::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- १६/०५/२०१८)
०१. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
०२. विरूध्द पक्ष क्र.१ फायनान्स कंपनी हे मुख्य कार्यालय तर वि.प.क्र.२ हे त्यांचे शाखा कार्यालय असून तक्रारकर्तीने टाटा एचसीवी एलपीटी २५१५ एपी०४ / यु- ८९३५ क्रमांकाचा ट्रक खरेदी करण्याकरीता वि.प.क्र.१ च्या चंद्रपूर येथे असलेल्या शाखा कार्यालय, वि.प.क्र.२ कडून रू. ३,५०,०००/- कर्ज घेतले. सदर कर्जाची व्याजासहीत परतफेड ही रू.१४,०३८/- च्या एकूण् ३३ मासीक किस्तींमध्ये दिनांक ०१/०७/२०१४ ते दिनांक ०१/०३/२०१७ पावेतो करावयाची होती. सदर कर्जाबाबत उभय पक्षांमध्ये करार झाला. तक्रारकर्ती वि.प.कडे कर्जपरतफेडीचा नियमीतपणे भरणा करीत होती व तिने दिनांक १८/०४/२०१६ पर्यंत रू.३ लाख वि.प.क्र.२ कडे जमा केलेले आहेत व रू.१,५५,०००/-फक्त तक्रारकर्तीकडे थकीत होते. काही आर्थीक अडचणींमुळे तक्रारकर्तीला एप्रिल २०१६ पासून उपरोक्त रकमेचा भरणा करता आला नाही. त्याबाबत तिने वि.प.क्र.२ ला सुचीत केले व त्यांनी तिला वेळ दिलेला होता. तक्रारकर्तीला वि.प.क्र.२ यांचेकडून थकीत रकमेच्या मागणीकरीता कोणतीही नोटीस वा पत्र आले नव्हते. वि.प.क्र.२ यांनी तक्रारकर्ती विरूध्द चंद्रपूर येथील जिल्हा मध्यस्थी केंद्रामध्ये प्रि लिटीगेशन प्रोसीडिंग दाखल केली. सदर प्रोसीडींगमध्ये तक्रारकर्तीला दिनांक ३०/०६/२०१६ रोजी मध्यस्थि केंद्रात उपस्थीत राहण्यांस कळविण्यांत आले. सदर तारखेवर तक्रारकर्ती मध्यस्थी केंद्रात हजर झाली असतांना तिथे कोणतीही चर्चा झाली नाही व तिला दि-२०/०७/२०१६ ही पुढील तारीख मिळाली. परंतु त्या तारखेपूर्वीच दिनांक १६/०७/२०१६ रोजी तक्रारकर्तीचे पती उपरोक्त ट्रक चालवीत असतांना जबरदस्तीने चाबी घेवून वि.प.क्र.२ यांनी त्याचा जबरदस्तीने ताबा घेतला. तक्रारकर्तीने त्याबाबत रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली असता त्यांनी वि.प.क्र.२ चे एजंट पंकज व इतर दोघांविरूध्द अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेतला. वि.प.क्र.२ यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यस्थी केंद्रात प्रिलिटिगेशन प्रलंबीत असतांना दिनांक १६/०७/२०१६ रोजी कोणतीही पूर्वसुचना न देता वि.प.नी उपरोक्त ट्रक जप्त केला. तक्रारकर्तीने दिनांक १७/०७/२०१६रोजी सदर ट्रकचा ताबा मागीतला असता वि.प.यांनी संपूर्ण थकीत रक्कम भरण्यांस सांगीतले व तिने एकमुस्त रक्कम दिनांक ३१/०७/२०१६ पर्यंत न भरल्यांस सदर ट्रक लिलावात विकून टाकणार व उर्वरीत रकमेकरीता त्यांच्यावर कारवाई करणार अशी धमकी दिली. दरम्यान मध्यस्थी केंद्रात प्रलंबीत प्रिलिटीगेशनमध्ये उभय पक्षांमध्ये सेटलमेंट न झाल्यामुळे सदर प्रकरण दिनांक २०/०७/२०१६ रोजी बंद करण्यांत आले. दिनांक ३०/०७/२०१६ रोजी तक्रारकर्तीचे पतीने रू. ५६,२३२/-थकीत रक्कम देवू करून ट्रकची मागणी केली असता त्यांनी सदर रक्कम घेण्यांस व ट्रक परत करण्यांस नकार दिला. दिनांक ३१/०७/२०१६ रोजी तिने परत ट्रकची मागणी केली असता वि.प.ने सदर ट्रक विक्री केल्याचे सांगितले. तक्रारकर्तीने दिनांक १७/०९/२०१६ रोजी अधिवक्त्यामार्फत नोटीस पाठवून सदर ट्रकची मागणी केली. वि.प.क्र.२ यांनी सदर नोटीसला दिनांक २१/०९/२०१६ रोजी खोटे उत्तर दिले. सदर उत्तराद्वारे तक्रारकर्तीला सदर ट्रक ३१/०७/२०१६ रोजी विकल्याचे प्रथम कळले व त्या विक्रीमधून मिळालेली रक्कम रू. १,५०,०००/-वजा करून तक्रारकर्तीला रू. ६६,२५३/- थकीत रकमेची मागणी केली. वि.प.क्र.१ यांनी दिनाक १६/०८/२०१६ रोजी परत नोटीस पाठविली. तिला तक्रारकर्तीने अधिवक्त्यामार्फत उत्तर देवून ट्रकची मागणी केली. परंतु वि.प.नी त्याची पुर्तता केली नाही. वि.प.यांनी तक्रारकर्तीचा ट्रक कोणतीही पूर्वसचना न देता जप्त करून विक्री केल्याने तक्रारकर्तीप्रती अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे. सबब तक्रारकर्तीने मंचासमक्ष विरूद्धपक्षांविरूध्द तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरूद्धपक्षांनी तक्रारकर्त्यांस न्युनतापूर्ण सेवा दिलेली आहे असे घोषित करावे, तक्रारकर्तीने कर्जपरतफेडीपोटी भरलेवापााललन7ीहलभरलेली रक्कम रू.३,०९,२७६/- त्यावर तक्रारकर्तीने विरूध्द पक्षाकडे किस्त रक्कम जमा केल्याच्या दिनांका पासून पूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. २१.०३ टक्के व्याजासह वि.प.नी तक्रारकर्तीला द्यावी तसेच मानसीक,शारीरिक व आर्थीक त्रासापोटी नुकसान-भरपाई रू.३,००,०००/- व तक्रारीचा खर्च रू.३०,०००/.- विरूद्धपक्षांनी तक्रारकर्तीला द्यावा असे आदेश पारीत करण्यांत यावेत अशी विनंती केली.
