(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 03/02/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 22.04.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्याने गैरअर्जदार कंपनीकडे त्याच्या वाहनाचा विमा पॉलिसी क्रमांक एमपीसी-000456336-00-00 नुसार दि.21.06.2007 ते 20.06.2008 पर्यंतच्या कालावधीसाठी काढला होता. दि.16.06.2008 रोजी सदर वाहनाचा अपघात झाला आणि वाहनाचे मोठे नुकसान झाले. विमा कंपनीने वाहन आपल्या एजंसीमध्ये 90 दिवस ठेवले मात्र ते दुरुस्त केले नाही आणि रु.100/- प्रति दिवस प्रमाणे रु.5,000/- व टोचन खर्चाचे रु.14,000/- दि.09.09.2008 रोजी घेण्यांत आले. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे वाहनाचा विमा दावा दाखल केला मात्र उपयोग झाला नाही व दि.22.08.2008 रोजी गैरअर्जदारांनी दावा नाकारला व कारण असे दर्शविले की, वाहनाचा व्यावसायीक कारणासाठी उपयोग झालेला आहे व तो पॉलिसीतील शर्तींचा भंग आहे. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना कायदेशिर नोटीस दिली परंतु त्यांनी नोटीसला उत्तर दिले नाही म्हणून शेवटी मंचात तक्रार दाखल करुन त्याव्दारे वाहनाचे नुकसान भरपाई दाखल विम्याची रक्कम रु.2,40,000/-, गॅरेज भाडे व टोचन खर्च रु.14,000/-, मानसिक त्रासाचा खर्च रु.5,000/- मिळावा अशी मागणी केलेली आहे. 3. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारांवर नोटीस बजावण्यांत आली असता, त्यांना नोटीस मिळाल्यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपला लेखी जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे. 5. गैरअर्जदारांनी मंचात हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला असुन त्यांनी विम्याची व वाहनाचे अपघाताची बाब मान्य केलेली आहे. तसेच इतर विपरीत विधाने ना-कबुल केली व असा उजर घेतला की, पॉलिसीच्या शर्तींप्रमाणे वाहन हे खाजगी उपयोगाचे होते. मात्र तक्रारकर्त्याने वाहनाचा उपयोग व्यावसायीक वापरासाठी केला असुन पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे विमा दावा नाकारल्याचे म्हटले आहे. तसेच तक्रारकर्त्याची तक्रार खारिज होण्यांस पात्र असल्याचे नमुद केले आहे. 6. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात वाहनाची पॉलिसी व नोंदणीचे दस्तावेज, विम्याचा दावा फॉर्म, दावा नाकारल्याचे पत्र, नोटीस व पोच पावत्या इत्यादींचा समावेश आहे. 7. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.22.01.2011 रोजी आली असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे तर्फे वकील हजर. उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 8. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकला असता सदर प्रकरणातील विवाद एवढाच आहे की, गैरअर्जदारांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारकर्त्याने वाहन भाडयाने दिले होते हा पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग आहे. या संबंधाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने “B.V. Nagaraju –v/s- Oriental Insurance Co. Ltd.” II(1996) CPJ 28 (SC) या प्रकरणात दिलेला निकालहा अतिशय स्वयंस्पष्ट आहे. यामध्ये मा. सवोच्च न्यायालयाने अशा प्रकारे वाहनाचा वापर झाला असला तरी मुळ करार त्यामुळे नष्ट होत नाही. आणि जोपर्यंत वाहनात बसलेल्या लोकांमुळे अपघात घडला आहे किंवा ते अपघातास कारणीभूत होते हे जोपर्यंत सिध्द होत नाही. तोपावेतो विमा कंपनी विम्याची राशी देण्याच्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही. 9. या प्रकरणात गैरअर्जदारांनी अपघातग्रस्त वाहन हे अपघाताचे वेळी भाडयाने दिले होते व त्याचा गैरवापर झाला हे सिध्द करणारा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ज्या तपासणीसाच्या अहवालाचे आधारावर हा बचाव केलेला आहे, त्याचे प्रतिज्ञालेख, अहवाल दाखल केलेले नाही. वाहनाची परिस्थिती अशी गृहीत धरली की, सदर वाहन त्या वेळेस भाडयाने दिले तरीही या प्रकरणात दाखल दस्तावेजांवरुन असे दिसुन येते की, चालकास डूलकी लागल्यामुळे अपघात घडलेला आहे. त्यामुळे मा. सर्वोच्च न्यायालयाने उपरोक्त निकालाचे संबंधात विमा कंपनीला हा बचाव उपलब्ध नाही. 10. गैरअर्जदारांनी सर्वेअरचा रिपोर्ट दाखल केलेला नाही, तसेच तक्रारकर्त्याने वाहन दुरुस्तीचे देयक दाखल केलेले नाही. मात्र घटनास्थळ पंचनाम्याचे अवलोकन केले असता तक्रारकर्ते म्हणतात त्याप्रमाणे वाहनाचे फार मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे, या म्हणण्यात तथ्य आहे असे स्पष्ट होते. वाहनाची किंमत रु.2,40,000/- दर्शविलेली आहे, त्यामुळे Non Standard Claim Basis वर या दाव्यातील तक्रारकर्ता ¾ रक्कम म्हणजेच रु.1,80,000/- एवढी नुकसान भरपाई मिळण्यांस पात्र ठरतो. तक्रारकर्त्याने गॅरेज भाडे व टोचन खर्चाबद्दल पावत्या दाखल केलेल्या नाही. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करता गैरअर्जदारांनी निष्कारण तक्रारकर्त्याचा दावा नाकारुन सेवेत त्रुटी दिलेली आहे, हे स्पष्ट होते. 11. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यांस वाहनाच्या नुकसानीपोटी विम्याची रक्कम रु.1,80,000/- एवढी दावा नाकारल्याचा दिनांक 22.08.2008 पासुन रक्कम अदा होई पावेतो द.सा.द.शे.9% व्याजासह द्यावी. 3. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला वाहनाच्या नुकसानीपोटी मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे. 4. वरील आदेशाची पालन गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी अन्यथा देय रकमेवर द.सा.द.शे. 9% ऐवजी द.सा.द.शे.12% दंडनीय व्याज देय राहील.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |