::निकालपत्र::
(पारीत व्दारा-श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष.)
(पारीत दिनांक– 30 नोव्हेंबर, 2017)
01. तक्रारकर्त्याने ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) मुख्य व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, शाखा काटोल, जिल्हा नागपूर, विरुध्दपक्ष क्रं-2) विभागीय व्यवस्थापक, बँक ऑफ इंडीया, नागपूर आणि विरुध्दपक्ष क्रं-3) मुख्य व्यवस्थापक, भारतीय रिझर्व्ह बँक, नागपूर यांचे विरुध्द सेवेतील कमतरता आणि निष्काळजीपणा या कारणां वरुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारकर्त्याचे तक्रारी नुसार संक्षीप्त कथन पुढील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचे विरुध्दपक्ष क्रं-1) बॅंक ऑफ इंडिया, शाखा काटोल, जिल्हा नागपूर मध्ये बचतखाते क्रं-87161000020019 दिनांक-10/08/2001 पासून आहे. विरुध्दपक्ष क्रं-1) बँके तर्फे तक्रारकर्त्याला एक ए.टी.एम. कॉर्ड दिलेले आहे. दिनांक-20/11/2014 ते 05/12/2014 या कालावधीत कोण्यातरी अज्ञात व्यक्तीने तक्रारकर्त्याच्या खात्यातून थोडे-थोडे करुन रुपये-1572/- एवढी रक्कम काढली, ही बाब लक्षात आल्यावर त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) ला त्याची सुचना दिली आणि ए.टी.एम. कॉर्डचा पिन क्रमांक बदलवून मागितला, जो बँकेने बदलवून सुध्दा दिला, परंतु त्या नंतरही पुन्हा त्याच्या बचतखात्यातून वेगवेगळया तारखांना काही रकमा काढण्यात आल्यात, तेंव्हा त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) ला त्याची ए.टी.एम. सुविधा बंद करण्या बाबत अर्ज दिला आणि ए.टी.एम. कॉर्ड परत केले. परंतु त्यानंतर सुध्दा त्याच्या बचतखात्यातून थोडे-थोडे करुन रकमा काढण्यात आल्यात, दिनांक-09/11/2015 ते दिनांक-01/12/2015 या कालावधीत रुपये-177/- एवढी रक्कम काढण्यात आली. अशाप्रकारे त्याच्या बचत खात्यातून थोडया-थोडया अंतराने रकमा काढून एकूण रुपये-41,496/- एवढी रक्कम काढण्यात आली, त्या बाबतीत त्याने दिनांक-10/11/2015 रोजी विरुध्दपक्ष क्रं-1) कडे लेखी तक्रार दाखल करुन काढलेली रक्कम परत त्याच्या बचत खात्यात जमा करण्याची विनंती केली परंतु ब-याच तक्रारी दिल्या नंतर सुध्दा काहीही कार्यवाही झाली नाही.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं-1) ने त्याला असे सांगितले की, त्याची तक्रार बँकींग लोकपाल, मुंबई यांचे कडे पाठविली असून त्यांच्या सुचने नुसर कारवाई करण्यात येईल. त्यानंतर काही दिवसानीं विरुध्दपक्ष क्रं-3) यांनी तक्रारकर्त्याच्या सर्व तक्रारी या बँकींग लोकपाल, मुंबई यांच्या निर्णया प्रमाणे बंद केल्यात. अशाप्रकारे विरुध्दपक्षांच्या निष्काळजीपणामुळे आणि सेवेतील कमतरते मुळे तक्रारकर्त्याचे आर्थिक नुकसान झाले, म्हणून या तक्रारीव्दारे त्याने त्याच्या बचतखात्यातून काढल्या गेलेली एकूण रक्कम रुपये-41,496/- द.सा.द.शे.18% दराने व्याजासह परत त्याचे बचत खात्यात जमा करण्याचे आदेशित व्हावे. याशिवाय त्याला झालेल्या त्रासा बद्दल रुपये-50,000/- नुकसान भरपाई आणि रुपये-20,000/- तक्रारीचा खर्च विरुध्दपक्षां कडून मिळावा अशी विनंती केली.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) बँक ऑफ इंडिया तर्फे लेखी जबाब दाखल करुन तक्रार नामंजूर केली. तक्रारकर्त्याचे विरुध्दपक्ष क्रं-1) बँक ऑफ इंडिया, शाखा काटोल, जिल्हा नागपूर बॅंकेत बचतखाते असून त्याच्या बचत खात्यातून कोणी तरी अज्ञात व्यक्तीने दिनांक-20/11/2014 ते 05/12/2014 या कालावधीत थोडे थोडे करुन रुपये-1572/- काढले ही बाब कबुल केली परंतु हे नाकबुल केले की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) ला तोंडी सांगून ए.टी.एम. चा पिन क्रमांक बदलवून मागितला होता आणि तो विरुध्दपक्ष क्रं-1) ने बदलवून दिला होता.
