ः न्यायनिर्णय ः-
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986च्या कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे रुक्मिणीनगर,कराड येथील कायमस्वरुपी रहिवासी असून त्यांचे मालकीचा ट्रक आहे. सदर ट्रक हा टाटा 1613 या मॉडेलचा असून त्याचा रजि.नं.एम.एच-11-ए.एल-4803 असा आहे. सदर वाहनास जाबदार 3 या बँकेने अर्थसहाय्य केले आहे. सदर ट्रकचा चॅसीस नं.एम.ए.टी.373344 ए 7 ए 03165 तसेच इंजिन क्र.697 टी.सी.55.ए.झेड.वाय 804798 असा आहे. सदर ट्रकचा विमा जाबदार क्र.1 विमा कंपनीकडे उतरविला होता. जाबदार 2 हे सर्व्हेअर व व्हॅल्युएटर आहेत. ट्रकचे विम्याचा कालावधी दि.2-2-2012 ते दि.1-2-2013 होता. दरम्यान दि.4-5-2012 रोजी सदर ट्रकला रेठरे, ता.कराड, जि.सातारा येथे चढण रस्त्यावर ब्रेक निकामी होऊन अपघात झाला व ट्रक उजवे बाजूस पलटी झाला. या अपघातात सदर वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. सदर अपघाताची खबर त्याच दिवशी म्हणजे दि.30-1-2012 रोजी जाबदार 1 यांना देणेत आली. त्यानुसार जाबदार 1 यांनी अपघात क्लेम क्र.949057 नोंदविला. जाबदार क्र.2 यांनी वाहनाचा सर्व्हे करुन तसेच वाहनाची सर्व कागदपत्रे, ड्रायव्हरचा वाहन चालवणेचा परवाना, आर.टी.ओ.परवाना इ. कागदपत्रांची तपासणी मेट्रो बॉडी बिल्डिंग, मलकापूर कराड येथे तसेच मेकॅनिकल काम भारत गॅरेज कराड येथे करुन घेतले. सुटया भागांची बाजारभावाने होणारी किंमत, मजुरी तसेच वाहन वापराचा घसारा गृहित धरुन रक्कम रु.2,38,103.75 (रु.दोन लाख अडतीस हजार एकशे तीन व पैसे पंचाहत्तर मात्र) मंजूर करणेबाबत फायनल सर्व्हे रिपोर्ट दि.31-10-2012 रोजी जाबदार 1 कडे पाठविला. वास्तविक तक्रारदारांना सदर वाहन दुरुस्तीस रक्कम रु.3,90,000/- (रु.तीन लाख नव्वद हजार मात्र) खर्च केले. त्याची सर्व बिले जाबदार 1 कडे मूळ प्रतीत जमा आहेत. अशा परिस्थितीत जाबदार 1 ने त्यांचे प्रतिनिधी प्रशांत सोळंकी यांचेमार्फत पत्र देऊन क्लेम डिस्चार्ज व्हौचरवर तक्रारदाराला सहया करणेच्या सूचना केल्या. त्यावेळी जाबदार क्र.1 यांनी जाबदार क्र.2 चे सर्व्हेरिपोर्टला बगल देऊन रक्कम रु.1,86,032/- (रु.एक लाख शहाऐंशी हजार बत्तीस मात्र) चा क्लेम मंजूर करत असलेचे कळविले. असे करतेवेळी कोणत्या आधारे सदर रक्कम काढली याचा खुलासा जाबदाराने केला नाही. याउपर तक्रारदारास कोणतीही माहिती न देता रक्कम रु.1,86,032/-(रु.एक लाख शहाऐंशी हजार बत्तीस मात्र) जाबदार क्र.1 कंपनीने जाबदार क्र.3 बँकेत दि.31-10-2012 रोजी परस्पर जमा केले. परंतु पूर्ण रकमेचा तक्रारदाराचा क्लेम जाबदाराने दिलेला नाही. सदर अपु-या विमा क्लेमचे अपूर्ण मंजुरीबाबत तक्रारदारानी जाबदाराकडे वारंवार विचारणा केली असता जाबदाराने कोणतेही समर्पक उत्तर दिले नाही व तक्रारदाराचे वाहनाचे नुकसानीची दखल घेतली नाही. म्हणजेच तक्रारदाराना जाबदाराने सदोष सेवा दिली असलेने तक्रारदारांनी जाबदाराकडून वाहनाच्या नुकसानीची रक्कम तक्रारदारास मिळणेसाठी सदर तक्रारअर्ज तक्रारदाराने दाखल केला आहे.
2. सदर कामी तक्रारदाराने अपघातग्रस्त वाहनाच्या विम्यापोटी रक्कम रु.3,90,000/- (रु.तीन लाख नव्वद हजार मात्र) जाबदार क्र.1 यांचेकडून वसूल होऊन मिळावेत, तसेच सदर विमा रकमेवर अपघात दि.4-5-2012 पासून द.सा.द.शे.18 टक्केप्रमाणे व्याज मिळावे, तक्रारदारास झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- जाबदार 1 ते 3 कडून मिळावेत, व अर्जाचा खर्च रु.15,000/- सदर जाबदारांकडून वसूल होऊन मिळणेबाबत विनंती केली आहे.
3. तक्रारदारानी सदर कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते 5/6 कडे अनुक्रमे अपघातग्रस्त वाहनाची विमा कव्हरनोट, जाबदार 1 चे अपघाताबाबतचे पत्र, जाबदार क्र.3 बँकेकडील तक्रारदाराचा कर्ज खाते उतारा, तक्रारदाराने वकीलांतर्फे जाबदाराला पाठवलेली नोटीस, पोस्टाची पावती, पोस्टाची पोहोचपावती, नि.25 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.27 चे कागदयादीसोबत नि.27/1 ते 27/3 कडे अनुक्रमे जाबदार 2 यांनी दिलेला फायनल सर्व्हे रिपोर्ट, जाबदार 1 याना स्थानिक प्रतिनिधीमार्फत पाठवलेल्या ईमेलची प्रत, अपघातग्रस्त वाहनाचे फोटो, नि.29 चे कागदयादीसोबत नि.34 कडे मेट्रो बॉडी रिपेअर्सचे मालक जावेद निजामुद्दीन मांगलेकर यांचे प्रतिज्ञापत्र, नि.35 कडे भारत मोटर्सचे मालक रफीक मुबारक मुल्ला यांचे प्रतिज्ञापत्र, तसेच खालीलप्रमाणे मे.वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे दाखल केले आहेत-
A) 2010 Law suit (SC) 413.
Amalendu Sahoo V/s. Oriental Insurance Co.Ltd.
B) 2009 Law suit (SC) 1035
New India Assurance Co.Ltd. V/s. Pradeep kumar-
4. सदर कामी जाबदार क्र.1 यांनी नि.20 कडे त्यांचे म्हणणे, नि.21 कडे म्हणण्याचे प्रतिज्ञापत्र, नि.23 चे कागदयादीसोबत नि.23/1 कडे सर्व्हे रिपोर्ट, नि.32 कडे जाबदार क्र.1 चे म्हणणे व म्हणण्याचे प्रतिज्ञापत्र हेच पुराव्याचे प्रतिज्ञापत्र समजणेत यावे अशी पुरसीस, नि.40 कडे लेखी युक्तीवादाची पुरसीस दाखल केली आहे. सदर कामी जाबदार क्र.2 ने म्हणणे दाखल केलेले नाही त्यामुळे जाबदार 2 विरुध्द नि.1 वर नो से आदेश पारित झाला आहे. जाबदार 3 ने नि.17 कडे त्यांचे म्हणणे/कैफियत दाखल केली आहे. जाबदार 1 व 3 यांनी तक्रारअर्जातील सर्व कथन फेटाळलेले आहे. जाबदार क्र.1 ने त्यांचे म्हणणे पुढीलप्रमाणे दिले आहे-
अ) तक्रारदाराने जाबदाराविरुध्द अकारण तक्रार दाखल केली आहे.
