तक्रारदार : वकील श्री. शर्मा हजर.
सामनेवाले : प्रतिनिधी महेश भगालीया हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.एस.एस.व्यवहारे, अध्यक्ष. ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र. 1 हे चोलामंडलम एमएस जनरल इनश्युरन्स लिमिटेड या नांवाने विमा विषयक कामे करणारी कंपनी असून सा.वाले क्र. 2 हे त्यांचे व्यवस्थापक आहेत. सा.वाले क्र. 1 व 2 यांची कार्यालये तक्रारीत नमुद केलेल्या ठिकाणी आहेत.
2. तक्रारदार एैरोली, नवी मुंबई येथील रहीवासी असून तक्रारदार यांनी आपल्या चारचाकी माल वाहतुक वाहनाचा विमा सा.वाले यांचे कडून दिनांक 22.3.2012 ते 21.3.2013 या कालावधीसाठी काढला होता. सदर विम्या बद्दल विमा पॉलीसीचा हप्ता देखील तक्रारदारांनी भरला होता. सा.वाले यांनी तक्रारदार यांना सदर पॉलीसी प्रमाणे रु.4,59,000/- सुरक्षा कवच प्रदान केले होते. तक्रारदारांचे वरील वर्णनाचे चारचाकी माल वाहतुक वाहन दिनांक 29.7.2012 रोजी चिपळून येथे अपघातग्रस्त झाले. त्या बाबत तक्रारदार यांनी सा.वाले यांना अपघाताची माहिती कळवून सदर माहिती प्रमाणे सा.वाले यांनी सव्हेक्षकाची नेमणुक केल्यानंतर सर्व्हेक्षकास आवश्यक असणारी कागदपत्रे तक्रारदार यांनी सव्हेक्षकाकडे जमा केली. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, सदर वाहनाच्या दुरुस्तीसाठी त्यांनी रु.2,10,000/- येवढी रक्कम खर्च केली. तसेच सा.वाले यांनी सर्व्हेक्षकाची नेमणूक केल्यानंतर सर्व्हेक्षकांनी आपला अहवाल देखील दाखल केला. सर्व्हेक्षकांनी आपला अहवाल दाखल करुन देखील सा.वाले यांनी तक्रारदार यांना विमा रक्कमेची मागणी मान्य न करता तक्रारदारांचा क्लेम बंद केल्याबाबत त्यांना कळविले व विमा रक्कमेची मागणी बंद करण्या बाबत तक्रारदार यांनी आवश्यक ती कागदपत्रे जमा न केल्यामुळे विमा रक्कमेची मागणी बंद केल्या बाबत कळविण्यात आले. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, वास्तविक सा.वाले यांच्या सर्व्हेक्षकाने अपघातग्रस्त वाहनाची तपासणी करुन नुकसान भरपाईचा अंदाज कळवून देखील सा.वाले यांनी तक्रारदारांची मागणी बंद केली ही सा.वाले यांची कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर या कृतीत येते. म्हणून सदर तक्रार दाखल करुन तक्रारदार यांनी नुकसान भरपाई बद्दल रु.2,10,000/- व्याजासहीत मागून मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रु.25,000/- व तक्रारीचा खर्च याची मागणी केलेली आहे.
3. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल करुन तक्रारदारांचे म्हणणे, मागणे व तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने, म्हणणे व मोगणे खोटे व लबाडपणाचे असून सत्य परिस्थिती मंचासमोर लपवून व तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नसताना सा.वाले यांचे कडून पैसे लुबाडण्यासाठी सदरची मागणी केलेली आहे. सा.वाले यांचे असे देखील म्हणणे आहे की, तक्रारदार यांची विमा रक्कमेची मागणी मुदतीच्या बाहेर असल्यामुळे मान्य करता येणार नाही. तसेच तक्रारदारांना रु.63,845/- येवढया रक्कमेपक्षा जास्त नुकसान भरपाई मागता येणार नाही.
