तक्रारदारातर्फे अॅड. श्री. लोंढे हजर.
जाबदेणार क्र. 2 व 3 तर्फे अॅड. श्रीमती तारे हजर
जाबदेणार क्र. 1, 4 व 5 तर्फे अॅड. राजे हजर
द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
** निकालपत्र **
(14/02/2014)
प्रस्तुतची तक्रार ग्राहकाने जाबदेणार बँकेविरुद्ध ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 नुसार सेवेतील त्रुटीकरीता दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालीलप्रमाणे आहेत.
1] तक्रारदार हे मयत सौ. सुप्रिया राजीव जोशी यांचे वारसदार आहेत. सौ. सुप्रिया राजीव जोशी या मयत डॉ. रंगनाथ जनार्दन वाटवे यांच्या कन्या होत्या व डॉ. वाटवे यांनी केलेल्या इच्छापत्राच्या लाभार्थी होत्या. जाबदेणार हे बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्यालय आणि इतर शाखा आहेत. मयत डॉ. रंगनाथ जनार्दन वाटवे यांनी दि.22/8/1985 रोजी इच्छापत्र केले होते आणि त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी जाबदेणार क्र. 2 व 3 यांनी स्विकारलेली होती. डॉ. रंगनाथ जनार्दन वाटवे यांचे दि.12/11/1994 रोजी निधन झाले. डॉ. रंगनाथ जनार्दन वाटवे आणि सौ. सुप्रिया जोशी यांच्या संयुक्त नावाने जाबदेणार यांच्या अमरावती शाखेमध्ये दि. 15/12/1992 रोजी रक्कम रु.55,000/- ची मुदतठेव ठेवलेली होती व दि. 4/7/1991 रोजी रक्कम रु. 3,400/- अमरावती येथील रुक्मिणीनगर शाखेत गुंतविले होते. सदरच्या रकमा या “Either or Survivor” म्हणून गुंतविलेल्या होत्या. त्यामुळे जी व्यक्ती हयात असेल त्या व्यक्तीस सदरच्या रकमा देण्यात याव्यात अशा सुचना देण्यात आलेल्या होत्या. परंतु सदरच्या ठेवींच्या रकमा सौ. सुप्रिया जोशी यांना दिल्या नाहीत. सदरच्या ठेवींची पुनर्गुंतवणुक केली असती तर तक्रारदारांना रक्कम रु. 3,43,772/- व रु.31,700/- इतकी रक्कम मिळाली असते. सौ. सुप्रिया जोशी यांचे दि. 7/2/2012 रोजी निधन झाले, म्हणून तक्रारदार यांनी सदरची रक्कम मिळावी अशी विनंती केली. परंतु जाबदेणार यांनी सदरची रक्कम दिली नाही. त्यामुळे सौ. सुप्रिया जोशी यांना मिळालेली रक्कम वगळून फरकाची रक्कम तक्रारदारांना देण्यात यावी, अशी विनंती तक्रारदारांनी केली. सदरची विनंती जाबदेणार यांनी नाकारली, त्यामुळे जाबदेणार यांनी निकृष्ट दर्जाची सेवा दिली म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली.
2] जाबदेणार यांनी प्रस्तुत प्रकरणी हजर होवून लेखी कैफियत दाखल करुन तक्रारीतील कथने नाकारली. जाबदेणार यांच्या कथनानुसार, दोन मुदत ठेवींपैकी रक्कम रु. 55,000/- च्या मुदत ठेवीची रक्कम सौ. सुप्रिया जोशी यांनी बॉंन्ड लिहून देऊन त्यांच्या हयातीमध्ये स्विकारलेली होती व त्यावेळी व्याजाबाबत कोणतीही तक्रार करणार नाही, असे लिहून दिले होते. या रकमेसंबंधी वारसांमध्ये वाद होता त्यामुळे सदरची रक्कम वारसांना देता आली नाही. त्याचप्रमाणे संबंधीत रकमेची पुनर्गुंतवणुक करावी, अशा कोणत्याही सुचना जाबदेणार यांना दिलेल्या नव्हत्या. त्यामुळे तक्रारदार हे केवळ बचत खात्याच्या व्याजास पात्र आहेत. यामध्ये जाबदेणार यांनी कोणत्याही प्रकारची निकृष्ट दर्जाची सेवा तक्रारदार यांना दिलेली नाही, त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार फेटाळण्यात यावी, अशी विनंती जाबदेणार करतात.
3] दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदोपत्री पुरावे, लेखी कथने आणि तोंडी युक्तीवाद विचारात घेता खालील मुद्दे निश्चित करण्यात येत आहेत. सदरचे मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालीलप्रमाणे-
अ.क्र. | मुद्ये | निष्कर्ष |
1. | जाबदेणार यांनी तक्रारदार यांना मुदत ठेवीची रक्कम परत न देऊन निकृष्ट दर्जाची सेवा दिली आहे का ? | अंशत: होय |
2. | अंतिम आदेश काय ? | तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते |
कारणे
4] दोन्ही बाजूंनी दाखल केलेले कागदपत्रे व युक्तीवादाचे अवलोकन केले असता असे स्पष्ट होते की, तक्रारदार यांचे पूर्वहक्कदार सौ. सुप्रिया जोशी यांचे नावे दोन मुदत ठेवी होत्या. त्यापैकी रक्कम रु. 55,000/- च्या मुदत ठेवीची रक्कम सौ. सुप्रिया जोशी यांना व्याजासह मिळाल्याबाबत फारशी तक्रार नाही. या संदर्भात तक्रारदार यांच्या कथनानुसार, बँकेने सदरच्या रकमेची दि. 15/12/1994 नंतर पुनर्गुंतवणुक केली नाही म्हणून सौ. सुप्रिया जोशी यांचे नुकसान झाले. तथापी, या मंचासमोर सौ. सुप्रिया जोशी यांनी सदरच्या रकमेची पुनर्गुंतवणुक करावी, अशा सुचना दिल्याबद्दलचा कोणतीही पुरावा नाही. सौ. सुप्रिया जोशी यांनी त्यांच्या हयातीमध्ये या रकमेबाबत कोणताही वाद उपस्थित केला नव्हता, त्यामुळे त्यासंबंधी वारसांना वाद उपस्थित करण्याचा अधिकार नाही.
दुसरी मुदतठेव ही रक्कम रु. 3,400/- ची होती. सदरच्या मुदत ठेवीची रक्कम जाबदेणार यांनी तक्रारदार यांना दिल्याबाबतचा कोणताही पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. त्यामुळे सदर रक्कम न देऊन जाबदेणार यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे, हे स्पष्ट होते. तक्रारदार यांच्या कथनानुसार, सदरची रक्कम जाबदेणार बँकेने मुदतठेव खात्यामध्ये गुंतवुन त्यावर 13% व्याज देणे क्रमप्राप्त होते. परंतु ठेवीदारांनी जर तशाप्रकारच्या सुचना दिल्या नसतील तर सदरची रक्कम मुदतठेव खात्यामध्ये पुनर्गुंतवणुक केली पाहीजे, असे बंधन जाबदेणार बँकेवर नाही. जाबदेणार बँक ही सदरच्या रकमेवर बचत खात्याप्रमाणे 3.5% व्याजदर देण्यास तयार होती व आहे. अशा परिस्थितीमध्ये, तक्रारदार हे रक्कम रु. 3,400/- वर दि.4/7/1991 पासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत 3.5 % व्याज मिळण्यास पात्र आहेत. या अनुषंगाने प्रस्तुतचा मंच अशा निष्कर्षास येतो की, जाबदेणार यांनी मुदतीमध्ये रक्कम परत न करुन तक्रारदार यांना निकृष्ट दर्जाची सेवा दिल्ली आहे. वर उल्लेख केलेले मुद्दे, निष्कर्षे आणि कारणे यांचा विचार करता, खालील आदेश पारीत करण्यात येतो.
** आदेश **
1. तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात
येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.3,400/-
(रु. तीन हजार चारशे फक्त) द.सा.द.शे. 3.5%
व्याजदराने दि. 4/7/1991 पासून ते संपूर्ण रक्कम
मिळेपर्यंत, त्याचप्रमाणे मानसिक व शारीरिक त्रासापोटी
नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु. 2,000/- (रु. दोन
हजार फक्त) आणि तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-
(रु. एक हजार फक्त) या आदेशाची प्रत मिळाल्यापासून
सहा आठवड्यांच्या आंत द्यावे.
3. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात यावी.
4. दोन्ही पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात
की त्यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक
महिन्याच्या आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे
संच घेऊन जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट
करण्यात येतील.
स्थळ : पुणे
दिनांक : 14/फेब्रु./2014