(द्वारा- श्री.डी.एस.देशमुख, अध्यक्ष) गैरअर्जदार फायनान्स कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्याने दि.18.07.2007 रोजी गैरअर्जदार चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अन्ड फायनान्स कंपनी लिमिटेड (यापुढे “फायनान्स कंपनी” असा उल्लेख करण्यात येईल.) यांच्याकडून वाहन खरेदी करण्यासाठी रु.1,95,000/- कर्ज घेतले होते. त्याने कर्ज परतफेडीसाठी त्याच्या वडिलांच्या खात्याचे (2) त.क्र.571/10 धनादेश गैरअर्जदार फायनान्स कंपनीकडे दिले होते, तरी सुध्दा गैरअर्जदार फायनान्स कंपनीने त्यास रोखीने हप्ते भरण्याची सुचना केली. त्यानुसार त्याने गैरअर्जदाराकडे रोखीने हप्ते भरले. त्याने गैरअर्जदार फायनान्स कंपनीकडे सर्व हप्ते वेळेवर भरले आणि त्याने गैरअर्जदाराकडे बेबाकी प्रमाणपत्राची मागणी केली. परंतु गैरअर्जदार फायनान्स कंपनीने त्याचे काही धनादेश न वटता परत आल्याबददल रु.6,864/- चेक बाऊन्स चार्जेस भरण्यास सांगितले. वास्तविक त्याने सर्व कर्ज हप्त्यांची रक्कम गैरअर्जदाराकडे वेळेवर भरली व त्याच्याकडे कोणतीही रक्कम बाकी नाही. परंतु गैरअर्जदार फायनान्स कंपनीने बेबाकी प्रमाणपत्र दिले नाही व त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदार फायनान्स कंपनीने दिलेली रु.6,864/- ची मागणी करणारी नोटीस रदद करावी व त्यास नुकसान भरपाई द्यावी. गैरअर्जदार फायनान्स कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने कर्ज परतफेडीपोटी दिलेल्या धनादेशांपैकी 5 धनादेश तक्रारदाराच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याच्या कारणावरुन न वटता परत आले. त्यानंतर तक्रारदाराने त्या हप्त्यांची रक्कम उशिरा रोखीने भरली. त्यामुळे तक्रारदार करारानुसार चेक बाऊन्सींग चार्जेस देण्यास जबाबदार आहे. तक्रारदाराने त्याच्याकडील सदर रक्कम भरल्यास त्यास बेबाकी प्रमाणपत्र देण्यात येईल. तक्रारदाराची तक्रार तथ्यहीन आहे, म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदार फायनान्स कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुददे उपस्थित होतात. मुददे उत्तर 1) गैरअर्जदार फायनान्स कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? होय. 2) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुददा क्रमांकः- 1 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. (3) त.क्र.571/10 गैरअर्जदार फायनान्स कंपनीने तक्रारदाराला दिलेल्या कर्जाची तक्रारदाराने परतफेड केल्याचे त्याच्या कर्ज खाते उता-यावरुन स्पष्ट दिसून येते. गैरअर्जदार फायनान्स कंपनीने तक्रारदाराकडे कर्ज हप्ते विलंबाने भरल्याच्या कारणावरुन आकारलेली रक्कम व धनादेश न वटता परत आल्याबददल दंड म्हणून आकारलेली रक्कम तक्रारदाराकडे बाकी असल्याचे दर्शविले आहे. तक्रारदाराचे 5 धनादेश न वटता परत आल्याचे गैरअर्जदार फायनान्स कंपनीचे म्हणणे आहे. परंतु तक्रारदाराचे धनादेश न वटता परत आले होते हे दर्शविणारा कोणताही पुरावा गैरअर्जदार फायनान्स कंपनीने सादर केला नाही. त्यामुळे तक्रारदाराचे धनादेश न वटता परत आले या कारणावरुन फायनान्स कंपनीने चेक बाऊन्सिंग चार्जेस म्हणून कोणतीही रक्कम तक्रारदाराकडे मागणे योग्य ठरत नाही. तसेच कर्ज हप्त्याची रक्कम विलंबाने भरली होती हे दर्शविणारा देखील पुरावा गैरअर्जदार फायनान्स कंपनीने सादर केला नाही. प्रत्येक हप्ता भरल्याचा दिनांक कोणता होता व तक्रारदाराने हप्ते भरण्यास किती विलंब केला व विलंबासाठी दंड आकारण्याचा अधिकार कसा प्राप्त झाला, याबाबत फायनान्स कंपनीने काहीही पुरावा दिलेला नाही. त्यामुळे फायनान्स कंपनीला धनादेश न वटता परत आल्याबददल किंवा हप्ता विलंबाने भरल्याबददल दंड आकारण्याचा काहीही अधिकार नाही, असे आमचे मत आहे. गैरअर्जदार फायनान्स कंपनीने तक्रारदाराचा कर्ज खात्याचा उतारा सादर केला आहे. सदर उतारा पाहता तक्रारदाराने सर्वच हप्ते भरल्याचे दिसते. त्यामुळे त्याच्याकडे कोणतीही बाकी नाही, असे आमचे मत असुन गैरअर्जदार फायनान्स कंपनीने तक्रारदाराकडे कर्ज हप्त्यांशिवाय ईतर कोणतीही रक्कम बाकी दर्शवून त्याची मागणी करणे योग्य ठरत नाही. गैरअर्जदार फायनान्स कंपनीने तक्रारदाराने सर्व कर्जाची रक्कम भरल्यानंतरही बाकी दर्शवून व त्यास बेबाकी प्रमाणपत्र देण्यास नकार देऊन निश्चितपणे त्रुटीची सेवा दिली आहे. म्हणून मुददा क्र.1 चे उत्तर वरीलप्रमाणे देण्यात आले. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अन्ड फायनान्स कंपनीने (4) त.क्र.571/10 तक्रारदाराला दि.31.07.2010 रोजी दिलेली नोटीस रदद करण्यात येते. व गैरअर्जदार फायनान्स कंपनीने तक्रारदाराला निकाल कळाल्यापासून एक महिन्याच्या आत बेबाकी प्रमाणपत्र द्यावे. 3) गैरअर्जदार चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अन्ड फायनान्स कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- निकाल कळाल्यापासून एक महिन्याच्या आत द्यावेत. 4) संबंधितांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |