::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 03/09/2015 )
आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे. . .
तक्रारकर्त्याने दि. 25/2/2013 रोजी स्टार मोटर्स अकोला येथून शेव्हरोले बीट चार चाकी गाडी क्र. एम.एच. 30 एएफ 2042 ही गाडी विकत घेतली. त्यानंतर चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कडून सदरहू वाहनाचा विमा काढला होता. सदरहू विमा पॉलिसीचा क्र. 3362- 00892337-000-00 असून कालावधी दि. 22/2/2014 ते 21/2/2015 असा होता व प्रिमियमची रक्कम रु. 11,301/- असून विम्याची रक्कम रु. 4,50,000/- होती. सदर वाहनाचा दि. 25/4/2014 चे सकाळी 1.00 वाजता मोठेगांव ता. रिसोड, जि. वाशिम येथे, तक्रारकर्त्याचे मित्र गजानन देशमुख हे त्यांचे घरी गाडी घेऊन जात असतांना गाडी झाडावर आदळून अपघात झाला. गाडी चालक गजानन देशमुख यांच्याकडे गाडी चालविण्याचा परवाना आहे. या अपघाताबाबतची माहिती तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला त्याच दिवशी दिली. त्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्यास फोन करुन त्याचे सर्व्हेअर श्री चांडक यांच्याकडे पाठविले. श्री चांडक यांनी सदरहू गाडी अकोला येथे घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार सदरहू गाडी अकोला येथे क्रेनद्वारे रु. 5000/- भाडे देऊन, आणण्यात आली व अधिकृत विक्रेते व दुरुस्ती करणारे स्टार मोटर्स यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर श्री चांडक यांनी सदरहू गाडीचे फोटो काढले व गाडीच्या बाह्य भागाचा सर्व्हे केला. सर्व्हेअरने गाडीच्या अंतर्गत भागाची कुठल्याही प्रकारची पाहणी केली नाही. स्टार मोटर्स यांनी अपघातग्रस्त गाडी दुरुस्ती करण्याकरिता लागणा-या खर्चाचे रु. 4,35,000/- चे अंदाजपत्रक तक्रारकर्त्यास दिले. सदरहू अपघातग्रस्त वाहन दुरुस्ती करिता तक्रारकर्त्यास रु. 2,24,586/- इतका खर्च आला. त्यानंतर सदरहू गाडीचे पुढल्या भागाचे उजवे टायर, जे अपघाताने क्षतीग्रस्त झाले होते ते नविन घेतले व त्याचा खर्च रु. 4,050/- आला. तक्रारकर्त्याने दि. 26/7/2014 रोजी विरुध्दपक्षाकडे अर्ज देऊन कळविले की, सदरहू विम्याची रक्कम तक्रारकर्त्यास धनादेशाद्वारे देण्यात यावी. त्यानंतर विरुध्दपक्षाने दि. 24/7/2014 रोजी तक्रारकर्त्यास नोटीस पाठविली व त्यामध्ये गाडीच्या खर्चाचे रु. 76,277/- इतकी रक्कम दर्शविली. तक्रारकर्त्याने सर्व बिलांच्या प्रती विरुध्दपक्षास देऊनही विरुध्दपक्षाने दुरुस्तीचा खर्च तक्रारकर्त्यास दिला नाही. अशा प्रकारे विरुध्दपक्षाने सेवेत न्युनता दर्शविली आहे. तक्रारकर्त्याने दि. 12/8/2014 रोजी त्यांच्या वकीलामार्फत विरुध्दपक्षास नोटीस पाठवून सदरहू गाडी दुरुस्तीचा खर्च एकूण रु. 2,33,636/- मागीतले. परंतु विरुध्दपक्ष यांनी सदर नोटीसची दखल घेतली नाही. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करुन तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष क्र. 1,2 व 3 कडून गाडी दुरुस्तीचा खर्च एकूण रु. 2,33,636/- देण्यात यावे. मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु. 50,000/- व दाव्याच्या खर्चासाठी लागलेला खर्च रु. 15,000/- मिळावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 12 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांचा लेखीजवाब :-
2. सदर तक्रारीचे अनुषंगाने विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी संयुक्त लेखी जवाब दाखल केलेला आहे. त्यानुसार तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करुन असे नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याकडून अपघातग्रस्त वाहनाची सुचना मिळाल्यानंतर विरुध्दपक्षाने तज्ञ सर्व्हेअर श्री चांडक यांची अपघातग्रस्त वाहनाचा सर्व्हे करुन नुकसानीची आकारणी करण्यासाठी नेमणुक केली. परंतु तक्रारकर्त्याने सदरहू अपघातग्रस्त वाहन अकोला येथे आणले होते. तक्रारकर्त्याने वाहन अपघातग्रस्त झाल्याची सुचना जेंव्हा विरुध्दपक्षाला दिली, तेंव्हा सर्व्हेअर अपघात स्थळी येईपर्यंत अपघात स्थळाहून तक्रारकर्त्याने वाहन सर्व्हे म्हणजे स्पॉट सर्व्हे झाल्याशिवाय हलवायला पाहीजे नव्हते. कारण विरुध्दपक्षाला सर्व्हेअर मार्फत अपघातस्थळी वाहनाचे कोणत्या परिस्थितीमध्ये कोठे व कसे नुकसान झाले, याची माहिती व फोटो काढता आले असते. सदर वाहन अपघात स्थळावरुन हलविल्यामुळे विरुध्दपक्षाला खरी माहीती मिळू शकली नाही. सर्व्हेअर श्री चांडक यांनी स्टार मोटर्स येथे जावून अपघातग्रस्त वाहनाचे आतुन व बाहेरुन निरिक्षण केले व त्यासंबंधीचे फोटो सुध्दा काढले व दुरुस्तीच्या अंदाजपत्रकाची तपासणी करुन व स्टार मोटर्सच्या प्रतिनिधीशी चर्चा करुन, निव्वळ देय रक्कम रु. 76,277.35 ची आकारणी केली व त्या संबंधीचा अहवाल विरुध्दपक्षास सादर केला. त्यानुसार विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास पत्र पाठवून वरील नमुद केलेली रक्कम मंजुर केल्याची व देण्यासंबंधी तक्रारकर्त्यास कळविले. तक्रारकर्त्याने अनावश्यक दुरुस्तीचे जास्तीच्या रकमेचे बिल विरुध्दपक्षाकडे सादर केले जेंव्हा की, तज्ञ सर्व्हेअरने वाहनाचे आतुन व बाहेरुन पुर्ण तपासणी करुन अंदाजपत्रक तपासून तसेच स्टार मोटर्सच्या प्रतिनिधीशी चर्चा करुन नुकसानीच्या रकमेची आकारणी केली आहे, जी योग्य व बरोबर आहे. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने श्री चांडक यांचेवर गंभीर स्वरुपाचे आरोप केलेले आहेत व त्यामुळे सदर प्रकरणाचा योग्य निवाडा होण्याकरिता दोन्ही पक्षांकडून लांबलचक व भरपुर पुरावे घेणे आवश्यक आहे व ते फक्त दिवाणी न्यायालय, यांचे विस्तारीत कक्षाअंतर्गत घेता येतात. त्यामुळे वि. मंचाचे संक्षीप्त कक्षेमध्ये सदर प्रकरणत येऊ शकत नाही. वरील सर्व कारणास्तव तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासहीत खारीज करण्यात यावी.
2. त्या़नंतर तक्रारकर्ते यांनी शपथेवर साक्ष पुरावा,साक्षदाराचा शपथेवर पुरावा दाखल केला तसेच प्रेमकिशोर चांडक यांनी प्रतिज्ञापत्र, दाखल केले. तसेच उभय पक्षांनी तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
3. सदर प्रकरणात उभय पक्षांनी दाखल केलेले दस्त यांचे अवलोकन करुन व उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकुन काढलेल्या मुद्दयांचा अंतीम आदेशाचे वेळी विचार करण्यात आला.
- सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून काढलेल्या पॉलिसी बद्दल, पॉलिसीच्या कालावधी बद्दल, पॉलिसीच्या रकमेबाबत कुठलाही वाद नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून काढलेल्या पॉलिसीची प्रत दस्त क्र. 1 पृष्ठ क्र. 9 वर दाखल केली आहे. तक्रारकर्ता हा विरुध्दक्षाचा ग्राहक असल्याबद्दल विरुध्दपक्षाचा कुठलाही आक्षेप नसल्याने व दाखल पॉलिसी वरुन तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा “ग्राहक” असल्याचे सिध्द होत असल्याने, तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांचा “ग्राहक” असल्याचे ग्राह्य धरण्यात येत आहे.
