जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ३७२/२००९
तक्रार दाखल दिनांक – १६/०४/२००९
तक्रार निकाली दिनांक – २८/०१/२०१४
१) कार्तिक संजय भदाणे
उ.व.अज्ञान, धंदा – काहीनाही
(अ.पा.क.) संजय केदारनाथ भदाणे
२) सौ.रेखा संजय भदाणे
उ.व.२८, धंदा – घरकाम
३) संजय केदारनाथ भदाणे
उ.व.३३, धंदा – मजुरी
सर्व रा.अवधान, ता.जि. धुळे ................ तक्रारदार
विरुध्द
१) चिरंतन आरोग्य सेवा आणि
संशोधन संस्था, धुळे
२१,’आभुषण’ महाराणा प्रताप कॉलनी,
देवपूर, धुळे
नोटीसची बजावणी चेअरमन/ संचालक
यांचेवर करण्यात यावी.
२) डॉ.रश्मी देवरे, वैद्यकीय अधिक्षक,
२१,’आभुषण’ महाराणा प्रताप कॉलनी,
देवपूर, धुळे.
३) डॉ.संजय जोशी, संचालक,
२१,’आभुषण’ महाराणा प्रताप कॉलनी,
देवपूर, धुळे.
४) डॉ.विवेक चौधरी
प्लॉट नं.३७०, जनरल पोस्ट ऑफिस समोर,
ओंकार नगर, जिल्हा पेठ, जळगाव
५) डॉ.संदिप बियाणी
१८५२/१, ग.नं.५, कॅनरा बॅंकेच्या समोर,
धुळे.
६) जवाहर मेडिकल फाऊंडेशन
ए.सी.पी.एम. मेडीकल कॉलेज,
डिपार्टमेंट ऑफ पेडीयाट्रीक्स
साक्री रोड, धुळे.
नोटीसीची बजावणी चेअरमनवर करण्यात यावी ............ सामनेवाले
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.डी.डी. जोशी)
(सामनेवाला नं.१ ते ३ तर्फे – वकील श्री.एल.पी.ठाकुर)
(सामनेवाला नं.४ व ५ तर्फे – वकील श्री.एस.आर.वाणी)
(सामनेवाला नं.६ तर्फे – वकील श्री.सी.पी कुलकर्णी)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
सामनेवाला यांनी योग्य पध्दतीने वैद्यकीय तपासणी व औषधोपचार न करता निष्काळजीपणा व हलगर्जीपणा दाखवून तक्रारदारास सदोष सेवा दिल्यामुळे तक्रारदारने सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार नं.२ व ३ यांचा तक्रारदार नं.१ कार्तिक हा मुलगा आहे. सामनेवाला नं.१ ही नोंदणीकृत चिरंतन आरोग्य सेवा आणि संशोधन संस्था असून सामनेवाला नं.२ डॉ.रश्मी देवरे हया सामनेवाला नं.१ च्या वैद्यकिय अधिक्षक असून सामनेवाला नं.३ डॉ.संजय जोशी हे संचालक आहेत. सामनेवाला नं.४ डॉ.विवेक चौधरी हे जळगाव येथील कार्डीओलॉजिस्ट असून सामनेवाला नं.५ डॉ.संदिप बियानी धुळे येथील रेडिऑलॉजिस्ट आहेत. तर सामनेवाला नं.६ जवाहर मेडिकल फाऊंडेशन हे मेडिकल कॉलेज, डिर्पाटमेंट ऑफ पेडियाट्रीक्स असे आहे. तक्रारदारची सामनेवाला नं.६ यांचेबद्दल काहीही तक्रार नाही.
२. तक्रारदार नं.२ सौ.रेखा भदाणे हीस सिव्हिल हॉस्पीटल येथे दि.१०/०५/२००८ रोजी पुत्ररत्न् प्राप्त झाले. परंतु जन्मानंतर बाळाच्या रडण्याचा आवाज न आल्याने तेथील तज्ञ डॉकटरांनी त्यास इंजेक्शन दिल्यानंतर त्याचा रडण्याचा आवाज आला, परंतु औषधोपचाराने त्याच्या शारीरिक परीस्थीतीत काहीएक सुधारणा न झाल्याने लहान बाळास तातडीने दि.११/०५/२००८ रोजी डिसचार्ज घेवून दि.१२/०५/२००८ रोजी धुळे येथील डॉ. संजय जोशी यांचे माहेर हॉस्पीटल मध्ये तपासणीसाठी आणले असता त्यांनी बाळाची तपासणी केल्यानंतर त्यास त्वरीत चितंतन हॉस्पीटल येथे हलविण्यास सांगितले. दि.१२/०५/२००८ ते दि.१९/०५/२००८ पर्यंत लहान बाळ तेथे अंर्तरूग्ण म्हणून दाखल होता.
