( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष )
आ दे श
( पारित दिनांक : 27 एप्रिल 2012 )
तक्रारकर्तीने हे प्रकरण ग्राहक सरंक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये या मंचात दाखल केले आहे.
यातील तक्रारदार श्री अरुण प्रल्हाद भजनी यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांनी गैरअर्जदार यांचे कडुन एम एच-31 सी पी 1448 या वाहनाचा गैरअर्जदार यांचे कडे विमाकृत केलेले असुन त्याचा कालावधी 12/2/2009 ते 11/2/2010 पर्यत होता. वाहन विमा कालावधीत दिनांक 17/6/2009 चे रात्री चोरीस गेली. त्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि गैरअर्जदाराकडे सुध्दा तक्रार करुन पुढे कागदपत्र तयार करुन दावा दाखल केला. गैरअर्जदाराने त्यांचा दावा निकाली न लावता निष्कारण कागदपत्रांची मागणी चालू केली जी कागदपत्रे तक्रारदाराने पुर्वीच दिलेली आहे. तक्रारदाराचे वाहन चोरीस गेल्यापासुन गैरअर्जदारास ते आढळुन आले नाही. त्यामुळे तपास बंद करत असल्याचे तक्रारदारास कळविण्यात आले. पुढे तक्रारदाराने गैरअर्जदार यांना सर्व आवश्यक कागदपत्रे गैरअर्जदारास दिले मात्र गैरअर्जदाराने विमा दावा दिला नाही. पुढे तक्रारदाराने ही तक्रार दाखल केली. दरम्यान तक्रारदाराचे वाहन विजयनगर येथे सापडल्याचे गैरअर्जदार यांनी सांगीतले. त्याप्रमाणे तक्रारदाराने सदर वाहन ताब्यात घेतले व विजयनगर येथील वर्कशॉप मधे दुरुस्ती केली व त्या वाहनाचे दुरुस्तीपोटी तक्रारदारास रुपये 83,500/- वाहनावर खर्च करावा लागला. गैरअर्जदाराने सदर रक्कम दिली नाही म्हणुन तक्रारदाराने हा वाहनाचा दुरुस्ती खर्च मिळावा. मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 50,000/- व प्रकरणाचा खर्च रुपये 10,000/- मिळावे अशी मागणी केली.
सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला.
गैरअर्जदार आपले लेखी जवाबात नमुद करतात की, तक्रारदाराने योग्य कागदपत्रे दिली नाही. त्यांना योग्य निर्णय घ्यावयाचा आहे परंतु त्यापुर्वीच तक्रारदाराने खोटेपणाने ही तक्रार दाखल केली याच कारणास्तव ती खारीज व्हावी असा उजर घेतला.
तक्रारदाराने आपली तक्रार शपथपत्रावर दाखल केली असुन दस्तऐवज यादी नुसार 14 कागदपत्रे दाखल केली व प्रतीउत्तर दाखल केले. गैरअर्जदाराने आपला जवाब शपथपत्रावर दाखल केला व सोबत एक सॅटिस्फॅक्शन सर्टीफिकेट दाखल केले.
#####- का र ण मि मां सा -#####
यातील तक्रारदाराने गैरअर्जदाराकडे सर्व कागदपत्रे योग्यवेळी दिले आहेत व ती प्राप्त झाल्याबद्दलचे दस्तऐवज तक्रारीत दाखल केले. वास्तविक ज्या दस्तऐवजाबद्दल गैरअर्जदार आक्षेप घेत आहे ते फिटनेस सर्टीफिकेट दिनांक 7.10.2009 रोजी गैरअर्जदारास मिळाले असल्याचे तक्रारदाराचे दस्तऐवजावरुन स्पष्ट होते आणि त्यास गैरअर्जदार योग्य जवाब देऊ शकले नाही व या प्रकरणात हजर झाल्यानंतर सुध्दा तोच आक्षेप घेत आहे. अशा प्रकारे संबंधीत प्रकरण प्रलंबीत ठेवणे व तक्रारदाराचा विमा दावा निकाली न काढणे हीच त्यांचे सेवेतील कमतरता व गंभीर त्रुटी आहे. यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला वाहनाचे दुरुस्तीपोटी रुपये 83,500/- वजा घसारा व भंगारा रुपये 10,000/- बरोबर 73,500/- एवढी रक्कम द्यावी.
3. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/-व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2,000/-असे एकुण 7000/- रुपये (रुपये सात हजार) द्यावे.
वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसांचे आत करावे न पेक्षा 9 टक्के ऐवजी 12 टक्के व्याज देय ठरतील.