- सदर प्रकरणात दोनच वादाचे मुद्दे आहेत.. त्यापैकी एक म्हणजे तक्रारकर्त्याचे म्हणणे असे की, तक्रारकर्त्याच्या वाहनाला जेंव्हा अपघात झाला, त्यावेळी तक्रारकर्त्याने त्या बद्दलची सुचना विरुध्दपक्षाला टोल फ्रि नंबरवरुन दिली व विरुध्दपक्ष क्र. 1 ने सर्व्हेअर चांडक यांचेकडे पाठविले. परंतु सदर सर्व्हेअरने अपघात स्थळावर येण्यास नकार देऊन, अपघातग्रस्त वाहन अकोला येथे आणण्यास सांगीतले, म्हणून तक्रारकर्त्याने रु. 5000/- खर्च करुन क्रेनद्वारे सदर वाहन अकोला येथे आणले. सदरची बाब विरुध्दपक्षाने त्यांच्या जबाब व युक्तीवादात संपुर्णपणे नाकारली आहे. या मुद्दयावर विरुध्दपक्षाचे असे म्हणणे आहे की, सर्व्हेअर अपघातस्थळी येईपर्यंत अपघात स्थळाहून तक्रारकर्त्याने वाहन स्पॉट सर्व्हे केल्याशिवाय अकोल्याला हलविले होते. त्यामुळे मुळ अपघात स्थळावरची अपघातग्रस्त वाहनाची स्थिती व माहीती विरुध्दपक्षाला मिळू शकली नाही. सदरच्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ सर्व्हेअर श्री प्रेमकिशोर चांडक यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले. सदर प्रतिज्ञापत्रात सर्व्हेअर यांनी शपथेवर असे नमुद केले आहे की, “ वाहनाचे स्पॉट निरीक्षण करुन, फोटो काढून त्या संबंधीचा अहवाल तयार करण्याची फी व अकोल्यावरुन अपघात स्थळापर्यंत जाण्यायेण्याचा व फोटो काढण्याचा खर्च सुध्दा मला मिळत असल्याने मी तक्रारकर्त्याला स्पॉटवर येत नाही व गाडी अकोल्याला घेऊन या, असे म्हणणार नाही.”
सदर मुद्दयावर उभयपक्षांचा युक्तीवाद व दाखल दस्तांचे अवलोकन केल्यावर मंचाला विरुध्दपक्षाच्या म्हणण्यात तथ्य वाटले, कारण अपघातग्रस्त वाहनाचा सर्व्हे करुन नुकसान भरपाई देण्यासाठी अपघातग्रस्त वाहनाचा स्पॉट पंचनामा व सर्व्हे रिपोर्ट अत्यंत आवश्यक असल्याने व त्यासाठी आवश्यक असलेली रक्कम सर्व्हेअरला मिळत असल्याने, आवश्यक असलेली कारवाई विरुध्दपक्षाच्या सर्व्हेअरने कोणतेही सबळ कारण न देता टाळली असेल, असे मंचास वाटत नाही. तसेच तक्रारकर्त्याने सर्व्हेअरने फोनवरुन येण्यास नकार दिला, हे सिध्द करणारे कुठलेही ठोस पुरावे तक्रारकर्त्याने मंचासमोर न आणल्याने तक्रारकर्त्याच्या या मुद्दयावरच्या आक्षेपात मंचाला तथ्य आढळून येत नाही.