०३. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन वि.प.क्र.१ व २ विरुध्द नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष हजर होवून त्यांनी आपले संयुक्त लेखी म्हणणे प्राथमिक आक्षेपासह दाखल केले असून त्यामध्ये नमूद केले की तक्रारकर्तीने सदर कर्ज हे व्यावसायिक कारणाकरिता घेतले असल्याने तो विरुद्ध पक्षांचा ग्राहक नाही तसेच करारनामा व कर्जासंबधीचा वाद हा करारनाम्यानुसार लवादाकडे दाखल करावा लागतो, या कारणास्तव सदर तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. पुढे आपल्या लेखी कथनामध्ये, तक्रारकर्तीने वि.प. क्र.१ च्या चंद्रपूर येथील वि.प. क्र.२ च्या शाखेतून टाटा एचसीवी एलपीटी २५१५ एपी०४ यु ८९३५ ट्र्क खरेदी करण्याकरीता वि.प.क्र.१ च्या चंद्रपूर येथील शाखा कार्यालय, वि.प.क्र.२ कडून रू. ३,५०,०००/- कर्ज घेतले होते व त्यासंदर्भात उभय पक्षांमध्ये करारनामा झाला तक्रारकर्तीला सदर कर्जाची परतफेड रु.१४,०३८/-प्रमाणे दि.०१/०७/२०१४ पासुन दि.०१/०३/२०१७ पर्यंत करायची होती. तक्रारकर्तीला जिल्हा मध्यस्थी केंद्र, चंद्रपूर यांच्या नोटीसा अन्वये दि. ३०/०६/२०१६ रोजि सदर प्रिलिटिगेशन प्रोसीडींग मध्ये हजर राहण्यास सुचीत केले होते. सदर बाबी विरुद्ध पक्षांनी मान्य केल्या असून तक्रारीतील उर्वरीत कथन नाकबूल केले व आपले विशेष कथनामध्ये त्यांनी नमूद केले की तक्रारकर्तीला करारनाम्याप्रमाणे सदर कर्जाची दरमहा रु.८,७५०/- याप्रमाणे एकूण ३३ किस्तीमध्ये परतफेड करायची होती. तक्रारकर्ती सुरवातीपासूनच सदर कर्जाची नियमितपणे परतफेड करत नव्हती. विरुद्ध पक्षांनी दि. ०६/१२/२०१५ रोजी तक्रारकर्तीला पत्र पाठवून थकीत रकमेची मागणी केली परंतु तक्रारकर्तीने सदर रकमेचा भरणा केला नाही. त्यामुळे विरुद्ध पक्षांनी तक्रारकर्तीला प्रिलिटीगेशनचा नोटीस कोर्टामार्फत पाठविला व दि. ३०/०६/२०१६ रोजि हजर राहण्यास सांगितले परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी नाईलाजाने वि.प.ना तक्रारकर्त्याचे वाहन जप्त करावे लागले. वि.प.यांनी दिनांक १९/०७/२०१६ रोजी तक्रारकर्ती व जमानतदाराला सदर वाहनाच्या विक्रीपूर्वीचे पत्र पाठविले व सदर पत्रान्वये पत्र प्राप्त होताच ७ दिवसांचे आंत संपूर्ण रक्कम जमा करण्याचे सुचीत केले. तसेच वि.प.यांनी वाहन जप्ती करण्यापूर्वी दिनांक १६/०७/२०१६रोजी रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांचेकडे जप्तीपूर्वीचे तसेच सदर वाहन जप्त केल्यानंतर सुध्दा त्याच दिवशी जप्तीनंतरचे सूचनापत्र दिले. त्यानंतरही तक्रारकर्तीने कर्जाची थकीत रक्कम वि.प.कडे जमा न केल्यामुळे वि.प.ना सदर वाहन नाईलाजाने विक्री करावे लागले. वि.प.नी तक्रारकर्त्यास कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिलेली नाही. वि.प.नी सदर वाहन विक्री केल्यानंतर मिळालेली रक्कम रू.१,५०,०००/- तक्रारकर्तीच्या खात्यात जमा केली व उर्वरीत रक्कम रू. ६६,२५३/- ची मागणी तक्रारकर्तीला केली. परंतु तक्रारकर्तीने सदर रक्कम वि.प.कडे जमा केली नाही. सबब तक्रारकर्तीची सदर तक्रार खोटी असल्याने ती खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