३. वरील कालावधीत तक्रारदार यांच्या लहान बाळाच्या दि.१२/०५/२००८ रोजी न्युरो सोनोग्राफी, हिमोग्राम तपासणी, बायोकेमिस्ट्री बाय ऑटो अॅनालायझर, इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. सदरच्या सर्व तपासणींचा रिपोर्ट नॉर्मल आला. त्यानंतर सामनेवाला नं.३ यांनी बाळाच्या पाठीत पाणी झाले असल्याचे सांगून दि.१३/०५/२००८ ला C.S.F. exam करण्यास सांगितले. सदर तपासणी रिपोर्ट नार्मल आला. दि.१५/०५/२००८ रोजी सी.आर.पी. टेस्ट करून घेतली. अशाप्रकारच्या वेगवेगळया तपासण्या करून देखील आजाराचे निदान होत नव्हते व बाळाची प्रकृती खालावत होती. त्यानंतर पुन्हा दि.१६/०५/२००८ रोजी बायोकेमिस्ट्री बाय ऑटो अॅनालायझर पुर्नतपासणी केली. एवढे करूनदेखील बाळाच्या तब्येतीत फरक पडत नसल्याने सामनेवाला नं.३ यांचे सल्ल्यावरून सामनेवाला नं.५ यांच्या डायग्नोस्टीक अॅड. कॅथलॅब सेंटर येथे जावून जळगाव येथील कार्डीओलॉजिस्ट डॉ.चौधरी सामनेवाला नं.४ यांचेकडून बाळाच्या ह्दयाची तपासणी करून घेतली. त्यात बाळाच्या ह्दयास २.७ mm चे छिद्र असल्याचे सांगितले. एवढे करूनही सामनेवाला नं.३ यांच्या वैद्यकिय सेवेचा बाळाच्या प्रकृतीत काहीही फरक पडत नव्हता.
४. सामनेवाला नं.१ ते ५ यांनी दिलेल्या सदोष सेवेमुळे लहान बाळास वैद्यकिय तपासणीसाठी दि.१९/०५/२००८ रोजी जवाहर मेडिकल फाऊंडेशन येथे अॅडमिट केले. तेथे त्यास दि.१९/०५/२००८ ते दि.११/०६/२००८ पर्यंत वैद्यकिय देखरेखीसाठी ठेवण्यात आले. तेथे साखरेचे प्रमाण कमी असल्याने तब्येत बिघडली असल्याचे व लहान बाळास Hypoglycemia (हायपोग्लासिमिया) असल्याचे निदान केले व रक्तातील साखरेचे प्रमाण नेहमीपेक्षा कमी झाले असे सांगितले व त्या अनुषंगाने औषधोपचार केला व त्यामुळे बाळाच्या तब्येतीत पूर्णपणे सुधारणा झाल्यामुळे त्यास डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर तक्रारदारने बाळाच्या आरोग्यास भविष्यात कोणताही धोका निर्माण होवू नये या दृष्टीने दि.२६/१२/२००८ रोजी शिर्डी येथील श्री.साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डीचे श्री.साईबाबा हॉस्पीटल येथे बाळाची 2-D Echo & Colour Doppler ही ह्दयाची तपासणी करून घेतली. सदर रिपोर्ट नॉर्मल आला.
५. अश्याप्रकारे तक्रारदार यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही सामनेवाला नं.१ ते ५ यांनी सांगितल्यानुसार वैद्यकिय तपसण्या व विविध औषधोपचार करत होता. याउलट सामनेवाला नं.१ ते ५ यांनी स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्याच्या दृष्टीने तक्रारदारचे आर्थिक, शारीरिक व मानसिक शोषण केलेले आहे. तसेच वैद्यकिय तपासणी व औषधोपचार करतांना केलेला निष्काळजीपणा, हलगर्जीपणा, व बाळाच्या तब्येतीत सुधारणा न होण्यास कारणीभूत ठरलेला आहे. याबाबत तक्रारदारने सामनेवाला नं.१ ते ३ यांना दि.०९/०१/२००९ रोजी रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविली. सदर नोटीस दि.१०/०१/२००९ रोजी मिळून देखील त्यांनी सदर नोटीसीस उत्तर दिलेले नाही. तसेच सामनेवाला नं.४ ते ५ यांना दि.०९/०१/२००९ रोजी रिपोर्टबाबत खुलासा देण्याबाबत रजि. पत्र पाठविले. सदर पत्रास खुलासा न आल्याने दि.०२/०२/२००९ रोजी नोटीस पाठविली. सदर नोटीस दि.०३/०२/२००९ रोजी मिळूनदेखील त्यांनी सदर नोटीसीस उत्तर दिलेले नाही व सदोष सेवा दिलेली आहे.
६. शेवटी तक्रारदार यांनी सामनेवाला नं.१ ते ५ यांनी निष्काळजीपणा व हलगर्जीपणा करून सदोष सेवा दिली आहे असे घोषित होवून मिळावे, सामनेवाला नं.१ ते ५ यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या वैद्यकिय तपासणीचा व औषधोपचाराचा खर्च एकूण रक्कम रू.३३,४७०/-, मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रू.१,००,०००/-, नुकसानीपोटी रू.२,००,०००/-, तक्रारीचा खर्च रू.२५,०००/- व वर नमुद रकमांवर रकमा अदा करेपावेतो द.सा.द.शे.१२% प्रमाणे व्याज मिळावे अशी मागणी केली आहे.
७. तक्रारदार यांनी आपले म्हणण्याचे पृष्टयार्थ नि.५ सोबत नि.५/१, नि.५/६, नि.५/९, नि.५/११, नि.५/१७, नि.५/२०, नि.५/२२, नि.५/२४, नि.५/२७, नि.५/३९, नि.५/३४, नि.५/३५, नि.५/३८ वर निरामय मेडिकल स्टोअर्सचे औषधांच्या बिलाची प्रत, नि.५/२ वर (X-Ray) बिलाची झेरॉक्स प्रत, नि.५/३, नि.५/४, नि.५/७, नि.५/८, नि.५/१०, नि.५/१२ ते नि.५/१६, नि.५/१८, नि.५/१९, नि.५/२०, नि.५/२१, नि.५/२३, नि.५/२६, नि.५/२८ ते नि.५/३०, नि.५/३२, नि.५/३३, नि.५/३७, नि.५/३९ वर चिरंतन आरोग्य सेवा येथील बिलाची झेरॉक्स प्रत, नि.५/२५ वर डॉ.बियाणी यांच्या लॅबचे तपासणी बिलाची प्रत, नि.५/३६ वर जीवनज्योती ब्लड बॅंक चे बिलाची प्रत, नि.५४० वर सिव्हिल हॉस्पीटलचे डिस्चार्ज कार्डची प्रत, नि.५/४१ व नि.५/४५ व नि.५/४७ वर बायोकेमिस्ट्री बाय ऑटो अॅनालायझरच्या रिपोटची प्रत, नि.५/४२ व नि.५/५० वर हिमोग्राम तपासणी रिपार्ट प्रत, नि.५/४३ वर नुरोसोनोग्राफी रिपोर्ट प्रत, नि.५/४४ वर सी.एस.एफ. एक्झाम रिपोर्ट प्रत, नि.५/४६ वर सी.आर.पी. टेस्ट रिपोर्ट प्रत, नि.५/४८ वर डॉ.बियाणी यांच्या रिपोर्टची प्रत, नि.५/४९ वर डॉ.चौधरी यांच्या ह्दय तपासणी रिेपोर्ट प्रत, नि.५/५१ वर बिल नं.१८१ ची प्रत, नि.५/५२ व नि.५/४३ वर जवाहर मेडिकल फाऊंडेशन येथील रिपोर्ट प्रत, नि.५/५४ वर डिस्चार्ज कार्डची प्रत, नि.५/५५ वर साईबाबा हॉस्पीटल रिपोर्ट प्रत, नि.५/५६ व नि.५/६२ वर सामनेवाला नं.१ त ५ यांना पाठविलेल्या नोटीसीची प्रत, नि.५/५७ वर सामनेवाला नं.४ व ५ यांना पाठविलेल्या पत्राची प्रत, नि.५/५९ ते नि.५/६१ व नि.५/६४ वर पोच पावत्या, नि.५/५२ व नि.५/६३ वर सामनेवाला नं.१ ते ५ यांना नोटीस पाठविल्याच्या पावत्यांची झेरॉक्स प्रत, वरीष्ठ कोर्टाचे न्यायनिवाडे तसेच नि.३९ वर तक्रारदार नं.३ अपंग असल्याबाबतचे प्रमाणपत्र, नि.४३ व नि.४४ वर तक्रारदार नं.३ व त्यांचे भाऊ अरूण भदाणे यांचे शपथपत्र, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
८. सामनेवाला नं.१ ते ३ यांनी नि.२० वर आपला खुलासा दाखल केला असून त्यात त्यांनी तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नाहीत. तक्रारीतील कथन खोटे, गैरकायदेशीर व कपोलकल्पीत असून सामनेवाला यांना मान्य व कबूल नाही. सामनेवालानं.१ ही संस्था आर्थिक फायदा मिळविण्याचे दृष्टीने काम करीत असल्याचे मान्य व कबूल नाही. तक्रारदार अवधान येथे राहत नव्हते व नाही. घोषीत होऊन मिळण्याची मागणीया मे. न्यायमंचाचे कार्यक्षेत्रात येत नाही.
९. सामनेवाला नं.१ ते ३ यांचे पुढे असे म्हणणे आहे की, तक्रारदार नं.१ यास दि.११/०५/२००८ ते दि.१२/०५/२००८ पर्यंत यांनी जन्म झाल्यानंतर घरी ठेवलेले होते. तो घरी राहिल्याने त्याला इन्फेक्श्न झालेले होते. ज्यावेळी तक्रारदार हे सामनेवाला नं.३ यांचेकडे गेले त्याचवेळी सामनेवाला नं.३ यांनी बाळाला ह्दयाचा आजार असून बाळास Birth Asphyxia with early neonetal sepsis हा आजार असून बाळ जन्मतः रडलेले नाही तसेच बाळ घरी राहिल्यामुळे त्यास जंतुसंसर्ग असून बाळाची परिस्थीती गंभीर आहे असे तक्रारदारला सांगितले होते व त्यामुळेच बाळाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. परंतु त्यानंतर तक्रारदार यांचे इच्छेनुसारच सामनेवाला नं.१ यांचेकडे अॅडमीट केले होते. लहान बाळ सुस्त असल्याने त्याचे मेंदुला सुज आहे किंवा नाही हे पाहून त्यानुसार औषधोपचार करणे गरजेचे असल्याने न्युरो सोनोग्राफी करण्यात आली होती. तक्रारदार नं.१ यास जन्मतः कावीळ असल्याने फोटोथेरपी सुरू करण्यांत येवून त्याच्यावर इलाज करण्यांत आलेला आहे.
१०. तक्रारदार नं.१ यास जंतुसंसर्ग झाल्यामुळे त्याची पाठीतील पाण्याची टेस्ट करणे आवश्यक असते, त्यानुसार बाळाची सी.एस.एफ. ही टेस्ट करण्यात आली होती. बाळाची साखर कमी असल्याने बायोकेमिस्ट्री बाय ऑटो अॅनालायझरची तपासणी वेळोवेळी करावी लागत होती. सदरची टेस्ट केल्यानंतर त्याचे रिपोटनुसार बाळास साखरेचे सलाईन देण्यात आलेले आहे. बाळास जंतु संसर्ग झालेला असल्याने सि.आर.पी. टेस्ट करावी लागली. त्यानुसार बाळास साखरेचे सलाईन सोबत उच्च दर्जाचे प्रतिजैविके, कॅल्शीयम व इतर आवश्यक ते इंजेक्शन देण्यात आले होते. बाळाचे तोंड सारखे कोरडे पडत होते हे त्यास साखरेची कमी असल्याने होत होते म्हणून त्यास साखरेचे सलाईन देण्यात आलेले आहे.
११. बाळाची वेळोवेळी तपासणी करतांना त्याचे ह्दयाच्या दोन ठोक्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारचा आवाज ऐकू येत होता. सदरचे लक्षण बाळास ह्दयाचा आजार म्हणजे CHD (Congienianal hart) असू शकण्याचे होते. म्हणून बाळाची २ डी इको कलर ड्रॉपलर नावाची चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये बाळास पी.डी.अे. नावाचा जन्मतः आजार असल्याचे निदर्शनास आले असल्याने सदर चाचणीनंतर बाळास आयबुप्रुफेन (Ibuprufen) नावाचे औषध देण्यात आले होते. त्याचा उपयोग होवून बाळाचा पी.डी.अे. नावाचा आजार दुरूस्त झालेला आहे म्हणूनच शिर्डी येथे तक्रारदारने २ डी इको कलर ड्रॉपलर टेस्टचा रिपार्ट नॉर्मल आलेला आहे.
१२. तक्रारदार नं.२ व ३ यांनी दि.१२/०५/२००९ रोजी सामनेवाला यांचेकडे बाळास आणले त्यावेळी बाळ काळे निळे दिसत होते. सामनेवाला यांनी केलेल्या इलाजानंतर बाळ हा दि.१८/०५/२००९ रोजी अंदाजे १० ते १२ मिली दूध घेवून पचवित होता. तसेच साखरेचे प्रमाण कमी असल्याचेही सामनेवाला यांनी त्यांचेकडे तक्रारदार गेल्याबरोबरच व नंतर देखील वेळोवळी सांगितले होते व त्यानुसार वैद्यकिय शास्त्राप्रमाणे ईलाज देखील सामनेवाला यांनी केलेला आहे. तक्रारदार नं.२ व ३ यांचे इच्छेनुसार बाळास जवाहर मेडिकल फाऊंडेशन येथे ट्रान्सफर करण्यांत आले होते व बाळाचा तेथील इलाजही सामनेवाला नं.३ यांचे सूचनेनुसारच करण्यांत आलेला आहे असे असतांना सुध्दा तक्रारदार यांनी गैरहेतूने सदरची तक्रार दाखल केली आहे.
१३. तक्रारदार नं.१ यास दाखल करतेवेळी त्याचे काका अरूण भदाणे हे उपस्थित होते, त्यांना समजेल अशा भाषेत बाळाच्या प्रकृतीविषयी सांगण्यात आलेले होते. त्यानंतर त्यांनी त्याबद्दल लिहून सही करून दिलेली आहे. तसेच ब्लड कल्चर नावाची चाचणी करावयाची नाही असेही त्यांनी लिहून दिलेले आहे. बाळाची सि.एस.एफ. ची चाचणी करण्यापूर्वी तक्रारदार नं.३ यांनी लेखी परवानगी दिलेली आहे. बाळाचे वेळोवेळी तपासणीवरून त्यास Selerima नावाचे लक्षण दिसत आहे व त्यामुळे बाळ गंभीर दिसत आहे. त्यासाठी सामनेवाला यांनी सर्वतोपरी इलाज व आवश्यक ते इंजेक्शन दिलेले आहेत. बाळाचा जंतुसंसर्ग आवाक्यात आणण्यासाठी Merupenam नावाचे उच्च प्रतिजैविक देण्यात आलेले आहे. तसेच त्यामुळे बाळाच्या शरीरातील प्लेटलेट नावाच्या पेशी कमी झाल्याने बाळास प्लेटलेट कॉन्स्नट्रेट नावाचे विशिष्ट रक्त देण्यात आलेले आहे. बाळ अशक्त असल्याने व त्याचे हातपाय निळे पडल्याने त्यास ऑक्सीजन कमी पडत होते म्हणून त्यास वाढविण्यासाठी आय.व्ही.डी.-१० देण्यांत आलेली आहे. दि.१९/०५/२००८ रोजी बाळास क्पहवगपद नावाचे औषध चालू करण्यात आलेले होते. त्यावेळी सकाळी १० वाजता तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांनी स्वतःहून बाळास जवाहर मेडिकल फौउंडेशन मध्ये नेण्याची इच्छा प्रदर्शित केल्याने बाळास ट्रान्सफर करण्यात आले आहे.
१४. तक्रारदार यांचे नोटीसीस दि.०८/०४/२००९ रोजी योग्य व कायदेशीर नोटीस उत्तर देण्यात आलेले आहे. तसेच डिस्चार्ज कार्ड व तपासण्याचे रिपोटर्स हे बाळास जावाहर हॉस्पीटल येथे ट्रान्सफर करण्यात आल्यानुसार सर्व कागदपत्रे जवाहर हॉस्पीटल मध्ये उपलब्घ करून देण्यात आले होते. सामनेवाला नं.१ ते ३ यांनी वेळोवेळी आवश्यक तपासण्या व ईलाज केल्यामुळेच बाळाची प्रकृती सुधारली आहे असे नमूद केले आहे.
१५. सबब तक्रारदारने सामनेवाला नं.१ ते ३ यांचे विरूध्द खोटी व गैरकायदेशीर तक्रार दाखल केलेली असल्यामुळे कॉम्पनसेटरी कॉस्ट रू.१,००,०००/- प्रत्येकी तक्रारदार यांनी अदा करावेत. अशी मागणी सामनेवाला नं.१ ते ३ यांनी केली आहे.
१६. सामनेवाला नं.१ ते ३ यांनी आपले म्हणण्याचे पृष्ठयार्थ नि.४१ सोबत पान नं.१ ते ३४ वर तक्रारदार नं.१ याच्या वेळोवेळी करण्यात आलेल्या तपासण्या व ईलाज केल्याच्या रिपोर्टस् च्या प्रती, तसेच नि.४९ वर डॉ.रश्मी देवरे यांचे प्रतिज्ञापत्र, नि.५५ वर वैद्यकिय माहिती पुस्तीका प्रत दाखल केलेली आहे.
१७. सामनेवाला नं.६ यांनी नि.२३ वर पुरसिस दाखल केली असून त्यात तक्रारदार यांनी सामनेवाला नं.६ यांचे विरूध्द काही तक्रार नाही. केवळ आवश्यक पार्टी म्हणून सामील केले असल्याचे तक्रारीत नमूद केलेले आहे. त्यामुळे सदोष सेवेचा आरोप नसल्याने व नुकसानभरपाईची मागणी न केल्यामुळे कैफियत सादर केलेली नाही असे नमूद केले आहे.
१८. सामनेवाला नं.४ व५ यांनी आपला खुलासा नि.३० वर दाखल केलेला असून त्यात त्यांनी तक्रारीतील मागणी खोटी असून कायदेशीर नाही. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक नाहीत. सामनेवाला नं.४ हे कॉर्डीयॉलॉजिस्ट म्हणून जळगांव येथे तर सामनेवाला नं.५ हे रेडिऑलॉजिस्ट म्हणून धुळे येथे व्यवसाय करतात. सामनेवाला नं.४ व ५ यांनी चुकीचा रिपोर्ट दिला असल्याचा आरोप खोटा असून दिशाभूल करणारा आहे. तक्रारदार नं.१ यास तपासणीसाठी सामनेवाला यांचेकडे आणले होते. तपासणीअंती त्या बाळाच्या ह्दयास २.७ एम.एम. चे छिद्र असल्याचे निष्पन्न झाले तसेच बाळ आईच्या गर्भात असतांनाच Ductus Arteriosus ही जागा उघडी होती. ती बाळाने जन्मानंतर श्वास घेतल्यानंतर बंद झाली नाही त्यामुळे ह्दयांच्या दोन ठोक्यांमध्ये आवाज येत होता. 2-D Echo आणिColor Doppler हया तपासणीने ही जागा उघडी असल्याचे निदान झाले व त्यामुळे सामनेवाला नं.४ यांनी दि.१७/०५/२००८ रोजी Ibuprofen हे औषध लिहून दिले व त्या औषधाचा उपयोग झालेने ती जागा बंद झाली आणि म्हणूनच शिर्डी येथील २ D Echo आणि Color Doppler तपासणी केली असता ती जागा उघडी असल्याचे दिसले नाही. त्यामुळे सामनेवाला यांचे वर केलेले आरोप निराधार आहेत.
१९. बाळाला जन्मतः पी.डी.अे. नावाचा आजार होता. पी.डी.अे. म्हणजे Patent Ductus Arteriosus व तो कसा होतो हे पुढीलप्रमाणे – गर्भातील बाळामध्ये ह्दयाच्या उजव्या कप्प्यात आलेले शुध्द रक्त पूर्ण शरिराला पोहचविण्यासाठी ते डाव्या भागात पाठविण्याची गरज असते हे काम करण्यासाठी निसर्गाने दोन जागा गर्भाच्या ह्दयात केल्या असतात १) Foramen Dvale – हि जागा ह्दयाच्या उजव्या व डाव्या कप्प्यांना जोडते २) Ductus Arteriosus – ही जागा शरीराची महाधमनी (Aots) व फुफ्फुसाची महाधमनी (PulmonaryArtery) या दोघांना जोडते. शरीराची महाधमनी ह्दयाच्या डाव्याबाजूकडून व फुफ्फसाची महाधमनी ह्दयाच्या उजव्याबाजूकडून निघते. या दोघं जागी शुध्द रक्त उजव्याबाजूकडून डाव्याबाजूकडे आणले जाते. जेव्हा बाळ जन्मानंतर पहिला श्वास घेतो त्यांनतर ताबडतोब हया दोन्ही जागा बंद व्हाव्यात अशी निसर्गाची योजना असते. परंतू दुर्देवाने बाळात (तक्रारदार नं.१) दुसरी जागा म्हणजे Ductus Arteriosu ही खुली होती म्हणजे Patent होती. जेव्हा Ductus Arteriosu बाळाच्या जन्मानंतर बंद होत नाही तेव्हा ह्दयाच्या दोन ठोक्यांदरम्यान एक प्रकारचा आवाज येतो. त्याला Murmur असे म्हणतात. ही जागा उघडी राहिल्यास Ibuprofen हे औषध देतात. त्यामुळे ती नळी बंद होते. सामनेवाला नं.४ यांनी तेव्हा हेच औषध लिहून दिले होते. त्यामुळेच शिर्डी येथील तपासणीत ती जागा उघडी असल्याचे दिसून आले नाही. म्हणजेच सामनेवाला नं.४ याने योग्य वेळी योग्य उपचार केलेले होते. त्यामुळेच बाळाला फायदा झाला होता.
२०. सामनेवाला नं.४ व ५ यांच्या निदानामुळे व औषधोपचारामुळे बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास मदत झालेली आहे. सबब सामनेवाला नं.४ व ५ यांनी बाळाच्या जिवीतास हानी निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे म्हणणे खोटारडेपणाचे असून त्यांच्याकडून बाळाची तपासणी करण्यात कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केलेला नाही, असे नमूद करून तक्रारदारची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी अशी सामनेवाला नं.४ व ५ यांनी विनंती केली आहे.
२१. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचे खुलासे, दाखल कागदपत्रे पाहता व युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्यासमोर खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात. त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहेात.
मुददे निष्कर्ष
१. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक
आहेत काय ? होय
२. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी केली आहे काय ? नाही
३. आदेश काय ? खालीलप्रमाणे
विवेचन
२२. मुद्दा क्र.१ - तक्रारदार यांनी तक्रारीसोबत सामनेवाला नं.१ ते ६ यांचेकडून तपासणी करून व औषधोपचार घेतल्याबाबतचे कागदपत्र दाखल केले असून सदर कागदपत्रावर तक्रारदार नं.२ व ३ यांचे नाव नमुद आहेत. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदार नं.१ यांचेवर औषधोपचार केल्याचे मान्य केलेले आहे यावरून तक्रारदार यांना सामनेवाला यांनी सेवा दिल्याचे स्पष्ट होत असल्याने तक्रारदार हे सामनेवाला नं.१ ते ६ यांचे ग्राहक आहेत, या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
२३. मुद्दा क्र.२ - तक्रारदार यांची मुख्य तक्रार अशी आहे की, तक्रारदार नं.२ हिला दि.१०/०५/२००८ रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले. परंतु बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाच्या रडण्याचा आवाज न आल्याने सिव्हिल हॉस्पीटलमधील तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली व त्यास इंजेक्शन दिल्यानंतर त्याचा रडण्याचा आवाज आला. परंतु तेथील औषधोपचाराने बाळाच्या शारीरिक परिस्थितीत काही सुधारणा झाली नाही म्हणून तक्रारदारने दि.११/०५/२००८ रोजी डिस्चार्ज घेवून दि.१२/०५/२००८ रोजी सामनेवाला नं.३ यांचेकडे तपासणीसाठी आणले तेथून चिरंतन हॉस्पीटल येथे हलविण्यात आले. तेथे तो दि.१२/०५/२००८ ते दि.१९/०५/२००८ पावेतो अंर्तरूग्ण म्हणून दाखल होता. वरील कालावधीत सामनेवाला नं.३ यांनी लहान बाळाच्या वेगवेगळया तपासण्या केल्यात. तसेच त्यांच्या सल्लयावरून सामनेवाला नं.४ व ५ यांचेकडून बाळाच्या ह्दयाची तपासणी देखील करून घेतली. परंतु एवढया विविध प्रकारच्या तपासण्याकरून देखील बाळाच्या प्रकृतीत काहीही फरक पडलेला दिसत नव्हता. दि.१९/०५/२००८ रोजी तक्रारदार याने बाळास जवाहर मेडिकल फाऊंडेशन येथे अॅडमिट केले. तेथे त्यास दि.१९/०५/२००८ ते दि.११/०६/२००८ पर्यंत वैद्यकिय देखरेखीसाठी ठेवण्यात आले. तेथे रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी झाले असे सांगितलेने त्या अनुषंगाने औषधोपचार केला. त्यामुळे त्याच्या तब्येतीत पुर्णपणे सुधारणा झाल्यामुळे त्यास डिस्चार्ज देण्यात आला.
एकंदरीत चिरंतन हॉस्पीटलमध्ये तक्रारदार यांच्या बाळावर योग्य पध्दतीने तपासणी व औषधोपचार करण्यात आलेले नव्हते अशाप्रकारे सामनेवाला यांनी सदोष सेवा दिलेली आहे.
याउलट सामनेवाला यांनी आपल्या खुलाश्यात त्यांनी तक्रारदाराच्या अपत्यास वैद्यकिय शास्त्रात उपलब्ध असलेल्या आजाराचे लक्षणे दिसणा-या आजाराचे निदान करण्यासाठी उपलब्ध असलेल्या योग्य व कायदेशीर चाचण्या केलेल्या आहेत. त्यानुसार सामनेवाला यांनी बाळावर योग्य ईलाजदेखील केलेला आहे. वैद्यकिय शास्त्रानुसार कराव्या लागणा-या आवश्यक तपासण्या सामनेवाला यांनी केलेल्या आहेत. तसेच त्यांनी वेळोवेळी केलेल्या ईलाजामुळेच बाळाची प्रकृती सुधारली आहे. यामुळे सामनेवाला यांनी कोणताही निष्काळजीपणा व गलथानपणा केलेला नाही व सदोष सेवा दिलेली नाही.
२४. तक्रारदार व सामनेवाला यांचे परस्परविरोधी म्हणणे पाहता, सामनेवाला यांनी नि.४१ वर दाखल केलेल्या वैद्यकिय चाचण्या व औषधोपचारा संदर्भातील कागदपत्रे पाहणे आवश्यक आहे. त्यात पान नं.१ वर दाखल केलेल्या सामनेवाला नं.३ यांचे कागदावर बाळाची माहिती लिहिलेली आहे. त्यात CHD – Hart related problem, BA – Birth Asphyxia, Seprvicarenia – जंतुसंसर्ग असे निदान केलेले आहे. तसेच पान नं.२ वर not cried immediately after birth तसेच Birth Asphyxia with early neonetal sepsis असा बाळाचा आजार नमूद आहे. सदर बाब पान नं.३ वरील सामनेवाला नं.१ यांच्या मेडिकल केस रेकॉर्डवरील Provisional diagnosis व final diagnosis मध्येही नमूद केलेली आहे. पान नं.८ वरील Investigation chart वर C.R.P.Test – Positive असे नमूद आहे. यावरून सामनेवाला यांनी त्या बाळाच्या योग्य त्या सर्वतपासण्या केल्या होत्या हे दिसून येते. तसेच पान नं.९ वर डॉक्टर्स ऑर्डर शीट दाखल आहे. त्यात पेशंटला असलेला आजार व त्याबाबत दिलेला औषधोपचार याबाबत माहिती नमूद आहे. सदर रिपोर्ट पाहता त्यावर बाळास O2 (ऑक्सीजन) दिल्याबाबत नोंद आहे. तसेच साखरेचे प्रमाण Test केल्याची माहिती असून त्यात साखरेचे प्रमाण कमी असल्याचे नमूद केलेले आहे. त्यात बाळास जन्मतः कावीळ असल्याचेही नमूद असून साखरेचे प्रमाण नियंत्रीत करण्यासाठी नशेतील इंजेक्शन दिल्याचेही नमूद आहे. तसेच बाळास काचेच्या पेटीतही ठेवल्याचे नमूद आहे. सदर दोन्ही (पान नं. ८ व ९) कागदपत्रांवर तक्रारदार माहिती दिल्याबाबत नमूद केलेले असून त्यांनी बाळाची रक्त तपासणी संदर्भातील तपासणी करण्यास तयार नसल्याबाबतची माहिती नमूद असून त्यावर त्यांनी इंग्रजीत सही केलेली आहे. यावरून तक्रारदार यांना बाळास असलेल्या आजाराबाबत व औषधेपचाराबाबत पूर्णतः माहिती होती असे दिसून येते.
२५. तसेच सी.एस.एफ. टेस्टबद्दलही (पाठीत पाणी असल्याबाबत) माहिती देण्यात आलेली होती हेही पान नं.१२ वरील रिपोर्ट पाहता दिसून येते. C.S.F.Test च्यावेळी ही तक्रारदार नं.२ यांची सही सदर कागदपत्रांवर घेण्यात आलेली होती. तसेच पान नं.१७ व १८ वरील रिपोर्ट पाहता बाळाची 2-D Echo-Color Doppler Test केल्याचे व त्याबाबत योग्य तो औषधोपचार केल्याचे नमूद आहे. पान नं.२१ वरही सदर Test केल्याचे नमूद आहे. तसेच Murmur Test केल्यानंतर ह्दयाचे छिद्र भरण्यासाठी केलेल्या औषधोपचाराबाबत माहिती नमूद आहे. (Inj. Merupenam & Ibuprofen ही औषधे) व साखरेचे प्रमाण कमी म्हणून Platelet transfer केल्याबाबतची माहितीही नमूद आहे. पान नं.२२ वर Platelet transfer केल्याबाबतची पावतीही दाखल आहे. वरील सर्व कागदपत्रे पाहता सामनेवाला यांनी तक्रारदार नं.१ याचे आजाराचे निदान करण्यासाठी आवश्यक असणा-या सर्व वैद्यकिय तपासण्या केलेल्या आहेत व त्यानुसार आवश्यक तो औषधोपचाराही केल्याचे स्पष्ट होत आहे. तक्रारदारने तक्रारीत बाळाला जवाहर मेडिकल फाऊंडेशन येथे दि.१६/०५/२००८ ते दि.११/०६/२००८ पावेतो वैद्यकिय देखरेखीखाली ठेवण्यात आले होते असे नमूद केलेले आहे. परंतु तिथे बाळावर कोणत्या प्रकारचा वैद्यकिय इलाज (Medical treatment) करण्यात आला या संदर्भात कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाही. तक्रारदार यांचे म्हणणेनुसार जवाहर मेडीकल फाऊंडेशन येथील तपासणीत बाळाच्या शरीरात साखरेचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले. परंतु सदर बाब ही सामनेवाला नं.३ यांनी त्यापुर्वीच म्हणजे दि.१२/०५/२००८ रोजी ज्यावेळी बाळाला त्यांचेकडे आणले होते त्याचवेळी तक्रारदारचे निदर्शनास आणून दिले होते व त्यानुसार योग्य तो औषधोपचारही सामनेवाला नं.३ यांनी केलेला होता. त्याबाबतची नोंदही सामनेवाला नं.३ यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांतील पान नं.९ वर नमूद आहे. तसेच तक्रारदार यांनी सामनेवाला यांनी वैद्यकिय ईलाज करतांना निष्काळजीपणा केलेला आहे हे सिध्द करण्यासाठी त्यांचे वतीने कोणताही वैद्यकिय तज्ज्ञ अहवाल आपले तक्रारीसोबत दाखल केलेला नाही. यावरून सामनेवाला यांनी वैद्यकिय इलाज करून कोणताही निष्काळजीपणा व हलगर्जीपणा दाखवून तक्रारदारास सदोष सेवा दिल्याचे सिध्द होत नाही, या मतास आम्ही आलो आहोत म्हणून मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
२६. मुद्दा क्र.३ – वरील विवेचनावरून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहेात.
आ दे श
१. तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
२. दोन्ही पक्षांनी आपआपला खर्च सोसावा.
धुळे.
दि.२८/०१/२०१४
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी) सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.