त्यांचे पुढे असे म्हणणे आहे की, बँकींग नियमा नुसार ए.टी.एम.कॉर्ड खातेदाराला दिल्या नंतर त्याचा पिन क्रमांक असलेले सिल बंद पत्र खातेदाराला देण्यात येते आणि खातेदाराला लेखी व तोंडी सुचना दिलेली असते की, पिन क्रमांक हा खातेदाराचा खाजगी क्रमांक असून तो कोणासही सांगण्यात येऊ नये, थोडक्यात खातेदाराने त्याचा पिन क्रमांक हा गोपनीय ठेवायचा असतो. तक्रारकर्त्याला याची पूर्ण जाणीव असतानाही त्याने त्याचे ए.टी.एम. कॉर्डचा पिन क्रमांक कोण्या तरी अज्ञात व्यक्तीला त्याचा फोन आल्यावर सांगितला. तसेच संबधित खातेदाराला बँक त्याचे ए.टी.एम. कॉर्डचा पिन क्रमांक कधीही बदलवून देत नाही तर खातेधारकाला स्वतः ए.टी.एम. सेंटरवर जाऊन ए.टी.एम. कॉर्डचे सहाय्याने पिन क्रमांक बदलावा लागतो. तक्रारकर्त्याच्या स्वतःच्या निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणामुळे त्याच्या बचत खात्यातून कोण्या तरी अज्ञात व्यक्तीने पैसे काढलेत, त्याच्या खात्याची संपूर्ण माहिती तक्रारकर्त्याने अज्ञात व्यक्तीला सांगितल्यामुळे इंटरनेट व्दारे त्या अज्ञात व्यक्तीने तक्रारकर्त्याचे खाते हॅक करुन पैसे काढलेत, त्यासाठी विरुध्दपक्षाला जबाबदार धरता येणार नाही.
विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) बँक ऑफ इंडिया तर्फे पुढे असे नमुद करण्यात आले की, तक्रारकर्त्याने या धोखागडी बाबत विरुध्दपक्ष क्रं-1) ला एक वर्षा पेक्षा जास्त कालावधी होऊनही माहिती दिली नव्हती, सदर्हू माहिती विरुध्दपक्षाला पहिल्यांदा दिनांक-09/11/2015 ला दिली, त्यावेळी विरुध्दपक्षाने त्याला लगेच पोलीस तक्रार करण्यास सांगितले आणि त्याच्या बचत खात्यात जमा असलेली रक्कम रुपये-1,67,171/- पैकी रुपये-1,67,000/- एवढी रक्कम फीक्स डिपॉझिट करण्याचा सल्ला देऊन ती फीक्स डिपॉझीट करण्यात आली व तात्काळ त्याचे ए.टी.एम. कॉर्ड नष्ठ करण्यात आले. तसेच खात्याच्या विमा रकमेचा मोबदला म्हणून विरुध्दपक्षाने विमा कंपनीकडे दावा दाखल केला होता परंतु तक्रारकर्त्याच्या निष्काळजीपणामुळे तो दावा खारीज झाला होता. अशाप्रकारे विरुध्दपक्षाचे सेवेत कुठलीही त्रृटी नव्हती आणि तक्रारकर्त्याचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केलेत. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) बँक ऑफ इंडिया तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-3) रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया तर्फे लेखी उत्तर दाखल करण्यात आले, त्यांचे उत्तरात तक्रारकर्ता हा त्यांचा ग्राहक होत नसल्याने सदर तक्रार त्यांचे विरुध्द ग्राहक मंचा समक्ष चालू शकत नाही. तसेच त्यांनी तक्रारकर्त्याला कुठलीही सेवा पुरविलेली नाही आणि त्यांच्यात व तक्रारकर्त्या मध्ये कुठलाही करार अस्तित्वात नाही. तक्रारकर्त्याची तक्रार आल्या नंतर त्यांनी ती तक्रार बँकींग लोकपाल, मुंबई यांचेकडे पाठविली होती, जी त्यांनी नस्तीबध्द केली आहे. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं-3) यांचे सेवेत कुठलीही कमतरता होती किंवा निष्काळजीपणा होता हा आरोप नाकबुल करुन तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
05. तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री ताईले, विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) बँक ऑफ इंडीया तर्फे वकील श्री गजभिये आणि विरुध्दपक्ष क्रं-3) रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया तर्फे अधिकारी श्री भगत यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला.तक्रारकर्त्याची तक्रार, तक्रारी वरील विरुध्दपक्षांची लेखी उत्तरे उभय पक्षांतर्फे दाखल दाखल दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले, यावरुन अतिरिक्त ग्राहक मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
06. या बद्दल वाद नाही की, तक्रारकर्त्याच्या बचत खात्यातून वेळोवेळी कोण्या तरी अज्ञात व्यक्तीने रकमा काढलेल्या होत्या, त्या रकमा ए.टी.एम. कॉर्डव्दारे आणि नेट बँकींग व्दारे काढण्यात आल्या होत्या. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, त्याच्या बचत खात्यातून त्या रकमा ए.टी.एम.कॉर्डव्दारे किंवा नेट बँकींग व्दारे काढलेल्या नाहीत आणि म्हणून या संबधी त्याने विरुध्दपक्षा विरुध्द धोखागडी आणि निष्काळजीपणाचा आरोप केलेला आहे.
07. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) बँक ऑफ इंडीया तर्फे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याने स्वतः ए.टी.एम. कॉर्डचा पिन क्रमांक आणि खात्याची गोपनीय माहिती एका अज्ञात व्यक्तीला फोनव्दारे सांगितली आणि त्या व्यक्तीने त्याचा दुरुपयोग करुन त्याच्या खात्यातून पैसे काढलेत, अशाप्रकारे तक्रारकर्ता स्वतःच या गोष्टीस जबाबदार आहे.
08. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) बँक ऑफ इंडीयाचे वकीलानीं आमचे लक्ष तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या एफ.आय.आर.च्या प्रतीकडे वेधले, पोलीसांना या घटने बाबत लेखी तक्रार दिली होती, ज्यामध्ये तक्रारकर्त्याने असे नमुद केलेले आहे की, त्याला एक अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता आणि त्या व्यक्तीने त्याला ए.टी.एम. कॉर्डचा पिन क्रमांक विचारला होता, त्यावेळी तक्रारकर्त्याने ए.टी.एम. कॉर्डचा पिन क्रमांक त्या व्यक्तीला सांगितला होता. काही दिवसा नंतर जेंव्हा तक्रारकर्त्याने आपले बचत खाते पाहिले त्यावेळी त्याच्या लक्षात आले की, त्याच्या खात्यातून कोणी तरी थोडे थोडे करुन रुपये-1572/- काढलेले आहेत. तपासाअंती असे निष्पन्न झाले की, एक व्यक्ती विशीष्ट मोबाईल नंबरचे सहाय्याने खात्यातून वेळोवेळी पैसे काढत होता, त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरुध्द फसवणूक आणि धोखागडीचा गुन्हा दाखल केला होता.