०४. तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज, शपथपत्र, लेखी युक्तीवाद व विरुद्ध पक्षांचे लेखी म्हणणे, दस्तावेज, शपथपत्र, लेखी युक्तीवाद व उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व विरुद्ध पक्षांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
१) तक्रारकर्ती विरूध्द पक्षांचा ग्राहक आहे काय ? : होय
२) प्रस्तुत तक्रार चालविण्याचे मंचास अधिकाक्षेत्र आहे काय? : होय
३) विरूध्दपक्षांनी तक्रारकर्तीप्रति न्युनता पूर्ण सेवा दिली आहे काय ? : नाही
४) तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. १ ः-
०५. विरूध्द पक्ष क्र.१ फायनान्स कंपनीचे मुख्य कार्यालय तर वि.प.क्र.२ हे त्यांचे चंद्रपूर येथील शाखा कार्यालय असून तक्रारकर्तीने स्वतःचे उपजिविकेकरीता टाटा एचसीवी एलपीटी २५१५ एपी०४ यु ८९३५ ट्र्क खरेदी करण्याकरीता वि.प.क्र.१ च्या चंद्रपूर येथे असलेल्या शाखा कार्यालय, वि.प.क्र.२ कडून रू.३,५०,०००/- कर्ज घेतले. सदर कर्जाबाबत उभय पक्षांमध्ये करार झाला. सदर कराराची प्रत प्रकरणात दाखल असून सदर करारनामा विरूध्द पक्षांसदेखील मान्य असल्याने तक्रारकर्ता हा विरूध्द पक्षांचा ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. १ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. २ बाबत ः-
६. कर्जाबाबत उभय पक्षांमध्ये झालेल्या करारातील तरतुदींनुसार उभय पक्षांमधील कर्जासंबंधीचा वाद हा लवादामा्र्फत सोडवून घेण्याचे उभय पक्षांनी मान्य केलेले आहे. त्यामुळे मंचास सदर वाद चालविण्याचे अधिकारक्षेत्र नाही असा आक्षेप वि.प. नी घेतलेला आहे. परंतु त्यांचे हे म्हणणे ग्राहय धरण्यायोग्य नाही कारण मा.सर्वोच्च न्यायालयाने अनेक न्यायनिवाडयांद्वारे स्थापीत केलेल्या न्यायतत्वानुसार ग्राहक संरक्षण कायदा,१९८६ हा कायदा इतर कायद्यांना पुरक कायदा असून त्यातील कलम ३ नुसार ग्राहक वादाचे निवारणासाठी अतिरीक्त यंत्रणा उपलब्ध करून देण्यांत आलेली आहे. त्यामुळे प्रस्तूत वाद चालविण्यांचे मंचास अधिकारक्षेत्र आहे असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. २ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. ३ बाबत ः-
७. विरूध्द पक्ष क्र.१ फायनान्स कंपनीचे शाखा कार्यालय असलेल्या वि.प.क्र.२ कडून तक्रारकर्तीने टाटा एचसीवी एलपीटी २५१५ एपी०४ / यु- ८९३५ क्रमांकाचा ट्रक खरेदी करण्याकरीता रू. ३,५०,०००/- कर्ज घेतले. सदर कर्जाची व्याजासहीत परतफेड ही रू.१४,०५८/- च्या एकूण् ३३ मासीक किस्तींमध्ये दिनांक ०१/०७/२०१४ ते दिनांक ०१/०३/२०१७ पावेतो करावयाची होती. सदर बाब उभय पक्षांस मान्य आहे. तक्रारकर्तीकडे रू.१,५५,०००/- थकीत होते तसेंच तक्रारकर्तीने एप्रिल २०१६ पासून उपरोक्त रकमेचा भरणा केला नाही असे तक्रारकर्तीने स्वत: आपल्या तक्रारीत मान्य केलेले आहे. तक्रारकर्ती ही थकीतदार असल्यामुळे वि.प.क्र.