आदेश - मा. श्री. ए. झेड. तेलगोटे अध्यक्ष, ठिकाणः बांद्रा
निशाणी 1 वर आदेश
1. मंचाकडून तक्रारीचे व सोबत दाखल कागदपत्रांचे वाचन करण्यात आले. तक्रारदाराच्या विधिज्ञांचा युक्तीवाद ऐकण्यात आला.
2. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांनी सामनेवाले कंपनीकडून रू.14,50,000/-,एवढे अर्थसहाय्य घेऊन एम.एच ओ.फोर- ई.वाय- 8471 खरेदी केला. उभयतामध्ये त्या संदर्भात दि.17/02/2011 रेाजी करारनामा झाला. त्यानूसार तक्रारदाराने कर्जाची फेड प्रतिमहा रू.39,814/-,याप्रमाणे एकुण 45 हप्त्यामध्ये करावयाची होती. तक्रारदाराच्या म्हणण्यानूसार त्यांनी 17,36,000/-,एवढी रक्कम भरली व आर्थिक अडचणीमुळे ते उर्वरीत रक्कम भरू शकले नाहीत त्यांचेकडून केवळ रू. 54,698/-,एवढीच रक्कम येणे बाकी होते. तक्रारदाराकडून केवळ दिड हप्त्याची रक्कम थकीत झाली होती. असे असतांनाही सामनेवाले यांनी त्यांचा ट्रक दि.25/03/2015 रोजी ताब्यात घेतला. त्यानंतर, सामनेवाले यांनी तक्रारदाराला ट्रक विक्री पूर्वी नोटीस पाठवून एकुण रू. 1,83,965/-,एवढया रकमेची मागणी केली. वास्तविक, तक्रारदाराकडून केवळ रू. 54,698/-,एवढीच रक्कम येणे बाकी असतांनाही सामनेवाले यांनी त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे ज्यादा रकमेची मागणी केली. तरी देखील त्यांनी सामनेवाले यांना नोटीस व सोबत रू. 1,83,965/-,चा डिमांड ड्रॉप पाठविला व ट्रक परत करण्याची विनंती केली. तथापी, सामनेवाले यांनी संपूर्ण रक्कम मिळूनही तक्रारदाराला ट्रक परत केला नाही व अशाप्रकारे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करून दोषपूर्ण सेवा दिली म्हणून तक्रारदाराला प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले.
3. सामनेवाले यांच्याकडून वादग्रस्त ट्रक परत मिळावा किंवा तसे शक्य नसल्यास रू.20,00,000/-,नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदाराने आपल्या तक्रारीत केली.
4. तक्रारदाराने तक्रारीसोबत करारनाम्याची व बँक स्टेटमेंटची प्रत व इतर कागदपत्रे दाखल केली. ज्यांचे मंचाकडून अवलोकन करण्यात आले. तक्रारीतील कथनांचा विचार करता तक्रारदाराने सामनेवाले यांच्याकडून कर्ज घेऊन वाणीज्यीक उद्देशासाठी ट्रक खरेदी केला हे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यांनी सदरचा ट्रक उदरनिर्वाहाचे साधन म्हणून खरेदी केल्याचे कथन तक्रारीमध्ये कुठेही आढळत नाही. त्यामुळे उभयतांमधील व्यवहार हा वाणीज्यीक व्यवहार ( Commercial Transition) आहे. तक्रारदारानी सदरचा ट्रक नफा कमविण्याच्या उद्देशाने खरेदी केला हे एकंदरीत परिस्थितीवरून व उपलब्ध कागदपत्रांवरून निदर्शनास येते. अशा परिस्थितीत उभयतामधील वाद हा ग्रा.सं.कायदयाच्या कार्यकक्षेत येत नाही व तक्रारदार हे ‘ग्राहक’ या संज्ञेत मोडत नाहीत. सबब, प्रस्तुतची तक्रार चालविण्याचा ग्राहक मंचाला अधिकार नाही. परिणामतः ती फेटाळण्यास पात्र आहे. म्हणून मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. ग्राहक तक्रार क्र. 201/2015 फेटाळण्यात येते.
2. आदेशाची प्रत तक्रारदारांना विनामुल्य पाठविण्यात यावी.
npk/-