09. तक्रारकर्त्याने एफ.आय.आर. मध्ये दिलेल्या या तक्रारी वरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने स्वतःहून अज्ञात व्यक्तीला ए.टी.एम.कॉर्डचा पिन क्रमांक दिला होता आणि त्या व्यक्तीने त्याचे सहाय्याने त्याच्या खात्यातून पैसे काढले होते, यामध्ये तक्रारकर्त्याची सर्वस्वी चुक तसेच शुध्द हलगर्जीपणा आणि निष्काळजीपण दिसून येतो. बँकेचे खाते आणि ए.टी.एम.कॉर्डचे संबधीची माहिती ही गोपनीय असून ती इतर कोणत्याही व्यक्तीला सांगण्यात येऊ नये या बाबत बँक आणि सरकार वेळावेळी जनतेला जाहिर सुचनेव्दारे सुचित करीत असते, बँक सुध्दा या बाबतची माहिती त्यांच्या खातेदारांना कधीही विचारत नाही, त्यामुळे या वस्तुस्थिती वरुन असे म्हणता येणार नाही की, यामध्ये विरुध्दपक्षांचा कुठलाही निष्काळजीपणा किंवा चुक होती, उलटपक्षी तक्रारकर्ता स्वतः त्याला झालेल्या आर्थिक नुकसानी संबधी जबाबदार आहे.
10. हे प्रकरण तक्रारकर्त्याच्या स्वतःच्या हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे ऑन लाईन धोखागडीचे आहे, ज्यासाठी विरुध्दपक्षानां कुठल्याही प्रकारे जबाबदार धरता येऊ शकत नाही. याउलट, विरुध्दपक्ष क्रं-1) ने तक्रारकर्त्याचे झालेले नुकसान भरुन मिळावे म्हणून विमा दावा सुध्दा दाखल केला होता परंतु तक्रारकर्त्याच्याच हलगर्जीपणामुळे तो विमा दावा सुध्दा खारीज झाला, यावरुन हे दिसून येते की, विरुध्दपक्ष क्रं-1) हा तक्रारकर्त्याचे नुकसान होऊ नये म्हणून जागरुक आणि दक्ष होता आणि त्यासाठी त्याने प्रयत्न सुध्दा केलेत.
11. तक्रारकर्त्याने एका तिस-या व्यक्तीने त्याच्या खात्या संबधी झालेल्या धोखागडी प्रकरणाची माहिती मिळविण्यासाठी माहिती अधिकारा अंतर्गत केलेल्या अर्जाच्या प्रती दाखल केल्यात परंतु ते सर्व अर्ज नामंजूर करण्यात आले होते कारण ज्या व्यक्तीने हे अर्ज केले होते, त्याचा, तक्रारकर्त्याचे खात्याशी काहीही संबध नव्हता. त्याच प्रमाणे झालेल्या धोखागडी संबधीचा रिपोर्ट ब-याच कालावधी नंतर देण्यात आला. रुपये-1572/- ही रक्कम नोव्हेंबर ते डिसेंबर-2014 या कालावधीत काढण्यात आली होती परंतु त्याची सुचना विरुध्दपक्षाला नोव्हेंबर-2015 मध्ये देण्यात आली होती. तसेच पोलीसांना रिपोर्ट दिनांक-18/07/2016 रोजी देण्यात आला. अशाप्रकारे झालेल्या धोखागडी संबधी विलंबने रिपोर्ट दिल्याने हे दिसून येते की, तक्रारकर्ता स्वतःच या बाबतीत जागरुक होता, ग्राहक तक्रार सुध्दा सन-2017 मध्ये दाखल करण्यात आली, जेंव्हा की, घटना सन-2014 मध्ये झाली होती आणि म्हणून ती मुदतबाहय सुध्दा झालेली आहे.
12. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन ही तक्रार खारीज होण्यास पात्र असल्याने, अतिरिक्त ग्राहक मंचा तर्फे या तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
::आदेश::
1) तक्रारकर्ता श्री प्रमोद पुंडलिक रेवतकर यांची, विरुध्दपक्ष क्रं-1) मुख्य व्यवस्थापक, बँक ऑफ इंडीया, शाखा काटोल, जिल्हा नागपूर, विरुध्दपक्ष क्रं-2) विभागीय व्यवस्थापक, बँक ऑफ इंडीया, नागपूर-01 आणि विरुध्दपक्ष क्रं-3) मुख्य व्यवस्थापक, भारतीय रिझर्व्ह बँक, नागपूर यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
2) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
3) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.