ब) तक्रारदारांचे जाबदार क्र.3 बँकेकडील कर्जखात्यामध्ये सदर जाबदार क्र.1ने या क्लेमपोटी रक्कम रु.1,86,032/- दि.31-10-2012 रोजी जमा केले आहेत. त्यामुळे तक्रारदाराना विमा क्लेम पूर्णपणे दिलेला आहे. तक्रारअर्जात तक्रारदारानी रक्कम रु.3,90,000/- (रु.तीन लाख नव्वद हजार मात्र) एवढया रकमेची विमा क्लेमची केलेली मागणी व त्यावरील 18 टक्के व्याजाची मागणी ही अवास्तव असून मान्य व कबूल नाही. तसेच रक्कम रु.25,000/- मानसिक त्रासापोटी व रु.15,000/- तक्रारअर्जाचा खर्च नामंजूर करावा असे जाबदार 1 ने म्हणणे दिले आहे.
क) जाबदार 3 ने त्यांचे म्हणण्यात म्हटले आहे की, तक्रारदाराचे वाहनाचा अपघात झालेनंतर त्याचा सर्व्हे करुन किती नुकसानभरपाई व विमा क्लेम दयायचा ही जबाबदारी जाबदार 1 यांची असलेने सदर विमा क्लेमचे रकमेचा जाबदार क्र.3 यांचेशी काहीही संबंध नाही. सबब तक्रारदाराचा तक्रारअर्ज जाबदार 3 विरुध्द फेटाळणेत यावा.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदारांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन सदर तक्रारअर्जाचे निराकरणार्थ मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय? होय.
2. जाबदाराने तक्रारदाराना सदोष सेवा पुरवली आहे काय? होय.
3. तक्रारदार हे मागणीप्रमाणे विमा क्लेमची रक्कम मिळणेस पात्र
आहेत काय? होय.
4. अंतिम आदेश काय? शेवटी आदेशात नमूद केलेप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदारांचे मालकीचा टाटा ट्रक रजि.नं.एम.एच-11-ए.एल.4803 चा विमा जाबदार क्र.1 विमा कंपनीकडे उतरविला होता. प्रस्तुत विमा उतरवलेची बाब जाबदार क्र.1 ने मान्य केली आहे, तसेच तक्रारदाराने नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 कडे दाखल केलेल्या विमा प्रमाणपत्रावरुन सिध्द होते म्हणजेच तक्रारदार व जाबदार क्र.1 यांचेदरम्यान विमा करार झाल्याची बाब सिध्द होते. त्यामुळे तक्रारदार व जाबदार क्र.1 हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार असल्याचे निर्विवाद सत्य आहे. तसेच सदर तक्रारदाराचे ट्रकचा विमा दि.2-2-2012 पर्यंत चालू होता. दरम्यान दि.30-1-2012 रोजी सदर ट्रक रेठरे, ता.कराड, जि.सातारा येथे चढण रस्त्यावर ब्रेक निकामी होऊन अपघात झाला व ट्रक उजवे बाजूस पलटी झाला. सदर अपघातात ट्रकचे प्रचंड नुकसान झाले. सदर अपघाताची खबर तक्रारदाराने त्याचदिवशी जाबदार क्र.1 विमा कंपनीस दिली. त्यानुसार तक्रारदाराचे वाहनाचा अपघात क्लेम नं.33790447763 हा तक्रारदार क्र.1 विमा कंपनीने नोंदविला व जाबदार क्र.1 ने जाबदार क्र.2 सर्व्हेअर यांची सर्व्हेसाठी नियुक्ती करुन सदर अपघातग्रस्त वाहनाचा सर्व्हे करुन घेतला. प्रस्तुत सर्व्हे व इतर सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन सदर विमा क्लेम तक्रारदारानी जाबदार विमा कंपनीकडे दाखल केला. सर्व्हेअर यानी वाहनाच्या सुटया भागांची बाजारभावाने होणारी किंमत, मजुरी तसेच वाहन वापराचा घसारा गृहित धरुन रक्कम रु.2,38,103/- (रु.दोन लाख अडतीस हजार एकशे तीन मात्र) विमा क्लेम मंजूर करणेबाबत फायनल सर्व्हे रिपोर्ट दि.20-2-2012 रोजी जाबदार क्र.1 विमा कंपनीकडे पाठविला. वास्तविक तक्रारदाराने सदर अपघातग्रस्त वाहन दुरुस्त करणेस रक्कम रु.3,90,000/- खर्च केले. त्याची सर्व बिले तक्रारदाराने जाबदार 1 विमा कंपनीकडे जमा केली. अशा परिस्थितीत जाबदार क्र.1 यांनी दि.11-5-2012 रोजी त्यांचे प्रतिनिधी प्रशांत सोळंकी यांचेमार्फत पत्र देऊन क्लेम डिसचार्ज व्हौचरवर तक्रारदाराच्या सहया घेऊन जाबदार क्र.1 यांनी सर्व्हेअर जाबदार क्र.2 चे सर्व्हे रिपोर्ट विचारात न घेताच रक्कम रु.1,86,000/- (रु.एक लाख शहाऐंशी हजार मात्र) चा क्लेम मंजूर करत असलेचे सांगितले, पण असे करताना प्रस्तुत रक्कम कोणत्या आधारे काढली याचा खुलासा जाबदाराने तक्रारदारास केला नाही, तर सदर रकमेपैकी रक्कम रु.50,000/- (रु.पन्नास हजार मात्र) जाबदार क्र.3 बँकेतील तक्रारदारांचे कर्ज खात्यास दि.31-10-2012 रोजी परस्पर जमा केले, परंतु पूर्ण रकमेचा तक्रारदारांचे वाहनाचा क्लेम जाबदाराने मंजूर केला नाही. प्रस्तुत अपूर्ण विमा क्लेम मंजुरीबाबत तक्रारदाराने जाबदार क्र.1 विमा कंपनीस वारंवार विचारणा केली असता जाबदारांनी कोणतेही समर्पक उत्तर दिले नाही व तक्रारदाराचे प्रत्यक्ष झालेल्या वाहनाच्या नुकसानीची दखल जाबदार विमा कंपनीने घेतली नाही. या सर्व बाबी तक्रारदाराने नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/3 कडे जाबदार क्र.3 बँकेतील तक्रारदाराचा खातेउतारा, नि.5/4 कडील तक्रारदाराने अपूर्ण क्लेमबाबत जाबदार क्र.1 ला वकीलांतर्फे पाठवलेली नोटीस, नि.5/5 कडे सदर नोटीस जाबदाराला पाठवलेची रजि.पोस्टाची पावती तसेच प्रस्तुतनोटीस वगैरे कागदपत्रावरुन सिध्द होते. म्हणजेच या सर्व बाबींचा उहापोह केला असता तक्रारदारांना अपूर्ण विमा क्लेम देऊन जाबदार क्र.1 विमा कंपनीने तक्रारदाराना सदोष सेवा पुरवली असल्याचे निविर्वाद सिध्द होते त्यामुळे मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र.3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण वरील मुद्दा क्र.1 व 2 चे स्पष्टीकरणानुसार तक्रारदाराचा ट्रक क्र.एम.एच-11-ए.एल.4803 चा विमा जाबदार क्र.1 विमा कंपनीकडे उतरविला होता, तो दि.2-2-2012 ते दि.1-2-2013 या कालावधीत चालू होता. दरम्यान दि.4-5-2012 रोजी रत्नागिरी मलकापूर रोडवर साखरपा येथे वाहनास अपघात झाला. सदर अपघातात ट्रकचे अतोनात नुकसान झाले हे तक्रारदाराने जाबदार क्र.2 सर्व्हेअर यांचे नि.27/2 कडील सर्व्हे रिपोर्टनुसार रक्कम र2,38,103.75 मात्र एवढया रकमेची जबाबदारी प्रस्तुत सर्व्हे रिपोर्टनुसार जाबदारांची आहे हे सिध्द होते. मात्र नि.30/1 चे सर्व्हेरिपोर्टनुसार रक्कम रु.1,86,032/- एवढीच रक्कम जाबदार देणे लागत असलेबाबत सर्व्हेअरने म्हटले आहे. परंतु तक्रारदाराने दाखल केलेला नि.27/2 कडील सर्व्हे रिपोर्ट तसेच तक्रारदाराने साक्षीदार मेट्रो बॉडी रिपेअर्सचे मालक व भारत मोटर्सचे मालक यांचे प्रतिज्ञापत्र नि.33 चे कागदयादीसोबत, नि.34 व नि.35 कडे दाखल प्रतिज्ञापत्रावरुन नि.27/2 कडील सर्व्हे रिपोर्टच खरा व बरोबर असल्याचे शाबीत होत असून सदर रिपोर्टनुसार रक्कम रु.2,38,103/- मात्र जाबदारांची जबाबदारी निश्चित केली आहे. तसेच जाबदार विमा कंपनीने नि.27/2 कडील सर्व्हे रिपोर्ट नाकारलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराने दाखल केलेला नि.27/2 कडील सर्व्हे रिपोर्ट विश्वासार्ह आहे असे या मे.मंचाचे मत आहे त्यामुळे तक्रारदार हे त्यांचे प्रस्तुत सर्व्हे रिपोर्टप्रमाणे जाबदार क्र.1 विमा कंपनीकडून रक्कम रु.2,38,103/- (रु.दोन लाख अडतीस हजार एकशे तीन मात्र) विम्यापोटी नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत, तसेच प्रस्तुत रकमेवर जाबदार क्र.1 विमा कंपनीकडून अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराला मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याज मिळणेस पात्र आहेत असे या मे.मंचाचे स्पष्ट मत आहे.
प्रस्तुत कामी आम्ही तक्रारदाराने दाखल केलेल्या खालील न्यायनिवाडयांचा व दंडकांचा आधार घेत आहोत-
A) 2010 Law suit (S.C) 413.
Amalendu Sahoo V/s. Oriental Insurance Co.Ltd.
Head Note-
Vehicle Insurance- Repudiation of claim- appellant/original complainant took comprehensive insurance policy of his private car- handed over the vehicle for a few hours for urgent use by the employees of the tenant bank by way of a good gesture and did not take any rent- vehicle met with an accident- the surveyor reported that the vehicle was given on a hire basis though no payment for hiring charges proved- National Commission dismissed the complaint on the ground that at the time of accident the car was used for hire and it was not given as a gesture of goodwill- appeal- this court observed the guidelines issued by the insurance company about settling of all non standard claims where 75% of the admissible claim settled where condition of policy including limitation as to use was breached, thus held that the insurance company can not repudiate the claim in toto- respondent/Insurance company directed to pay a consolidated amount of Rs.2.5 lac. To the appellant- appeal allowed.
B. 2009 Law suit (S.C)1035.
New India Assurance Co.Ltd. V/s. Pradeep Kumar.
Head Note- Consumer Protection Act 1986 Sec.21(6)Insurance Act 1938- Sec.64. UM (2)-deficiency in service- accident with insured take surveyor’s report – complainant not satisfied with investigations- National Commission dismissed revision Petition- assessment of loss by approved surveyor’s is pre-requisite for payment or settlement of claim of twenty thousand rupees or more by insurer, but surveyor’s report is not last and final it is not that sacrosanct that it cannot be basis or foundation for settlement of claim by insurer in respect of loss settled by insured but surely such report is neither binding upon insurer nor insured- claim of complainant has been accepted by consumer for a as it was duly supported by original vouchers, bills & receipts- Insurance company would have been well advised in not spending public money unnecessarily an avoidable and wholly frivolous- litigation such as this appeal dismissed.
9. सबब वर नमूद न्यायनिवाडे व त्यातील दंडकांचा आधार घेऊन सदर कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-
-ः आदेश ः-
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. तक्रारदारांना जाबदार क्र.1 विमा कंपनीने अपघातग्रस्त ट्रकचे विम्यापोटी रक्कम रु. 2,38,103/- (रु.दोन लाख अडतीस हजार एकशे तीन मात्र) अदा करावेत. प्रस्तुत रकमेतून जाबदार विमा कंपनीने जाबदार क्र.3 बँकेत कर्ज खात्यात जमा केलेली रक्कम रु.1,86,032/- वजा करुन उर्वरित रक्कम तक्रारदारास अदा करावी.
3. सदर विमा रकमेवर जाबदार क्र.1 विमा कंपनीने अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज तक्रारदारांस अदा करावे.
4. तक्रारदारास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कमरु.15,000/- (रु.पंधरा हजार मात्र) जाबदार क्र.1 विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
5. तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (रु.पाच हजार मात्र) जाबदार क्र.1 ने तक्रारदाराना अदा करावेत.
6. वरील आदेशाचे पालन जाबदारानी आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात करावे.
7. जाबदारानी विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये दाद मागू शकतील.
8. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
9. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 2-3-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.