4. तक्रारदार यांनी आपल्या मालकीच्या चारचाकी माल वाहतुक वाहनाचा रु.4,59,000/- येवढया सुरक्षा कवचासाठी दिनांक 22.3.2012 ते 21.3.2013 या कालावधीसाठी विमा काढला होता व सदर विमा रक्कमेपोटी विम्याचा हप्ता देखील भरला होता ही बाब सा.वाले नाकारत नाहीत. तक्रारदार यांच्या वरील वर्णनाच्या चारचाकी वाहनास चिपळून येथे अपघात झाल्याबाबत सा.वाले नाकारत नाहीत. परंतु सा.वाले यांचे असे म्हणणे आहे
की, तक्रारदार यांनी सदर अपघाताची माहिती पोलीसांना दिली नाही. तसेच सदर चारचाकी वाहना बद्दल आवश्यक ती कागदपत्र वारंवार मागणी करुन देखील दिली नाही. तसेच तक्रारदारांचा वाहन चालविण्याचा परवाना हा तिन चाही वाहनाचा असून त्यांचे जवळ चारचाही वाहनाचा परवाना नाही. त्यामुळे तक्रारदार यांना चारचाकी वाहनाचा परवाना दाखल करावयास सांगून देखील तो त्यांनी केलेला नाही. अशा परिस्थितीत तक्रारदार यांचा विमा मागणीचा अर्ज बंद करण्यावाचुन सा.वाले यांना दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे सा.वाले यांची कृती कोणत्याही परिस्थितीत सेवा सुविधा पुरविण्यात कसुर ठरु शिकत नाही. सबब तक्रार रद्द करण्यात यावी.
5. तक्रारदार यांनी आापल्या तक्रारी सोबत पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, चारचाकी वाहनाची विमा पॉलीसीची प्रत, सर्व्हेक्षक यांचा अहवाल, तसेच दत्तात्रय मोटर गॅरेज यांनी दिलेल्या बिलाच्या पावत्या, वाहन चालविण्याच्या परवान्याची प्रत, दाखल केलेली आहे.
6. या उलट सा.वाले यांनी आपल्या कैफीयती सोबत पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, विमा पॉलीसीची प्रत, तसेच सदर विमा पॉलीसीच्या अटी व शर्थीची प्रत दाखल केलेली आहे.
7. प्रस्तुत मंचाने तक्रार , कैफीयत, शपथपत्र, कागदपत्र व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. प्रकरणात तक्रारदार यांचा तोंडी युक्तीवाद एैकण्यात आला. सा.वाले हे तोंडी युक्तीवादाकामी हजर राहू शकले नाहीत. त्यानुसार तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदार यांचा त्यांच्या मालकीचा चारचाकी माल वाहतुक वाहनाच्या विमा रक्कमेची मागणी नाकारुन सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिंध्द करतात काय ? | होय. |
2 | तक्रारदार तक्रारीत मागीतलेल्या मागण्या मिळण्यास पात्र आहेत काय | होय. |
3 | अंतीम आदेश ? | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
मान्य मुद्देः तक्रारदार यांनी आपले मालकीच्या चारचाकी माल वाहतुक वाहनाचा रु.4,59,000/- येवढया सुरक्षा कवचाचा विमा सा.वाले यांचे कडून दिनांक 22.3.2012 ते 21.3.2013 या कालावधीसाठी काढला होता. तसेच सदर विमा पॉलीसीचा हप्ता सा.वाले यांचेकडे अदा केला होता ही बाब सा.वाले नाकारत नाही. तक्रारदार यांच्या मालकीचे वरील वर्णनाचे वाहन दिनांक 29.7.2012 रेाजी चिपळून येथे अपघातग्रस्त झाल्यामुळे तक्रारदार यांनी सा.वाले यांना त्या बाबत कळविले होते व सा.वाले यांनी श्री. दंभे यांची सर्व्हेक्षक म्हणून नेमणूक केली होती ही बाब सा.वाले नाकारत नाहीत.
8. तक्रारदार यांनी आपल्या वाहनाच्या दुरुस्तीसाठी श्री. दत्तकृपा मोटर गॅरेज यांचे कडून दुरुस्तीचे अंदाजपत्रक दाखल केले ही बाब सा.वाले नाकारत नाही.
9. तक्रारदार यांच्या चारचाकी मालवाहु वाहनाच्या विमा रक्कमेची मागणी बंद करण्याची कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर होती ही बाब सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांनी आपले पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद याव्दारे प्रामुख्याने असे सिध्द करण्याचा प्रयत्न केला आहे की, तक्रारदार यांच्या चारचाकी वाहनास अपघात झाल्यानंतर अपघाताची माहिती सा.वाले यांना तत्परतेने कळविण्यात आली. त्या प्रमाणे सा.वाले यांनी सर्व्हेक्षकाची नेमणूक करुन सर्व्हेक्षकास आवश्यक असणारी कागदपत्रे देखील सादर केली. असे असताना देखील सा.वाले यांनी तक्रारदार यांचा विमा मागणीचा अर्ज योग्य ती कागदपत्रे न दिल्याबद्दल बंद ( Close ) केला. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, त्यांची विमा रक्कमेची मागणी चुकीची असल्यास सा.वाले हे नाकारु शकले असते. परंतु विमा रक्कमेची मागणी बंद करण्याची कोणतीही तरतुद मोटार वाहन कायद्यात नाही. त्यामुळे सा.वाले यांची सदर कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर या कृतीत येते. तक्रारदार यांनी आपल्या चारचाकी वाहनासाठी दुरुस्तीसाठी लागलेला खर्च दाखविण्यासाठी श्री दंत्तकृपा मोटर गॅरेज यांचे बिल दाखल करुन मजुरीसाठी दिलेल्या खर्चाची बिले दाखल केलेली आहेत. त्यामुळे तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, सा.वाले यांनी त्यांच्या चारचाकी वाहनाचा विमा उतरवित असताना त्यांना रु.4,59,000/- येवढी रक्कम सुरक्षा कवचापोटी देण्याचे कबुल केलेले असल्यामुळे सा.वाले हे तक्रारदार यांना रु.2,10,000/- देण्यास बांधील आहे.
10. प्रति उत्तरा दाखल तक्रारदार यांची विमा रक्कमेची मागणी मुदतीच्या बाहेर आहे हे दाखविण्यासाठी मा. राष्ट्रीय आयोगाच्या गणपत रामा मढावी विरुध्द न्यु इंडिया अॅश्युरन्स या रिव्हीजन अर्ज क्रमांक 1065/11 निकाल दिनांक 20.9.2011 व मा. राष्ट्रीय आयोगाच्या वंदन परेश कुमार विरुध्द डिव्हीजनल मॅनेजर नॅशनल इनश्युरन्स कंपनी पहीले अपील क्रमांक 854/12013 निकाल दिनांक 8.10.2014 या न्यायनिर्णयाची मदत घेऊन तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार विम्याची मागणी बंद केल्यापासून दोन वर्षानंतर असल्यामुळे तक्रार रद्द होण्यास पात्र आहे असा लेखी युक्तीवाद सा.वाले यांचेतर्फे करण्यात आला.
11. याचे व्यतिरिक्त सा.वाले यांचेतर्फे लेखी युक्तीवादात इतर मुद्दे मांडण्यात आले नाहीत. सा.वाले यांच्या कैफीयतीत तक्रारदार यांच्या विमा रक्कमेची मागणी बंद करताना तक्रारदार यांनी आवश्यक ती कागदपत्र हजर केली नाही. तसेच तक्रारदार यांचे जवळ तिनचाकी वाहन चालविण्याचा परवाना होता परंतु चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना त्यांनी दाखल केला नाही. तसेच आवश्यक ती कागदपत्र वारंवार कळवून देखील तक्रारदार यांनी जमा न केल्यामुळे तक्रारदारांची विमा रक्कमेची मागणी रद्द करण्यात आली व तसे करण्यात सा.वाले यांची कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर ठरु शकत नाही. असा युक्तीवाद करताना तक्रारदारांची विमा रक्कमेची मागणी रद्द करण्यात यावी असा युक्तीवाद सा.वाले यांचेतर्फे करण्यात आला.
12. उभय पक्षकारातर्फे दाखल करण्यात आलेला पुरावा, लेखी युक्तीवाद व तक्रारदार यांचेतर्फे करण्यात आलेला तोंडी युक्तीवाद याचे अवलोकन करुन प्रामुख्याने असे दिसुन येते की, तक्रारदार यांना जरी सा.वाले यांनी त्यांच्या चारचाकी वाहनापोटी विमा काढत असताना रु.4,59,000/- येवढया रक्कमेचे सुरक्षा कवच प्रदान केले होते तरी तक्रारदार यांचे चारचाकी वाहन 2007 साली तंयार केलेले होते. तक्रारदार यांनी सदरचे वाहन नविन घेतले होते अथवा दुस-या कडून विकत घेतले होते या बाबत कोणताही खुलासा केलेला नाही. तक्रारदार यांच्या वाहनाचा 2007 सालापासून झालेला घसारा किती होता या बाबत उभय पक्षकारांनी समाधानकारक खुलासा केलेला नाही. तक्रारदार यांचे वाहन 2007 साली जरी तंयार करण्यात आले असले तरी तक्रारदार यांच्या वाहनाचा विमा काढत असताना त्यांना सा.वाले यांनी रु.4,59,000/- येवढया रक्कमेचे सुरक्षा कवच प्रदान केले या बाबत सुध्दा सा.वाले यांचे कडून खुलासा नाही. त्यामुळे तक्रारदार व सा.वाले यांच्यातील विमा रक्कमेच्या करारामुळे वाहनास होणा-या नुकसानी बद्दल सा.वाले हे नुकसान भरपाई देण्यास बांधील आहेत असा निष्कर्ष काढल्यास ते वावगे ठरणार नाही. सा.वाले यांचे जरी असे म्हणणे असले की, तक्रारदार यांनी आवश्यक ती कागदपत्र सा.वाले यांचे कडे जमा केली नाहीत. तसेच त्यांनी दाखल केलेला वाहन चालविण्याचा परवाना हा संशयास्पद होता, असे असले तरी सा.वाले यांनी नियुक्त केलेल्या सर्व्हेक्षकाच्या अहवाला वरुन तक्रारदारांनी सर्व कागदपत्रे सर्व्हेक्षकाच्या मनाप्रमाणे समाधानकारकरित्या दाखल केले होते असे दिसून येते. त्यामुळे विमा रक्कमेची मागणी बंद करण्याची सा.वाले यांची कृती हास्यास्पद वाटते. तक्रारदार यांनी विमा रक्कमेची मागणी सिध्द करत असतानरा वाहनाच्या दुरुस्तीसाठी लागलेल्या खर्चाच्या पावत्या दाखल करुन विमा रक्कमेची मागणी रु.2,10,000/- पर्यत सिमित ठेवली आहे. परंतु ते तसे करीत असताना वाहनावरील झालेल्या घसा-याचा विचार त्यांनी केलेला नाही. सर्व्हेक्षक यांनी वाहनावरील दुरुस्ती खर्चामध्ये 50 टक्के घसारा काढून विमा रक्कमेची मागणी रु.63,845.75 येवढीच सिमित ठेवलेली आहे. परंतु सर्व्हेक्षकांनी 50 टक्के घसारा गृहीत धरण्यासाठी कोणती तत्वे वापरली या बद्दल त्यांच्या अहवालात बोध होत नाही. सर्व्हेक्षकांनी काढलेली विमा रक्कमेची मागणी क्षणभर बरोबर धरल्यास सदरची रक्कम देखील सा.वाले यांनी तक्रादार यांना देऊ केलेली नाही. उलटपक्षी तक्रारदार यांनी आवश्यक ती कागदपत्र जमा न केल्याबद्दल तक्रारदारांची विमा रक्कमेची मागणी बंद केलेली आहे. वास्तविक विमा कंपनी विमा ग्राहकाची मागणी बंद करता येत नाही. विमा रक्कमेची मागणी योग्य वाटत नसल्यास विमा कंपनी विमा रक्कमेची मागणी रद्द करु शकते अथवा योग्य वाटत असल्यास मागणी मान्य करु शकतात. परंतु विमा रक्कमेची मागणी बंद करण्याच्या कृतीस कोणीतीही कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळे सा.वाले यांची कृती निच्छितच सेवा सुविधा पुरविण्यात कसुर या कृतीत येते असे मंचाचे मत आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सा.वाले यांच्या दिनांक 11.13.2013 पत्रावरुन त्यांची विमा रक्कमेची मागणी बंद केल्या बाबत दिसून येते. तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार सदर पत्रापासुन दोन वर्षाचे आत आत केल्यामुळे तक्रारीस मुदतीची बाधा येत नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे सा.वाले यांचेतर्फे दाखल करण्यात आलेल्या कायदेशीर प्रकरणातील मा. राष्ट्रीय मंचाचे निर्णय सा.वाले यांना फायदेशीर ठरु शकत नाही असे मंचाचे मत आहे.
13. तक्रारदार यांच्या विमा रक्कमेचा मागणीचा विचार करताना त्यांनी वाहनाच्या दुरुस्तीसाठी केलेल्या खर्चातुन 30 टक्के घसारा वजा करुन उर्वरित रक्कम तक्रारदार यांना वाहनाच्या विमा रक्कमेची मागणी म्हणून दिल्यास उचित ठरेल असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारदार यांची विमा रक्कमेची मागणी रु.1,47,000/- या किंमतीस सिमित ठेऊन मुद्दा क्रमांक 1 व 2 होकारार्थी ठरवून मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार क्रमांक 107/2014 ही अशतः मंजूर करण्यात येते.
2. सा.वाले यांनी तक्रारदार यांचा त्यांच्या मालकीचा चारचाकी माल वाहतुक वाहनाच्या विमा रक्कमेची मागणी नाकारुन सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सा.वाले यांनी एकत्रित अथवा संयुक्तरित्या सदर आदेशाची प्रत मिळाल्यापासून दोन महीन्याचे तक्रारदार यांना त्यांचे चारचाकी मालवाहु वाहनाच्या विमा रक्कमेपोटी रु.1,47,000/- अदा करावेत, तसे न केल्यास सदर रक्कमेवर विमा तारखेपासून सदर रक्कम वसुल होईपावेतो 10 टक्के प्रमाणे होणारे व्याज अदा करावेत असे आदेश मंच पारीत करीत आहे.
4. सा.वाले यांनी एकत्रित अथवा संयुक्तरित्या दोन महिन्याचे आत तक्रारदार यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी रु 25,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- अदा करावेत असा आदेश मंच पारीत करीत आहे.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 05/03/2016