना स्पष्ट सांगितले की, जर अर्जदाराचा संपूर्ण क्लेम रक्कम सेटल न झाल्यास गैरअर्जदाराला रक्कम परत करावी लागेल. गैरअर्जदार क्रं. ३ ने अर्जदारास कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिली नाही. सदर तक्रार दाखल करण्यापर्यंत अर्जदाराने कोणतेही पञव्यवहार केलेले नाही याउलट गैरअर्जदार क्रं. ३ ने अर्जदाराला त्याचा कर्जाचे ताळेबंद पञ सुध्दा दिले आहे. अर्जदार व गैरअर्जदार क्रं. ३ सोबत झालेल्या करारानुसार सदर प्रकरण या मंचास चालविण्याचा अधिकार नाही सबब सदर तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
५. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
१) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
२) सदर तक्रार गैरअर्जदार क्रं. १ व २ ने उदभवित केलेला ग्राहक वाद
विषयी हा या मंचाला कार्यक्षेञात अधिकार आहे काय ? नाही.
३) गैरअर्जदार क्रं. ३ ने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? नाही.
४) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाण
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. १ बाबत ः-
६. अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. १ व २ कडून वादातील ट्रक बाबत विमा काढला होता ही बाब गैरअर्जदार क्रं. १ व २ यांना मान्य आहे. तसेच वादातील ट्रक बाबत अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. ३ कडून खरेदी करतेवेळी कर्ज घेतले होते ही बाब गैरअर्जदार क्रं. ३ यांना मान्य असून अर्जदार हा गैरअर्जदार क्रं. १ ते ३ चा आहे असे सिध्द होत असल्याने मुद्दा क्रं. १ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. २ बाबत ः-
७. गैरअर्जदार क्रं. १ व २ यांचे प्रमुख कार्यालय चेन्नई येथे असल्याने तसेच शाखा कार्यालय जिल्हा नागपूर येथे आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. १ व २ यांनी अर्जदाराने दाखल वादातील चोरी गेलेल्या ट्रक बाबत विमा क्लेम मिळण्याबाबत तक्रार दाखल केली आहे. ग्राहक सरंक्षण कायदा १९८६ चे कलम ११(२)(अ)(ब) च्या अन्वयाने सदर तक्रार गैरअर्जदार क्रं. १ व २ ने उदभवित केलेल्या ग्राहक वाद बाबत तक्रार चालविण्याचा अधिकार क्षेञ नसल्याने मुद्दा क्रं. २ चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. ३ बाबत ः-
८. गैरअर्जदार क्रं. ३ ने अर्जदारास वादातील ट्रक बाबत कर्ज दिले होते व सदरहु कर्जाची रक्कम दिनांक ३०.०३.२०१३ रोजी गैरअर्जदार क्रं. १ व २ यांच्या कडून गैरअर्जदार क्रं. ३ ला धनादेशाव्दारे प्राप्त झाले असल्याने व ही बाब गैरअर्जदार क्रं. ३ ने नि. क्रं. १७ वर दस्त क्रं. २ वर दाखल खाता उतार वरुन सिध्द होते. गैरअर्जदार क्रं. ३ ला अर्जदाराने सदरहु तक्रारीबाबत दाखल करण्यापूर्वी कोणतीही सुचना किंवा न्युनतम सेवा दर्शविली याबाबत कोणतेही पञ गैरअर्जदार क्रं. ३ ला अर्जदाराने दिली नसून यावरुन सिध्द होते कि, गैरअर्जदार क्रं. ३ ने अर्जदारास त्यांनी दिलेल्या वादातील ट्रक बाबत कर्जाची वसुली करीता कोणतीही न्युनतम सेवा दिली नाही सबब मुद्दा क्रं. ३ चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. ४ बाबत ः-
९. गैरअर्जदार क्रं. १ व २ आणि तक्रारीमध्ये उदभवलेला ग्राहक वाद या मंचाच्या कार्यक्षेञात नसल्याने व मुद्दा क्रं. १ ते ३ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
१) अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. १ व २ चे विरुध्द दाखल केलेली
तक्रार योग्य मंचात दाखल करण्यास परवानगी सह परत करण्यात येते.
२) गैरअर्जदार क्रं. ३ च्या विरुध्द तक्रार खारीज करण्यात येत आहे.
३) अर्जदाराला तक्रारीतील मूळ प्रत सोडून उर्वरित प्रति परत करण्यात
याव्या.
४) दोन्ही पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
५) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - १६/०३/२०१६