निकालपत्र (पारित दिनांक 15 डिसेंबर, 2010) व्दारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा. 1. तक्रारकर्ता श्री गोविंद सदाराम तिडके यांनी सदर ग्राहक तक्रार ही त्यांच्या अपघातग्रस्त वाहनाच्या विमा रक्कमेबद्दल दाखल केली असून मागणी केली आहे की, विरुध्दपक्ष यांनी रुपये 98,360/- ही रक्कम दिनांक 15/05/2009 पासून ती तक्रारकर्ता यांना प्राप्त होत पर्यंत 9% व्याजासह देण्याचा आदेश व्हावा. तसेच शारीरिक व मानसिक त्रासासाठी रुपये 10,000/- व ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5,000/- विरुध्दपक्ष यांचेकडून मिळावे. 2. विरुध्दपक्ष त्यांच्या लेखी जबाबात म्हणतात की, तक्रारकर्ता यांनी केलेला विमादावा हा अवास्तव असा आहे. तक्रारकर्ता यांच्या असहकारामुळे त्यांचा विमादावा हा नाकारण्यात आल्यामुळे तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार ही खारीज करण्यात यावी. ..2..
..2.. कारणे व निष्कर्ष 3. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली शपथपत्रे, दस्ताऐवज, इतर पुरावा व केलेला युक्तीवाद यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांचे टेम्पो ट्रॅक्स गामा टॅक्सी हे वाहन क्रमांक एमएच-31/एपी-8620 हे विरुध्दपक्ष यांचे कडे पॉलिसी क्रमांक MCT-00010902-000-00 अन्वये दिनांक 11/08/2008 ते 10/08/2009 पर्यंत रुपये 2,50,000/- करीता विमीत केले होते. 4. सदर वाहनाचा दिनांक 15/05/2009 रोजी गोंदिया जिल्हयातील गोरेगांव तहसिल येथील मुरदोली गांव येथे अपघात झाला. विरुध्दपक्ष यांनी नियुक्त केलेले सर्व्हेअर श्री संजय श्रीवास्तव यांनी सदर वाहनाची तपासणी करुन तपासणी अहवाल तयार केला. दिनांक 27/05/2009 रोजी तयार करण्यात आलेल्या या तपासणी अहवालात श्री श्रीवास्तव यांनी तक्रारकर्ता यांच्या वाहनास झालेल्या क्षतीचे विस्तृत वर्णन केलेले आहे. 5. विरुध्दपक्ष यांचेतर्फे दिनांक 27/05/2009, 27/07/2009 व 12/08/2009 रोजी तक्रारकर्ता यांना वाहनाच्या अंतीम तपासणी करीता सहकार्य करण्यासाठी पत्रे पाठविण्यात आली असे म्हणण्यात आले आहे. मात्र पत्रांवर जावक क्रमांक नाहीत. दिनांक 27/05/2009 व दिनांक 12/08/2009 च्या पत्राची पोस्टल रसीद नाही, तर दिनांक 27/05/2009 च्या पोस्टल रसीदवर गोंविद नागपूर एवढेच नमूद आहे. सदर पत्रांच्या पोचपावती विरुध्दपक्ष यांनी रेकॉर्डवर दाखल केलेलया नाहीत. त्यामुळे ही पत्रे तक्रारकर्ता यांना प्राप्त झाली असे म्हणता येत नाही. 6. विरुध्दपक्ष म्हणतात की, त्यांनी शैलेश तिवारी हे दुसरे सर्व्हेअर अंतीम तपासणी करीता नियुक्त केले होते परंतू तक्रारकर्ता यांनी त्यांना सहकार्य केले नाही. मात्र तक्रारकर्ता यांनी त्यांच्या ग्राहक तक्रारीमध्ये परीच्छेद क्रमांक 5 मध्ये श्री शैलेश तिवारी,भंडारा यांनी सदर गाडीची तपासणी केली व सर्व्हे रिपोर्ट तयार केला आहे परंतू त्याची प्रत विरुध्दपक्षातर्फे त्यांना देण्यात आली नाही असे नमूद केले आहे. विरुध्दपक्ष यांनी त्यांच्या लेखी जबाब निशानी क्रमांक 10 मध्ये ग्राहक तक्रारीच्या परीच्छेद क्रमांक 5 ला उत्तर देतांना ही बाब स्पष्टपणे नाकारलेली नाही. 7. तक्रारकर्ता यांनी पुढील 5 केस लॉ रेकॉर्डवर दाखल केलेले आहेतः- 1. I (2009) CPJ 125 (NC) 2. I (2009) CPJ 25 3. I I (2010) CPJ503 4. I I I (2010) CPJ142 5. (2009) CPJ 46 (SC) 8. इम्पेरिअल एक्सपोर्ट लिमी. विरुध्द ओरीएंटल इन्श्युरंस कंपनी लिमी. या I (2009) CPJ 125 (NC) मध्ये प्रकाशित झालेल्या न्याय निवाडयामध्ये आदरणीय राष्ट्रीय ग्राहक वाद ..3..
..3.. निवारण अयोगाने असे प्रतिपादन केले आहे की, "तक्रारकर्ता यांच्या असहकारामुळे दावा हा बंद करण्यात आला असे विमा कंपनीचे म्हणणे असेल व या संदर्भात तपासणी करणा-याचे (इन्व्हेस्टीगेटर) शपथपत्र हे दाखल करण्यात आले नाही तर नाकारलेला विमादावा हा अन्यायकारक होता व विमा कंपनीच्या सेवेत न्युनता आहे असे म्हणता येते". सदर प्रकरणात सुध्दा तपासणी करणा-याचे शपथपत्र दाखल करण्यात आलेले नाही. 9. अरुणकुमार रुद्र पॉल विरुध्द नॅशनल इन्श्युरंस कंपनी लिमी. I (2009) CPJ 25 या त्रिपुरा राज्य ग्राहक वाद निवारण आयोग व न्यु इंडिया एश्युरंस कंपनी लिमी विरुध्द प्रदिपकुमार IV 2009 CPJ 46 (SC) या आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या न्याय निवाडयात असे म्हटले आहे की, "तक्रारकर्ता यांचा विमादावा हा देयके व रसीद यांच्या आधारावर ग्राहक मंचाने मंजूर केलेला असल्यास त्या निर्णयात बदल करण्याची आवश्यकता नाही." 10. तक्रारकर्ता यांनी त्यांच्या क्षतीग्रस्त वाहनाची दुरुस्ती करतांना आलेल्या खर्चाची रुपये 91,866/- ची देयके रेकॉर्डवर दाखल केलेली आहेत. 11. तक्रारकर्ता यांनी केलेल्या असहकाराचे कारणावरुन विमादावा नाकारणे ही विरुध्दपक्ष यांच्या सेवेतील न्युनता आहे. असे तथ्य व परिस्थिती असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे. आदेश 1. विरुध्दपक्ष यांनी रुपये 91,866/- ही रक्कम तक्रारकर्ता यांना विमा दाव्याची फाईल बंद केल्याचे पत्र पाठविल्याच्या तारखेपासून म्हणजे दिनांक 31/08/2009 पासून ती रक्कम तक्रारकर्ता यांना प्राप्त होत पर्यंत 9% व्याजासह दयावी. 2. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासासाठी रुपये 3,000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 1000/- द्यावेत. 3. आदेशाचे पालन विरुध्दपक्ष यांनी आदेशाच्या तारखेपासून एक महिण्याच्या आत करावे.
| [HONORABLE Smt. Patel] Member[HONORABLE Smt. Potdukhe] PRESIDENT[HONORABLE Shri. Ajitkumar Jain] Member | |