२ यांनी तक्रारकर्तीविरूध्द चंद्रपूर येथील जिल्हा मध्यस्थी केंद्रामध्ये प्रि लिटीगेशन प्रोसीडिंग दाखल केली. सदर प्रोसीडींगमध्ये तक्रारकर्तीला दिनांक ३०/०६/२०१६ रोजी मध्यस्थि केंद्रात उपस्थीत राहण्यांस कळविण्यांत आले. सदर तारखेवर तक्रारकर्ती मध्यस्थी केंद्रात हजर झाली परंतु निष्कर्ष न निघता प्रोसिडींगमध्ये दि-२०/०७/२०१६ ही पुढील तारीख देण्यांत आली. मात्र त्या तारखेपूर्वीच दिनांक १६/०७/२०१६ रोजी वि.प.क्र.२ यांनी सदर ट्रकचा ताबा घेतला. तक्रारकर्तीने दिनांक १७/०७/२०१६रोजी सदर ट्रकचा ताबा मागीतला असता वि.प.यांनी संपूर्ण थकीत रक्कम भरण्यांस सांगीतले व तिने एकमुस्त रक्कम दिनांक ३१/०७/२०१६ पर्यंत न भरल्यांस सदर ट्रक लिलावात विकून टाकणार व उर्वरीत रकमेकरीता त्यांच्यावर कारवाई करणार असे तक्रारकर्तीने तक्रारीत स्वतः नमूद केलेले आहे. यावरून तक्रारकर्तीने कर्जाचे रकमेचा भरणा न केल्यास वि.प. सदर ट्रक विक्री करतील याची तक्रारकर्तीला कल्पना होती हे सिध्द होते. तक्रारकर्ती ही थकीतदार असल्यामुळे वि.प.क्र.२ यांनी दिनांक १६/०७/२०१६ रोजी सदर ट्रकचा ताबा घेतला. वि.प.यांनी वाहन जप्ती करण्यापूर्वी दिनांक १६/०७/२०१६ रोजी रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांचेकडे जप्तीपूर्वीचे तसेच सदर वाहन जप्त केल्यानंतर सुध्दा त्याच दिवशी जप्तीनंतरचे सूचनापत्र रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांचेकडे दिले. सदर पत्र वि.प.नी प्रकरणात दाखल केले आहे. त्यानंतरही तक्रारकर्तीने कर्जाची थकीत रक्कम वि.प.कडे जमा न केल्यामुळे वि.प.नी सदर वाहन रू.१,५०,०००/-ला विक्री केले व विक्रीतून मिळालेली रक्कम तक्रारकर्तीचे कर्जखात्यात जमा करून उर्वरीत रक्कम रू.६६,२५३/- तक्रारकर्तीला दि.१६/०८/२०१६ रोजीचे नोटीसद्वारे मागणी केली हे सदर नोटीसवरून सिध्द होते. सदर नोटीस हा तक्रारकर्तीनेच स्वत: प्रकरणात दाखल केलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्ती ही मंचासमक्ष स्वच्छ हाताने आलेली नाही व तक्रारकर्तीला वि.प.ने मागणी केलेली थकीत रक्कम द्यावयाची नसल्याने तक्रारकर्तीने सदर तक्रार दाखल केलेली आहे असे निदर्शनांस येते. तक्रारकर्ती थकीतदार असल्याने वि.प.नी तक्रारकर्तीचे उपरोक्त वाहन उभय पक्षातील झालेल्या करारनाम्यातील तरतुदींनूसार ताब्यात घेवून पूर्वसुचना देवून विक्री केलेले आहे त्यामुळे वि.प.नी तक्रारकर्त्यास कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिलेली नाही हे दाखल दस्तावेजांवरून सिध्द होते असे मंचाचे मत आहे . सबब मुद्दा क्रं. ३ चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. ४ बाबत ः-
८. मुद्दा क्रं. १ ते ३ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(१) तक्रारकर्त्याची तक्रार क्र. १३३/२०१६ खारीज करण्यात येते.
(२) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा.
(३) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
चंद्रपूर
दिनांक – १६/०५/२०१८
( अधि.कल्पना जांगडे (कुटे) ) ( अधि. किर्ती वैदय (गाडगिळ) )( श्री उमेश व्ही.जावळीकर)
मा.सदस्या. मा.सदस्या. मा. अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.