(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक :16 /08/2011)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 13.08.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. यातील तक्रारकर्तीची थोडक्यात अशी आहे की, गैरअर्जदाराकडून तिने आपल्या वाहनाचा विमा काढला त्याचे विमापत्र गैरअर्जदारांनी दिले मात्र त्यात अटी व शर्ती नाही. सदर वाहनाचा दि.31.03.2010 रोजी अपघात झाला त्याची माहिती गैरअर्जदारांना कळविण्यांत आली असता त्यांचे घटनास्थळ सर्वेअरने वाहनाची तपासणी करुन वाहन दुरुस्ती करण्यांस सांगितले. त्यानुसार तक्रारकर्तीच्या पतीने वाहन अधिकृत डिलर ग्रेस टोयोटा, कामठी रोड, भिलगाव, नागपूर येथे दुरुस्तीसाठी नेले, गैरअर्जदारांचे सर्वेअरने ग्रेस टोयोटा, कामठी रोड, भिलगाव, नागपूर येथे भेट देऊन वाहनाचे फोटो काढले व दस्तावेज तपासुन वाहनाची दुरुस्ती करण्यांस संमती दिली. त्यानुसार वाहनाची दुरुस्ती करण्यांत आली, व गैरअर्जदारांकडे विमा दावा दाखल करण्यांत आला. परंतु गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीचा विमा दावा निकाली काढला नाही, म्हणून तिने सदर तक्रार मंचात दाखल करुन तीव्दारे रु.38,269/- एवढी वाहन दुरुस्तीचे खर्चाची रक्कम द.सा.द.शे.18% व्याजासह मिळवी व क्लेम फॉर्म सादर केल्यापासुन 2% वेगळे व्याज मिळावे, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु.10,000/- मिळावे अश्या मागण्या केलेल्या आहेत.
3. गैरअर्जदाराला नोटीस देण्यांत आला असता त्यांनी मंचात हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला. त्यात त्यांनी तक्रारकर्तीने केलेली सर्व विपरीत विधाने नाकबुल केली, विम्याची बाब मान्य केली व वाहनाचा अपघात झाल्याबाबतची सुचना त्यांना मिळाली आणि क्लेम फॉर्म नोंदवुन सर्वेअरची नियुक्ती केली, या बाबी मान्य केल्या. आणि तक्रारकर्तीची मागणी चुकीची व अवाजवी स्वरुपाची असल्यामुळे दावा दि.22.04.2010 रोजी नामंजूर केला. यामध्ये त्यांनी आपल्या सेवेत कुठलीही त्रुटी ठेवलेली नाही म्हणून सदर तक्रार खारिज करावी असा अजर घेतला आहे.
4. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र.3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात अनुक्रमांक 1 ते 7 वर गैरअर्जदारांना दिलेली नोटीस, कव्हरनोट, पॉलिसी, पावत्या, इत्यादी दस्तावेजांच्या छायांकित प्रती जोडलेल्या आहेत.
5. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.06.08.2011 रोजी आली असता तक्रारकर्त्याचे वकील हजर त्यांचा युक्तिवाद ऐकला. उशिराने गैरअर्जदारांचे वकीलांनी हजर होऊन दस्तावेज दाखल करण्याचा अर्ज दिला, त्यावर तक्रारकर्त्याने से दिला व दस्तावेज दाखल केले. तसेच तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
6. यातील गैरअर्जदारांनी पॉलिसी व वाहनाचे अपघातासंबंधीची बाब मान्य केलेली आहे. गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीचा दावा का नामंजूर केला यासंबंधीचा उजर सिध्द केलेला नाही तसेच क्लेम नाकारण्या संबंधीचे पत्र सुध्दा दाखल केलेले नाही. तक्रारकर्तीने वाहनाचे दुरुस्तीसाठी रु.38,269/- ग्रेस टोयोटा, कामठी रोड, भिलगाव, नागपूर यांना दिल्याची पावती व बिल दाखल केलेले आहे. गैरअर्जदारांनी याउलट सर्वेअरचा अहवाल दाखल केलेला नाही, या सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीस दाव्याची रक्कम न देणे हीच त्यांचे सेवेतील गंभीर त्रुटी ठरते. तक्रारकर्तीने जर रु.38,269/- एवढे दुरुस्तीच्या खर्चाचे बिल दाखल केले आहे, तरी ते जसेच्या तसे विचारात घेण्याजोगे नाही आणि त्यामधे घसारा व साल्वेजची किंमत या बाबी विचारात घेणे गरजेचे आहे. तसेच अशा प्रकरणांत जास्तीची दुरुस्ती खुपदा करण्यांत येते, ही सुध्दा बाब विचारात घेणे गरजेचे आहे. या सर्व बाबींचा विचार करता तक्रारकर्तीस वाहनाच्या दुरुस्ती खर्चाचे रु.30,000/- देणे न्यायोचित होईल असे आमचे मत आहे. यास्तव आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीस रु.30,000/- एवढी रक्कम विम्याचे दाव्यापोटी व तीवर दि.22.04.2010 पासुन प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.9% व्याजासह येणारी रक्कम 30 दिवसांचे आंत द्यावी.
3. गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीस तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे.
4. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत न दिल्यास द.सा.द.शे. 9% ऐवजी 12% व्याज देय राहील.