- सदर प्रकरणातील दुसरा वादाचा मुद्दा असा आहे की, तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार विरुध्दपक्षाच्या सर्व्हेअरने अपघातग्रस्त वाहनाचे छायाचित्र काढले व फक्त गाडीच्या बाह्य भागाचा सर्व्हे केला व सर्व्हेअर यांनी गाडीच्या अंतर्गत भागाची कुठल्याही प्रकारची पाहणी केली नाही. गाडीच्या आतल्या भागातील कोणकोणते भाग निकामी झाले आहेत, हे न पाहता व त्याचा योग्य सर्व्हे न करता निघुन गेले. तक्रारकर्त्याने त्याला लागलेल्या खर्चाचे अंदाजपत्रक, तसेच प्रत्यक्ष अदा केलेल्या देयकाच्या मुळ प्रती, क्रेन भाड्याची रु. 5000/- ची पावती, नवीन टायरच्या किंमतीची रु. 3850/- ची पावती व टायर बसवून घेण्याची मजुरी रु. 200/- ची पावती, या सर्वांच्या मुळ प्रती, विरुध्दक्षाच्या सर्व्हेअरला दिलेल्या असतानांही व त्यावरुन वाहन दुरुस्तीसाठी तक्रारकर्त्याने रु. 2,33,636/- खर्च केल्याचे सिध्द होत असतांनाही विरुध्दपक्षाने गाडीचा दुरुस्ती खर्च केवळ रु. 76,277/- एवढाच मंजुर केला. तक्रारकर्त्याची पॉलीसी प्रमाणे गाडीची विमा रक्कम रु. 4,50,000/- इतकी होती व तक्रारकर्त्याला सदर वाहनाच्या दुरुस्तीसाठी रु. 2,33,636/- लागले असल्याने, तक्रारकर्ता तेवढी रक्कम मिळण्यास पात्र आहे.
यावर विरुध्दपक्षाचे असे म्हणणे आहे की, त्यांच्या सर्व्हेअरने स्टार मोटर्स येथे जाऊन अपघातग्रस्त वाहनाचे आतुन व बाहेरुन निरीक्षण केले व त्या संबंधीचे फोटो सुध्दा काढले व सी.डी. सुध्दा तयार केली. तक्रारकर्त्याने दिलेल्या अंदाजपत्रकाची तपासणी करुन, तसेच स्टार मोटर्सचे प्रतिनिधी यांचेशी चर्चा करुन नुकसानीची निव्वळ देय रक्कम रु. 76,277.35 ची आकारणी केली व सदरची रक्कम योग्य व बरोबर आहे.
उभय पक्षांचे म्हणणे ऐकल्यावर मंचाने सदर मुद्दयांशी संबंधीत दस्तांचे अवलोकन केले. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तांपैकी दस्त क्र. 1 (पृष्ठ क्र. 9) वर असलेल्या वाहनाच्या पॉलिसीचे निरीक्षण केले असता, सदर वाहनाची Insured Declared Value (IDV ) ही रु. 4,50,000/- असल्याचे दिसून येते. तसेच दस्त क्र. 3 ( पृष्ठ क्र. 11 ) वर हर हर महादेव क्रेन सर्व्हीस ला क्रेन भाड्यापोटी दिलेल्या रु. 5000/- ची पावती, दस्त क्र. 5 ( पृष्ठ क्र. 13 ) वर आंबेकर टायर्स कडून टायर विकत घेतल्याची रु. 3850/- ची पावती, दस्त क्र. 7 ( पृष्ठ क. 15 ) वर स्टार मोटर्स ला अपघातग्रस्त वाहनाच्या दुरुस्तीपोटी दिलेल्या रु. 2,24,586/- ची पावती व टायर्स बसवल्याच्या खर्चाची रु. 200/- ची पावती दस्त क्र. 8 ( पृष्ठ क्र. 16 ) वर, अशा एकूण सर्व खर्चाच्या पावत्या प्रकरणात दाखल केलेल्या दिसून येतात. या सर्व पावत्यांवरुन तक्रारकर्त्याला रु. 2,33,636/- इतका खर्च वाहन दुरुस्तीसाठी लागलेला होता, हे सिध्द होत आहे.
विरुध्दपक्षाने त्यांच्या जबाबात त्यांच्या सर्व्हेअरने तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या अंदाजपत्रकावरुन व स्टार मोटर्स चे प्रतिनिधीशी चर्चा करुन झालेल्या नुकसानीची रक्कम ठरवली. परंतु तक्रारकर्त्याने प्रत्यक्षात क्रेन भाडेपोटी रु. 5000/- दिलेले असतांनाही विरुध्दपक्षाने केवळ रु. 1500/- मंजूर केल्याचे सर्व्हे रिपोर्टवरुन दिसून येते. तसेच टायर्स विकत घेतलेल्या रकमेचा व टायर बसवण्याच्या खर्चाचा सर्व्हे रिपेार्ट मध्ये कुठेही उल्लेख दिसून येत नाही. त्याच प्रमाणे स्टार मोटर्स मधील सर्व्हीस ॲडव्हायझर श्री तेजस कपाटे यांचा शपथेवर लेखी पुरावा तक्रारकर्त्याने दाखल केला आहे ( पृष्ठ क्र. 40) सदर पुराव्यात साक्षीदाराने, तक्रारकर्त्याने गाडीच्या दुरुस्तीच्या खर्चापोटी रु. 2,24,586/- दिल्याचे व त्याच्या पावत्या तक्रारकर्त्याला दिल्याचे शपथेवर नमुद केले आहे.
