प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल मंचासमोर दाखल केलेली असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा थोडक्यात आशय असा आहे की, गैरअर्जदार संस्था ही मुदत ठेवी स्विकारुन परिपक्वता दिनांकास त्या परिपक्वता रक्कम देण्याचे लोकांना अभिवचन देत असल्याने त्याने गैरअर्जदाराच्या संस्थेत रु.1,00,000/- दि.04.04.2007 रोजी मुदत ठेवी अंतर्गत गुंतविले होते व गैरअर्जदाराने त्याबाबत प्रमाणपत्र दिले. सदर मुदत ठेव ही दि.04.05.2009 ला परीपक्व झाली. तक्रारकर्त्याच्या बचत खात्यात 20.02.2010 रोजी रु.31,336/- ची शिल्लक दर्शविण्यात आलेली आहे. गैरअर्जदार संस्था आर्थिक अडचणीत आल्याचे कळल्याने व मुदत ठेव ही परीपक्व झाल्याने तक्रारकर्त्याने रकमेची मागणी केली. परंतू गैरअर्जदाराने रक्कम अदा केली नाही. तक्रारकर्त्याच्या मते गैरअर्जदाराने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे व रक्कम अदा न केल्याने शेवटी मंचासमोर सदर तक्रार दाखल करुन परीपक्वता रकमेची मागणी व्याजासह केलेली आहे. तसेच शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई, तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. 2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांचेवर बजावण्यात आली असता गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारीस संयुक्तपणे आपले लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र. 3 यांना मंचाचा नोटीस मिळाल्याबाबत प्रकरणात काहीही दाखल नाही. तसेच तक्रारकर्त्याने त्याबाबत काहीही स्टेप्स घेतल्या नाहीत. त्यामुळे प्रकरण युक्तीवादाकरीता नेमण्यात आले. 3. गैरअर्जदार क्र. 1 व 2 ह्यांनी सदर तक्रारीला उत्तर दाखल करुन नमूद केले आहे की, सदर तक्रार ही मंचाचे कार्यक्षेत्रात येत नाही. पुढे असे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याला त्याची रक्कम ही नियोजित व्याजासह परत करण्याबाबत सुचना दिली होती. त्यामुळे गैरअर्जदारांनी सेवेत कोणतीही त्रुटी केली नसल्याचे म्हटले आहे. 4. सदर प्रकरण मंचासमोर दि.09.02.2011 रोजी युक्तीवादाकरीता आले असता मंचाने उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकला. तसेच सदर प्रकरणी दाखल दस्तऐवज, शपथपत्रे यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 5. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र. 1 ते 2 कडे ठेवी म्हणून रक्कम ठेवली होती ही बाब तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे कथनावरुन स्पष्ट होत असल्याने तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे. 6. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार संस्थेकडे मुदत ठेव ठेवली होती व त्याबाबत रु.1,00,000/- व बचत खात्यात रु.31,336/- तक्रारकर्त्याला गैरअर्जदाराने दिलेले नाही ही बाब तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केली आहे. तसेच गैरअर्जदार क्र. 1 व 2 ह्यांनी लेखी कथनात ते तक्रारकर्त्याची रक्कम देण्यास तयार असून तशी तोंडी सुचना तक्रारकर्त्याला दिल्याचे म्हटले आहे. मंचाचे मते ठेवीचा कालावधी संपल्यानंतर ठेव रक्कम ही ग्राहकास/तक्रारकर्त्यास न देणे ही सेवेतील त्रुटी असल्याचे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा त्याची रक्कम रु.31,336/- दि.02.03.2010 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याजाने व रु.1,00,000/- ही रक्कम दि.04.05.2009 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजाने मिळण्यास पात्र ठरतो. 7. तक्रारकर्त्याने शारिरीक व मानसिक नुकसानाकरीता रु.25,000/- मागणी केलेली आहे. सदर मागणी अवास्तव असल्याने तक्रारकर्ता मानसिक व शारिरीक त्रासाच्या भरपाईकरीता रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.1,000/- मिळण्यास पात्र ठरतो. गैरअर्जदार क्र. 3 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला रु.31,336/- ही रक्कम दि.02.03.2010 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याजाने व रु.1,00,000/- ही रक्कम दि.04.05.2009 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजाने द्यावी. 3) गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रासाच्या भरपाईकरीता रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.1,000/- द्यावे. 4) गैअर्जदार क्र. 3 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 5) गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |