::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- ११/०८/२०१७)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
2. तक्रारदारकर्ता हा स्वतः व स्वतःच्या परिवाराच्या उदरनिर्वाहाकरिता अन्य जिल्हयांतून किरकोळ कपडयांची खरेदी करून तो रस्त्यांवर विकून आपला चरितार्थ चालवितो. तक्रारकर्त्याने दिनांक 26/1/2015 रोजी इंदौर येथून रू.1,24,394/- किमतीच्या कापडाची खरेदी केली. त्यांचे एकूण वजन 2 क्विंटल 10 किलो इतके होते. तक्रारकर्त्याने वि.प.क्र.4 यांच्याकडे सदर मालाचे चार नग पार्सल इंदोर रेल्वे स्टेशन येथून बल्लारशा रेल्वे स्टेशन येथे पाठविण्यासाठी बूक केले त्याकरीता रू.830/- पार्सल शुल्क अदा केले. तेंव्हा वि.प.क्र.4 यांनी 3-4 दिवसांत पार्सल वि.प.क्र.3 कडे बल्लारशा येथे पोहचतील असे आश्वासन दिले. मात्र पार्सल बुकींगनंतर 3-4 दिवसांनी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र. 3 यांच्याकडे मालाच्या डिलीव्हरीबाबत विचारणा केली असता अजून माल वि.प. 3 कडे पोहचला नसून मालाबाबत वि.प.क्र. 4 कडे विचारपूस करण्यांस सांगून परत पाठविण्यात आले. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने वि.प.क्र.4 कडे विचारणा केली असता त्यांनी याबाबत वि.प.1 व 2 यांच्याकडे चौकशी करण्यांस सांगितले. सदर पार्सलकरीता तक्रारकर्त्याला वि.प.क्र.2 व 3 कडे वारंवार जावे लागले परंतु त्यांनी तक्रारीचे निराकरण न करता उडवा उडवीची उत्तरे दिली. तक्रारकर्त्याने दिनांक 27/6/2015 रोजी वि.प.क्र.1 ते 3 यांना पत्र पाठवून माल प्राप्त झाला नसल्यामुळे योग्य कार्यवाही करण्याची विनंती केली. परंतु पत्र प्राप्त होवूनही वि.प.1 ते 3 यांनी पत्राचे उत्तरही दिले नाही व पुर्ततादेखील केली नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याप्रती अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला असून त्रुटीपूर्ण सेवा दिलेली आहे. सबब तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्याविरूध्द मंचासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरूध्द पक्ष क्र.1 ते 4 यांनी तक्रारकर्त्याला, त्याने बूक केलेल्या कपडयांचे मालाचे पार्सलची डिलीव्हरी द्यावी किंवा सदर मालाची किंमत रू.1,24,394/- त्यावर द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह परत करण्याचे आणि आर्थीक नुकसानापोटी भरपाई रू.1 लाख व शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान भरपाई रू.50,000/- तसेच तक्रार खर्चापोटी रू.10,000/- विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला देण्याबाबत आदेश पारीत करण्यांत यावेत अशी विनंती केली.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन विरूध्द पक्ष यांच्याविरुध्द नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 हे मंचासमक्ष हजर होवून त्यांनी, विस्तृत लेखी उत्तर दाखल करण्याचे अधिकार अबाधीत ठेवून प्राथमीक आक्षेपासह लेखी म्हणणे दाखल केले आहे.
4. विरूध्द पक्ष यांनी प्राथमीक आक्षेप नोंदवित नमूद केले आहे की, प्रस्तुत वाद हा विरूध्द पक्ष रेल्वेला वाहतुकीकरीता दिलेले पार्सल तक्रारकर्त्याला विहीत स्थळी प्राप्त न झाल्याबाबतचा आहे. रेल्वे क्लेम्स ट्रिब्युनल अॅक्ट,1987 च्या कलम 13 अन्वये, रेल्वेला वाहतुकीकरीता दिलेले पार्सल प्राप्त न झाल्याबाबतच्या वादावर निवाडा देण्याचे अधिकार रेल्वे क्लेम्स ट्रिब्युनलला देण्यांत आले असून सदर कायद्याचे कलम 15 अन्वये अशा विवादांवर निवाडा करण्याचे इतर न्यायासने तसेच अधिकारी यांचे अधिकारक्षेत्र समाप्त (oust) करण्यांत आलेले आहे. त्यामुळे विद्यमान मंचाला प्रस्तुत वादावर निवाडा करण्याचे अधिकारक्षेत्र नाही व या कारणास्तव प्रस्तूत तक्रार खारीज करण्यांस पात्र आहे. तसेच विरूध्द पक्ष यांनी तक्रारीतील उर्वरीत कथन नाकबूल केले असून प्रस्तूत तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
5. विरूध्द पक्ष क्र.4 यांनीदेखील मंचासमक्ष हजर होवून पुरसीस दाखल करून विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचे लेखी म्हणणे हेच त्यांचेदेखील लेखी म्हणणे समजण्यांत यावे,अशी विनंती केली आहे.
6. तक्रारदारांची तक्रार, दस्ताऐवज, शपथपत्र, तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे, लेखी उत्तरालाच शपथपत्र समजण्यांत यावे अशी पुरसीस तसेच लेखी युक्तीवाद, उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता विरूध्द पक्षांचा ग्राहक आहे काय ? : होय
2) मंचास प्रस्तुत तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र आहे काय ? नाही
3) अंतीम आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 ः-
7. तक्रारकर्त्याने दिनांक 26/1/2015 रोजी इंदौर येथून रू.1,24,394/- किमतीच्या कापडाची खरेदी केली व दिनांक 26/1/2015 रोजी सदर मालाचे चार नग पार्सल तयार करून वि.प.क्र.4 यांच्याकडे रू.830/- पार्सल शुल्क भरून सदर पार्सल इंदोर रेल्वे स्टेशन येथून बल्लारशा रेल्वे स्टेशन येथे पोचविण्यासाठी बूक केले. याबाबत वि.प.क्र.4 यांनी दिलेली पावती प्रकरणात दस्त क्र.अ-4 वर दाखल आहे. शिवाय ही बाब विरूध्द पक्षांसदेखील मान्य असल्याने तक्रारकर्ता हा विरूध्द पक्षाचा ग्राहक आहे हे सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
8. तक्रारकर्त्याने दिनांक 26/1/2015 रोजी इंदौर रेल्वे स्टेशन येथून बल्लारशा रेल्वे स्टेशन येथे कपडयाचे चार नग पार्सल पोचविण्यासाठी बूक केले. परंतु सदर पार्सल बल्लारशा रेल्वे स्टेशन येथे तक्रारकर्त्यांस प्राप्त झाले नसल्याने तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्याकडे अर्ज केला. तरीही पार्सल प्राप्त झाले नाही अशी तक्रारकर्त्याची तक्रार आहे. परंतु रेल्वे क्लेम्स ट्रिब्युनल अॅक्ट,1987 च्या कलम 13 अन्वये, रेल्वेला वाहतुकीकरीता दिलेले प्राणी व माल हे खराब झाल्यांस, हरविल्यांस, अप्राप्त असल्यांस त्यासंबंधीचे वादावर निवाडा देण्याचे अधिकार रेल्वे क्लेम्स ट्रिब्युनलला देण्यांत आले असून सदर कायद्याचे कलम 15 अन्वये अशा विवादांवर निवाडा करण्यासाठी रेल्वे क्लेम्स ट्रिब्यनल्सलाच विशेषाधिकार देण्यांत आले असून इतर न्यायासने तसेच अधिकारी यांचे अधिकारक्षेत्र समाप्त करण्यांत आलेले आहे.तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्याकडे बुक केलेले सदर मालाचे पार्सल हे प्राप्त झाले नाही व सदर वाद हा माल प्राप्त न झाल्याबाबत असल्यामुळे कलम 13 व15 अंतर्गत सदर वादावर केवळ रेल्वेक्लेम्स ट्रिब्युनल्स यांनाच निवाडा देण्याचे अधिकार असल्यामुळे विद्यमान मंचाला प्रस्तुत वादावर निवाडा करण्याचे अधिकारक्षेत्र नाही असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याला त्याचा वाद सोडवून घेण्यासाठी उचीत न्यायासनाकडे जाण्याची मुभा देवून प्रस्तूत तक्रार निकाली काढण्यात येते..
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
9. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.208/15, अधिकार क्षेत्राअभावी निकाली काढण्यात
येते तसेच तक्रारकर्त्यांस वादाचे निराकरण करून घेण्यासाठी उचीत
न्यायासनाकडे जाण्याची मुभा देण्यांत येते.
(2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
चंद्रपूर
दिनांक – ११/०८/२०१७
( अधि.कल्पना जांगडे (कुटे) ) ( अधि. किर्ती गाडगिळ (वैदय) )( श्री उमेश व्ही.जावळीकर)
मा.सदस्या. मा.सदस्या. मा. अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.