त्याच प्रमाणे सर्व्हेअरने अपघातग्रस्त वाहनाची पाहणी करुन त्याचे फोटो व सी.डी. काढल्याचे विरुध्दपक्षाने म्हटले आहे व सदर फोटो प्रकरणात दाखल केलेले आहेत. परंतु युक्तीवादाच्या वेळी सदर फोटोतील काही फोटो तक्रारकर्त्याच्या गाडीचे नसल्याचे तक्रारकर्त्याने मंचाच्या निदर्शनास आणून दिले. तक्रारकर्त्याच्या गाडीचा क्रमांक एम.एच. 30 एएफ 2042 असा आहे तर छायाचित्रातील गाडीचा क्र. एम.एच 30 एए 467 असल्याचे दिसून येते. त्याच प्रमाणे काही फोटोवरील तारीख 29/4/2014 दिसून येते तर काही फोटोवरील तारीख 30/6/2014 अशी दिसून येते. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार व तक्रारकर्त्याच्या साक्षीदाराच्या शपथेवरील पुराव्यानुसार तक्रारकर्त्याची गाडी स्टार मोटर्स यांचेकडे दि. 27/4/2014 ते 28/6/2014 या कालावधी पुरतीच असल्याने सर्व्हेअरने दि. 30/6/2014 चे फोटो तक्रारकर्त्याच्या गाडीचे फोटो म्हणून कसे दाखल केले, यावर प्रश्नचिन्ह उभे राहते. त्याच प्रमाणे छायाचित्रातील वाहनाचा व तक्रारकर्त्याच्या वाहनाचा क्रमांक जुळत नसल्याने तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाच्या सर्व्हेअरने वाहनाचे निरीक्षण आतुन – बाहेरुन योग्य रितीने केले नसल्याचा व कशा वरुन सदर सर्व्हे तक्रारकर्त्याच्याच गाडीचे निरीक्षण करुन केला असावा, असा जो आक्षेप घेतला आहे, त्यात मंचाला सदर संभ्रमीत पुराव्यावरुन तथ्य वाटते.
वरील सर्व बाबींचा विचार केला असता, तक्रारकर्त्याने रु. 2,33,636/- प्रत्यक्ष खर्च केले असले तरी तक्रारकर्त्याने अपघातग्रस्त वाहन, सर्व्हेअरने घटनास्थळ पंचनामा करण्याच्या आधीच हलवून विरुध्दपक्षाच्या अटी शर्तींचा भंग केला असल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे. त्यामुळे विरुध्दपक्षाने सदर प्रकरणात Non Standard Basis नुसार सदर खर्चाच्या 75 टक्के रक्कम रु.1,75,227/- इतकी तक्रारकर्त्याला द्यावी. तसेच प्रकरणाच्या खर्चापाटी रु. 3000/- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला द्यावे, या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.
सबब अंतिम आदेश पारीत केला तो खालील प्रमाणे……
::: अं ति म आ दे श :::
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
2) विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी Non Standard Baiss नुसार संपुर्ण खर्च रकमेच्या म्हणजे रु. 2,33,636/- च्या 75 टक्के इतकी रक्कम म्हणजे रु. 1,75,227/- ( रुपये एक लाख पं चाहत्तर हजार दोनशे सत्ताविस फक्त ) वैयक्तीक व संयुक्तीकरित्या तक्रारकर्त्याला द्यावी.
3) विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 3000/-( रुपये तिन हजार फक्त ) तक्रारकर्त्याला द्यावे.
4) सदर आदेशाचे पालन निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावे
5) निकालपत्राच्या प्रती संबंधीतांना विनामुल्य देण्यात याव्या.